Sign In New user? Start here.

‘मिफ्ता’ मराठीतला मानबिंदू

‘मिफ्ता’ मराठीतला मानबिंदू

 
 
 

मिफ्ता सोहळ्याला संपूर्ण मराठी इंडस्ट्रीतून अतिशय जोरदार प्रतिसाद मिळत असून मिफ्ताला मोठं करण्यासाठी अधिकाधीक कलाकार समोर येत आहेत. जे होईल ती मदत करत आहेत. महत्वाचं म्हणजे यात फक्त नवीन कलाकारांचाच सहभाग नसून चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार सुद्धा आनंदाने सहभाग घेताहेत. त्यामुळे या वेगळ्याच मिफ्ताबद्द्ल अनेक मान्यवरांचे मत जाणून घेतले. त्यातीलच एक म्हणजे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले. मिफ्ताच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

मिफ्ता या संकल्पनेबद्द्ल एक कलाकार या नात्याने काय सांगाल? यावर प्रशांत दामले म्हणाले की, इतके वर्ष मुंबई आणि पुण्यापर्यंतच मराठी चित्रपट पुरस्कार सोहळे मर्यादीत होते. ते आता सातासमुद्रापार होताहेत. हा सोहळा गेल्यावर्षी दुबईला झाला आणि यावर्षी लंडनला होतोय. हे खरंच खूप आनंदाचं आणि कौतुकाचं आहे. आपल्या कक्षा आता रूंदावत चालल्या आहेत. पण जसजसं आपण वर जात राहू तसतशी आपल्यावरील आणि एकंदर कला क्षेत्रावरील जबाबदारी वाढत जाणार आहे. त्यानुसार आपलं सादरीकरण किंवा त्यासंबंधीत गोष्टी परफेक्ट असायला पाहिजे. शिवाय सद्या आपल्याकडे अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार होत आहेत नवीन चांगली नाटकं येत आहेत. त्यामुळे हा सोहळा नक्कीच यांच्यासाठी मानबिंदू ठरेल असं मला वाटतं.

जेवढ्या गतीने आज चित्रपटांचा विकास होत आहे त्याचप्रमाणे मिफ्ताच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचाही अधिक विकास होईल? यावर ते म्हणतात की, " मुळात काय आहे की मराठी रंगभूमीचा विकास करण्यासाठी आपल्याकडचे स्टेज आधी बदलायला हवेत. आज जर तुम्ही परदेशातील रंगमंच बघीतले तर त्यांच्या आणि आपल्या स्टेजच्या कंडीशनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याकडे २८ ते ३० फुटाच्या आत काय तो दंगा करायचा असतो. मात्र तिकडे ७० ते ८० फुट एवढी जागा असते. खरंतर मराठी नाटकांच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने दोन गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. एक म्हणजे नाटकाचा विषय आणि दुसरी म्हणजे त्यात अभिनय करणारे कलाकार कोण आहेत. अशात जर चांगल्या नाटकांना लोकांचा प्रतिसाद मिळत नसेल तर काय फायदा...? म्हणजे जास्तीत जास्त लोकं नाटक बघायला यायला हवेत तरंच मराठी रंगभूमीचा विकास होईल. दुसरी गोष्ट पब्लिसिटीची ती या मिफ्ताच्या माध्यमातून होईल याची खात्री आहे.

मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच ‘मिफ्ता’ अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे, त्यामुळे या सोहळ्याचे आयोजक अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर यांच्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, " खरंच खूप चांगलं त्यांनी हे सुरू केलं आहे. महत्वाचं म्हणजे केल्या जाणा-या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आधीच झालं असल्याने कुठलिही अडचण त्यात येत नसून अगदी सुरळीत काम सुरू आहे. त्यामुळे हा सोहळा उत्तम होणारंच. यात शंकाच नाहीये. मला वाटतं आयोजकांसाठी सर्वात चॅंलेंजींग पार्ट असतो तो, एवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकारांना आणि प्रेक्षकांना घेऊन जाणं, त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करणं हे सर्वात जास्त अवघड आणि चॅलेंजींग काम आहे. पण अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर हे सर्व सांभाळून घेत आहेत.

लंडनमध्ये स्थायिक झालेल्या मराठी लोकांच्या दृष्टीने या सोहळ्याचं काय महत्व आहे? यावर म्हणतात की, " काय असतं की ब-याच वर्षांपासून त्यांचं त्यांच्या लोकांपासून, घरांपासून नातं तुटलेलं असतं. त्यामुळे अशा सोहळ्यांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आपल्या मराठी मातीशी, मराठी लोकांशी जुळण्याची संधी मिळते. ज्या कलाकारांना ते पडद्यावर बघतात त्यांना प्रत्यक्षात भेटायला मिळतं. त्यांच्याशी जवळून संवाद साधायला मिळतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्यातही मोठा उत्साह दिसून येतो. मिफ्ता सोहळा म्हणजे त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच ठरणार आहे.

या सोहळ्याला येणा-या कलाकारांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? यावर ते म्हणाले की, " आपण मराठी कलेचे प्रतिनिधी आहोत याचे भान ठेवून तिथे जबाबदारीने वागावं एवढंच मी सर्वांना सांगतो.

-अमित इंगोले.