Sign In New user? Start here.

आणि महेशची भूमिका मला पटली...!

आणि महेशची भूमिका मला पटली...!

 
 
 

प्रसिद्ध लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार हे ‘मिफ्ता’ च्या नाटक विभागासाठी यावर्षी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या वर्षी त्यांच्यां ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाला नामांकन मिळालं होतं. ते ‘मिफ्ता’च्या एका कमिटीवर सुद्धा महत्वाची जबाबदारी साभांळतात. ‘मिफ्ता’बद्द्ल त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्यासाठी जयंत पवार यांच्याशी साधलेला संवाद....

एक लेखक, समीक्षक या नात्याने ‘मिफ्ता’ या पुरस्कार सोहळ्याबद्दल सांगताना ते म्हणाले की," हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘आयफा’ सोहळा परदेशात होत असतो किंवा इतरही मोठ मोठे सोहळे होत असतात. तसा मराठी सिनेमा अशा पद्धतीने कधी बाहेर गेलेला नाहीये. ब-याचदा अनेक मराठी नाटकं परदेशात होतात. पण मराठी चित्रपटांना, मराठी रंगभूमीला ग्लॅमर यावं, कारण हे सगळं ग्लॅमरभोवतीच फिरतं. त्यामुळे महेश मांजरेकरच्या अशा लक्षात आलं की, मराठी सिनेमा खूप मोठ्या प्रमाणात आता फ्लरीश होतोय. नाटक तर आपल्या परंपरेतच आहे. मग या गोष्टींना ग्लोबल स्टेज का देऊ नये, म्हणून या सोहळ्याची महेशने सुरवात केली. आणि ही भूमिका मला पटली याचं एक कारण असं आहे की, मराठीत एवढे नवनवीन प्रयोग होत असतात. पण कधी आपल्याला त्याचं मार्केटींग जमलं नव्हतं. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या मोठ्याने आपण कुणाला सांगत नव्हतो. (आता तो न्युनगंड असेल किंवा नम्रपणा असेल.) पण आताचं जग हे मिडिया भोवती फिरणारं आहे. मग या गोष्टींचा फायदा करून घेऊन आपल्याकडे जे काही चांगलं होतंय, त्याचा गौरव आणखी एका मोठ्या स्केलवर करावा असं जर कुणाला वाटत असेल तर ते योग्यच आहे असं मला वाटतं. कसं आहे जगाच्या पाठीवर मराठी माणूस खूप दूरवर पोहचला आहे. तिकडे राहून त्याला आपल्या मुळापासून दुरावल्यासारखं वाटतं. त्यांच्या संस्कृतीपासून दुरावल्यासारखं वाटतं. पण या माध्यमातून तिथल्या आणि इथल्या कलाकारांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणणारा जो पूल आहे, त्याचा एक भाग म्हणून आपल्याला ‘मिफ्ता’कडे बघता येतं. आणि ‘मिफ्ता’ हा नुसता पुरस्कार सोहळा नसून त्याअंतर्गत आणखीही काही उपक्रम केले जातात. त्यातीलच काही उपक्रमांसाठी चित्रपटांच्या स्क्रिप्ट मागवणं. किंवा नाटकासाठी काही प्रोजेक्ट मागवणं. यासाठी जी कमिटी आहे त्यावर मी आहे. तसं अजून फुल फ्लेज काम सुरू झालेलं नाहीये. पण लवकरच होईल आणि त्याला निश्चित एक आकार सुद्धा येईल.

यावर्षी तुम्ही नाटक विभागासाठी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताय, नेमकं काय स्वरूप असतं नाटकांच्या निवडीचं? यावर ते म्हणतात की," हे या सोहळ्याचं दुसरं वर्ष त्यामुळॆ गेल्यावर्षीचा जो मेन प्रॉब्लेम होता तो म्हणजे ड्युरेशनचा. तर त्यांनी गेल्या वर्षी लोकांनी उचलून धरलेली गेल्या दोन वर्षातील सिलेक्टीव्ह नाटकं निवडली होती. यावर्षी मात्र नाटकांच्या निवडीचा एक निश्चित पिरीयड आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट असा यावेळी कालावधी ठेवण्यात आला आहे. यात आम्ही एक केलं की, सध्या पुनरूजीवीत नाटकं सध्या खूप येताहेत. त्यात अनेक नाटकं गाजलेली आहेत. मग या पुनरूजीवीत नाटकांमधून एक कुठलं तरी नाटक निवडलं जाईल. आणि जी फ्रेश नाटकं आहेत त्यांचा एक वेगळा ग्रुप असणार आहे आणि यातून मग सर्वोत्कृष्ट नाटक निवडलं जाईल.

एक ज्येष्ठ नाट्य समीक्षक म्हणून सध्या बदलत्या रंगभूमीविषयी त्यांचे मत विचारता ते म्हणाले की, " खरं तर सद्या रंगभूमीला चांगले दिवस आहेतच. नवनवीन जी नाटकं येत आहेत त्यांच्यात एक सेन्सिबिलिटी दिसते आहे. नवीन जनरेशन जे करताहेत त्यांच्या नाटकांमध्ये एक वेगळाच फ्रेशनेस आहे आणि ती लोकांकडून सुद्धा उचलली जात आहे. त्यादृष्टीने मला असं वाटतं की, जी एकेकाळी व्हायब्रंट रंगभूमी होती ज्याकडे मधल्या काळात प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. ते सर्व परत यायला लागले आहेत. आणि कसं आहे की, क्वॉलिटी म्हटल्यावरती काहीतरी कमी जास्त होतंच असतं. कधी खूप चांगली नाटकं बघायला मिळतात. तर कधी साधारण दर्जाची नाटकं बघायला मिळतात. पण महत्वाचं म्हणजे नाटकं यायला लागली आहेत. जे कलाकार सिरीअल्स, चित्रपटांकडे वळले होते ते परत नाटक करताहेत. हर्बेरीअम सारखा एक उपक्रम सुनील बर्वे करतोय तो लिमिटेड शोसाठी का होईना पण प्रेक्षक त्याकडे वळायला लागला आहे. आणि कलाकारांच्या मनात जी भिती होती की, आपण तालीम करायची आणि प्रेक्षकच येणार नाहीत ती भितीही आता निघून गेली आहे. ही खरंच चांगली गोष्ट आहे.

एक परिक्षक म्हणून जेव्हा एखाद्या नाटकाविषयी बेधडकपणे लिहिण्याचा कधी त्रास होतो का? यावर ते म्हणतात ," (मी फक्त माझ्याबाबतीत हे सांगतो) की, जेव्हा आपण एखाद्यावर टिका करतो किंवा एखाद्याची स्तुती करतो. तर त्याच्या मागची कारणे कुठल्याही समीक्षकाला स्पष्टपणे देता आली पाहिजे. ती जर त्याला निटपणे देता आली, तर मला वाटत नाही की त्याचा त्याला त्रास होईल. तसेच त्याची भूमिका किंवा त्याचा त्या नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट असेल तर त्याला त्रास होत नाही. कसं आहे की, नाटक बघितल्यावर त्याचं जस्टीफिकेशन देणं एका समीक्षकाला गरजेचं आहे आणि मी ते देतो. त्यामुळे मला कधी असा त्रास झाला नाही. आणखी एक सांगायचं म्हणजे अनेकदा ज्यांच्यावर टिका होते त्यांना वाईट वाटतं किंवा त्यांची एखादी जी रिअॅखक्शन येते ती सुद्धा समीक्षकानं समजून घ्यायला पाहिजे. समीक्षक जे लिहितो त्याने ते प्रेक्षकांना किंवा वाचकांना समजेल या पद्धतीने लिहिले पाहिजे. नुसतंच एखाद्याला ठोकून काढणं यात मला रस नाही. पण नाटक जर फसलं आहे तर का फसलं याचा शोध घेण्यात मला रस आहे. नेमकी कारणं आपल्याला देता आली पाहिजे आणि ती वाचकांना कळली पाहिजे. तसंही माझं देणं घेणं नाटक सादर करणा-या कुठल्या ग्रुपशी नसून ते वाचकांशी आहे.

नाट्य आणि चित्रपट लेखक या नात्याने नवीन लेखकांना काही सांगाल का? यावर ते म्हणाले की, " (खरं म्हणजे कुणाला असा उपदेश करावा असं मला मुळीच वाटत नाही.) मुळात एका लेखकाला तू असं लिखाण कर हे सांगणं कठीण आहे. मुळात लिखाणासाठी जी काही स्किल्स लागतात त्याचा अभ्यास तर करावाच लागतो शिवाय त्याच्यापलिकडे जाऊन, जो एक कल्पनाशक्तीचा भाग असतो तो ज्याचा त्याचा असतो. मला एवढंच सांगायचं आहे की, नवीन लेखकांनी सिनेमासाठी किंवा नाटकांसाठी लिहितांना त्या त्या माध्यमाचे स्ट्रॉंग पॉईन्ट्स काय आहे याचा अभ्यास करावा. शिवाय नाटक म्हणजे काय? चित्रपट म्हणजे काय?याची गल्लत करू नये. या माध्यमांची सामर्थ्य सतत शोधत राहिलं पाहिजे. म्हणजे पुस्तक वाचायला घेतलं आणि मी लेखक झाले असं होत नाही, ती एक मोठी प्रोसेस असते जी तुम्हाला तुमच्या आत कळत जायला लागते. शिवाय त्या लेखकाने आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, त्यावर काय लिहिलं जातंय़. नुसतं मराठीच नाही तर इतरही भाषेत काय लिहिलं जातंय ते सुद्धा वाचायला पाहिजे. किंवा आधीच्या नाटककारांनी काय लिहिलं आहे याचाही अभ्यास करायला हवा.

‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळा हा नुसता पुरस्कार सोहळा नसून त्यामार्फ़त अनेक उपक्रम केले जातात, त्यात आणखीही एखादी गोष्ट केली जावी असं तुम्हाला वाटतं का? याबद्द्ल सांगतांना ते म्हणाले की," मुळात ‘मिफ्ता’चा उद्देश हा मराठी सिनेमाला ग्लॅमर मिळवूण देणं हा आहे. पण त्याचबरोबर त्यांनी टॅलेंट हंट साखरं काहीतरी करावं. त्याचं कारण असं की, इंडस्ट्रीपर्यंत पोचू न शकणारं खूप टॅलेंट राज्याच्या कानाकोप-यात आणि परदेशातही आहे. त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्यातील टॅलेंट हेरता येईल का असा विचार केला पाहिजे. म्हणजे याचा विचार जर केला गेला तर काहीतरी प्रोग्राम तयार करता येईल. अनेकांमध्ये लेखक, कलाकार, दिग्दर्शक दडलेला असतो, पण त्याला तांत्रीक जोड नसते. अशांना हेरून त्यांना काही शेप देता येईल का याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की, ‘मिफ्ता’ला आणखी एक चांगका हेतू येईल.

मुळात ‘मिफ्ता’हा मराठी नाटक आणि सिनेमाला ग्लॅमर देणारा पुरस्कार आहे असं आत्तापर्यंत सर्वांना वाटायचं पण त्यापलिकडे जाऊन ‘मिफ्ता’ मार्फ़त मराठी सिनेमांचे परदेशात प्रदर्शन करणं, मराठी सिनेमांसाठी गुंतवणूक करू इच्छिणा-या लोकांना एकत्र आणण्याचं काम, तसंच मराठी चित्रपटांना परदेशात चित्रीकरणासाठी लागणारी मदत उपलब्ध करून देणं हे सुद्धा केलं जातं. मला वाटतं निदान एवढंच केलं तरीही मराठी सिनेमा आणि नाटक ग्लोबल झाल्याशिवाय राहणार नाही.

-अमित इंगोले.