Sign In New user? Start here.

आपली संस्कृती आपली कला जपण्यासाठी अधिवेशन - नितीन जोशी

आपली संस्कृती आपली कला जपण्यासाठी अधिवेशन - नितीन जोशी

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन येत्या २१ ते २४ जुलै दरम्यान आयोजित केले आहे. या अधिवेशनाची तयारी जोरात असून प्रेक्षकही मोठ्या आतुरतेने या अधिवेशनाची वाट बघत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरविण्यात येणा-या अधिवेशनाची तयारी गेल्या दिड वर्षापासून सुरू आहे. ती तयारी कशी केली जाते आणि अधिवेशनाच्या इतरही काही गोष्टी जाणून घेण्यासाठी अधिवेशनाचे संयोजक नितीन जोशी आणि सहसंयोजक सुजीत वैद्य यांच्याशी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद प-हाड यांनी केलेली बातचीत.....

* या अधिवेशनाचं उद्दिष्ट काय आहे?

- सुजीत - "काय आहे की, बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळीच त्याचा उद्देश असा होता की, उत्तर अमेरीकेतला जो मराठी समाज आहे. त्यांना एका छत्रछायेखाली आणण्यात यावं. की ज्यायोगे या दोन खंडप्राय देशातील मराठी बांधव एकत्रीतपणे येऊन आपली कला, आपली परंपरा जपतील. अधिवेशनाचा काहीसा उद्देश तसाच आहे. या निमित्ताने लांबलांबच्या गावातील सगळी मराठी मंडळी एकत्र येतात. मित्रांच्या गाठीभेटी होतात. त्यातील काही लोकांच्या अंगी जे कला गुण आहेत त्यांना वाव मिळतो. आणि एकत्रीतपणे मराठी समाजाची एकजूट जी आहे. परदेशात स्थायिक झाल्यानंतर त्याची शक्ती आपल्याला माहित होते. माझ्या दृष्टीने हा महत्वाचा उद्देश आहे अधिवेशनाचा.."

* ज्यावेळी अधिवेशनाची तयारी सुरू होते, तेव्हा एका कन्व्हेनरची भूमिका काय असते.?

- नितीन - "खरं सांगायचं तर एका कन्व्हेनरची भूमिका ही एका लग्न घरातील वधू पित्याच्या भूमिकेसारखीच असते. कारण हे आपल्या घरचंच काम म्हणून करायचं असतं. फरक एवढाच आहे की, याठिकाणचं तुमचं कुटूंब तुमच्या घरापर्यंतच मर्यादीत न राहता. सर्व मराठी लोकांचं कुटूंब असतं. त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना व्यवस्थित कामाचे वाटप करून देणे, त्यांच्याकडून ते करवून घेणे. आणि अधिवेशन यशस्वी करणे. सर्वात म्हत्वाची भूमिका अशी आहे की, आपला समाज एकत्रीत आणायचा. आणि एक चांगलं कार्य सगळ्यांनी करून दाखवायचं हा सर्वात महत्वात उद्देश आहे असं मला वाटतं".

* शिकागोला दुस-यांदा अधिवेशनाचं यजमानपद मिळतंय त्याबद्दल काही सांगू शकाल का?

- सुजीत - "१९८४ साली झालेलं पहिलं अधिवेशन हे शिकागोलाच झालं. त्यानंतर तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा इथेच अधिवेशन होत असल्याने खूप अभिमानास्पद वाटतंय. यात मला सांगावसं वाटतंय की, पहिल्या अधिवेशनाला २५० लोकं उपस्थित होती. आणि यावेळी आम्हाला ३ ते ४ हजार लोकं येतील अशी अपेक्षा आहे. ही जे वाटचाल आहे ती खूप कौतुकाची आहे".

 

* या शिकागोच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय असणार आहे?

- नितीन- "वैशिष्ट्य म्हणजे बीएमएमच्या जन्मभूमीत हे अधिवेशन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हे अधिवेशन होणार आहे ते मॅकॉर्मिक प्लेस सेंटर जगदविख्यात कन्व्हेन्शन सेंटर आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध सभागृह म्हणजे ऎरी क्राऊन थिएटर अतिशय सुसज्ज असं सभागृह आहे. यातही काही कार्यक्रम होणार आहेत. शिवाय हे सेंटर मिसिकन सरोवराच्या तिरावर वसलेलं आहे. तिथला नयरम्य परिसर शिवाय तिथल्या लोकांचा जिव्हाळा हे खरंतर माझ्यादृष्टीने अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे. तसंच इतक्या मोठ्या सभागॄहांमध्ये कार्यक्रम घेणार असल्याने तितकाच मोठा कार्यक्रम असावा म्हणून ‘मराठी बाणा’ आणि ‘आवाज की दुनिया’ सारखे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. हेही एक मह्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं".

* या अधिवेशनात तरूण पिढीचा सहभाग वाढावा यासाठी काय उपक्रम आहे?

- सुजीत - "या अधिवेशनाच्या युथ कमिटीचे नेतृत्व अमेरीकेत जन्मलेली आणि वाढलेली पिढी करत आहे. त्यांतील प्रतिनिधी करत आहेत. त्यांनी तरूणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यात महत्वाचे म्हणजे स्नेहबंध, स्पिड डेटींग, वैचारीक व धार्मिक कार्यक्रमही आहेत. शिवाय एक स्टॅन्डअप कॉमेडीचाही कार्यक्रम आहे. तसंच बोट राईड आणि बॉलिवूड स्टाईलचा फॅशन शो सुद्धा आहे. म्हणजेच तरूणांनी, तरूणांचे, तरूणांसाठी केलेले कार्यक्रम हे आकर्षण ठरणार आहे".

* अमेरीकेमधील मराठी बिझनेस कम्युनिटीच्या विकासासाठी काय केलं जाणार आहे?

- सुजीत - "आपण एक बिझनेस कॉन्फरन्स आयोजिली आहे. त्यासाठी भारतातल्या काही विख्यात उद्योजकांना आमंत्रीत केलं आहे.

- नितीन - त्याशिवाय अमेरीकेतल्या काही उद्योजकांना भारतात काही उद्योग करण्याची संधी मिळावी. तसेच भारतातील उद्योजकांना अमेरीकेत उद्योग करण्याची संधी मिळावी आणि परस्परातील इंटरॅक्शन वाढावं, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचाही यात सहभाग वाढावा हा आमचा प्रयत्न असणार आहे. तसंच मराठी बिझनेस कम्युनिटीला ज्या विषयांबद्द्ल आवड आहे अशासाठी त्यांना एकत्र आणणं हाही आमचा मुख्य उद्देश आहे. यासाठी अमर भिडे हे तज्ञ आपल्याला वक्ते म्हणून लाभले याचं आम्ही भाग्य समजतो".

* नेहमीच अधिवेशनाच्या खर्चाचा विषय चर्चेत येतो, त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

- नितीन - "खरं सांगायचं तर खर्चाच्या आधी आपण ह्या कार्यक्रमांच्या दर्जाचा विचार करू. जे कार्यक्रम इथे लोकांना बघायला मिळत नाहीत असे काही दर्जेदार कार्यक्रम त्यांना पहायला मिळावे. हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे. कारण जर जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमाला यावे असं वाटत असेल तर त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. पण त्यात देखील आम्ही कटाक्षाने गोष्ट पाळलेली आहे. ती म्हणजे, उत्तर अमेरीकेतील कलाकारांचे ६५ टक्के कार्यक्रम आमच्या अधिवेशनात असतील आणि काही कार्यक्रम हे भारतातून आणावेच लागतात. त्यासाठी खर्च तर होणारंच..त्यातल्या त्यात तो खर्च कमी कसा करता येईल याचा विचार आम्ही करत असतो".

* महाराष्ट्र शासनाची अधिवेशनाच्या आयोजनामध्ये काही मदत होते का?

- नितीन - "खरं सांगायचं तर महाराष्ट्राचे प्रथम नागरीक म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही नेहमीच आमंत्रीत करतो. आणि यावेळीही केलं आहे. पण याला काही लोकांचा विरोध आहे. म्हणून मग आम्ही सर्वांनी असं ठरवलं की, राजकीय पुढारींना न बोलवता. जर महाराष्ट्राचं एखादं दालन किंवा महाराष्ट्र पर्यटन विभागाचं दालन इथे असावं. ज्यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाची, महाराष्ट्राची माहिती मिळेल. असं जर सरकारला काही करता आलं तर ती त्यांची जबाबदारी आहे. तसंच महाराष्ट्र सरकारकडून दुसरी काही मदत आम्हाला अपेक्षीत नसली तरी त्यांचा सहभाग यात असावा, त्यांचा पाठिंबा आम्हाला असावा अशी आमची इच्छा आहे".

* एवढ्या मोठ्याप्रमाणात तुम्ही अधिवेशन आयोजित करता मग त्याच्या यशस्वीतेसाठी काय करावं लागतं?

- नितीन - "अधिवेशन हा एक मोठा प्रकल्प आहे. कारण प्रत्येकजण आपले उद्योग, व्यवसाय सांभाळून या अधिवेशनासाठी काम करत असतात. मला सांगायला अभिमान वाटतो की, १०० ते १५० स्वयंसेवक या अधिवेशनासाठी रात्रंदिवस झटताहेत. या अधिवेशनात येणा-या प्रत्येकाची व्यवस्था करावी लागते. कार्यक्रमांसाठी लागणा-या सुविधा उपलब्ध करून देणे. ह्या सर्वच गोष्टी कराव्या लागतात. पण आपण आपल्या बांधवांसाठी एक चांगलं कार्य करत असल्याचा आनंद मिळतो. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. की, आम्ही हे जे श्रम करतोय त्याचं चीज फक्त तुमच्या उपस्थितीनेच होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी या अधिवेशनाला या..! अशी मी विनंती करतो".

* अधिवेशनाला येणा-या लोकांना किंवा प्रेक्षांकाना काही संदेश द्यायचा आहे का?

- सुजीत - हो..नक्कीच मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही शिकागोला नक्की या...! आणि हा अनिभव तुम्हाला खूपच आवडेल असं मी सांगेन..