Sign In New user? Start here.

मराठीला ग्लोबल करण्यासाठी ‘मिफ्टा’

मराठीला ग्लोबल करण्यासाठी ‘मिफ्टा’

 
 
 

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावंत कलावंतांचा, तंत्रज्ञांचा सन्मान करणारा ‘मिफ्टा’(मराठी इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर अवॉर्ड) सोहळा येत्या सप्टेंबर महिन्यात लंडन येथे आयोजिला आहे. यानिमित्ताने ‘मिफ्टा’बद्द्ल अधिक जाणून घेण्यासाठी या सोहळ्याचे मुख्य आयोजक प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांच्याशी केलेली बातचीत....

‘मिफ्टा’काय आहे? मिफ्टाचा मतितार्थ काय आहे? या पहिल्याच प्रश्नाला त्यांनी सांगितले की, "माज आहे..! मराठी असल्याचा एक माज आहे. काय आहे आपल्या महाराष्ट्रात सगळे येऊन आपल्यावर राज्य करीत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीवाल्यांची दादागिरी, साऊथ वाल्यांची दादागिरी, एकंदर सांगायचं काय तर मराठी लोकांमध्ये न्युनगंड आहे. मी नेहमी विचार केल की, आपले सिनेमे चांगले आहेत, दिग्दर्शक चांगले आहेत, सर्वच चांगलं आहे. आज नॅशनल अवॉर्डमध्ये मराठी सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारावर बाजी मारतोय. मग आपण का नाही आपल्या विजयाचा तोरा मिरवायचा? आता नाटकच बघा ना....! या देशात मराठी नाटकं सोडली तर दुसरी नाटकं आहेत का? तरी आपण का ते कुणाला सांगत नाही? या गोष्टीचा मला खूप राग यायचा. मग विचार केला की महाराष्ट्राच्या बाहेर असा इंटरनॅशनल लेव्हलचा पुरस्कार सोहळा करायचा. जेणेकरून लोकांना मराठी कलाक्षेत्र काय आहे ते माहिती पडेल. कसं आहे की जगाला काही पडलं नाहीये की, भारतात हिंदी सिनेमा चांगला आहे की, मराठी सिनेमा चांगला आहे. त्यांना ते आपण सांगायला हवं, त्यासाठी ‘मिफ्टा’हा अतिशय योग्य मंच आहे. आज नाहीतर उद्या हे नोटीस होईलच की, आपल्याकडे चांगले लेखक आहेत, दिग्दर्शक आहे.

मुळात ‘मिफ्टा’ची संकल्पना कुणाला आणि कशी सुचली? "Basically ही Idea माझ्याकडे `राजा राणी ट्रॅव्हल्स'चा संचालक अभिजीत पाटील घेऊन आला. तो मला म्हणाला की, महेश भाई आपण असं असं करायचं का? आधी मी जरासा घाबरलो. कारण एवढ्या लोकांना बाहेर देशात नेणं Not a Joke..! पण तरीही त्याच्यात एक विश्वास होता. म्हटलं काय होईल अपयश येईल अजून काय होईल. कुणी फाशी तर देणार नाही ना...! मग आम्ही ‘मिफ्टा’ करायचं ठरवलं आणि त्यासाठी कंबर कसली. मग नंतर त्यात अनेकांनी Contribute केलं. पण मुळात ही संकल्पना अभिजीत पाटील याचीच आहे.

‘मिफ्टा’चा मुख्य उद्देशाबाबत ते म्हणाले की, "मराठीला Global करणं. मराठी चित्रपट असू देत, मराठी नाटक असू देत किंवा कुठल्या मराठी घडामोडी असू देत. त्यांना Global करणं जेणेकरून महाराष्ट्राकडे जगाचं लक्ष गेलं पाहिजे. आज मला हेवा वाटतो गुजरातचा. कारण काय Market Develop केलंय त्यांनी, अनेक MultiNational Company तिथे आल्यात. एक महत्वाची गुंतवणूकीची बाजारपेठ म्हणून जग गुजरातकडे पाहत आहे. पण माझं असं मत आहे की, थोड्याच दिवसात "Our State Will be leading in India". महाराष्ट्रातल्या माणसात हा एक थोडा आळशीपणा आहे की, ते स्वत:ला Market करत नाहीत. लोकांना तुमचं Talent कळू द्या. आज लोकांना वेळ नाहीये आपल्याजवळ येण्याचा, त्यामुळे सगळं त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागतं. त्यासाठी "Mifta is a right platform". मग नुसता सिनेमा किंवा नुसतं नाटक नाहीतर एखादी अभिमानास्पद असणारी गोष्टही या मिफ्टाच्या माध्यमातून जगासमोर आणायला आम्हाला आवडेल.

गेल्यावेळी दुबईत झालेल्या पहिल्याच सोहळ्याला सर्व स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावेळी लंडन ‘मिफ्टा’चं काय वैशिष्ट्य असणार आहे? असं विचारता ते म्हणतात की, " ज्याप्रमाणे तिथल्या मराठी लोकांनी आपली संस्कृती जपली आहे. त्याचप्रमाणे आम्हीही आमची जपलेली संस्कृती आणि बदलेला मराठी सिनेमा दाखवू. त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आहेत ज्याचा आनंद कलाकार, प्रेक्षक घेऊ शकतील. तसंच यावेळी ‘मिफ्टा’ च्या माध्यमातून आम्ही १०० अनाथ मुली Adopt करणार आहोत. यासाठी एका NGO बरोबर आम्ही Tie-up केलंय. हेच यावेळी विशेष असणार आहे", असं त्यांनी अभिमानानं सांगितलं.

दुबईतील ‘मिफ्टा’त प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन हे आकर्षणाचं केंद्रबिंदू होते. तसं यावेळी सलमान खान लंडन येथील मिफ्टाला येणार असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले की, "असं काही नाहीये मराठी कलाकार सुद्धा खास आकर्षण असणार आहे. तशी special Guest साठी सलमान सोबत बोलणी सुरू आहे, पण ते अजून Confirm नाहीये. ते Confirm होताच सर्वांना कळेलंच. त्याआधी सांगणं मला आवडणार नाही.

या पुरस्कारासाठी चित्रपट आणि नाटकांची निवड कशापद्धतीने केली जाते?त्यात तुमचा किती सहभाग असतो? यावर ते म्हणाले की, "चित्रपट आणि नाटकांच्या निवडीसाठी आम्ही परिक्षकांची निवड केली आहे. परिक्षक त्याचा निकष काढतील. त्यात माझा तसा काहीच सहभाग नसतो. निवड समितीत चित्रपट विभागासाठी चंद्रकांत कुलकर्णी, नीना कुलकर्णी, बिपीन नाडकर्णी परीक्षक म्हणून काम पाहणार असून नाटक विभागासाठी श्रीरंग गोडबोले, भारती आचरेकर, जयंत पवार हे मान्यवर काम पाहणार आहेत.

दुबईतील ‘मिफ्टा’ सोहळ्याच्या अनुभवांबद्द्ल ते सांगतात की, "अतिशय Fantastic असा तो अनुभव होता. पहिलाच सोहळा असल्याने मनात थोडी भिती होती. पण नंतर सगळं चांगलं होत गेलं. सगळ्यांनी चांगली धमाल केली, Enjoy केलं. अनेक कलाकारांनीही चांगला प्रतिसाद दिला.

शेवटी कलाकार आणि प्रेक्षकांना सांगताना ते म्हणाले की, "सगळ्यांनी हा आपलाच कार्यक्रम समजून या पुरस्कार सोहळ्याला यावं. परिवाराबरोबर, मित्रांबरोबर याचा आनंद घ्यावा असं या सोहळ्याच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो. एकंदर काय तर मराठी चित्रपट आणि रंगभूमी किती प्रगल्भ आहे. याची माहिती संपूर्ण जगाला व्हावी यासाठी ‘मिफ्टा’ची सुरवात करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपट आणि रंगभूमीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतीक स्तरावर प्रसिद्धी मिळत असल्याने इंडस्ट्रीतील कलाकार मंडळीही या पुरस्कार सोहळ्याला चांगला प्रतिसाद देतांना दिसतात. खरंच महेश भाईने म्हटल्याप्रमाणे लोकांपर्यंत आपलं टॅलेंट घेऊन जावं लागतं. याचा विचार करता आगामी वर्षात ‘मिफ्टा’चा मराठी कलाक्षेत्राला जागतीक दर्जा मिळवून देण्यात खूप मोठा सहभाग असणार आहे. असं म्हटल्यास वावगं ठरू नये....!

-अमित इंगोले.