Sign In New user? Start here.

वास्तववादाच्या नावाखाली निराशावादी लिखाण - रत्नाकर मतकरी

Ratnakar Matkari interview

वास्तववादाच्या नावाखाली निराशावादी लिखाण - रत्नाकर मतकरी

 
 
 

- झगमग टीम

  गुढ कथाकार आणि ज्येष्ठ दिग्दर्शक, नाटककार, साहित्यिक म्हणून मराठी मनाला सुपरिचित असणारे आणि मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे रत्नाकर मतकरी यांनी बीएमएमच्या शिकागो येथे होणा-या अधिवेशनात प्रमुख वक्ते (कि नोट स्पिकर) म्हणून भाषण केलं. त्यात त्यांनी सध्या निर्माण होणा-या साहित्यावर अतिशय परखड मत व्यक्त केलं आहे.

   * मराठी कला, साहित्य आणि भाषेचा विकास करण्यासाठी अशा पद्धतीची अधिवेशने कितपत फ़ायदेशीर ठरतील, असे तुम्हाला वाटते?

   अमेरिकेत राहणा-या मराठी जणांचा मराठी भाषेशी आता संपर्क वाढला आहे. मात्र यापूर्वी कमी होता, असे नाही. पर्यायाने मराठी आणि महाराष्ट्राशी आता जास्त संपर्क वाढला आहे. अमेरिकत मराठी कार्यक्रम व्हावेत. लोकांपर्यंत मराठी भाषा आणि साहित्य पोहचावे, यासाठी हा उपक्रम चांगला आहे. मुळात अमेरिकेत मराठी लोक आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. त्यांचे मराठीवरचे प्रेम वाढते आहे. दोन वर्षातून एकदा अशा प्रकाराचे अधिवेशन होत असले तरी याचा व्याप मोठा आहे. तिकडे पुष्कळ लोक मराठी लिहणारे आणि वाचणारे आहेत. त्यांचे लिखाण भारतात प्रसिद्ध होत नाही. मात्र तिकडे प्रसिद्ध होणा-या नियतकालिकातून काही चांगली मंडळी लिहती होत आहे. विशेष म्हणजे हे लिखाण वाचले जात असून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळत आहे. मुळात कसे आहे की, अमेरिकेत मराठी कुंटूंबियांची संख्या वाढत असल्याने अशा अधिवेशनांची अधिकाधिक गरज आहे. कला आणि साहित्य हे दोन्ही प्रांत वेगवेगळे असले तरी त्याने फ़ारसा काही फ़रक पडत नाही. यामध्ये कोणाला किती रूची आहे हे महत्वाचे. आपल्याकडे होणा-या साहित्य संमेलनांमधून मनोरंजनाचे कार्यक्रम होताच. त्याचप्रमाणे शिकागोतल्या अधिवेशनातसुद्धा अशा प्रकाराच्या कार्यक्रमांची अधिकाधिक गरज आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने का होईना त्यांचे वाचन वाढते. संपर्क वाढतो. मराठी साहित्याची माहिती होते. मराठीवरचे प्रेम वाढते. मराठीचा सराव राहतो. बोलीभाषेपेक्षा थोडया शुद्ध मराठीशी संपर्क येतो. मुंबईत तरी कुठे शुद्ध मराठी बोलली जाते. त्यामुळे या अधिवेशनाने यात काहीसा फ़रक पडणार असेल तर काहीच वावगं ठरणार नाही.

   * तुम्ही या अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून जी भूमिका मांडली त्याबद्द्ल काय सांगाल?

   मी अधिवेशनात "समाज आणि मराठी साहित्य" या विषयावर माझी भूमिका मांडली. साहित्याचा समाजावर किंवा समाजाचा साहित्यावर काय प्रभाव पडला याचा आढावा घेतला आहे. एकेकाळी ध्येयवादी, आशावादी साहित्य लिहले जात होते. मात्र आज साहित्यामध्ये बकालपणा आला आहे. वास्तववादाच्या नावाखाली निराशावादी लिखाण सुरू आहे. साहित्यामुळे समाजात बदल घडेल, असा समज ठेवणे आता कठीण झाले आहे. आता पूर्वीसारखे वैचारिक साहित्य लिहले जात नाही. मूल्य ढासळत चालली आहेत. वाचनाचा एक टक्काही लोक वाचतात की नाही याबाबत शंका आहे. लोकांकडे वाचायला वेळ नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. लोकांचा वाचनाचा पाया कच्चा राहिला आहे. फ़ार कमी लोक वाचन करतात. त्यामुळे साहित्याने आता क्रांती वैगेरे होईल, असे म्हणणे कितपत बरोबर आहे हे मला माहित नाही. वाचण्यासारखे खुप आहे मात्र विशिष्ट वर्ग वाचनाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. प्रत्येकाला महत्वकांक्षा असल्याने प्रत्येकजण या स्पर्धेत धावतो आहे. मोठ्या पगाराच्या नोक-या असल्याने लोकांना तिथे फ़ार वेळ द्यावा लागतो. अधिकाधिक वेळ प्रवासात जातो. ई-क्रांतीमुळे साहित्य लोकांना सहज उपलब्ध झाले आहे मात्र तेही फ़ार कमी लोकांपर्यंत पोहचले आहे. खेड्यापाड्यातही बदल होत असून, तिकडेही शहराचे अनुकरण होत आहे. एकंदर गेल्या पन्नास एक वर्षाचा साहित्याचा आढावा मी माझ्या भाषणातून घेतला.

   ४) एक साहित्यिक या नात्याने तुम्ही या अधिवेशनाकडे कसे पाहता?

   अधिवेशानाच्या निमित्ताने का काही होईना लोकांच्या कानावर चांगली मराठी पडेल. मराठी भाषेचे वातावरण तयार होईल. साहित्य निर्मितीचे वातावरण निर्माण होईल. सर्वच लोक साहित्याशी संबधित असतील अशातला भाग नाही. मात्र ते लोकही अधिवेशानात सामील झाले तर त्यांचा संपर्क वाढेल. त्यांच्यापर्यंत न पोहचलेले साहित्य पोहचेल. एकंदर एवढेच म्हणेण की, भाषेसह साहित्याचा विकास आणि व्यापक प्रसार होण्य़ासाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत आणि ते होत राहोत.

   ५) सद्यस्थितीमध्ये मराठीच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण केले जात असताना शिकोगामध्ये मराठी भाषिक लोक भाषेचा विकास आणि प्रसारासाठी अधिवेशन भरवतात याबाबत तुमचे मत काय आहे?<?

   राजकारण कशाचे केले जात नाही ते सांगा? शिववडा असो नाही तर पाणीपुरी. राजकारण हा एक मोठा धंदा झाला आहे. राजकारणात राम उरलेला नाही. लोक पाहत राहण्यापलीकडे काही करत नाहीत. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा काळ कसा भारदस्त होता. समाजाला आणि राजकारणाला दिशा मिळत होती. त्यांच्यानंतरही पुढील पाच वर्षे काही काळ चांगले वातावरण होते. मात्र ऐंशीच्या दशकादरम्यान आणि नंतर राजकारणाचा चेहरा-मोहराच बदलून गेला. आजघडीला अवस्था वाईट आणि बिकट आहे. आदर्शवाद उरलेला नाही. नुसते भाषेवर नाही तर लोकं उठसूठ कशावरही राजकारण करतात. शरद पवार यांना यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाते. मात्र पवार राजकारणात फ़ार काही आशावादी कामगिरी करू शकले नाहीत. सगळीकडे निराशावाद आहे. राजकारण्यांकडे बुद्धी चांगली आहे. मात्र त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. लोकांच्या भल्यासाठी नाही तर स्वताचे खिसे भरण्यासाठी प्रत्येकजण राजकारणात उतरतो आहे. विकास राहिला बाजुलाच. प्रत्येकाला मी आणि माझा पक्ष एवढेच काय ते राजकारण ठाऊक आहे. लोकानांही कळले आहे मात्र वळले नाही. महाराष्ट्र विकला गेला तरी चालेल पण राजकीय लोकांना मराठीचे काहीएक पडलेले नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्यानंतर पहिल्या दहा वर्षांत थोडा उत्साह होता. यशवंतरावांनी महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या. मात्र नंतर परिस्थिती बदलली. प्रत्येकजण आपला फ़ायदा कसा होईल याचा विचार करू लागला. तेव्हापासून सुरु झालेली घसरुन आताही सुरुच आहे. अमेरिकत मात्र तेथील लोकांचा राजकारणाशी फ़ारसा संबध येत नाही. अधिवेशनामध्ये राजकीय कार्यक्रमांचा भाग नसतो. त्यामुळे त्यांचा अभिमान आहे.

   * मराठी रंगभूमीला चांगले दिवस आल्याची चर्चा ऐकिवात आहे, याबाबत तुम्हाला काय वाटते?

   ...चांगला प्रश्न विचारलात. कसे माहित आहेत आहे का याचा अर्थ असा होतो की, चांगला बिझनेस होतो आहे. फ़ार चांगली नाटकं येत आहेत, अशातला भाग नाही. यशस्वी नाटकं दोन किंवा तीन त्याच्यापुढे काही नाही. पूर्वीप्रमाणे चांगलं स्क्रिप्ट पाहयला मिळत नाही. जेवढा धंदा करुन घेता येईल तेवढा करुन घ्यायचा. काय झाले माहित आहे का, यापूर्वी नाटकांशी संबधित ज्या संस्था होत्या त्या उरल्या नाहीत किंवा त्या वाढल्या नाहीत. एका अर्थाने म्हणायचे तर त्या वाढू दिल्या नाहीत. त्या कोणी वाढू दिल्या नाहीत या खोलात शिरण्याची गरज नाही. मात्र काही लोकांमुळे संस्था अधोगतीला गेल्या. नाटक सोपं आहे, असे लोकांना वाटते मात्र प्रत्यक्षात असे काही नसते. स्टार घेतले म्हणजे आपले नाटक चालले अशातला भाग नसतो. नाटक यशस्वी होण्यासाठी साहित्याबद्दल किंवा कामाबद्दल प्रेम लागते. आजघडीला तसे दिसून येत नाही. अभिरुची असणारी नाटकं आता होताना दिसत नाही. आता केवळ चालेल असे नाटक करण्याकडे कल आहे. याबाबतच्या कल्पना पुसट झाल्या आहेत. चांगले लेखक आणि दिग्दर्शकांना लांब ठेवण्यात येत आहे. लोक कमीपणा घ्यायला तयार नाहीत. पूर्वी असे नव्हते. मोठया माणसाचा मोठेपणा समजायला स्वताकडे मोठेपणा लागतो. आज तोच राहिलेला नाही. चार पैसे मिळत असतील तर चांगलेच आहे पण गुणवत्तेच्या कल्पना बदलल्या आहेत. शिक्षणाची अधोगती होत आहे. सुशिक्षित वर्ग कमी होत आहे. कानिटकरांच्या नाटकांदरम्यान तुमच्या हातात पैसा यायला तुमच्याकडे चांगली विद्या असणे गरजेचे होते. मात्र आज परिस्थिती बदलली. विद्या नसली तरी पैसा येत आहे. प्रेक्षकांची अभिरुची बदलल्याने निर्मात्यांना आयती संधी मिळाली. प्रेक्षकांना तशा प्रकाराचे नाटक आवडते म्हणून आम्ही असे नाटकं करतो आहोत, असा सुर लावला जातो. चार चांगली मंडळी आली आणि एखादा चांगला प्रयोग झाला, असे होताना दिसत नाही. धंदेवाईकपणा आला आहे. मात्र कलेसाठी जे काम करतात ते धंदेवाईक नाही होऊ शकत. मात्र अशा नाटकांचे प्रयोग कमी होताना दिसतात. आता नटमंडळींना वेळ मिळत नाही. अनेक पर्याय खुले आहेत. तालमीत खुप शिकायला मिळायचे आता तालमी होताना दिसत नाहीत किंवा तालमींसाठी पाहिजे तसा वेळ मिळत नाही.

   * नवीन विषयांवर मराठी चित्रपट घेऊन येणा-या लेखक, दिग्दर्शकांबद्दल तुमचे मत काय आहे?

   आता दिग्दर्शक आणि लेखक वेगळे राहिलेले नाही. दिग्दर्शकच लेखक झाला आहे. निर्माता, दिग्दर्शक आणि दोन स्टार मिळाले की सिनेमा झाला, असे होते. मात्र त्याला पाया नाही. चांगल्या लिखाणावर चांगला सिनेमा होताना दिसत नाही. पैसा महत्वाचा झाला आहे. तसा तो महत्वाचा आहेच. चांगली स्क्रिप्ट ही संकल्पना उरलेली नाही. चांगल्या लेखकाकडे यायला निर्मार्त्यांना वेळ नाही किंवा ते येत नाही. त्यांचा कलेशी संबध येत नाही. मग चित्रपट चांगला होत नाही. चांगल लिहण्यापेक्षा भरपूर लिहण्यावर भर दिला जातो. कालांतराने गुणवत्ता घसरते. वरवर दिसते त्याप्रमाणे सिनेमा चालत नाहीत. एक चांगला लेखक आणि दिग्दर्शक यांच्याप्रमाणे डिस्ट्रीब्युटरनेही सिनेमासाठी काम केले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. प्रत्येक सिनेमा चांगल्यारितीने डिस्ट्रीब्युट झाला पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. त्यामुळे चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहचत नाही.

   * लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीच्या प्रदीर्घ अनुभवांनतर समाधानी आहात?

   वाईट अनुभव पुष्कळ आले पण त्याने मला फ़ारसा काही फ़रक पडला नाही. कारण मी प्रामाणिक होतो. मी कोणाच्या दडपणाखाली काम केले नाही. त्यामुळे नुकसान झाले पण कोणाच्या दडपणाखाली वाईट सिनेमा केला नाही. स्वांतत्र्यानिशी सर्व काही केले. चांगल काम करणे कठीणच असते. मात्र नंतर मार्ग सोपे होतात. प्रामाणिकपणे काम केले की यश मिळेलच, असे धरुन चालायचे नाही. पण प्रयत्न थांबवायचे नाहीत.

   * नुकताच पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट कोणता?

   पाहिले तसे बरेच, मात्र टिंग्या आवडला. आवडला म्हणण्यापेक्षा मनाला भावला. कसे असते माहित आहे का? प्रामाणिकपणे एखादी गोष्ट केली की मग यश मिळतेच. मला टिंग्या प्रामाणिक वाटला. गाभ्रीचा पाऊस आणि वळूपण पाहिला. मात्र टिंग्या लय भारी. कलेमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. तो ठेवला की यश मिळतेच.

   * सध्या कुठला नवीन चित्रपट करत आहात किंवा काही नवीन लिखाण?

   एक नाही तर चार-चार चित्रपट लिहून तयार आहेत. काही मालिकांसाठी लिखान केले आहे. मात्र निर्माता मिळणे गरजेचे आहे. माझ्यावर विश्वास असणारा निर्माता मिळाला पाहिजे. मी काही कुठे शोधायला जाणार नाही. आपल्याकडचे निर्माते पाहत आणि विचारत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात. माझे लिखाण नेहमीच सुरू असते. कधीकधी वेळ कमी पडतो. कामाचा व्याप वाढला आहे पण तरिही कंटाळा करून चालत नाही. जसे जमेल तसे लिहतो. एक काम आहे, अशातला भाग नाही. सतत डोक्यात कोणता तरी विषय घोळत असतो. सवडीनुसार लिहतो. घरी रोज चार वर्तमानपत्र येतात पण वाचायला वेळ मिळत नाही. दिवसभरातली कामं उरकली की रात्री वेळ काढून वर्तमानपत्र वाचतो. बातम्यांचा सूर नकारात्मक असतो, पण जगाशी स्वताला जोडणे महत्वाचे. वर्तमान पत्रातील मराठी भाषेबद्दल न बोललेच बरे. व्याकरणाच्या तर चुकाच चुका. काळ उलटला तसा वर्तमानपत्रे बदलली पण त्यात जिंवतपणा नाही. काही ठराविक वर्तमानपत्रे वगळली तर फ़ार काही आशावादी चित्र नाही. पण हे सगळे बदलणे गरजेचे आहे. नव्या पिढीसमोर आपण काय मांडतो आहोत, याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे.

 
 
 

Other Interview link