Sign In New user? Start here.

खुप वर्षांनी मी तिरळा झालो - पॅडी कांबळे

खुप वर्षांनी मी तिरळा झालो - पॅडी कांबळे

 
 
 

मालिका असो वा चित्रपट या सर्वच माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या धमाल विनोदी अभिनयाने खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी. याची भूमिका असलेला ‘येड्यांची जत्रा’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. भरत आणि पॅडी यांची विनोदी जुगलबंदी याआधीही आपण अनुभवली असून या चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा ही जोडी धमाल करायला येत आहेत. या चित्रपटाविषयी पॅडीशी केलेली ही खास बातचीत...

* ‘येड्यांची जत्रा’ या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे ?

- आतापर्यंत आपण सर्वांनी वेगवेगळ्या जत्रा पाहिल्या असतील,मग त्या गावाकडच्या असो वा शहरातील...मात्र ही येड्यांची जत्रा बघितल्यानंतर खरंच तुमच्या लक्षात येईल,हे टायटल या चित्रपटाला किती समर्पक आहे. जवळपास १० वर्षांनंतर मी असं कॅरेक्टर या चित्रपटात करतोय ज्याचं नाव आहे नयनराव...मात्र नावाच्या विरुद्धच माझं रूप आहे. मी यात तिरळ्याची भूमिका करत आहे. मी जरा नॉस्टॅल्जिक झालो होतो की, इतक्या वर्षांनी मला अशी भूमिका करायला मिळत आहे. खरंतर भरतही माझ्याबरोबर तिरळा असला असता तर आणखी मजा आली असती. कारण हसा चकटफु या मालिकेत चव्हाण अण्णा आणि बंड्या ह्या आमच्या भूमिका खुप गाजल्या होत्या. पण यात तो तिरळा नाहीये. मात्र तेवढ्याच तोडीची अभिनेत्री विशाखा सुभेदार आहे. जी या चित्रपटात माझ्या आईची भूमिका करत आहे. ती सुद्धा या चित्रपटात तिरळी आहे.

pyady kamble yedyanchi jatra

* या चित्रपटातून प्रेक्षकांना वेगळी काय धमाल पहायला मिळणार आहे?

- विषय सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टीने आपली दिवसाची सुरवात होते तो हा विषय आहे. सरकारची जी योजना आहे निर्मल ग्राम योजना त्यावर या चित्रपटाचं कथानक आहे ज्यावर राजकारण होतंय. अतिशय विनोदी पद्धतीनं प्रेक्षकांसमोर हा विषय येतोय. कुठलाही मॅसेज देण्याचा अट्टहास नाहीये. पण तो आपसुक त्यातनं येतोय. असा हा सिनेमा आहे. भरत जाधव, विनय आपटे, मोहन जोशी, संदीप पाठक अशी उत्तम कलाकार मंडळी यात तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.

* मिलिंद कवडे हे पहिल्यांदाच चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन करत असून त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

- मिलिंदचा हा पहिलाच चित्रपट असेल असं त्याच्या कामावरून जराही वाटत नाही. जेव्हा आम्ही सेटवर गेलो तेव्हा त्याचं होमवर्क आणि पेपरवर्क इतकं करेक्ट होतं की, वेगवेगळ्या पद्धतीनं तो शॉट्स घेत होता. एकतर तो अ‍ॅडमॅन असल्याने अ‍ॅड्सचा जो एक फिल असतो तो या चित्रपटाला मिळाला आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम हलती आहे. तांत्रीकदृष्ट्या चित्रपट खुप सुसज्ज आहे. तसेच त्याचं लिखाण सुद्धा उत्तम आहे. शिवाय प्रकाश भागवत यांनी लिहिलेले डायलॉग्स सुद्धा धमाल आहेत. तो मुळात मराठवाड्यातला असल्याने आणि चित्रपटही मराठवाड्यात घडत असल्याने जो ग्रामीण लहेजा त्याने यात आणलाय तो मस्त आहे.

* एवढी धमाल या चित्रपटात असणार असं प्रोमोजवरून दिसून येत असून शूटींग दरम्यानही अनेक किस्से घडले असतील. त्यातील तुझ्या आठवणीतला खास किस्सा?

- खरंतर अख्खा चित्रपटच माझ्या लक्षात आहे. सांगायचं झाल्यास भरत बरोबर काम करत असतांना मला नेहमीच खुप चांगलं वाटतं. मी खुप हॅपी असतो. कारण भरत खुप चांगला रिअ‍ॅक्टर आहे, को आर्टीस्ट आहे. आठवण सांगायची झाल्यास आम्ही एक पारावरचा सीन करत होतो. त्यात मी शशीकपूर सारखा नाचलोय. त्या सीनला भरत फुटला म्हणजे हसला...त्यातून एवढी काय धमाल झाली ना की, आम्ही जवळपास पुढचा अर्धा तास शूटींग थांबवून हसत होतो. हा किस्सा खरंच खुप लक्षात आहे. तसं तर अनेक किस्से आहे. एक एपिसोड होईल किस्स्यांचा मात्र त्यातील हा जास्त लक्षात आहे.

अमित इंगोले