Sign In New user? Start here.

‘काकस्पर्श’ आम्हा सर्वांचं स्वप्न - महेश मांजरेकर

‘काकस्पर्श’ आम्हा सर्वांचं स्वप्न - महेश मांजरेकर

 
 
 

मराठी चित्रपटांचे ग्रेट शोमन, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर एक अत्यंत संवेदनशील असा चित्रपट घेऊन रसिकांसमोर येताहेत. ‘काकस्पर्श’ एक विलक्षण प्रेमकथा...! आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्वाचा चित्रपट असं महेश मांजरेकर या चित्रपटाचं वर्णन करतात. ‘ग्रेट मराठा एंटरटेनमेंट एल एल पी’ निर्मित तरल, भावस्पर्शी, उदात्त अशी ही रोमहर्षक प्रेमकहाणी ‘काकस्पर्श’ येत्या ४ मे रोजी झी टॉकीज तर्फ़े रसिकांसमोर दाखल होत आहे, त्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलेल्या भावना...-

१) ‘काकस्पर्श’बद्दल काय सांगाल ?

- आजवर लोकांनी रोमियो-ज्युलियट, शिरी फरहाद, बाजीराव मस्तानी यांसारख्या अदभुत प्रेमकथाच पाहिल्या, ऎकल्या. मात्र माझा आगामी चित्रपट ‘काकास्पर्श’ मधील प्रेमकहाणी ही या सगळ्या प्रेमकथांमध्ये उजवी आहे. कोकणातल्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरची अस्सल मातीतली आणि अत्यंत तरल भावस्पर्शी, रोमहर्षक अशी ही प्रेमकथा म्हणजे ‘काकस्पर्श’!! ‘काकस्पर्श’ हा माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात उजवा चित्रपट आहे.

Atul Kale

२) या कथेच्या इतक्या प्रेमात कसे पडलात?

- प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं की एखादी तरी उत्तम प्रेमकथा करता यावी. प्रेमकथेचा मोह कुणालाही सुटलेला नाही. व्ही.शांताराम, राज कपूर, यश चोप्रा यांच्यासारख्या दिग्गजांनाही या प्रेमकथांचा मोह आवरता आला नव्हता. या महान दिग्दर्शकांसारखीच नितांतसुंदर प्रेमकथा पडद्यावर आपल्यालाही साकारता यावी, हे माझंगी स्वप्न होतंच. पण तशी कथा माझ्या हाती लागत नव्हती. सचिन खेडेकरमुळे उषा दातार यांची एक आगळीवेगळी कथा माझ्या हाती आली आणि सुमारे शतकभर मागच्या काळातली एक विलक्षण प्रेमकथा पडद्यावर आणण्याचा योग माझ्या आयुष्यात जुळून आला.

३) या चित्रपटाची निवड कशी केलीत ?

- मी या चित्रपटाची निवड केली नाही, तर चित्रपटानेच माझी निवड केली. सचिन खेडेकर बरेच दिवस माझ्यामागे होता की लवकर हातातलं काम संपव. मला एक कथा तुला ऎकवायची आहे. कित्येक दिवस मला ते जमत नव्हतं. अखेर सचिनने एकदा मला निवांत गाठून ती कथा ऎकवली. आणि कथा ऎकून मी अवाक झालो. मला त्या कथेने झपाटून टाकले. मग ती कथा माझा पिच्छाच सोडेना. यावर चित्रपट करायचाच, हा निर्धार पक्का झाला. आणि त्यानंतर सर्कस सुरू झाली ती कथेचे हक्क मिळवण्यासाठीची! महत्प्रयासाने कथेचे हक्क मिळवले. मग कलाकारांची आखणी डोक्यात सुरू झाली.

Atul Kale

४) या चित्रपटातील प्रमुख पात्रासाठी सचिन खेडेकर यांचाच विचार सुरूवातीपासून केलेला की, कुणी आणखीही मनात होते?

- सचिन खेडेकरशिवाय दुस-या कुणाचा विचार मी करण्याचा प्रश्नच नव्हता. सचिन इतका दुसरा कुणीही त्या भूमिकेला न्याय देऊ शकला नसता. मी तीन वर्ष या चित्रपटात मनाने गुंतलो होतो, तर सचिन त्यात माझ्या आधीपासून म्हणजे पाचेक वर्षांपासून गुंतलेला होता. माझं आणि सचिनचं गेल्या चार पाच वर्षांपासूनचं ते स्वप्न होतं. हा चित्रपट केला नाही तर आपण आयुष्यात काहीतरी गमावून बसू..असं आंम्हाला दोघांनाही वाटत होतं. आमची दोघांची इतकी घट्ट नाळ या कथेशी जुळली होती. त्यामुळे सचिनशिवाय मी दुस-या कुणाचा विचार करणं शक्यच नव्हतं.

५) इतर व्यक्तीरेखांमध्येही तुमचे नेहमीचेच यशस्वी कलाकार घेण्याचं विशेष कारण?

- या चित्रपटात काम करणारे कलावंत अस्सल ब्राम्हणी दिसावेत, ही माझी पहिली अट होती. यासाठी सगळ्यांनी केसांचा गोटा करून घेणे गरजेचे होते. मात्र अलिकडे सगळे कलावंत चित्रपट मालिकांमध्ये पुरते गर्क असल्याने आणि आधीच्या कामातली ‘कन्टिन्युटी’ ची भानगड सांभाळायची असल्याने केसांचा गोटा करायला कोण तयार होईल, याबाबत शंका होती. पण माझे नेहमीचे यशस्वी कलाकार आपले केस गमवायला तयार झाले. मात्र त्यांनी एक गळ घातली की, शुटींग सलगपणे संपावं आणि लवकरात लवकर मोकळं होता यावं. त्यांची ती गळ रास्तसुद्धा होती. आम्ही तशा पद्धतीनं कामाची आखणी केली. चित्रपटाची मागणी लक्षात घेऊनच ‘काकस्पर्श’ मधील कुटूंब जसंच्या तसं दिसावं, तेव्हाचे क्रांतिकारी, तेव्हाच्या व्यक्तिरेखा ख-याखु-या दिसाव्यात, म्हणून पात्रांची निवड चोखंदळपणे केली. मला जे अपेक्षित होतं ते या सगळ्याच कलावंतांनी दिलं, आणि गिरीश जोशीची पटकथा, अजित रेड्डीचे छायांकन सगळ्यांचीच कसोटी पणाला लागली. सचिनची आणि माहीच नव्हे तर चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाची यात भावनिक गुंतवणूक जबरदस्त होती. अजब वेडाने सर्वांना झपाटले होते. कुठली तरी आंतरिक तळमळ सर्वांच्याच मनात होती. म्हणूनच ‘काकस्पर्श’ इतका स्पेशल होऊ शकला.

६) या चित्रपटात घराचं एक खास स्थान आहे. किंबहुना ते घर हे चित्रपटातलं एक विशेष पात्रच ठरलेय. या घराचा शोध कसा घेतलात?

- मी त्या घराचा शोध घेत अख्खं कोकण पिंजून काढलं. पण मनात असलेलं कौलारू, शेणानं सारवलेलं, ओटी, सज्जा, माजघर, पवडी, परसदार, न्हाणीघर, दारात विहिर असलेलं ऎसपैस घर काही केल्या सापडेना. हल्ली गावांचं इतकं शहरीकरण झालंय की, सिमेंट कॉंक्रीटची आणि आधुनिक पद्धतीची घरं कोकणात सर्वत्र दिसतात. अखेर माझ्या एक चित्रपट निर्मात्या मित्रानं मला गुहागरचं हे घर सुचवलं. ते घर मी पाहिलं आणि माझ्या चित्रपटातलं घर मला सापडलं. त्या घरात फिरतांना माझा अख्खा स्क्रिनप्ले आकार घेऊ लागला..त्या घराशी माझे ऋणानुबंध जुळले. महिना दिड महिना या घरात वावरलो. एका अनामिक ओढीने, एका वेगळ्याच स्फूर्तीने आम्ही या घरात चित्रीकरण करत होतो. चित्रीकरण संपल्यावर मात्र आता या घरातला आपला सहवास संपला म्हणून मन कातावले होते. ‘काकस्पर्श’ हा चित्रपट माझ्याकडून घडावा, हे माझ्या नशिबातच लिहून ठेवलेलं असावं बहुधा! म्हणून चित्रपटासाठी जे जे आवश्यक होतं ते ते मला असं समोरून सापडत गेलं.

७) या चित्रपटाचं संगीत हे मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारं आहे, त्याबद्द्ल काही सांगाल?

- या चित्रपटाचं संगीत अजित परब, समीर जोशी आणि राहुल रानडे यांनी केलंय. चित्रपटाला एक टिपिकल ब्राम्हणी चेहरा आहे. ब्राम्हणी परंपरा आणि रितीरिवाजांचा एक खास टच त्याला आहे. त्यामुळे अजितपेक्षा राहुल तो टच देऊ शकेल असं मला वाटलं. आणि ‘काकस्पर्श’ची गाणी मी राहुलवर सोपवली. सौमित्रने लिहिलेल्या गाण्याना राहुल रानडेने उत्तम न्याय दिलाय. चित्रपटातील गाणी खरंच १९५०चा काळ जिवंत करणारी ठरली आहेत. चित्रपटातील गाण्यांइतकेच ‘काकस्पर्श’चे पार्श्वसंगीतही परिणामकारक झालेय. अजितने या दरम्यान दुसरे कुठलेही काम हातात घेतले नव्हते. ‘काकस्पर्श’चे पार्श्वसंगीत ही त्याचीही मोठीच परीक्षा होती. त्याला त्यासाठीपुरेसा वेळ हवा होता. मी त्याला तो दिला. आणि अजितने चित्रपटाचा हवा तो परिणाम साधला.

७) आज चित्रपटात व्यक्तिरेखा ठसठशीत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो तो मेकअप. परंतु या चित्रपटात कुणीही मेकअप केलेला नाहीय. हे कसे?

-या कथेची आणि चित्रपटाची खरी गरज होती ती चेह-यामागचा चेहरा दिसावा. चित्रपटातील व्यक्तीरेखा ठसठशीत व्हावी, ही ‘काकस्पर्श’ची पहिली आणि महत्वाची मागणी होती. हा चित्रपट अस्सल मातीतला, कोकणच्या निसर्गदत्त सौंदर्यभूमीतला आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीचा तो काळ आहे. तेव्हाचा काळ...पोशाख..राहणीमान दाखवताना मला चित्रपटाचा पोत सांभाळणं खूप गरजेचं होतं. त्या काळात बायकांचं ठसठशीत लाल कुंकू, तेव्हाचे पारंपारिक अलंकार हेच स्त्रियांचे मेकअप होते. ‘काकस्पर्श’ मध्ये उलटं झालंय. बायकांपेक्षा पुरूषांनी मेकअप केलाय. ‘काकस्पर्श’ मधील कलावंतांच्या मेकअपबाबत विक्रम गायकवाड याने मला मोलाचे सल्ले दिले. मेकअप, पोशाख आणि कलादिग्दर्शन यानेही या चित्रपटाला वेगळा उठाव दिलाय.

‘काकस्पर्श’ हा माझ्या आणि सचिन खेडेकरच्या पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम चित्रपट आहे. आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज साकार झालंय. या चित्रपटाशी संबंधीत प्रत्येकाच्या आयुष्यातील हे महत्वाचं वळण आहे, त्यांच्या कारकीर्दीतील तो मोलाचा टप्पा आहे. येत्या ४ मे रोजी झी टॉकीजच्या वतीने ‘काकस्पर्श’संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे. विशेष अपेक्षा ठेवून प्रेक्षकांनी चित्रपटात येऊ नये, असे अन्य चित्रपट निर्माते सांगतात. पण माझं तर उलटं म्हणणं आहे. माझ्या आणि झी टॉकीजच्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या विशेष अपेक्षा ठेवाव्यात. तो त्यांचा अधिकार आहे. रसिकांच्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि एक आगळीवेगळी कलाकृती देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आहे.

झगमग टिम -