Sign In New user? Start here.

 

Lata Mangeshkar

लता मंगेशकर

लता मंगेशकर या भारताच्या भारतरत्‍न गानकोकीला आहेत. लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजंसी) च्या इंदौर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलाकार होते. लता-दीदी सर्व भावंडांमध्ये मोठ्या आहेत. आशा, उषा, मीना आणी हृदयनाथ ही लहान भावंड. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्याच वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. लता दीदी १३ वर्षाच्या असतांना १९४२ मध्ये त्यांचे वडील वारले. त्यावेळी ’नवयुग’ कंपनीचे मालक, मास्टर विनायक यांनी लता दीदींच्या परिवाराची काळजी घेतली व लता दीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाची सुरूवात करून दिली.

लता-दीदीने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (१९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले. पहिली मंगळागौर (१९४२) या चित्रपटामध्ये त्यांनी छोटी भुमिका केली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. पुढे मास्टर विनायकयांनी आपली कंपनी १९४५ साली मुंबईत स्थानांतरीत केली, तेव्हा लतादीदीही मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाज़ारवाले ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाज़ारवालेंनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवालेंकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडून ही दीदींना तालीम मिळाली.

त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) या हिन्दी चित्रपटामध्ये दत्‍ता डावजेकरयांनी संगीतबद्ध केलेले पा लागूं कर जोरी हे गाणे गायले. १९४८ साली मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केले. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात ’दिल मेरा तोडा’ हे गाणे म्हणण्याची संधी दिली. १९४९ साली महल चित्रपटामधील ’आयेगा आनेवाला’ हे गाणे दीदींच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले. लतादीदीला ’सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ म्हणून सर्वप्रथम फिल्मफेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळाले. १९६० मध्ये ’प्यार कीया तो डरना क्या’ हे मुग़ल-ए-आज़म (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रीत गाणे तुफान लोकप्रिय झाले. ’अजीब दास्ताँ है ये’ हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रीत गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. बीस साल बाद (१९६२) या चित्रपटातील ’कहीं दीप जले कहीं दिल’ ह्या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी त्यांना दुसरे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

२७ जून १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदीने कवी प्रदीप यांनी लिहीलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ’ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्‍तिगीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्‍या जवानांना श्रद्धांजलि वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रु वाहू लागले. लता दीदींनी मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

* फिल्म फेर पुरस्कार (१९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३ आणि १९९४)
* राष्ट्रीय पुरस्कार (१९७२, १९७५ आणि १९९०)
* महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६ आणि १९६७)

* १९६९ - पद्म भूषण
* १९७४ - दुनिया मे सबसे अधिक गीत गाने का गिनीज़ बुक रिकॉर्ड
* १९८९ - दादा साहब फाल्के पुरस्कार
* १९९३ - फिल्म फेर का लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार
* १९९६ - स्क्रीन का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
* १९९७ - राजीव गान्धी पुरस्कार
* १९९९ - एन.टी.आर. पुरस्कार
* १९९९ - पद्म विभूषण
* १९९९ - ज़ी सिने का का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
* २००० - आई. आई. ए. एफ. का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
* २००१ - स्टारडस्ट का का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार
* २००१ - भारत का सर्वोच्च नागरिक सम्मान "भारत रत्न"
* २००१ - नूरजहाँ पुरस्कार
* २००१ - महाराष्ट्र रत्‍न