Sign In New user? Start here.

Rima Lagu inerview

"तुला मी..मला मी"तील रीमा लागू

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणा-या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या ‘जन्म’ या चित्रपटानंतर त्या गिरीश कर्नाड लिखीत ‘तुला मी मला मी’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करीत आहेत. या नाटकाचा प्रयोग शिकागो येथे होणा-या बीएमएम अधिवेशन २०११ मध्ये सादर केल्या जाणार असून या नाटकाच्या निमित्ताने रीमा लागू यांच्याशी साधलेला संवाद...

या अधिवेशनात सादर करणा-या नाटकाबद्दल त्यांना विचारता रीमाजी म्हणाल्या की, "गिरीश कर्नाड यांच्या `ब्रोकन इमेजेस' या नाटकाचा मराठी अनुवाद असलेलं ‘तुला मी मला मी’ हे नाटक करणार असून या नाटकाचे तीन भाषांमध्ये प्रयोग सुरू आहेत. हिंदीत शबाना आझमी, कन्नडमध्ये अरूंधती नाग आणि मराठीत मी करतेय. विवेक लागू यांचं दिग्दर्शन आहे. यात मी एकपात्री भूमिका करणार आहे. महत्वाचं म्हणजे मला या नाटकातील माझी भूमिका खूप आवडते. यात मी माधवी राजाध्यक्ष या प्राध्यापिकेची भूमिका करत आहे. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पुस्तक लिहीलंय आणि ते खुप प्रसिद्ध झालंय. त्यातून तिला भरमसाठ पैसा मिळालेला असतो. म्हणून ती आपल्या नोकरीचा राजीनामा देते. तिच्यावर लोकांकडून आरोप केले जातात की, तिने पैशांसाठीच इंग्रजी भाषेत पुस्तक लिहीले. या पुस्तकाचा खप आणखी जास्त वाढावा या प्रयत्नात तीने आपल्या नव-याकडे आणि आजारी बहीणीकडे दुर्लक्ष केलं. पुढे या पुस्तकावर चित्रपटही निघतो. आणि या चित्रपटासंबंधी मुलाखतीत तिला तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्न केले जातात. ती त्या प्रश्नांना काय उत्तर देत? कसे उत्तर देते? हे यात रेखाटण्यात आलं आहे".

तुम्हाला भारतात आणि परदेशातील प्रेक्षकांमध्ये काय फरक जाणवतो असं विचारता त्या म्हणाल्या, " अमेरीकेत नाटकांना यंगस्टर्स प्रेक्षक येतंच नाही, हे मला खूप खटकलं. फक्त जे मुलं भारतातून तिथे शिक्षणासाठी वैगेरे गेलेले असतात तेवढेच दिसतात. बाकी तेथे असणारे कुणीच येत नाही. जे रेग्युलर प्रेक्षक आहेत ते येतातच. त्यांना जुन्या नाटकांच्या आठवणीही चांगल्या लक्षात राहत असल्याचे मला अनेक अनुभव आले आहेत. नाटकांना खूप लांबून लांबून प्रेक्षक येतात. हे खूप आश्चर्याचं आहे, असं मी म्हणेन".

चित्रपट, नाटक आणि मालिका यापैकी कोणत्या माध्यमात तुम्हाला जास्त काम करायला आवडतं या प्रश्नाला त्या म्हणाल्या की, "प्रत्येक माध्यमाची एक आप-आपली खासियत आहे. पण मला जास्त करून नाटकात काम करायला आवडतं. नाटक हे नॅच्युरली होत असल्याने त्यात मी जास्त कंफर्ट फील करते. चित्रपट हा टेक्निकल मिडिया आहे. त्यातील तांत्रीक बाबी जेवढ्या तूम्ही समजून घेतल्या तेवढं तूम्हाला त्यात काम करणं सोपं जातं. नाटकांबद्दल आणखी एक सांगायचं झाल्यास, माझी अभिनयाची सुरवात ही नाटकांमधूनच झाली आहे. आपल्याकडे नाटकांचं डॉक्युमेंटेशन फरसं होत नाही. आता आता कुठे थोडंफार व्हायला लागलंय. ते खूप महत्वाचं आहे. अनेक जुन्या नाटकांचं डॉक्युमेंटेशन झाले असते तर आजच्या तरुण पिढीला ते पाहता आले असते, त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असत्या" अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविलं.

तरुण पिढीतील कलाकारांपैकी कुणाबरोबर काम करायला आवडेल याबाबत विचारता रीमाजींनी कुणाची नावं न घेता त्यांच्या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करत म्हणाल्या की, "सध्या अनेक तरुण नव नवीन विषय घेऊन समोर येत आहेत. वळू, विहीर, जोगवा, बालगंधर्व, नटरंग, हरीश्चंद्राची फॅक्टरी आदींच्यां दिग्दर्शकांनी अतिशय उत्तम आणि दर्जेदार कलाकृती तयार केल्या आहेत. यातील कुणाबरोबरही मला काम करायला आवडेल. वेगळ्या जॉनरच्या विषयांवर काम करायला आवडेल" असं त्या म्हणाल्या.

हिंदी आणि मराठी चित्रपटपसृष्टीतील फरक काय सांगाल? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो इकॉनॉमीकल. हिंदी फिल्म्सना ग्लोबलायझेशनमुळे मिळणारं एक्सपोजर मोठं असतं. बिग बजेटमुळे हवंतसं करण्याची कपॅसिटी दिग्दर्शकाच्या हातात असते. पण त्यातुलनेत मराठीत हे होत नाही. तसेच हिंदी सिनेमा नॅशनल लेव्हलला पाहिला जातो. पण मराठीचा एक वर्ग ठरलेला आहे. मराठीत अनेक चांगले प्रोजेक्टस येतात पण ते लोकांना माहितीच पडत नाहीत. जेव्हा ते टिव्हीवर येतं तेव्हा लोकांना माहिती पडतं" असं त्या म्हणाल्या.