Sign In New user? Start here.

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शुक्रतारा राहूल देशपांडे

* शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शुक्रतारा राहूल देशपांडे *

 
 
 

राहूल देशपांडे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक तरुण आणि मनमौजी गायक. प्रसिद्ध गायक पंडीत वसंतराव देशपांडे यांचा तो नातू. मात्र आपल्या आजोबांकडून शास्त्रीय संगीताचा एकही धडा न गिरवता, तो आज शास्त्रीय गायन क्षेत्रातील एक प्रसिद्ध गवय्या म्हणून प्रसिद्ध आहे. ख्याल, ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, भजन, गझल आणि भावगीत अशा विविध प्रकारच्या गायनात तो चांगलाच रमतो. शास्त्रीय गायना व्यतिरीक्त राहूल त्याच्या आजोबांच्या ‘कट्य़ार काळजात घूसली’ या संगीत नाटकात अभिनय सुद्धा करतो आहे. शिवाय नुकतीच त्याने ‘बालगंधर्व’ या चित्रपटात देखील एक भूमिका केली होती. या हरहुन्नरी शास्त्रीय गवय्याशी झगमग प्रतिनिधी अमित इंगोले यांनी केलेली खास बातचीत.....

शास्त्रीय गायनाच्या प्रवासाची सुरवात कशी आणि कधी झाली याबद्दल राहूल सांगताना म्हणाला, "वयाच्या ६ व्या वर्षापासून मी पंडीत गंगाधर पिंपळखरे यांच्याकडे संगीत शिकलोय. त्यांच्याकडे १० वर्ष मी गाणं शिकलो. माझे आजोबा ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे हे मी ताडे तीन वर्षाचा असतांनाच वारले. त्यांच्याकडून मला काहीच शिकायला मिळालं नाही. मात्र त्यांनी सांगितलं होतं की, माझं संगीत शिक्षण हे पिंपळखरे बुवांकडे व्हावं. त्यानुसार माझ्या वडीलांनी मला त्यांच्याकडे संगीत शिकायला पाठवलं. माझी पहिली मैफिल मी १९८७ साली गुरू पौर्णिमेला गायिली होती. तेव्हा मी दुर्गा गायलो होतो. दुर्गामध्ये एक बंदीश गायलो होतो. ‘छबीली छैल खेले ओरी छबीली छैल खेले’ असे त्या बंदीशचे बोल आहेत".

"माझे आजोबा एक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध गायक होते. मात्र मला त्यांच्याकडे संगीताचे धडे गिरवता आले नाही. याची खंत माझ्या मनात आहेच. त्याचं कारण असं की, ते जितक्या ताकदीचे गव्वये होते, तितक्याच ताकदीचे ते शिक्षक सुद्धा होते. मात्र त्यांच्याकडे मला संगीत शिकता आले नाही. पण त्यांचं गायन आजही ऎकलं तर खूप शिकता येतं. आणि त्यातून मी शिकलो सुद्धा...."

शास्त्रीय संगीताबरोबर तू मराठी/हिंदी गझल सुद्धा गातोस. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या मराठी गझल असलेला ‘गझल दरबार’ हा अल्बम मागे येऊन गेला. कसा अनुभव होता हा? यावर राहूल म्हणतो, "खूप छान अनुभव होता...मी एकतर १० व्या वर्गात असल्यापासून सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्याकडे जायचो. ते माझ्या आजोबांचे जणू भक्तच होते. ते खूप मोठे गझल तज्ञ असल्याने त्यांच्याकडे गेलो की, गझल संबंधीत अनेक गप्पा व्हायच्या. कुणाची गझल कशी असते. काय असते. त्यांच्याकडून ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि याचा खूप जास्त उपयोग माझ्या गायकीला झाला. त्यांचे अनेक कार्यक्रमही मी केले. यातूनच मला गझलची खरी ओढ माझ्यात निर्माण झाली. त्यानंतर मला वैभव जोशी येऊन भेटला. तेव्हा आमची ऒळखही नव्हती. मात्र त्याने लिहिलेल्या गझल मला खूप आवडल्या. आणि मी त्याच्याबरोबर ‘गझल दरबार’ हा अल्बम केला. या अल्बमधील माझी आवडती गझल म्हणजे ‘शेवटी काही फुले उधळायला ये, तू मला तेव्हा तरी भेटायला ये’ ".

गझल गायन आणि शास्त्रीय गायनाबद्द्ल बोलतांना तो सांगतो, "शास्त्रीय संगीत हे एखाद्या युनिव्हर्सिटी सारखं आहे. गझल गायन, लाईट गायन किंवा ठुमरी गायन ह्या शास्त्रीय गायनाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. त्यातही आणखी प्रकार असतात. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. शास्त्रीय संगीत हे सुरप्रधान आहे. त्यामुळे गझल गातांना त्यातील अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहचणं महत्वाचं असतं. सुर हे त्यातील एक एलिमेंट असतं".

शास्त्रीय संगीत आणि गझल गायन या दोन प्रकारांपैकी तू कशात जास्त रमतो? असं विचारता राहूल म्हणतो, "मी शास्त्रीय संगीतात जास्त रमतो. तसे मला सर्वच प्रकार गायला आवडतात. पण सरतेशेवटी म्हणतात ना, तशी मला शास्त्रीय संगीतात एक वेगळीच शांतता मिळते. त्यामुळे शास्त्रीय संगीत माझ्यासाठी खूप जवळचं आहे".

एवढ्या लहान वयातच तू ज्या टेक्निकल पद्धतीने शास्त्रीय गायन करतो, ते फारसं आजच्या तरूणांमध्ये पहायला मिळत नाही. तूझ्या या गायनाचं काय गुपीत आहे? यावर तो सांगतो, "मला माझ्या गुरूजनांनी जे शिकवलं ते मी गातो. मी नेहमी वेगवेगळे प्रयोग करतो. माझा एक मित्र आहे चैतन्य कुंटे. जो आमच्या पिढीतला म्युझिकोलॉजिस्ट आहे. त्याची मदत घेऊन मी अनेक कार्यक्रम केलेत. कुमारांच्या बंदीशीचा एक कार्यक्रम घेतला. सद्या एक कार्यक्रम आहे डोक्यात की, एकच राग घेऊन तीन तास मैफिल करायची. तो राग आत्ताच्या पिढीला कळण्याकरीता काय काय करता येईल, असे अनेक नवीन प्रयोग मी करत असतो. आणि त्याच्यामुळॆ अभ्यास जास्त होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे मला त्याची आवड आहे. आणि मला असं वाटतं की, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल, तर ती आपण खूप मनापासून करतो".

आज अनेक तरुण गायक हे चित्रपटात पार्श्वगायन करण्यासाठी धडपडत असतात. तूलाही पार्श्वगायन करावं असं कधी वाटलं नाही का? "खरंतर लहानपणी मला असं वाटायचं. पण ते अगदी एका क्षणा पूरतच असायचं. मला असं कधी वाटतं नाही की, मला चित्रपटात गाण्यास मिळावं. मी जे करतो ते खूप प्रामाणिकपणे करतो. माझ्या कलेकडे खूप प्रामाणिकपणे बघतो. आजच्या तरुण पिढीने ही खरंच खूप समजून घेण्याची गोष्ट आहे. जी अतिशय दुरापास्त होऊन बसली आहे. म्हणजे एखाद्या स्पर्धेत आपल्याला गायचं असतं म्हणून आपण गायला लागतो. ही जे काही रिव्हर्स इंजिनिअरींग असते ती शास्त्रीय संगीतात चालत नाही. तूम्ही सातत्याने त्याचा मागोवा घेतला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे".

आजही शास्त्रीय गायनाकडे आजची तरुण पिढी पाठ फिरवते. त्यामुळे तरूणांमध्ये हे संगीत रूजवण्यासाठी राहूल काही उपक्रम करतो आहे. त्याबद्दल त्याने माहिती दिली. "शेवटी असं आहे की, माझे आजोबा जेव्हा होते तेव्हाही हीच रड होती. म्हणजे प्रत्येक काळात ह्या समस्या असतातच. यावर माझे आजोबा खूप छान बोलले होते की, शास्त्रीय संगीत ही काळाची भूक आहे. त्याच्यासाठी आपण चिंता करायची गरज नाही. तो जन्माला घालत असतो आणि तो त्याची भूक भागवत असतो. हे मला खूप संयुक्तीक वाटलं. यात मी काय करतो तर मी दरवर्षी वसंतोत्सव भरवतो. यात जे नवीन उभरते कलाकार असतात. त्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो. शिवाय माझं संगीत नाटकांमध्ये काम करण्याचं हेच कारण आहे की, आताच्या पिढीपर्यंत त्या जुन्या चाली, ते जुनं संगीत पोहचावं".

सध्या तू ‘कट्यार काळाजात घूसली’ या नाटकात अभिनय करतो आहे. शास्त्रीय संगीत आणि अभिनय हे कसं जुळून आलं? तूझ्यात अभिनयाचे गुण आधीच होते, की अ‍ॅक्सिडेंटली तू अभिनय करायला लागला? "अभिनयाचे गुण माझ्याकडे होते की, नव्हते मला माहिती नाही. माझे आजोबा खूप मोठे अभिनेते होते. पण जो ‘वसंतोत्सव’ मी करतो त्यात मला एकाने विचारलं होतं की, वसंतरावांचं संगीत नाटकांमध्ये खूप मोठं योगदान होतं. तू काय करणार आहेस. तर मी बोलून गेलो की, एखादं संगीत नाटक करू आणि मग ‘कट्यार’ करण्याचं ठरलं. हो....नाही म्हणत मी ते केलंच. खूप शिकायला मिळालं मला त्यातून....मी किती चांगला अभिनय करतो मला माहित नाही. पण नाना मला म्हणाला होता की, फजीती होण्यातही एक गंमत असते. त्याचाही अनुभव घ्यायला हवाच".

-अमित इंगोले.