Sign In New user? Start here.

interview of Mazha Mee Team

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘माझा मी’ टीमशी ऑनलोकेशन धमाल गप्पा....

   मड आयलंड येथील परेरा बंगल्यावर निसर्गाच्या सानिध्यात ‘माझा मी’ या आगामी मराठी सिनेमाचं शूट चालू होतं. सकाळी ११ ची वेळ...सगळीकडे सेट लावण्याची धावपळ, कॅमेरा अ‍ॅंगल्सचं सेटींग, स्टार्सचं मेकअप, वर आकाशात भिरक्या घालणा-या हेलिकॉप्टरचा घरररररररर.....आवाज असं धमाल वातावरण...शॉटसाठी जरा वेळच होता. मग अभिनेता प्रसाद ओक, माधव देवचक्के, अभिनेत्री मनीषा केळकर, समीधा गुरू, नंदिनी वैद्य, श्रॄती वनगे, निर्माते अतुल वनगे आणि निर्माता - दिग्दर्शक निनाद वनगे यांना एकत्र बोलवून त्यांच्याशी सॉलीड धमाल मस्ती करत या सिनेमाबद्दल गप्पा सुरू झाल्या...

   सर्व टीम माझ्यासमोर एका लाईनमध्ये बसलेली...दिग्दर्शक निनाद यांनीच सिनेमाच्या विषयापासून सुरवात केली. ‘हा सिनेमा माझे मोठे भाऊ आणि या सिनेमाचे निर्माते अतुल वनगे यांच्या एका कवितेवर आधारीत आहे. अनेक वर्षांपासून सिनेमा करायचा विचार चालू होता. शेवटी मागच्या वर्षी सगळी जमवाजमव केली आणि सिनेमा पूर्ण झालाय. सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी आधीपासूनच प्रसादचा विचार आम्ही केला होता. ही भूमिका प्रसादच करणार यावर आम्ही ठाम होतो. सोबतच माझा दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असल्याने खरोखर खूप मजा आली’. बोलणं कमी आणि काम जास्त अशा वृत्तीच्या या दिग्दर्शकानंतर मुळातच मीत भाषी असलेल्या अतुल वनगे यांनी थेट सिनेमाच्या विषयाकडे लक्ष वेधले, ‘‘माझा मी’ या सिनेमातून मनोरंजनासोबतच संदेशही देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो स्वत:साठी फार कमी जगत असतो. जसं लहान असताना आई-वडीलांच्या सांगण्याप्रमाणे जगतो, मग प्रेयसी, पत्नी, मुलगा अशा या टप्प्यांमध्ये जगत असताना तो त्याचा कधीच नसतो. हा सिनेमा बघतांना प्रत्येकाला कुठेतरी ही कथा त्यांच्याशी निगडीत असल्याचे जाणवेल. प्रेक्षकांनी हा सिनेमा आवर्जून बघावा आणि वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडतांना स्वत:साठीही कसं जगता येईल याचा विचार करावा असं मला वाटतं’.

   निर्माता आणि दिग्दर्शकाने सिनेमाच्या आशयाबाबत बोलल्यानंतर थेट वळलो स्टार्सकडे...तीन वेगवेगळ्या पिढ्यांची भूमिका प्रसादने या सिनेमात साकारली असून याबद्दल त्याने सांगितले की, ‘कॉलेजमधील तरूण प्रियकर, त्यानंतर एक जबाबदार पती, नंतर एक तत्ववादी वडील अशा तीन वयोगटातील भूमिका एकाच सिनेमात मी पहिल्यांदा करतोय. त्यामुळे त्या त्या वयातील पात्रांच्या आवाजातील बदल, हावभाव-हालचाली, विचार करण्याची पद्धत या सर्वांवर बराच अभ्यास मी केला. खरंतर अशाप्रकारची भूमिका करणं माझ्यासाठी एक आव्हानच होतं आणि माझ्यापरीने मी ही भूमिका उत्तम रेखाटण्याचा प्रयत्न केलाय’. आता या सिनेमात दोन अभिनेत्री आहेत त्यांपैकी कुणासोबत त्याची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन चांगली जमते. यावर तो म्हणाला, ‘समीधा बरोबर मी आधी खूप काम केलंय. पण माझ्या दुदैवाने मी पहिल्यांदाच मनीषाबरोबर काम करतोय. खूप आधीच तिच्याबरोबर काम करायची संधी मिळायला हवी होती’. मनीषाबद्दल प्रसाद असं गमतीने बोलताच एकच हशा उडाला.

   प्रसादची गंमत-मस्ती चालू असतानाच मनीषाला मी भूमिकेबद्दल विचारले, ‘मी या सिनेमात रेशमची भूमिका करतीये. पहिल्यांदा मला जेव्हा ही कथा ऎकवण्यात आली तेव्हा मला पहिले अट्रॅक्ट झालं ते हे की, माझं कॅरेक्टर तीन जनरेशनमध्ये विभागलेलं आहे. एकाच फिल्ममद्ये तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या भूमिका करायला मिळताहेत म्हणजे वॉव...! ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय हवं असतं...! ह्या भूमिका मी खूप एन्जॉय केल्यात..खरंतर आमचे डिरेक्टर, प्रोड्युसर आणि मेकअप मन या सर्वांनी त्यासाठी खूप मदत केली. सोबतच भूमिकेच्या अभ्यासाठी खूप चित्रपट सुद्धा पाहिलेत. अर्थातच माझी आई जिवनकला केळकर यांच्याकडूनही मला खूप शिकायला मिळालं. एक कलाकार म्हणून मी नेहमी शिकत रहाते. असं मी कधीच म्हणणार नाही की, हो मला हे पूर्णपणे येतं. कुणाकडूनही काहीना काही शिकायला मिळतच असतं. आणि हो प्रसादबरोबर काम करण्याचा खूप चांगला अनुभव आला. सुरवातीला तो खूप शांत असायचा मात्र नंतर आम्ही खूप धमाल केली...अ‍ॅज अ अ‍ॅक्टर आणि अ‍ॅज अ ह्युमन सुद्धा तो खूप चांगला आहे. मला खूप सपोर्ट केला त्याने’. धमाल मस्तीची ही मैफल चांगलीच रंगली होती. इतक्यात मी माझी नजर वळवली ती वेगवेगळ्या मालिकांमध्ये व्हॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या समीधा गुरूकडे...मालिकांमध्ये जेवढी निगेटीव्ह आणि कटकारस्तानी ती असते तशी मुळात नाहीये. तिने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले, ‘आतापर्यंत जेवढया मी भूमिका केल्यात त्यापेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. माझ्या भूमिकेला विविध छटा आहेत. ज्यासाठी बरीच मेहनत मला करावी लागली. गाण्यांच्या शूटचं मला बरंच दडपण आलं होतं. सुदैवाने प्रसादबरोबर मी आधी खूप काम केले असल्याने सर्व काम सोपं झालं. प्रेक्षकांना नक्कीच माझ्या इतर भूमिकांप्रमाणे ही वेगळी भूमिकाही आवडेल असा विश्वास आहे’...

   नंदिनी वैद्यची भूमिका सुद्धा सिनेमात अतिशय महत्वाची आहे. तिचे या भूमिकेबद्दलचे एक नाहीतर अनेक किस्से आहेत तिने त्यापैकी काही सांगितले, जेव्हा मला कळे की, मला प्रसादच्या आईची भूमिका करायची आहे तेव्हा मी थोडे शॉक झाले, कारण प्रसादपेक्षा मी वयाने लहान आहे. त्यामुळे भूमिकेचं आव्हान लक्षात घेता या भूमिकेसाठी मी ऑडीशन दिलं आणि ऑडिशनला जीन्स -टॉप अशा अवतारात गेले होते. मला तेव्हाच रिजेक्ट केले. शेवटी खूप विचारानंतर मलाच फायनल केले, मात्र मला हे शेवटपर्यंत सांगण्यात आले नव्हते. सिनेमात माझी भूमिका एका लहान मुलाच्या आईपासून ते एका लग्न झालेल्या नातवाच्या आज्जीची भूमिका आहे. यात गंमत अशी की, मी या सिनेमात प्रसादची आई आणि त्याच्या मुलाची आज्जी आहे. मेकअप आणि अभिनयातून तसे कुठेही जाणवू नये याचा मी प्रयत्न केलाय’.

   सिनेमात प्रसादच्या मुलाची आणि सुनेची भूमिका करणारे माधव देवचक्के आणि श्रृती वनगे ह्यांनीही सिनेमाबद्दल सांगितले. ‘परिवारातील अडचणी, जनरेश गॅपमुळे निर्माण होणारे वाद...मोठ्यांकडून शिकायला मिळालेल्या गोष्टींचा काय प्रभाव होतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती करायची असेल तर कोणत्या मार्गाने जावं. कोणत्या चुका टाळाव्यात. अशा अनेक कौटुंबिक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत ज्यातून आजच्या तरूणांना खूप काही शिकायला मिळले. आणि प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, असे माधव सांगतो. तर अनेक जाहीरातींचा अनुभव असलेली श्रॄती सांगते, ‘मी पहिल्यांदाच फिल्ममद्ये काम करतेय त्यामुळे माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि चांगला अनुभव होता. सेटवर कधीच शूटींगला आल्यासारखे न वाटता एक परिवार एकत्र आलाय असे वाटायचे’.

   गमती-जमती, धमाल-मस्ती करत ही मैफल अशीच चालू होती बोलता बोलता दुपार कधी झाली कळलेच नाही. लन्च टाईम झाल्याने सर्व स्पॉट जेवणाची तयारी करीत होते. मी सुद्धा गप्पांची ही मैफल थोडी उरकती घेतली आणि सर्वांनी धाव घेतली ती लंन्च टेबलकडे...

- अमित इंगोले