Sign In New user? Start here.

कळतच नव्हतं की, ही लेणी गात आहेत, की माझं मन ! - कौशल इनामदार

कळतच नव्हतं की, ही लेणी गात आहेत, की माझं मन ! - कौशल इनामदार

 
 
 

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या विषयांबरोबरच संगीतमय विषयांवरील सुद्धा चित्रपट आता तयार करण्यात येत आहेत. आणि संगीयमय(म्युझिकल) चित्रपटांचा विषय निघाला की, आधी नाव घेतल्या जातं ते संगीतकार कौशल इनामदार यांचं. ‘बालगंधर्व’ या चित्रपटाला कौशल इनामदार यांच्या संगीताने एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. वेगळ्या पठडीतलं संगीत देण्यासाठी कौशल इनामदार हे प्रसिद्ध असून त्यांनी २०१० साली रचलेल्या मराठी अभिमान गीताच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगलीच धूम केली होती. आता पुन्हा एकदा नितीन देसाई यांचीच निर्मिती असलेल्या ‘अजिंठा’ या चित्रपटाला कौशल यांनीच संगीत दिलं आहे. यातील गीतं रचण्यासाठी कौशल यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ११ मे ला हा सिनेमा प्रदर्शित होत असून यातील संगीताबाबत कौशल इनामदार यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

‘अजिंठा’या चित्रपटाबद्दल बोलायला सुरवात केली असता ते सांगतात, खरंतर या विषयावर चित्रपट करण्याची जेव्हा घोषणा झाली होती, तेव्हापासूनच मी या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये एक संगीतकार म्हणून इनव्हॉल्व झालो होतो. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर होणारं काम मी पाहिलं होतं. मुळात ही एक प्रेमकथा आहे. मग एका प्रेमकथेचा मुड लक्षात घेऊन या सिनेमाचं संगीत तयार करण्यात आलं आहे.

-‘अजिंठा’चं संगीत सजवतांनाचा अनुभव कसा होता याबाबत ते म्हणाले की, मी महानोरांनी लिहिलेलं काव्य वाचलेलं होतं. ज्यावेळी मला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं तेव्हा अक्षरश: माझे हात शीवशीवत होते. कुणालाही खोटं वाटेल पण या सिनेमातली १० पैकी सात गाणी एका दिवशी तयार झाली आहेत. त्यांना एका दिवसात चाली बसवल्या आहेत. आणि ह्या चाली आम्ही ‘अजिंठा’लेण्यांमध्येच बसवल्या आहेत. त्यानंतर त्या चालींवर संस्कार करण्यात आलेत. पण मुळ ज्या चाली झाल्या त्या एका दिवसात ‘अजिंठा’ला केल्यात. त्यावेळी महानोर आमच्या सोबत होते. ते मला गाणं लिहून द्यायचे आणि मी त्यावर चाल करायचो. त्यांच्या या काव्याविषयी आधी खुप ऎकलं असल्याने मी फार आनंदी होतो की, मला महानोरांच्या या प्रसिद्ध काव्यावर काम करायला मिळतंय.

बालगंधर्वच्या संगीतासाठी अनेक प्रयोग मी केले होते. यातही काही नवीन प्रयोग केले आहेत. यावेळीही अनेक नवीन वाद्य आम्ही या सिनेमासाठी वापरली आहेत. जवळपास ८० वादकांची टीम होती. आपलं पारंपारिक संगीत यात मी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं आहे. अगदी ढोल, ताशा, हलगी, ढोलकी, डफ, चंडा यापासून ते घूंगरु पर्यंतची वाद्य मी वापरली आहेत. जे फारसं कोणी वापरत नाही. दिपक बोरकर यांनीच जवळपास पन्नास वाद्य वाजवली आहेत.

kaushal inamdar interview

‘अजिंठा’ चित्रपटाचं संगीत रचायचं असल्याने अजिंठा येथील लेणींना भेट देणे आवश्यक असल्याने कौशल यांनी ‘अजिंठा’ दौरा केला होता. तो अनुभव कसा होता, याबद्दल ते सांगतात, नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला होता. नितीन दादाने अजिंठा येथे जायचा बेत आखलेला होता. आम्ही सकाळीच उठलो आणि ना.धों. महानोरांच्या सोबतीने अजिंठ्याच्या सफारी वर निघालो. जिथे आमच्या चित्रपटाची कथा घडणार आहे, त्या ठिकाणी ना.धों. सारखा कवी सोबत असणे म्हणजे ग्रेटच.. आम्ही सुद्धा बसनेच अजिंठ्याच्या पायथ्याशी पोहचलो. पायी वर चढत गेल्यावर लेण्यांचं जे दर्शन झालं, ते श्वास रोखून धरणारं होतं. वाघुरा नदी निरव शांत भासत होती. पण ना.धों. म्हणाले की, सप्टेंबर मध्ये हीच नदी वाघिणी सारखी डरकाळ्या फोडत वाहते. आम्ही पहिल्या लेणीच्या आत गेलो आणि एवढा अचंबित झालो की, फोटो काढायचं भान हरवून बसलो. पण, सरतेशेवटी एवढ कळलं की, मनावर चितारलेले चित्रं ही लेन्सच्या छायाचित्रांची बरोबरी करूच शकत नाही. मी प्रत्येक लेणीत बराच वेळ घालवला. तिथल्या शांततेला मन लावून ऐकण्याचा प्रयत्न केला...हा विचार नेमका स्वप्नील वाटेल... पण..थोड्याच वेळात त्या लेण्यांतून सुमधुर संगीत दरवळत असल्यासारखं वाटायला लागलं. कळतच नव्हतं की, ही लेणी गात आहेत, की माझं मन ! पण खरंच, तिथल्या कणाकणात संगीत होतं. खालील छायाचित्र पाहून लगेच लक्षात येईल की, त्यांनी त्यांच्या कवितेची सुरुवात ‘डोळ्यांना डसले पहाड इथले’ अशी का केली आहे ते. ब-याचदा शब्दंच त्यांच्या सोबत संगीत घेऊन येत असतात, ‘डसले’ या शब्दातूनही तेच जाणवलं. मला एखादा शब्द किंवा चित्रंच धून बनवायला प्रेरित करत असतात. ‘संगीत हे चेतनेच्या अनुभूतीचा अनुवाद असतो’..

तेथून निघायची मनात इच्छा होत नव्हती, पण निघावं लागलं...रात्री जेवणाच्या वेळी महानोरांनी त्यांच्या चालीत गाणे गायले.जेव्हा एखादा कवी स्वत:ची कविता गातो, संगीत दिग्दर्शकाला तीच चाल बेस्ट वाटते...काव्यसंध्ये नंतर आम्ही निघालो... पण महानोरांच्या ओळी सतत कानात दरवळत होत्या...मन सतत विचारात होतं, महानोरांची चाल जर मनात बसली तर मी कसा काय नवीन चाल देऊ शकेल ?

Kaushal inamdar interview

मुळात ‘अजिंठा’ ही एक प्रेमकथा आहे. त्यामुळे प्रेमकथेचं संगीत कसं असावं. आता बालगंधर्वचं संगीत वेगळं होतं. कारण ते कथानक वेगळं होतं. तिथे एक कम्प्लशन होतं की, त्या काळातीलच संगीत पाहिजे. यात असं केलंय की, जिथे जिथे लोकसंगीताचा बाज होता. तिथे तिथे काळानुरूप संगीत दिलं आहे. त्यानुसारच यातील गाणी ना.धो.महानोरांनी लिहिली आहेत. त्यांनी यातील बरीच गाणी ‘अजिंठा’परीसरातच लिहिली आहेत. अतिशय सुंदर अशी साध्या भाषेतील गाणी त्यांनी लिहिली आहे. यातील ‘डोळ्यांना डसले पहाड’ हे गीत पारोची समाधी बघितल्यावर महानोरांना ते शब्द सुचले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी ते शब्द म्हटले आणि त्या मागोमाग मी त्या शब्दांना चाल केली होती. मला अजूनही आठवतं की, रॉबर्टची रंगशाळा जिथे होती. तिकडे सर्व पहाडच आहेत. त्यामुळे त्यांना हे सुचलं होतं.

Kaushal inamdar interview

वेगळं संगीत देण्याबरोबरच वेगवेगळे आवाज गीतांसाठी त्यांनी वापरले आहेत. त्याबद्दलही ते सांगतात की, या सिनेमाच्या गाण्यांसाठी मी खुप वेगवेगळ्या आवाजांचा वापर केला आहे. यात एकूण दहा गाणी आहेत आणि ती गाणी मी जवळपास १८ ते १९ गायकांकडून म्हणून घेतली. त्यात रविंद्र साठे, सुरेश वाडकर, सत्यशिल देशपांडे, स्वानंद किरकिरे, मिलिंद इंगळे, नेहा राजपाल, जयदिप बगवाडकर, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी, मधुरा कुंभार, सई पेंढेकर, प्रियांका बर्वे, अमृता सुभाष, योगिता पाठक, तेजस्विनी केळकर, उर्मिला धनगर आणि मी स्वत:ही यात थोडा गायलो आहे.

अजंठा चित्रपटातील तुमचं सर्वात आवडतं गाणं कोणतं असं त्यांना शेवटी विचारल्यावर ते हसून म्हणतात, खरंतर तसं सांगणं कठीण आहे. पण त्यातल्या त्यात ‘छंद ओठांचे’ एक गाणं आहे. ते मला खुप जास्त आवडतं. कारण त्याचे शब्द आणि चाल दोन्हीही अप्रतिम झाली आहेत. हे गाणं सुरेश वाडकर आणि हमशिखा अय्यर यांनी गायिलं आहे.

- अमित इंगोले