Sign In New user? Start here.

जिंदादिल सुधीर गाडगीळ

जिंदादिल सुधीर गाडगीळ

 
 
 

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षीत ते चित्रकार मकबुल फिदा हुसेन, गायिका आशा भोसले ते व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अशा विविध क्षेत्रातील ३००० नामवंत व्यकींच्या रंगमंचावर, दूरदर्शनवर, चॅट शो-टॉक शो मध्ये मुलाखत घेण्याचा उच्चांक करणारे निवेदक-सूत्रसंचालक-मिडीया मॅन सुधीर गाडगीळ यांना ‘जिंदादिल’ पुरस्काराने नुकतेच पुरस्कॄत करण्यात आले. त्यानिमीत्ताने त्यांची घेतलेली एक खास मुलाखत....

१) सुधीरजी नुकताच तुम्हाला ‘जिंदादिल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याबद्दल काय सांगाल?

- या महिन्यामध्ये माझ्या ३००० मुलाखती पुर्ण झाल्या. इंदिरा गाधींपासुन बाळासाहेब ठाकरेपर्यंत नंतर प्रमोद महाजन, शरद पवार, इकडे अमिताब बच्चन, माधुरी दिक्षित, एम.एफ. हुसेन, आर. के लक्ष्मण, अब्दुल कलाम अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन झाल्या. या सगळ्या मुलाखती, ह्यांच्यातलं जे बोलणं आहे, ते या पुण्यामध्येच ऎकत गेलो. जे उत्तमोत्तम वक्ते पुण्यातंच ऎकायला मिळाले, त्यातून जो शब्दांचां रियाज झाला. त्यामुळेच मी एवढ्या सगळ्या माणसांना बोलतं करत गेलो. यासाठीच पुणेकरांनी मला विठ्ठ्ल कामतांसारख्या ऑर्कीडच्या या जिदांदिल माणसाच्या हस्ते ‘जिदांदिल पुरस्कार’ देऊन पुरस्कृत केलं. माझ्यासाठी ही बाब फार अभिमानास्पद होती. त्यामुळे मला मनापासुन आनंद झाला. ही ‘पुणेकरांनी पुणेकराला दिलेली पावतींच आहे’, जी नक्कींच माझ्या दॄष्टीने मोलाची आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आता मी ठरवले की, या टप्प्यावर आजवर घेतलेल्या मुलाखतीतनं भेटलेल्या माणसांनी मला त्यांच्यां कर्तॄत्वानं त्यांच्यां वैविध्यपुर्ण व्यक्तीमत्वाच्या छटांमधून ताजं तवानं केलं. त्याचेचं अनुभव आता हळू हळू शब्दबद्ध करत जाणार आहे. डायरीतला कच्चा माल ललित लेखणाच्या स्वरुपामध्ये आपल्यासारख्या रसिकांसमोर पुस्तक स्वरुपात मांडण्याचा संकल्प मी या निमित्ताने सोडतोय.

२) तुम्ही आजवर घेतलेल्या मुलाखतींपैकी तुमच्या आठवणीत राहीलेली मुलाखत कोणती?

-खरं तर ३००० मुलाखतींमध्ये अविस्मरनीय अनेक मुलाखती आहेत. राजकारण, उद्योग, कला, सिनेमा, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलाखती मी घेतल्या. पण नुसती नावं घ्यायची तर सचीन तेंडुलकर, आशा भोसले, अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती घेतांना सर्वाधीक धम्माल आली. आणि माधुरी दिक्षितची अमेरीकेच्या सॅन होजेच्या अधिवेशनात घेतलेली मुलाखत सर्वाधिक रंगली. कारण लोकांना माहिती नसलेला तिचा अनोखा पैलू त्या मुलाखतीमध्ये मी काढून घेऊ शकलो. तो म्हणजे ती नुसतं अभिनय, कथ्थक नृत्यंच करत नाही, तर शास्त्रीय गाणं सुद्धा शिकली आहे. तिने यमण रागातली एक चिझ त्या मुलखतीत सादर केली.

३) तुमच्या स्वभावात एक हजरजबाबीपणा, मिश्कीलपणा आहे, ह्या तुमच्या गुणांबद्द्ल काही सांगा?

-माझी पत्रकारीतेची पार्श्वभूमी असल्यामुळे सदंर्भाचं ज्ञान, माहितीचं ज्ञान ओठावर असतं. आणि भोवताली सजगपणे पाहणं असतं, निरीक्षण असतं त्यामुळे घड्णा-या गोष्टीतील विसंगती पटकन कळते. मग त्याचमुळे नेमक्या शब्दावर बोट ठेवणं जमून जातं, हा पुण्याने दिलेला गुणं असावा.

४) मुळात पुण्यातंच तुम्ही या क्षेत्रात प्रगल्भपणे पुढे आलात, तर पुणे शहराबद्दल तुमच्या काही आठवणी?

-लहानपणापासुन तीन पिढयांमधले उत्तमोत्तम वक्ते मी ऎकत आलो. माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सांगत असतो की, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे पासुन पु.ल. देशपांडेपर्यंत आणि त्या काळातल्या डॉ. राशम वाळींब्या पासुन ते अगदी अलीकडच्या टप्प्यावरच्या राम शेवाळकरांपर्यंत आणि बॅरीस्टर नाथपे पासुन बापुसाहेब काळदात्यांपर्यंत वकॄत्वाच्या विविध छटा अनुभवता आल्यामुळे इतके दिवस ऎकत गेलो. पुण्यामध्ये जो शब्दांचा रियाज होता आणि आता कुठे मैफिलींना सुरुवात होतीय.

५) मुलाखतींशिवाय तुम्हाला आणखी छंद म्हणून काय जोपासायला आवडतं?

- मला मुळात माणसं आवडतात, गप्पा मारायला आवडतात, म्हणून मी पत्रकारीतेत आलो. अन्यथा मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. पण अन्य आवडी म्हणजे गाणं ऎकायला आवडत, चित्र अर्थात स्केच काढायला आवडतात, मी काही चित्रकला शिकलो नाही. पण माणसाचं वैविध्य रोज बघत असतो त्यामुळे त्यांचं वैविध्य पेन्सिलने कागदावर उमटवण्याचा मोह कधी कधी खुप होतो.

६) तुम्हाला मनापासून घ्यायची राहून गेलेली मुलाखत कोणती सांगाल?

-आता असलेल्यांपैकी राहून गेलेली एकच मुलाखत आहे, जी घ्यायला मी फार उत्सुक आहे, ती म्हणजे नरेंन्द्र मोदी आणि आता आपल्यामध्ये अस्तित्वातच नाही. जे कधीचं भेटणार नाही, ज्याची मुलाखत मला घ्यायला आवडली असती अशी हुकलेली मुलाखत म्हणता येईल, ती म्हणजे स्वातंत्र्य वीर सावरकरांची.

- स्नेहा मुथा