Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘ताठ कणा हाच बाणा...’! - सचिन खेडेकर

Interview of sachin khedekar for marathi movie kokanasth
Sachin Khedekar
Add Comment

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या आणि कितीतरी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा एक वेगळाच प्रभाव प्रेक्षकांवर पाडणारे अभिनेते सचिन खेडेकर. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांनी अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केले. ते सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांसाठी ‘कोकणस्थ’ हा सिनेमा घेऊन येत आहे. सध्या या सिनेमाची सर्वीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे. या चर्चेला अनेक कारणं आहेत, एकतर सचिन खेडेकर यांचा अभिनय आणि दुसरं म्हणजे महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर यांची जोडी पुन्हा एकत्र आली याची... वेगळ्या वाटणा-या या सिनेमाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आम्ही थेट संवाद साधला अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी....

   * ‘कोकणस्थ’ या सिनेमाचं कथानक आणि तुमच्या भूमिकेबद्दल सांगा...

   कोकणस्थ ही कहाणी रामचंद्र गोविंद गोखले या एका मध्यमवर्गीय माणसाची आहे. ज्याचा मुलगा अमेरिकेत असतो. एक निवृत्त आणि शांत आयुष्य जगत असलेल्या रामचंद्र गोविंद गोखले यांच्या जीवनात एका घटनेमुळे उलथापालथ होते. आपलं सर्वस्व हरवून बसलेला हा सामान्य माणूस आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो. तो शांत आणि संयमित आहे तो त्याच्या बुद्धीमत्तेमुळे, पण वेळ आली तर मोठ्यात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो. आपला स्वाभिमानी बाणा शेवटपर्यंत कायम ठेवून कशाप्रकारे लढा देतो हेच या सिनेमात दाखवण्यात आले आहे. `कोकणस्थ ही रामचंद्र गोविंद गोखले या सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी आहे. सिनेमातील रामचंद्र गोविंद गोखले हे मुख्य मी साकारतो आहे.

   * * या सिनेमातून प्रेक्षकांसाठी काही संदेश आहे की फक्त मनोरंजन ?

   - अर्थातच, मनोरंजनही होणार. सोबतच महेशचा आणि माझा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे, आपल्याकडे जो समाज त्यांनी आता आपणं बरं, आपलं बरं..! असं राहून चालणार नाहीये. आपल्यावर इतक्या बाजूंनी दडपण आणि अन्याय होताहेत की, आपल्याला कुठेतरी व्यक्त व्हावं लागेल. आणि ते व्यक्त होणं या सिनेमामध्ये आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत हाच संदेश पोचवायचाय की, आपण आपल्यावरील अन्यायाविरूद्ध एकतर वाचा फोडली पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे आणि लढा दिलाच पाहिजे. कारण आता सहन करून चालणार नाही. कारण ताठ कणा हाच बाणा...!

   * तुमच्या आणि महेश मांजरेकर यांच्यातील ट्युनिंगचं काय वैशिष्ट्य आहे ?

   - गेली कित्येक वर्ष आम्ही सोबत काम करतोय. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे त्याला एखाद्या सिनेमात कशापद्धतीचं काम हवंय. किंवा त्याला काय दाखवायचं आहे. हे मला चांगलंच माहित आहे. याच कारणाने ‘अस्तित्व’ पासून ते ‘काकस्पर्श’ असे कित्येक सिनेमे आम्ही सोबत केले आहेत. प्रत्येक सिनेमाच्या विषयाचं गांभिर्य आणि महत्व हे जाणून आम्ही काम करत असतो. आणि प्रत्येक वेळी कोणताही सिनेमा करताना तो मह्त्वाचा असला पाहिजे असं आमच्या दोघांच्याही मनात असतं. शिवाय कोणताही सिनेमा करताना जे झपाटलेपण महेश मध्ये आहे ते मला खूप आवडतं. ‘कोकणस्थ’ची संकल्पना ही महेशचीच आहे. त्याला हे कथानक सुचलं. त्यावर आम्ही चर्चा केली. प्रत्येक सिनेमा करताना फक्त मनोरंजन करता एखादा संदेश किंवा विचार त्यातून मांडावा याकडेही कल असतो. अशाप्रकारे काम करणारा दिग्दर्शक अभावाने आढळतो. ‘काकस्पर्श’च्या वेळी आम्ही १८-१८ तास सलग काम केलं. कारण, त्या सिनेमाचं बजेट कमी, विषय चांगला होता, कमी दिवसांमध्ये सिनेमा पूर्ण करायचा होता. इतकी मेहनत केल्यानंतर सिनेमा प्रेक्षकांसमोर आला आणि त्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतं. पण, ते जे काहीतरी वेगळं करण्याचं झपाटलेपण आहे, ते त्या सिनेमात आलेलं आहे.

   * ‘मी राजे भोसले बोलतोय’ या सिनेमाच्या कथानकासारखेच ‘कोकणस्थ’चे कथानक आहे अशी चर्चा आहे ते खरं आहे का ?

   - नाही असं काही नाहीये. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या सिनेमातही सामान्य माणसाची कथा होती. आणि ‘कोकणस्थ’मध्येही सामान्य माणसाचीच कथा आहे. पण दोन्ही कथा वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या विषय आणि आशय सुद्धा वेगळा आहे.

   * हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा, कशासाठी बघावा ?

   - हा सिनेमा प्रेक्षकांनी कथेसाठी, संजय पवार यांच्या संवादासाठी बघावा, महेश मांजरेकर आणि माझ्या जोडीसाठी बघावा, मी आणि सोनाली कुलकर्णी आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय आमचं काम बघण्यासाठी बघवा, उपेंद्र लिमयेच्या अभिनयासाठी बघावा, सिनेमातील अनेक प्रसंगासाठी बघावा आणि सिनेमातल्या लढाईसाठी बघावा.

   * सध्याच्या मराठी सिनेमाच्या ट्रेण्डबद्दल तुमचं काय मत आहे ?

   - आता मराठी सिनेमा बघता बाकीच्या सर्व भाषांनी मराठी सिनेमाचा हेवा करायला हवा असाच आहे. प्रेक्षक नवीन विषय बघायला मल्टील्पेक्समध्ये यायला लागलेत. गेल्या ५ वर्षात आलेल्या चित्रपटांमध्ये एकही विषय दुस-या चित्रपटाच्या विषयासारखा आढळत नाही. आणि प्रत्येक सिनेमाला लोकांनी उचलून धरलं आहे. वेगळ्या विषयांचा सिनेमा मराठीत करता येतोय नाहीतर आपलं हिंदी सिनेमांसारखं माकड झालं असतं. त्यामुळे माझ्यामते तरी सध्या मराठी सिनेमा चांगल्या स्थीतीत आहे.

   * मराठी सिनेमा आणखी पुढे जाण्यासाठी कशापद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं ?

   - वेगळ्या विचारापेक्षा जर आपण १०० सिनेमात बनवत असू तर त्याच्या दर्जाकडे लक्ष द्यायला हवंय. हे तेव्हाच होईल जेव्हा प्रेक्षकांची संख्या वाढेल आणि जेव्हा बजेट वाढेल. यामुळे काही सिनेमे जे बजेटमुळे आपण करू शकत नाही तेही लोकांसमोर येतील.

   * इतक्या वर्षांच्या अभिनयाच्या अनुभवानंतर दिग्दर्शनाचा विचार कधी मनात आला नाही का ?

   हाहाहाहा...! नाही अजून असा दिग्दर्शनाचा विचार मनात आला नाही. मला नट म्हणूनच अजून खूप काम करायचं आहे.

   * प्रेक्षकांना काय सांगाल ?

   - प्रेक्षकांनी ‘कोकणस्थ’ सिनेमा पहावा कारण तो पाहण्याची अनेक कारणं आहेत आणि न पाहण्याचं एकही कारण नाहीये.

- अमित इंगोले