Sign In New user? Start here.

 

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

या भूमिकेसाठी मला रिजेक्ट करण्यात आलं होतं - नंदिनी वैद्य

   ‘माझा मी’ हा ‘एव्हीएनव्ही मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत आणि अतुल वनगे-निनाद वनगे निर्मित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आजच्या समाजाचं प्रतिबिंब या सिनेमाच्या कथानकात असून एका माणसाच्या जन्मापासून ते म्हातारपणा पर्यंतची कथा यात रेखाटण्यात आली आहे. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवास सुरू आणि त्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’, ‘मोरूची मावशी’, ‘शांतेचं कारटं चालू आहे’, ‘गोलपिठा’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘डोळे मिटून उघड उघड’ अशा गाजलेल्या नाटकांमधून, तसेच ‘दामिनी’, ‘बंदीनी’, ‘तिसरा डॊळा’, ‘ऋणानुबंध’, ‘रेशीमगाठी’, ‘गहीरे पाणी’, ‘थरार’, ‘कॉमेडी.कॉम’, ‘छत्रपती शिवराय’ अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केलेल्या नंदिनी वैद्य ह्या ‘माझा मी’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. या सिनेमात त्या एका महत्वाच्या भूमिकेत असून त्यांच्या या भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

   * ‘माझी मी’ या सिनेमातील भूमिका तूम्हाला मिळाली कशी ?

   - खरंतर अपघातानेच ही भूमिका माझ्या वाट्याला आली. या सिनेमाशी संबंधीत माझ्या एका मित्राकडून ही भूमिका मला मिळाली, असं म्हणता येईल. त्याने जेव्हा मला सांगितलं की, एका आईचा रोल करायचा आहे. तेव्हा मी विचार केला की, ठिक आहे आता मी या स्टेजला आहे की आईचे रोल्स करू शकते. पण या सिनेमातील आईची भूमिका मालिकांमधील आईपेक्षा खूप वेगळी आहे. जेव्हा मी त्याला विचारले कोणाची आई व्हायचंय, तर तो म्हणाला प्रसाद ओकची...प्रसादचं नाव घेताच मी एकदम शॉक झाले आणि म्हणाले, ‘तू बरा आहेस ना...?’ एकतर मी प्रसादपेक्षा वयाने लहान आहे. कोणत्याच अ‍ॅंगलने त्याची मी शोभणार नाही हे मला माहित होते. मग यावर मी विचार करते असं त्या मित्राला सांगितले. त्यानंतर मी त्याला टाळत होते. त्याचा अनेकदा फोन आला लूक टेस्ट देण्यासाठी...इतक्यांदा मी ते काम टाळत होते आणि पुन्हा पुन्हा ते काम माझ्याकडे येत असल्याने शेवटी मी टेस्टसाठी गेले.

   * ऑडिशनला सिलेक्शन झालं का मग ?

   - मी तेथे गेले ते जिन्स आणि टॉप घालून...माझा तो अवतार पाहून फिल्मचे निर्माते अतुल वनगे एकदम शॉक झाले आणि म्हणाले ही तो रोल करूच शकणार नाही. मला रिजेक्ट करण्यात आले. सिनेमातील माझ्या भूमिकेला खूप शेड्स आहेत आणि ते मी करूच शकणार नाही असं त्यांना वाटले. मात्र, निर्मात्यांना माझ्या मित्राने विश्वास दिला की, ही ती भूमिका चांगली करणार...पण मी सुद्धा स्वत: हा रोल स्विकारताना थोडी साशंक होते. मग मला अचानक आठवलं की, मी जेव्हा वीस वर्षाची होते तेव्हा राज्य नाट्य स्पर्धेत ६० वर्षाच्या म्हातारीचा रोल केला होता आणि त्या रोलसाठी मला गोल्ड मेडल मिळालं होतं. सोबतच मराठी इंडस्ट्रीत म्हाता-या रोल्सचे डबिंग करण्यासाठी मी ब-यापैकी फेमस आहे. याचा फायदा मला ‘माझा मी’ तील नंदीनी करताना होईल आणि म्हणून ती भूमिका मी स्विकारली. शिवाय इतकी वर्ष मी इंडस्ट्रीत काम करतेय पण मला हवा तसा रोल कधीच नाही मिळाला. त्यामुळे हा रोल मी एक चॅलेन्ज म्हणून स्विकारला.

   * शूटींग सुरू झाल्यावर तूला नाही म्हणणा-या निर्मात्यांची काय प्रतिक्रिया होती ?

   - खूप शॉक होते अतुल दादा...त्यांनी माझं गेटअप पाहिल्यावर बोलून दाखवलं की, नाही मी तुझ्या बाबतीत चुकीचा होतो आणि तू ही भूमिका अतिशय चांगली साकारली आहे. माझ्यासाठी त्यांची ही प्रतिक्रिया खूप महत्वाची होती आणि मलाही बरं वाटलं की, ज्या व्यक्तीला माझ्या या भूमिकेबद्दल शंका वाटत होती त्यांच्याकडून उत्तम प्रतिक्रिया मिळाली. एक अभिनेत्री म्हणून सुद्धा हे काम केल्याचं मला खूप समाधान आहे.

   * प्रसादबरोबर आई म्हणून रोल करण्याचा अनुभव कसा होता ?

   - खूप छान होता खरंच...खूप मस्ती करायचो. तो मला खूफ चिडवायचा की, अरे काय माझ्यापेक्षा वयाने लहान माझी आई....आणि मला ते खूप कॉम्प्लेक्स व्हायचं, की मी काय करतेय, बरोबर करतेय ना...? असे प्रश्न मला पडायचे. भूमिका करताना प्रसादला एकदम असं बाळा, बेटा करत बोलायचं होतं, त्याच्या डोक्यावर हात फिरवून, असं नाही करायचं वैगेरे वैगेरे असं म्हणायचं होतं. जे मला कुठेतरी जड जात होतं. अभिनय करताना ब-याचदा याचं हसू सुद्धा यायचं. सीन झाल्यावर सगळे खूप हसायचो आम्ही...पण सीन चालू असताना आमचं इंटरॅक्शन खूप चांगलं होतं. आधीही त्याच्याबरोबर काम केले असल्याने खूप सोपंही गेलं आणि मज्जाही आली.

   * ‘माझा मी’या सिनेमाचं वेगळेपण काय सांगता येईल ?

   - आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातच घडणारी ही गोष्ट आहे. पण ती आपल्याला कळत नाही. किंवा आपण हे जगतो ते जेव्हा बघतो तेव्हा ते आपल्याला अपील होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी हा सिनेमा जरूर बघावा. दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमात प्रत्येक कलाकाराने वेगवेगळे गेटअप केले आहेत. माझे चार गेटअप आहेत. म्हणजे मी २५ ते ३० वर्षांची पण आहे, ४० ते ४५ वयाची आहे, ५५ ते ६० वयाची आहे आणि ७० ते ७५ वयाची सुद्धा यात दिसणार आहे. सोबतच सिनेमातला माझा मुलगा प्रसाद याचेही तीन वेगवेगळे गेटअप आहेत. समीधा, मनीषा आणि अतुल तोडणकर याचेही असेच तीन वेगवेगळ्या वयातले गेटअप आहेत. म्हणजे प्रत्येक कलाकाराला यात महत्व देण्यात आलं आहे. असं फार कमी कलाकृतीमध्ये पहायला मिळतं की, ज्यात सगळ्यांना काहीना काही करायला मिळतं. जनरली फक्त जे मेन रोल्स असतात त्यांनाच जास्त महत्व दिलं जातं. त्यामुळेही ही फिल्म मला वेगळी वाटते.

- अमित इंगोले