Sign In New user? Start here.

‘एका क्षणात’साठी शरद पोंक्षे यांचं दिग्दर्शन

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘एका क्षणात’साठी शरद पोंक्षे यांचं दिग्दर्शन

   दस-याच्या शुभ मुहूर्तावर सोन्यासारखे नाटक येतेय. त्याचे नाव आहे ‘एका क्षणात’. उदय धुरत यांच्या माऊली प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या नाटकाच्या माध्यमातून अभिनेते शरद पोंक्षे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरतायत...शरद पोंक्षे यांना नाव आणि खरी ओळख मिळाली ती ‘माऊली प्रॉडक्शन’ ची निर्मिती असलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकातल्या मध्यवर्ती भूमिकेमुळे. गेली सुमारे दोन दशके रंगभूमी तसेच छोटा आणि मोठा पडदा गाजवणारे अभिनेते शरद पोंक्षे आता दिग्दर्शनाकडे वळलेत. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद....

   आपण नाटकाचे दिग्दर्शन करावे असा विचार कसा आणि कधी आला ?

play director sharad ponkshe

   - हौशी रंगभूमीवर सक्रीय असताना अनेक नाटके आणि एकांकिका मी दिग्दर्शित केल्या होत्या. त्यामुळे दिग्दर्शन हे काही मला नवीन नव्हते. गेली दोन वर्ष चित्रपटांची तयार स्क्रिप्ट् घेऊन मी अनेकांना भेटतोय. कारण मला चित्रपट दिग्दर्शित करायचाय. दरम्यान काळात दिग्दर्शक मंगेश कदम एक नाटक घेऊन माझ्याकडे आले. ‘नथुराम’च्या कोल्हापूर दौ-याच्यावेळी ते नाटक वाचले, संदीप जंगम यांच्या त्या नाटकाचे नाव होते ‘ब्रेकिंग न्यूज’. कॉन्सेप्ट चांगली असूनही मला ते नाटक अजिबात आवडले नव्हते. त्यातली माझी भूमिका तर त्याहूनही आवडली नव्हती. त्यामुळे इंटरेस्ट नाही असे म्हणत ते नाटक मी परत केले. मी आणि अश्विनीने यातली प्रमुख भूमिका करावी अशी निर्माते उदय धुरत यांची खूप इच्छा होती. मला ते सांगायचे की आपण फारतर हवेतसे लिहून घेऊ. मी नाही म्हणायचो. एक दीड वर्षांनी ते परत माझ्याकडे आले.खूपच आग्रह झाला. मी म्हणालो नाटक पुन्हा लिहावे लागेल आणि यातली भूमिका मी करेन पण याचे दिग्दर्शन करायला मला देणार असाल तरच. असे म्हणायचे कारण मंगेश कदम सारख्या अत्यंत नामांकित दिग्दर्शकाकडे ते असल्याने असे शक्य होणार नाही. तसे मी करणारही नाही कारण तसे करणे अनैतिक ठरते. दुस-याकडे असलेले नाटक खेचणे कोणत्याही सभ्यतेत बसत नाही. पण, निर्माते धुरत म्हणाले की मंगेशशी मी बोलतो. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मीच बोलेन कारण ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ अशी त्यांची दोन नाटके मी केली असल्याने त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. याबद्दल मी मंगेशशी बोललो. तेव्हा एकही क्षण न थांबता तो मला म्हणाला की तुझ्यासारख्या नटाला जर नाटक डिरेक्त करावेसे वाटत असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. हे नाटक तू कर. मी तुला ते दिले. आणखी एक असे की पहिल्यांदाच व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शन करतोयस, तेव्हा काही मदत लागली तर सांग मी नक्की मदतीसाठी येईन. त्याच्यासारख्या दिग्दर्शकाने स्वत:कडचे नाटक देणे म्हणजे त्याचा दीड-दोन लाखाचा तोटा आहे. असे असूनही त्याने हे केले याबद्द्ल मी मंगेशचा अत्यंत आभारी आहे. अशा रीतीने नाटक माझ्याकडे आले मी ते मला हवे होते तसे संदीप कडून लिहवून घेतले आणि तामली सुरू केल्या.

   या नाटकाबद्दल काय सांगाल ?

play director sharad ponkshe

   - नाटक हे नेहमीच सामाजिक भान ठेवून करायचे असते. आजवर मी केलेली सगळीच नाटके ही सामाजिक भान असलेली आणि संदेश देणारी होती. नाटक हे प्रभावी माध्यम आहे. ते विचारपूर्वकच हाताळले पाहिजे. समाजात अनेक ब-या-वाईट घटना घडत असतात, त्याचे समाजावर, माणसांवर परिणाम होत असतात. अशाच सामाजिक घटनांचे कुटूंबावर झालेल्या परिणामांचे हे नाटक आहे. हा परिणाम एवढा असतो, की त्या कुटुंबियांमधल्या नात्यांमध्ये गोंधळ होतो. हे नाते नेमके काय ? आई-मुलाचे की बहीण -भावाचे ? की नुसतेच मित्र-मैत्रिणीचे ? थोडक्यात क्षणा-क्षणाला नाती बदलून टाकणारे हे नाटक आहे. म्हणूनच ‘ना त्यातला नात्यांची गोष्ट’ अशी त्याची कॅचलाईन आहे.

   यातल्या कलाकारांबद्दल काय सांगता येईल ?

   - यात खरेतर तीनच पात्रं आहेत. मी स्वत: यात भूमिकाही करतोय. शिवाय अश्विनी एकबोटे सचिन देशपांडे असे मूळ नाटकात तीनच कलाकार आहेत पण यात ब्रेक देण्याची गरज होती म्हणून चौथे पात्र आहे ती भूमिका सुचेत गवई करतोय. अश्विनीची यात ख-या अर्थाने मध्यवर्ती भूमिका आहे, माझीही अत्यंत वेगळी भूमिका म्हणजे अशी की आजवर मी रंगमंचावर अशी भूमिका कधीच केली नव्हती, ती या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

   याचा अर्थ तुझी भूमिका ग्रे शेड्स असलेली आहे का ?

play director sharad ponkshe

   - इथे परिस्थीती ग्रे आणि ब्लॅक आहे. परिस्थीतीच लोकांना भंडावून सोडते. २६ जुलैसारखा महापूर येतो, बॉम्बस्फोट होतात, बलात्काराच्या घटना घडतात, अनेकांचे संसार उध्वस्त होतात. इथे गुन्हेगारांना हवी तशी शिक्षा होत नाही. त्यामुळे सगळेजण मोकाटपणे धंदे करतायत, यावर यात भाष्य आहे. ज्या राजकारण्यांवर एक जबाबदारी आहे, त्यातलेच एक नवे नाव आपण रोज घोटाळा प्रकरणात अडकलेले पाहतो. या घॊटाळ्यांमुळे जमवलेल्या मायेला काही मोजदादच नाही. या घोटाळ्यांमधले पैसे जर सरकारी तिजोरीत जमवले तर आपल्याला आज गॅसचा सिलिंडर शंभर रूपयांना आणि पेट्रोल पंचवीस रूपरे लिटर मिळू शकेल. सामान्यांच्या आयुष्याची किंमतच या देशात नाहीये. अनेक जीव इथे कसेतरी जगतायत आणि त्यातही थोडे सुख-आनंद मिळवायचा प्रयत्न करतायत. अशा धडपडणा-या दोन जीवांची ही गोष्ट आहे.

   तुम्ही दोघांनी एकत्र काम केलेले हे तिसरे-चौथे नाटक असेल ना ?

   - अश्विनी आणि मी एकत्र काम केले ते ‘इथं ऒशाळला मृत्यू’ या नाटकात. पंतांच्या आग्रहाखातर ते नाटक आम्ही केले. त्यात अश्विनी येसूबाई आणि संभाजी होतो. त्यानंतर ‘तू फ्कत हो म्हण’, हे नाट्क आम्ही केले, त्यानंतर ‘उंबरठा’ केले आणि आता ‘एका क्षणात’ या नाटकात आम्ही एकत्र आहोत. ‘माऊली प्रॉडक्शन’चे मात्र आमच्या एकत्र भूमिका असलेले हे दुसरे नाटक आहे.

   अश्विनीबद्दल काय सांगता येईल ?

   - या निमित्ताने अश्विनीला ख-या अर्थाने एक चांगली संधी मिळाली आहे. आजवर तिने जी नाटके केली त्यात तिला हवी तशी संधी मिळाली नव्हती. यावेळी मात्र तिचा उत्तम अभिनय आणि त्यातल्या छटा रसिकांना पाहायला मिळणार आहेत. विजया दशमीच्या मुहूर्तावर एका क्षणात हे नाटक रंगभूमीवर येतंय.