Sign In New user? Start here.

बहुरंगी कलोपासक ‘प्रशांत पुरुषोत्तम दामले ’

बहुरंगी कलोपासक ‘प्रशांत पुरुषोत्तम दामले ’

 
 
 

मराठी चित्रपट आणि रंगभुमीवर गेल्या 33 वर्षांपासून 'टूर' करणारा आणि 'गेला माधव कुणीकडे' चा शोध घेणा-या प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा....असा हा महाराष्ट्राचा लाडका कलावंत प्रशांत पुरुषोत्तम दामले....

1978 साली ’टूरटूर’ या सिनेमामुळे विनोदी अभिनेता म्हणून प्रसिध्दी मिळाली. आजवर त्याने 37 अजरामर मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही नाटकं आणि ‘वाजवा रे वाजवा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘तू तिथं मी’ हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. अशा या बहुरूंग कलाकाराशी झगमग डॉट नेट ने केलेली ही खास बातचीत...

* आजवर आपण अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय आणि रंगभूमीवरही तितक्याच ताकदीने आपण आम्हाला पाहण्यास मिळाले पण एक प्रश्न असा की मराठी चित्रपट सृष्टीपेक्षा नाटकांकडे तुमचा कल जास्त दिसतो. असं का?

- कल बघितल्या पेक्षा मला आनंद कुठे मिळतो हे मी नेहमी बघतो. कारण मला नाटकात जास्त आनंद मिळतो. पण चित्रपटात मिळत नव्हता असं पण नाही. नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे आणि नाटकात आपण स्वता:ला सुधारु शकतो. नाटकात काम करायला मला जास्त आवडतं. लाईव्ह परफॉरमन्स ही एक वेगळीच मजा आहे. एक वेगळे चॅलेन्ज आहे आणि प्रेक्षकांशी आपण प्रत्यक्षात संवाद साधु शकतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नाटकाचा जो प्रयोग करतो तो प्रयोगच असतो. प्रत्येक वेळी नाटकाचे काम करताना प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. ज्या क्षणाला लाफ्टर अपेक्षित आहे त्यावेळी लाफ्टर आला तर ती एक वेगळीच मजा येते.

* सद्ध्या मराठी चित्रपटांचं रूप दिवसेंदिवस बदलत चाललंय. याबद्दल काय सांगणार?

- प्रोडक्शन कॉस्ट खूप वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञान खूप आलंय. फक्त मला भीती अशी वाटते की, मराठी चित्रपटाची जी स्क्रीप्ट आहे त्याकडे थोड दुर्लक्ष होतं आहे. या आधुनिकीरणामुळे हा बदल जाणवतो आहे. आजच्या मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटाची कॉपी सादर केलेली दिसते. ते सादरीकरण करताना सुद्धा हिंदी चित्रपटाचा तोडीस तोड म्हणू शकत नाही. कारण तेवढा खर्च आपण करु शकत नाही. खरं तर विषयांची मांडणी मराठी मातीतील असावी.

* चित्रपटांबरोबरच अनेक चांगली नाटके रंगभूमीवर येत आहेत. अनेक जुनी नाटके सुद्धा येत आहेत. यामुळॆ रंगभूमीचं रूप आणखी बदलेल असं वाटतं का?

- जुनी नाटकं रंगमंचावर येण्याचं कारण असं आहे की, एक तर नवीन लेखक जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे वळली आहेत. आपल्याकडे चार-पाच मराठी वाहिन्या आहेत. प्रत्येक चॅनल वर वेगवेगळ्या मालिका चालू आहेत. या सगळयांमुळे लेखक मंडळी तिथे व्यस्त आहेत. नवीन नाटक लिहीण्यासाठी जे पेशन्स लागते, जी जिद्द लागते, ती जिद्द त्याच्यांकडे नाही, असं नाही. कारण जे बावीस एपिसोड लिहू शकतात त्यांच्याकडे जिद्द नाही असं नाही, त्याला एक इच्छा लागते. त्यामुळे उत्तम संहितेची थोडी उणीव आहे. जुनी नाटकं परत रंगमंचावर येण्याचं कारणच ते आहे. जुन्या नाटकांची संहिता चांगली होती. त्यालाच जरा आधुनिकीकरण करुन ते लोकांसमोर माडणं ही एक कला आहे.

* तुमच्या नावाने असलेल्या प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनतर्फे नवीन कोणती नाटकं येत आहेत?

- खरं सांगू का... ही फर्म स्थापन झाली ती सोशल, कल्चरल आणि एज्युकेशनल अ‍ॅक्टीव्हिटीजसाठी! फक्त नाटक हा उद्देश नाही. पण बरीच कामं आम्ही या मार्फत करतो. नवीन नाटक कधी येईल हे काही सांगता येत नाही. पण साधारणत: २६ नोव्हेंबरला एक नवीन नाटक प्रदर्शित होणार आहे. पण मी जरा ते गुलदस्त्यात ठेवत आहे.

* अनेक मराठी कलाकार आता चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येत आहेत. तुमचा असा काही प्लॅन आहे का?

- दिग्दर्शनाचं काम हे चोवीस तासांचं असतं. दिग्दर्शनासाठी कमीत कमी चार ते पाच वर्षांची तपस्या लागते. त्यासाठी चार-पाच चित्रपट चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणं महत्वाचं आहे.

* आज मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवीन चेहरे आपल्याला पहायला मिळतात. अशा कोणत्या नव्या चेह-यासोबत तुला काम करायला आवडेल?

- मराठी भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्त्व असणं महत्वाचं आहे. वाक्यातला कुठला शब्द महत्वाचा हे देखील गरजेचं आहे. मराठी येणं गरजेचं आहे. त्यामुळे असे जे कलाकार आहेत त्यांच्याबरोबर काम करायला मला फार आवडतं. मग हावभाव व अभिनय हा पुढचा भाग आहे. बाकी अभिनय, अभिनय आहे. त्यासाठीच मी आहे....

माझ्यातर्फे सर्व प्रेक्षकांना आणि रसिक मायबापांना आपल्या लाडक्या प्रशांतकडून खूप खूप शुभेच्छा....

एका कलाकारने कलेसाठी दिलेली साद ही प्रशांतच्या अभिनयाचं प्रतिबिंब आहे असचं म्हणावं लागेल.....

धन्यवाद....