Sign In New user? Start here.

मराठमोळी रांगडी कॉमेडी ‘येड्यांची जत्रा’ - मिलिंद कवडे

मराठमोळी रांगडी कॉमेडी ‘येड्यांची जत्रा’ - मिलिंद कवडे

 
 
 

सद्या अनेक वेगवेगळ्या विषयांना घेऊन मराठी इंडस्ट्रीत चित्रपट केले जात आहे. ज्याला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. असाच एक वेगळा विषय असलेला चित्रपट म्हणजे ‘येड्यांची जत्रा’ जो ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची निर्मिती तरूण निर्माते विश्वजीत गायकवाड करत असून मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शन आणि लेखन अशी दुहेरी भूमिका निभावली आहे. मिलिंद कवडेंचा हा पहिलाच चित्रपट असून यात मराठी इंडस्ट्रीतले अनेक मोठे कलाकार अभिनय करीत आहेत. ग्राम स्वच्छता हा गंभीर विषय धमाल विनोदी ढंगाने त्यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे. या निमित्ताने त्यांनी झगमग डॉट नेटशी केलेली ही बातचीत....

* ‘येड्यांची जत्रा’ हा तुझा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाबद्दल आम्हाला सांग.

- ‘येड्यांची जत्रा’ हा चित्रपट खरंतर मराठीमोळी रांगडी अशी मॅड कॉमेडी आहे. फक्त कॉमेडी करायची म्हणून आम्ही ती केलेली नाहीये, त्याला एक कथानक आहे. हिंदीच्या तोडीस तोड हा सिनेमा आम्ही केला आहे. चित्रपट बघतांना तुम्हाला कुठेही असं जाणवणार नाही की, ही एक टिपिकल मराठी फिल्म आहे. दुसरी गोष्ट फिल्मचा युएसपी म्हणाल, तर चित्रपटाच्या तांत्रीक भागावर आम्ही नाविण्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच युरी ४१६ एच एस ४ हा कॅमेरा आम्ही चित्रीकरणासाठी वापरला आहे. जो आत्तापर्यंत पिपली लाईव्ह, धोबी घाट या गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठीच वापरण्यात आला आहे. या कॅमेराबद्द्ल सांगायचं झाल्यास अतिशय लो वेट असा हा कॅमेरा आहे. त्यामुळे तो हॅन्डलिंगसाठी खुप सोपा असतो. अनेक तांत्रीक बाबींकडे आम्ही जातीने लक्ष दिलं आहे. शिवाय मराठी इंडस्ट्रीतले मोठ मोठी कलाकार मंडळी यात आम्ही घेतली आहे. या सर्वांच्या सोबतीने प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच एन्जॉय करेल. सोबतच एक सामाजिक संदेश सुद्धा आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून दिला आहे.

* या चित्रपटाचं कथानक काय आहे?

- मराठवाड्यातलं एक गाव गाढवेवाडी...त्या गावाच्या दोन वाड्या आहेत. या गावांच्या सीमेवर एक ओसाड जमीन आहे. कालांतराने या जमिनीवर लोक शौचास जाऊ लागले. या गोष्टीचा गावातील राजकिय नेत्यांनी इश्यु केलाय. नेमकी ती जमीन असते ती हा-याची(भरत जाधव) याची...यात त्याचंच मरण होतं. कारण त्याच्या जमीनीवरच हे सर्व चालू असतं. मग त्याला कुठेतरी कळतं की, सरकारची हागणदारी मुक्त गाव अशी योजना आहे. ती योजना गावात आणण्यासाठी तो खटाटोप करतो आणि ती योजना तो गावात आणतो..त्यानंतर काय धमाल उडते ही या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.

* तुझा हा पहिलाच चित्रपट असल्याने कसा अनुभव होता?

- फारच सुंदर..! बेसिकली मी माझा होमवर्क करून गेलो होतो. मी स्क्रिप्टवर खुप काम केलं...नंतरच मी निर्मात्यांकडे गेलो, नंतरच मी भरत दादाकडे गेलो. त्याला स्क्रिप्ट खुप आवडली आणि त्याने होकार दिला. त्यानंतर इतरही कलाकारांच्या तारखा जुळवून आणल्या. मह्त्वाची गोष्ट म्हणजे ठरलेल्या शेड्युलनुसार चित्रपट तयार झाला. ही खुप मोठी गोष्ट आहे.

* एकंदर सद्या मराठी चित्रपटसॄष्टी बघता अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात असतांना हा विषय प्रेक्षकांना आवडेल असं का वाटलं ?

- खरंतर मी म्हणेन की, प्रेक्षक चित्रपटगृहात चांगल्या कथानकासाठी येतात. मग ते याचा विचार करून येत नाहीत की, कथानक शहरातील आहे की ग्रामीण भागातील...लोकांना वळू आवडला, नटरंग आवडला ह्या ग्रामीण भागातीलच कथा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, कथा ही महत्वाची आहे. ती चांगली असेल तर लोकांना नक्कीच आवडेल.

* सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीविषयी तुझं काय मत आहे?

- खुप उत्तम..! खरंतर मी नशीबवान आहे की, या वेळेत मी या इंडस्ट्रीत आलोय. तसंच मला वाटतं की, हा मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुवर्ण काळ आहे. लोकं २-३ कोटींच्या फिल्म बनवताहेत. त्यांना रिटर्न्स मिळताहेत आणि प्रेक्षक चित्रपटांना चांगला प्रतिसाद देताहेत. ही मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी चांगली गोष्ट आहे. आज हिंदी चित्रपटवाले मराठी चित्रपट सिरिअसली घेत आहेत. ही खुप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.

* सध्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सोशल मिडियाचा खुप वापर केला जातोय. तुझा कसा अनुभव आहे सोशल मिडियाचा?

- आजकाल गावोगावी टेलिव्हिजन, कम्प्युटर आलेत. त्यामुळे सोशल मिडियाचा नक्कीच खुप चांगला उपयोग होतोय. इव्हन फेसबुक, ट्विटर, यु ट्युब यांसारख्या साईट्सचाही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी खुप मोठा फायदा होतांना दिसतो आहे. या मिडियामुळे प्रेक्षकांचा लवकरात लवकर प्रतिसाद मिळतोय.

* ‘येड्यांची जत्रा’ या चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्याने प्रेक्षकांना काय सांगशील?

- प्रेक्षकांना मी हेच सांगतो की, हा चित्रपट तुम्ही बघा. तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. खुप धमाल या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पहायला मिळणार असून एक सामाजिक संदेश सुद्धा यातून देण्यात आला आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

अमित इंगोले

 
 
 

मुलाखती link