Sign In New user? Start here.

मिफ्ता मोठा प्रेस्टीजियस अवॉर्ड होणार

Sandip Padhey interview

मिफ्ता मोठा प्रेस्टीजियस अवॉर्ड होणार

 
 
 

   गेल्या काही वर्षात मराठी सिनेमाचं रूप पूर्णपणे बदलून गेलंय. नवीन विषय, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते यांचा या मोलाचा वाटा आहे. आज मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय, त्याला प्रसिद्धी मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कारातही मराठी सिनेमा बाजी मारतोय. याच पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना आणखी ग्लोबल रूप देण्यासाठी ‘मिफ्ता’हा पुरस्कार सोहळा पुढे आला आहे. गेल्या वर्षी दुबईत हा सोहळा झाला आणि यावर्षी लंडन शहरात होतो आहे. त्यानिमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचे संयोजक संदीप पाध्ये यांच्याशी झगमग टिमने केलेली बातचीत....

   सर्वप्रथम ‘मिफ्ता’ सोहळ्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, " मिफ्ता सोहळ्याची माध्यमातून आंतरराष्ट्रीय मराठी माणसाची पताका फडकणार आहे. खरंतर गेल्यावर्षी लंडनहून दुबईला या सोहळ्याची भव्यता पाहण्यासाठीच मी स्पेशली गेलो होतो. तो सोहळा खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर महेश मांजरेकर आणि अभिजीत पाटील यांच्या समोर मी प्रस्ताव मांडला की, लंडनला ‘मिफ्ता’ सोहळा करूया का? त्यावेळी त्यांनी मागे पुढे न पाहता हा सोहळा लंडनमध्ये करण्याचा होकार दिला होता. त्यामुळे मला खरंच या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आहे की, मराठी कलाकारांचा एवढ्या मोठ्या लेव्हलवर सन्मान करणा-या पुरस्कार सोहळ्याचा मीही एक भाग आहे. हा पुरस्कार सोहळा उत्तरोत्तर खूप मोठा प्रेस्टीजियस अवॉर्ड होत जाणार याची मला खात्री आहे. मराठी सिनेमा आणि रंगभूमी विश्वातील ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.

   यावर्षी लंडनमध्ये होणा-या सोहळ्यात नेमकी त्यांची काय भूमिका आहे, ते क्लिअर करतांना ते म्हणाले की, " जेव्हा पहिल्यांदा मिफ्ताची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा मला अभिजितचा फोन आला. तो म्हटला की, मिफ्ता सोहळा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्या त्या देशातील मराठी मंडळांच्या मदतीने त्यांना ते करायचं होतं. त्यानुसार तो म्हटला की, पुढच्या तीन वर्षाचं शेड्युल मला करायचं आहे. कमीत कमी तीन शहरांनी यात आम्हाला सुरवात द्यावा अशी माझी इच्छा आहे. यावर मी एकाही क्षणाचा विचार न करता त्याचं उत्तर अगदी हो म्हणून दिलं. त्यानुसार पुढच्या तीन वर्षाचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. पहिला दुबईत झाला, आता लंडन आणि तीसरा न्युयॉर्क या शहरात होणार आहे. यात माझी अशी भूमिका आहे की, लंडनमधील सोहळ्याची मी आणि माझा मित्र महेश पटवर्धन आम्ही लोकल होस्ट म्हणून आमच्यावर जबाबदारी सांभाळणार आहे. लंडनमधील संयोजकांना आमचा सर्व पाठिंबा असणार आहे. त्या चार दिवसात कुठले कार्यक्रम घ्यायचे, कसे घ्यायचे. हे सर्व आम्ही बघणार आहोत.

   ‘मिफ्ता’ सोहळा लंडन शहरातील प्रसिद्ध O-2(मिलेनियम डोम) या थिएटरमध्ये होणार असून त्याचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की, " म्हणायला गेलं तर याची खूप गमतीशीर गोष्ट आहे. मागच्या वर्षी मी जेव्हा सुनील गावसकर आणि सचीन तेंडुलकर यांच्या कार्यक्रमासाठी एक व्हेन्यु बुक करायचा होता. त्याच दरम्यान मिफ्ताचं पण प्रयोजन आलं. तेव्हा असं लक्षात आलं की मराठीतील एवढ्या मोठ्या लोकांना घेऊन आपण कार्यक्रम करतोय, तर तो एकदम मेनस्ट्रीम इंग्लिश किंवा ब्रिटीश पद्धतीने भव्यदिव्य व्हायला हवा असा विचार केला. जसे बॉलिवूडचे कार्यक्रम सेंट्रल लंडनमध्ये होतात, तसं भव्यदिव्य. त्यादृष्टीने एका मोठ्या व्हेन्युच्या शोधात मी होतो. तर लंडनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी २००० साली मिलेनियम डोम तयार करण्यात आला होता. येथील लोकांचे मोठ मोठे कार्यक्रम येथे घेतले जातात. तिथे आम्ही जे O-2 थिएटर बुक केलं आहे. त्याच्याच बाजुला २५००० लोकांची क्षमता असलेलं ‘एरेनाय’ हे प्रसिद्ध थिएटर सुद्धा आहे. ज्यात मायकल जॅक्सन सारख्या मोठ्या कलाकारांचे शोज झालेले आहेत. मग आम्ही ठरवलं की इथेच का नाही. कारण सगळं वेस्टर्न रूप इथेच आहेच. आणि जे मराठी कलाकार इथे येणार आहेत, त्यांनाही हे सगळं पाहता येईल. शिवाय लंडनमधील लोकांनाही याचा अनुभव घेता येईल. कारण तिथले मराठी लोकं फार काही तिथे जात नाहीत.

   दुबई सोहळा चांगलाच गाजला त्यामुळे यावेळीही सोहळ्याचं काय वैशिष्ट्य असणार? यावर ते म्हणाले की, " काय आहे की गेल्या वेळी दुबईच्या सोहळ्याची तयारी करण्यासाठी फार कमी वेळ त्यांना मिळाला होता. त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. पण यावेळी आधीच सगळी तयारी झाली आहे. त्यात महेश मांजरेकरांचं स्वप्न आहे की, सोहळ्याबरोबरच आपण लंडनमध्ये एक टूरिझम सारखंपण करूयात. जेणेकरून मराठी लोकांना लंडन आणखी जवळून पाहता येईल. आणि त्यांच्या डोळ्यातून भारतातील मराठी लोकांनाही तो पाहता येईल. त्यासाठी या टूरमध्ये लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणांवर ही सफर होणार आहे. लंडनचं मराठी मंडळ हे भारताच्या बाहेरचं सर्वात जुनं आणि एकटं रजिस्टर्ड मंडळ आहे. त्यांना पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी मराठी कलाकारांबरोबर वेळ घालवता येणार आहे. एवढ्या कलाकारांना एकत्र पाहता येणार आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लंडनमध्ये गेल्या तीस चाळीस वर्षांपासून राहत असलेली लोकं सुद्धा आहेत ते पण याची वाट बघत आहेत. अनेकांनी सुट्ट्यांची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे हा सोहळा म्हणजे लंडनमधील लोकांसाठी एक अभुतपूर्व असा योग आहे, असं मी म्हणेन.

   या सोहळ्याची कशा पद्धतीने तयारी केली जाते आणि तयारी कुठपर्यंत आली आहे? यावर ते म्हणाले की, " नुकताच मी आणि महेश पटवर्धन यांनी सचीन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात महेश मांजरेकर स्वत: होते. या कार्यक्रमात त्यांनी मिफ्ताची रूपरेषा लोकांना सांगितली. तिथे मी सुद्धा होतो. तुम्हाला सांगतो की, त्या कार्यक्रमानंतर माझा फोन वाजायचा थांबलाच नाही. रोज मला शेकडो ई-मेल्स यायला लागलेत. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळू लागला. मिफ्ताही माहिती लोकं घेऊन लागले. तिकीटची विचारपूस करू लागले. त्झुरिक आणि अॅगमस्टरडॅममधून पण फोन आलेत की आम्ही येऊ शकतो का? म्हणजे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय गणेशोत्सव सुद्धा येतोय आणि लंडनमध्ये हा उत्सव खूप मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे या सोहळ्यालाही खूप महत्व प्राप्त झालं आहे.

   जवळपास ३०० ते ३५० मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ या सोहळ्याला येणार असून त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे. याबाबत सांगतांना ते म्हणाले की, " खरं सांगायचं तर या सर्व गोष्टीचं श्रेय अभिजीत पाटील याला जातं, कारण अभिजीत किंवा राजारानी ट्रॅव्हल्स या गोष्टींमध्ये एक मॉडल झालेलं आहे. गेली कित्येक वर्ष राजारानी बीएमएमला ट्रॅव्हल सपोर्ट करताहेत. शिवाय अभिजीतचं आज लंडनमध्ये सुद्धा खूप मोठं नेटवर्क निर्माण झालं आहे. त्यामुळे त्याने कलाकारांचा व्यवस्थेचं सगळं प्लॅनिंग त्याने केलं आहे. आमची लोकल टीम आहे जी अभिजीतबरोबर आहे, त्याचे तिथले ट्रॅव्हल पार्टनर आमच्याबरोबर आहेत. आमची एक भक्कम टीम तयार झाली आहे.

   चार ते पाच दिवस चालणा-या या सोहळ्यात कोणते कार्यक्रम होणार याबद्द्ल ते सांगतात की, " पहिल्या ही सगळी कलाकार मंडळी इथे आल्यानंतर सध्यांकाळी एक क्रुझ डिनर असणार आहेत. जे फार युनिक असेक. थेम्स नदीत हे क्रुझ असणार आहे. त्यावर तीनशे कलाकार आणि शंभर च्या जवळपास लोकल लोकांनाही सहभाग घेता येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्या क्रुझवर नुसतं डिनर नसून एका नाटकाचा प्रयोग सुद्धा सर्वांसाठी ठेवण्यात आलाय. दुस-यादिवशी लोकल प्लेअर्स आणि कलाकार यांच्यात क्रिकेटचा सामना खेळला जाईल. आणि तिस-या दिवशी पुरस्कार सोहळा होणार आहे. यात चंद्रकांत कुलकर्णी यांची संकल्पना असलेला सुंदर कार्यक्रमही होणार आहे. त्याचं दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे करणार आहेत. या सोहळ्यानंतर कलाकार आणि प्रेक्षकांसाठी डिनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

   या चार दिवसात लंडनमधील मराठी लोकांना कितपत सहभागी होता येणार आहे? यावर ते सांगतात की, " खूप जास्त प्रमाणात त्यांचा सहभाग यात असणार आहे. एवढंच काय तर गणेशोत्सवात काही कलाकार तिथल्या मराठी लोकांच्या घरी जाऊन त्यांना मिफ्ताचं महत्व सांगणार आहेत. मी असं म्हणेन की त्यांना आमंत्रण देणार आहेत. काय होतं की, इथल्या मराठी लोकांसाठी मराठी बोलणं, ऎकणं किंवा मराठी चित्रपट बघणं हे दुर्मिळच असतं. त्यामुळे एखादा कलाकार आला की, त्यांच्यासाठी दिवाळी-दसराच ठरतो. त्यामुळे हा सोहळ्या त्यांच्यासाठी अविश्वसनीय आहे कारण यातून त्यांच्यासमोर मराठीतले ३०० कलाकार येणार आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनाच सांग्तो की तुम्हा प्रत्येकाला यात सामावून घ्यायची आमची इच्छा आहे. यातही महत्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी आम्ही रिजनल टीम तयार केल्या आहेत. लंडनच्या चारही भागातून आम्ही रिप्रेझेंटेशन घेतलंय. तिथल्या मंडळांना यात जॉईन होण्याचं आम्ही सांगितलं. आणि यात त्यांनी आनंदानं सहभाग घेतला आहे.

   मराठी मंडळांच्या मराठी लोकांचा यात कितपत आणि कसा सहभाग असतो? यावर ते म्हणाले की," मुख्यत: त्यांची मदत ही प्रचारासाठीच होते आहे. शेवटी आज काय झालं आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार तसा बराच सोपा झाला आहे. पण ग्रुपमधून याचा जास्त प्रचार केला जातो. मराठी मंड्ळांचे अनेक ग्रुप्स आहेत त्यांना आम्ही एकत्र आणून त्यांना सांगितलं की, यात सामिल व्हा. मुळात जेव्हा आम्ही या सोहळ्याची जबाबदारी घेतली तेव्हाच वाटलं होतं की ही एक चळवळ आहे. त्यामुळे यात सर्वांचा सहभाग मिळणं आवश्यक आहे, त्यातून लोकांना आनंद मिळणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही या मंडळांना यात सामिल करून घेतलं. आणि लंडनमध्ये जवळपास ४ ते ५ हजार आणि युकेत ५० हजारांच्या जवळपास मराठी कुटूंब आहेत. त्यानुसार आम्ही १६०० लोकांची क्षमता असलेलं थिएटर बुक केलं आहे. आमची हीच अपेक्षा आहे की, ते थिएटर संपूर्ण भरलं जावं. आणि मला खात्री आहे की, लोकांचा खूप जास्त प्रतिसाद आम्हाला लाभणार आहे.

   शेवटी सोहळ्याला येणा-या प्रेक्षकांना आवाहन करतांना ते म्हणाले की, " मिफ्ता हा अभूतपूर्व अशा पद्धतीचा सोहळा असून ह्या संधीचा प्रेक्षकांनी फायदा घ्यावा. या सोहळ्यात सामील होऊन आनंद घ्यावा, कलाकारांशी गप्पा माराव्या. ही संधी कुणीही चुकवू नये, असे आवाहन मी प्रेक्षकांना करतो.

-अमित इंगोले.

 
 
 

Other Interview link