Sign In New user? Start here.

आता मराठी इंडस्ट्रीत स्टार्स कुठे आहेत ?

 
     
 

रवी जाधव

आता मराठी इंडस्ट्रीत स्टार्स कुठे आहेत ?

जाहिरात क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसोबतच मराठी सिनेइंडस्ट्रीला एक वेगळी ओळख देणारं तरुण आणि प्रतिभावंत व्यक्तीमत्व म्हणजे चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव. पहिल्याच ‘नटरंग’ या सिनेमाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर त्यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बालगंधर्व’ या सिनेमानेही अनेक रेकॉर्ड मोडीत काढलेत आणि रवी जाधव हे नाव नामवंत मराठी चित्रपट दिग्दर्शकांच्या यादीत लिहिल्या गेले. इतक्या कमी वेळात त्यांना मिळालेल्या या यशामागे काय विचार आहेत आणि त्यांच्या या यशस्वी वाटचालीतील चढ-उतार जाणून घेण्यासाठी झगमगचे प्रतिनिधी अमित इंगोले यांनी रवी जाधव यांच्याशी केलेली ही खास बातचीत....

* तूझ्या कला क्षेत्रातील प्रवासाची सुरवात कशी आणि कधी झाली ?

- मी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट येथून बीएफए केलंय. त्यात मी कमर्शिअल आर्ट निवडलं होतं. यात असं असतं की एखादी गोष्ट जी आपण खूप मेहनतीने तयार केलेली असते ती लोकांपर्यंत प्रवाभीरित्या पोहचवणं शिकवलं जातं. तेथून बाहेर पडल्यावर मी Draft Fcb-Ulka या जाहीरात कंपनीत काम करायला लागलो. जवळ जवळ १२ वर्ष मी या कंपनीत काम केले. वयाच्या ३० व्या वर्षींच डिरेक्टर या पदापर्यंत या कंपनीत मी गेलो. जाहीरात विश्वाची सर्व माहिती मला घ्यायची होती म्हणून दर दोन वर्षांनी या कंपनीत माझं डिपार्टमेंट बदलून घेत होतो. फिल्म डिरेक्शन करण्याआधी ते मला खूप महत्वाचं वाटत होतं. आणि त्याचाच फायदा आता मला सिनेमा करताना होतो. मार्केटींगपासून ते डिझायनिंगपर्यंत सर्वच मी चांगला जाणून आहे. या एजन्सीमध्येच माझा खूप मोठा पाया तयार झाला. ITC, GODREJ, AMUL, ZODIAC, ZOD, WIPRO, CEAT, UTI, ICICI, TCS, TATA MOTORS, ZEE NETWORK, KINETIC, LIC, INDIAN TEA BOARD या मोठ मोठ्या कंपन्याच्या जाहीराती करायला मिळाल्या आणि त्यातून खूप काही शिकता आलं.

* हे सर्व करताना पुढे फिल्म डिरेक्शन करायचं असं कुठे ठरवलं होतं का ?

- खरंतर १२ वर्ष जाहीरात फिल्डमध्ये काम करायचं हे मी ठरवलं होतं. आणि ते खूप मेहनतीने करायचे हेही ठरवले होते. जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं हेच मनात होतं. यात माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. कधीही कुठल्या गोष्टीची कम्प्लेंट केली नाही. ती जाहीरात कंपनी सोडल्यावर मी स्वत:ची जाहीरात कंपनी सुरू केली. माझी पहिली फिल्म ‘नटरंग’वर काम करणे सुरू केले. माझं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस असल्याने वर्षातून जवळपास १०० जाहीरातींसाठी काम करतो.

* ‘नटरंग’ या तूझ्या पहिल्या फिल्मची नशा अजून कमी झालेली नाहीये, या सिनेमाबद्दल सांग. हा विषय निवडण्यामागचं कारण ?

- जाहीरात क्षेत्रात इतकी वर्ष काम करून करून मी आपल्या मराठी भाषेपासून खूप लांब गेलो होतो. या फिल्डमध्ये इंग्रजीचा जास्त प्रभाव आहे. अनेकदा काम करताना या मराठी भाषेचा कुठेतरी उपयोग करता येईल का ? किंवा फिल्मसाठी उपयोग करता येईल का..?

याचा विचार मनात येत होता. म्हणतात ना जितकं आपण आपल्या संस्कृतीपासून लांब जातो तितकी त्याची उणिव आपल्याला भासत असते. तसंच माझ्याबाबतीत झाले. जितकं मी इंग्रजीकडे वाहवत जात होतो तितकी मराठीची ओढ मला लागली होती. मराठी संगीत, साहित्य या सर्वांची आवड निर्माण होत गेली. त्यातून मी अशा विषयाच्या शोधात होतो ज्यातून मला काही शिकायला मिळेल. मराठी कलेवर काहीतरी करावं असं नेहमी मनात होतं आणि मी तमाशा हा विषय निवडला. मी मूळचा कोकणातला असल्याने तिकडे कधी तमाशा बघायला मिळालाच नाही. त्यामुळे या विषयावर खूप जोरात अभ्यास सुरू केला. त्याच दरम्यान गणपत पाटलांना झी गौरवचा पुरस्कार मिळाला होता. मला त्यांचा विषय क्लिक झाला. जो माणूस नेहमी हिणवला गेला, ज्याच्याकडे लोक गंमत म्हणून बघत होते त्याला जर आपण हिरो केलं तर काय होईल. जेव्हा मी या विषयावर फिल्म करायची ठरवलं तेव्हा मला सर्वांनी वेड्यात काढलं होतं. तमाशा आता मागे पडलाय, यावर आधी अनेक सिनेमे येऊन गेलेत असं अनेकांनी सांगितले. गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी तू यासाठी सोडली का ? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडल्या गेले. पण सर्वांना म्हणालो की, जर मला माझ्या अनुभवांवर, अभ्यासावर विश्वास असेल तर मी नक्कीच ही फिल्म चांगली करून दाखवेल आणि कामाला लागलो.

* कशाप्रकारचे चित्रपट करायचे असं काही ठरवलं आहेस ?

- एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे एकतर मी हाडाचा कमर्शिअल आर्टीस्ट आहे. त्यामुळे कोणतही प्रोडक्ट चांगलं असो की वाईट ते लोकांपर्यंत कसं पोहचतं, याचं थोडसं नॉलेज मला आहे असं मला वाटतं. मला आधीपासून हे माहिती होतं की तुमच्या सिनेमाला यश मिळणं हे मॅन्डेटरी आहे. ते मिळालच पाहिजे. मला वाटतं की सिनेमा हा बिझनेस आहे. त्यामुळे एक डिरेक्टर म्हणून त्या प्रोड्युसरचे पैसे कसे परत मिळत्तील याचा विचार तूम्ही करायला हवा. ते पैसे रिटर्न झाले तर मराठी फिल्म इंडस्ट्रीचा दर्जाही वाढेल. ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘मी शिवाजी राजे बोसले बोलतोय’ असे वर्षातून २० सिनेमे तयार झाले तर मराठी इंडस्ट्री खूप वर जाईल. आता तसं बघितलं तर ‘नटरंग’ आणि ‘बालगंधर्व’ हे दोन्ही सिनेमे व्यावसायिक नव्हते. पण त्यांची कथा, त्याचा साचा व्यवस्थित बांधला गेला म्हणून ते लोकांना आवडले. ‘नटरंग’ नंतर मला जवळपास चाळीस ते पन्नास तमाशा विषयावर सिनेमे करण्याच्या ऑफर आल्या होत्या. ‘बालगंधर्व’नंतर सुद्धा तिच परिस्थीती होती. पण मला काय आवडतं, कोणत्या कामात मला मजा येते याचा मी जास्त विचार करतो. इतकी वर्ष मी खूप वेगवेगळं काम केलं आहे. खूप पैसा कमवला आहे. आता पैशांची मला गरज नाही. मला चांगलं काम करायचं आहे, चांगल्या कलाकृती तयार करायच्या आहेत. मी एखादा जॉनर फिक्स नाही करू शकत. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ हे दोन्ही जॉनर वेगळे होते त्यानंतर आता ‘बालक-पालक’ केला तो सुद्धा एक वेगळा जॉनर आहे.

* बालक- पालक बद्दल आम्हाला सांग.

- ‘बालक-पालक’चा विषय मला खूप आवडला. एकीकडे आपण शेतक-यांच्या आत्महत्या बघतो, दुसरीकडे स्त्रीभृण हत्या बघतो. आणि एकीकडे सर्व जगाला भेडसावणारा मुलांच्या आणि पालकांच्या संवादाचा प्रश्न आहे. हा विषय अतिशय मोठा आहे. आज आपण पाहतो की, आज मुलाचे आई-वडील सकाळी घराबाहेर पडल्यानंतर दिवसभर मुलं काय करतात हे त्यांना काहीच माहित नसतं. दुसरीकडे आपण पाश्चात्य देशांची अंदाधुंद कॉपी करतो. आपल्याकडे ती संस्कॄती कशी आणि कधी रूजली कळलंच नाही. त्याचा प्रभाव आपल्या मुलांवर कसा होतोय, सर्व पालकांचा आणि बालकांचा विसंवाद कशामुळे होतोय हेच या सिनेमातून समोर आणतोय. पुन्हा तीच गोष्ट सांगायची म्हणजे ‘बालक-पालक’ हा व्यावसायिक सिनेमाचा विषय नाही. तरीही मला वाटतं की हा सिनेमा खूप व्यवसाय करेल.

* सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल तूझं काय मत आहे ?

- खूप वाईट परिस्थीती आहे. नेमकं काय चाललंय मला लक्षातच येत नाहीये. म्हणजे एका बाजूला खूप कौतुक होतंय आणि दुस-या बाजूला वाईट अवस्था आहे. म्हणजे मराठी सिनेमा कसा चालेल याचा विचार करण्यापेक्षा त्यातून पैसे कसे मिळतील याचा विचार जास्त केला जातो. त्यातून अनुदान कसं मिळेल याचा विचार केला जातोय. असं नसतं...मला वाटतं ज्यावर्षी मराठीमध्ये १० ते १५ सिनेमे कमीत कमी पाच करोडचं प्रॉफिट करतील. त्यादिवसापासून मराठी सिनेइंड्स्ट्रीत एक वेगळीच क्रांती होईल. लोकं म्हणतात हिंदीमध्ये बजेट असतात मराठीत बजेट नसतात असं काहीही नाहीये. चांगली कथा, चांगली मांडणी असेल तर कमी बजेट मध्येही चांगला सिनेमा होऊ शकतो. आणि लोकांना जे जे भावतं त्याला ते सपोर्ट करतात. दुसरीकडे होणारी ओरड म्हणजे प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही ही ओरड खोटी आहे असं मला वाटतं. मराठीचं सुवर्णयुग वैगेरे मला काही कळतच नाही. फार वाईट अवस्था आहे मराठी सिनेमाची...

* मराठी सिनेमाच्या या सर्व परिस्थीतीला मराठी चित्रपट निर्माते जबाबदार आहेत का ?

- नाही..! असं काही नाहीये. कोणताही सिनेमा हा एक टिमवर्क असतो. तो यशस्वी झाला तरी सर्वांमुळेच होतो आणि अयशस्वी झाला तरी सर्वांमुळेच होतो. प्रत्येकाचेच योगदान महत्वाचे असते. सिनेमाची कथा हा सर्वात मूळ गाभा आहे. त्याच्याशी निगडीत योग्य गोष्टींची निवड महत्वाची आहे तरच सिनेमा चांगला तयार होऊ शकतो. तूमची त्या कथेची कल्पना खूप महत्वाची आहे. अख्ख जग हे कल्पनेभोवती फिरतं. त्या आपल्या कल्पना किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवतो हे जास्त महत्वाचे आहे. फक्त निर्मात्यांना दोष देऊन नाही चालणार....फक्त त्यांनी विषयाची निवड अतिशय जागरूकपणे करावी.

* मराठी सिनेमातील ‘स्टार’ ह्या कन्सेप्टबद्दल काय वाटतं तूला ?

- खरंतर आताच्या तुलनेत जुने सिनेमे फार चांगले होते. तेव्हा स्टार लोकं होती. दादा कोंडके एवढे मोठे स्टार होते की त्यांच्या नावावर सिनेमा चालायचा. निळू फुले, श्रीराम लागू, अरूण सरनाईक असे मोठे स्टार होते. आता स्टार कुठे आहेत..? आता कथा ही स्टार झाली आहे. मराठी सिनेमाला चालना देणारा, प्रेक्षकांना खेचून आणणारा स्टार नाही आहे आता. मराठीत असा स्टार हवा की जिथपर्यंत लोकांना पोहचणं कठीण होईल. गल्लीबोळातील माणूस स्टार नाही होत. स्टारची व्याख्याच आहे की ज्याच्यापर्य़ंत आपण पोहचू शकत नाही तो स्टार...हिंदी सिनेमा आणि साऊथ सिनेमांमध्ये स्टार्स आहेत. त्यांच्या नावावर सिनेमा चालतो. मराठीत ते नाही. बोटावर मोजण्याइतकी लोकं मराठीत आहेत ज्यांनी त्यांचं स्टारडम टिकवलंय. त्यातील एक म्हणजे अतुल कुलकर्णी. त्यात आणखी नाव घेता येईल ते संगीतकार अजय-अतुल यांचं...ते स्टारडम टिकवणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच मराठी सिनेमाला चांगले दिवस येतील. तोपर्यंत वाट बघायची....

* हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन करण्याच्या ऑफर आल्या असतीलच ?

- हो खूप ऑफर आल्यात. पण हिंदी मध्ये छोटा सिनेमा करण्यापेक्षा मराठीत मोठा सिनेमा करायचा. मराठी दिग्दर्शक कमी पैशात चांगली फिल्म करतो म्हणून त्याला हिंदीत घ्यावं, असं जर असेल तर त्यांना धन्यवाद...! त्यांना मी सांगतो की आमचं छान चाललंय आणि मला अभिमान आहे की मी मराठी सिनेमा करतो. त्याच विषयावर जर तुम्हाला सिनेमा करायचा असेल तर तेवढं १५-२० करोडचं बजेट घेऊन या...! मग बोलता येईल. मराठी फिल्म इंडस्ट्रीत मी अत्यंत कॉन्शीअसली आलो होतो तसच हिंदीत सिनेमा करताना मी अत्यंत कॉन्शीअसली करेन. पण हिंदीत लहान सिनेमा करण्यापेक्षा मराठीत मोठा सिनेमा करणं हे माझ्या डोक्यात फिट आहे. जेव्हा एखादी चांगली ऑफर येईल आणि मला वाटेल की हे करता येईल तर नक्कीच करेन.

अमित इंगोले