Sign In New user? Start here.

 

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

मनोरंजनाबरोबरच विचार करायला लावणारा ‘माझी मी’ - समीधा गुरू

   ‘सोनियाचा उंबरा’, ‘अवघाची संसार’, जीवलगा, ‘झुंझ, ‘या वळणावर’ ‘देवयानी’ ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तुझविन सख्या रे’ या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली अभिनेत्री म्हणजे समीधा गुरू. विविध मालिकांमधून लोकप्रिय झालेली समीधा आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असून यावेळी ती एखाद्या मालिकतील नाही तर एका सिनेमाच्या माध्यमातून...एव्हीएनव्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मी माझा’ या आगामी सिनेमात समीधा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या सिनेमाबद्द्ल तिच्याशी साधलेला हा खास संवाद....

   * ‘माझी मी’ या सिनेमातील तूझी भूमिका काय आणि कशी आहे ?

   - या सिनेमातील हिरो सौरभ याच्या प्रेयसीची भूमिका मी या सिनेमात साकारते आहे. खूप अशी गोड, शांत आणि त्याग करणारी ती मुलगी आहे. ‘प्रेम म्हणजे त्याग’ हे जे ब्रिद वाक्य आहे त्यानुसार ती चालणारी असंही आपण म्हणू शकतो. आजकाल अशी मुलगी बघायला मिळत नाही अशी ती वेगळी आहे.

   * अनेक मालिका आणि चित्रपटात तूझ्या भूमिकेंपेक्षा या भूमिकेचं वेगळेपण काय आहे ?

   - वेगळेपण म्हणजे गेल्या काही मालिकांमध्ये मी ज्या भूमिका निवडल्या त्या तुलनेत ही नक्कीच वेगळी आहे. पहिल्यांदा जेव्हा माझी भूमिका मी वाचली तेव्हा मला खूप आनंद झाला की, ब-याच दिवसांनी मला एक वेगळी भूमिका करायला मिळणार आहे. या भूमिकेला खूप वेगवेगळे शेड्स आहेत, जसे इमोशनल, रोमॅंटीक, साधेपणा... आणि अचानक ग्रे शेडच्या भूमिकेतून बाहेर पडून ही भूमिका करताना मला पर्सनली खूप मजा आली.

   * वेगवेगळे शेड्स असलेली ही भूमिका करताना तूला त्यासाठी काय वेगळा अभ्यास करावा लागला ?

   - यात कॉलेजला जाणा-या एका मुलीपासून म्हणजे २३ वर्षाच्या मुलीपासून ते ४० वर्षाच्या महिलेपर्यंतची माझी भूमिका आहे. त्यामुळे त्या त्या वयात तूमची बॉडी लॅंग्वेज, बोलण्याची पद्धत, हावभाव, आवाजातील चढउतार याकडे मला खास लक्ष द्यावे लागले. आणि माझे को-आर्टीस्ट चांगले असल्याने त्यांच्याकडूनही ह्यातील ब-याच गोष्टी मला शिकायला मिळाल्यात.

   * प्रसाद बरोबर याआधीही तू काम केले आहे पण या सिनेमासाठी त्याच्याबरोबर काम करताना काय वेगळेपण जाणवलं ?

   - प्रसादबद्दल सांगायचं तर तो एक खूप चांगला को-आर्टीस्ट आहे. जितका चांगला तो कलाकार आहे तितका चांगला तो माझा मित्र सुद्धा आहे. याआधी आम्ही ‘अवघाची संसार’ ही मालिका सोबत केली होती. गेली तीन चार वर्षे आम्ही एकत्र काम केले. समोरच्या को-आर्टीस्टला कम्फर्टेबल करून देण्याची वॄती प्रसादमध्ये खूप चांगली आहे. अप्रतिम पाठांतर, अभिनय हे त्याचे वैशिष्ट्य़ आहे. शिवाय प्रसादला अभिनय करताना बघणं ही तुमच्यासाठी एक छान ट्रिट असते. त्याच्यापुढे उभं राहिलं की आपल्यालाही चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं. आणि ते चांगलं काम करण्यासाठी तो मदत सुद्धा करतो.

   * दिग्दर्शक निनाद वनगे आणि निर्माते अतुल वनगे यांची ही पहिलीच फिल्म आहे, कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा ?

   - खरंच खूप चांगला अनुभव होता. अतुलजीं आणि निनाद दोघेही अतिशय छान व्यक्तीमत्व आहेत. काहीही अडचण आली तर त्याकडे अगदी शांतपणे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मलाही खूप शांत शांत वाटले. कुठलंही टेन्शन आलं नाही. आणि 'Ninad is a such wonderful person' , स्वभावाने अत्यंत गोड माणूस, एक छान मित्र, चांगला दिग्दर्शक, सोबतच एक खूप चांगला प्रोड्युसर तो आहे. सेटवर असं कधी वाटलंच नाही की त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतेय. आणि खूप दिवसांनी इतक्या मोकळ्या वातावरणात एका फिल्मसाठी काम करताना खूप चांगलं वाटलं. एका फॅमिलीसारखं वाटायचं सेट नेहमी...मात्र जितकं मोकळं वातावरण होतं तितकाच कामातही सिरीअसनेस सुद्धा होता.

   * ‘माझा मी’ या सिनेमातून प्रेक्षकांना काय वेगळेपण बघायला मिळणार आहे ?

   - अलिकडे मराठीत खरंच खूप छान सिनेमे येताहेत. विशेषकरून कन्टेन्ट वाईज अनेक चांगले सिनेमे येत आहेत. सिनेमातूण मनोरंजन करणं हे समीकरण तर आहेच, पण त्यासोबतच प्रेक्षकांना एक विचार देणं सुद्धा अनेक सिनेमांमधून होतंय. ह्या सिनेमातून सुद्धा एक चांगली कौटुंबिक कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार असून एका माणसाच्या लाईफचा प्रवास, त्याने केलेला त्याग, परिवारासाठी केलेली तडजोड ह्यात रेखाटली आहे. प्रत्येक कॅरेक्टरमधून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तसंच एक आणखी वेगळेपण म्हणजे एखाद्या सिनेमात वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळे कलाकार भूमिका करत असतात. मात्र, यात एकाच कलाकाराने वयाच्या वेगवेगळ्या स्टेजच्या भूमिका साकारलेल्या आहेत. शिवाय या सिनेमाचं संगीत अतिशय उत्तम बांधण्यात आलं आहे. नक्कीच प्रेक्षकांना सिनेमा आणि सिनेमातील गाणी आवडतील.

- अमित इंगोले