Sign In New user? Start here.

मोठी स्टारकास्ट आणि भव्य सेट्सपेक्षा स्क्रिप्ट महत्वाची - सतीश राजवाडे

 

मोठी स्टारकास्ट आणि भव्य सेट्सपेक्षा स्क्रिप्ट महत्वाची - सतीश राजवाडे

 
 
 

मराठी इंडस्ट्रीमद्ये खूप कमी दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या नावावरच चित्रपट बघीतला जातो. सतीश राजवाडे हे असच एक नाव. साधारण दोन वर्षांपूर्वी सतीश बरोबर झगमग टीमने पहिला संवाद साधला होता. तेव्हाच त्याचा महत्वाकांक्षी चेहरा, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक अजूनही त्याच्या प्रत्येक कलाकॄतीतून दिसते. सिनेमा आणि मालिका या दोन्हींमधला बॅलन्स सांभाळत सतीश राजवाडे हे नाव लाखो मराठी रसिकांचा विश्वास बनलाय. ‘अग्निहोत्र’, ‘असंभव’, ‘मॄगजळ’, ‘गुंतता हॄदय हे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या व अशा अनेक लोकप्रिय मालिकांसोबत ‘गैर’, ‘एक गाव धोबी पछाड’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे सतीश राजवाडे यांचा ‘बदाम राणी गुलाम चोर’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय. गेल्यावेळी त्यांच्याशी झालेल्या गप्पा ह्या मालिका आणि चित्रपट ह्या विषयावर चांगल्याच रंगल्या होता. तर यावेळी त्यांनी त्यांच्या नवीन ‘बदाम राणी गुलाम चोर’ चित्रपटाबाबत भरभरून सांगितलं...

* ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाट्यकलाकॄतीवर चित्रपट करण्याची संकल्पना नेमकी कुणाची होती ?

- या नाटकावर सिनेमा करायची संकल्पना ही निर्माता शेखर कुलकर्णी यांची होती. एक प्रेक्षक म्हणून मी ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ हे नाटक खूप ऎन्जॉय केलं होतं. लेखक विवेक बेळे यांचा मी फॅन झालो. काही दिवसांनी ह्याच विवेक बेळेंचा निर्माता शेखर कुलकर्णी ह्यांच्याकडून मला फोन आला. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ ह्या नाटकावर आधारित चित्रपट करायचा असं ठरत होतं आणि त्याचे दिग्दर्शन मी करावे असा तो फोन होता. मी लगेच होकार दिला.

Satish Rajwade Interview

* ‘बदाम राणी गुलाम चोर’ च्या वेगळेपणाबद्दल काय सांगाल.

- वेगळेपणाबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय उत्कॄष्ट कथानक आहे. एकतर Brilliantly grafted script आहे. खूप चांगलं मनोरंजन त्यातून होणार असून सिनेमा बघतांनाच त्याची गंमत प्रेक्षकांना कळणार आहे. प्रेक्षकांना मी एकच सांगतो की, खूप कमीवेळा कन्टेंट आणि एन्टरटेन्मेंटचं करेक्ट बॅलन्स असलेला विषय चित्रपटात येतो. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही आवर्जून बघायला जा. तुम्ही नक्की हा सिनेमा enjoy कराल. खरंतर अशा उत्तम स्क्रिप्ट बरोबर मला माझी ड्रीम कास्टींग यात मिळाली, ज्यात उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, विनय आपटे, दिपक करंजीकर, सुधीर गाडगीळ आणि डॉ.मोहन आगाशे यांचा समावेश आहे. सर्वांनी अतिशय चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जी कास्टींग आम्हाला हवी होती तिच मिळाली. त्यासाठी आम्हाला फार स्ट्रगल करावं लागलं नाही.

Satish Rajwade Interview

* तूम्ही आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा हा खूप वेगळा चित्रपट आहे. त्यामुळे हा अनुभव कसा होता ?

- मी आजपर्यंत जे काही काम केलं आहे. त्यापैंकी ही सर्वात चॅलेंजींग फिल्म आहे. मुळात नाटक इतकं यशस्वी म्हणून जबाबदारी दुप्पट होती. विवेक बेळे यांनी नाटकाचं रूपांतर पटकथेत अगदी उत्कृष्टरीत्या केले आहे. मला त्या पटकथेशी प्रामाणिक रहायचं होतं. आणि मी ते केलं.

* ‘बदाम राणी गुलाम चोर’ या अतिशय वेगळ्या टायटलचं गुपीत काय आहे ?

- या टायटलची गंमत अशी आहे की, माणसाच्या मनात नेहमीच बदामची राणी येते. गुलाम चोर खेळ खेळताना आपण एक पत्ता लपवून ठेवत असतो. आणि इतरांच्या हातातले पत्ते खेचून आपण जोड्या बनवायचा प्रयत्न करीत असतो. आयुष्यात सुद्धा आपण असंच काहीतरी करत असतो. बदाम राणी गुलाम चोर मधील प्रत्येक व्यक्तीने एक एक पत्त लपवून ठेवलं आहे. आणि दुस-याकडे काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करत असतात.

Satish Rajwade Interview

* टायटलप्रमाणेच यातील भूमिकांची नावे सुद्धा अतिशय वेगळी आहेत, त्याबद्दल सांगा.

- यातील भूमिकांची नावं आपल्यातील असलेल्या विशिष्ट्य गुणांवरूनच ठेवलेली आहे. म्हणजे सांगायचं झाल्यास मुलाचं नाव जर प्रकाश ठेवलं तर तो पुढे जाऊन प्रकाश पाडेलच असं नाहीये. आपल्या स्वभावातील जी गुणधर्म आहेत त्यावरूनच ती नावं ठेवण्यात आली आहे. यातील मुक्ताच्या भूमिकेचं नाव ‘पेन्सील’ आहे. भूतकाळात केलेल्या विधानांची जबाबदारी पेन्सील घेत नाही. कारण पेन्सीलने लिहिलेलं खोडता येतं. मग भूतकाळात केलेल्या विधानांची जबाबदारी पेन्सील घेत नसलेली मुलगी कशी असेल..? त्यात एक गंमत आहे. आणि ती गंमत प्रेक्षकांना चित्रपट बघताना जास्त येईल.

Satish Rajwade Interview

* मुक्ताने तुमच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. ती तुमच्यासाठी लकी आहे असंही म्हटलं जातं..

- खरंतर मुक्ता माझ्यासाठी खरंच लकी आहे. आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लकी असणं हे तिचं qualification नाहीये. तर ती एक अतिशय उत्कॄष्ट अभिनेत्री आहे. ती मराठीतील छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील एक आघाडीची आणि उत्तम कलाकार आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्यात एक वेगळी मजा मला येते.

Satish Rajwade Interview

* नाट्यकलाकॄतीवर काम करीत असताना तुम्हाला काय वेगळी तयारी करावी लागली ?

- नाटकाच्या दोन पावलं पुढं जायचं हे तर नक्की होतं. कारण लोकांनी आधीच नाटक पाहिलेलं आहे. त्यामुळे सिनेमात काय वेगळं बघायला मिळणार. त्यामुळे दोन पावलं पुढे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जबाबदारी असल्यामुळे एक दडपण होतं. नाटक चांगलंच यशस्वी असल्यामुळे यावर काम करण्याची भिती सुद्धा होती मनात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. वेगळी काही तयारी करण्यापेक्षा विवेक बेळें लिहिलेल्या पटकथेवर मला फक्त प्रामाणिक रहायचं होतं. आणि जे जे elements नाटकात नव्हते, ते सिनेमात आम्ही incorporat केले आहेत. ते elements largen than life करायचे होते.

* एक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना प्रेक्षकांच्या मानसीकतेला कितपत ध्यानात घेतलं जातं ?

- इतकी वर्ष मी या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे माझ्या मानसीकतेचा अंदाज मला आलेला आहे. आणि प्रेक्षक कोणत्या वाक्यावर हसतील आणि कोणत्या वाक्यावर हसणार नाहीत, याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. कारण की प्रत्येक माणसाची एक वेगळी टेंम्प्रामेंट असते. आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करणं. आणि मी as a director ते करताना मला ते एन्जॉय होणं हे जास्ती गरजेचं आहे. मी जर ते एन्जॉय केलं तर ते प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतील. याची मला खात्री आहे.

Satish Rajwade Interview

* कोणताही प्रोजेक्ट स्विकारताना कोणत्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देता ?

- सिनेमाची गोष्ट आणि पटकथा यांना मी प्राधान्य देतो. मुळात गोष्टच जर श्रावणीय नसेल किंवा ती संहिताच चांगली नसेल तर तुम्ही काय कराल? चांगली पटकथा आणि चांगल्या कथेशिवाय तुम्ही कितीही मोठी स्टारकास्ट घेतली, कितीही मोठे सेट्स उभे केलेत तर काहीच फायदा नाही. हे प्रत्येकवेळी प्रुव्ह झालेलं आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये फार मोजके दिग्दर्शक असे आहेत जे मालिका असो वा चित्रपट या माध्यामातून प्रेक्षकांना नेहमीच वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याहूनही महत्वाचं म्हणजे ती कलाकॄती काटेकोरपणे तयार केली जावी असाही त्यांचा आग्रह असतो. दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून नेहमीच वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या आधीच्या कलाकृतींप्रमाणॆ ‘बदाम राणी गुलाम चोर’ या सिनेमालाही प्रेक्षकांची भरभरून प्रतिसाद मिळतो का? किंवा या कलाकृतीतूनही प्रेक्षकांच्या अपेक्षावर सतीश राजवाडे खरा उतरतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना त्यांच्या या नव्या सिनेमासाठी शुभेच्छा...!

मागील मुलाखत - सिनेमाच सतिशचा 'फर्स्ट प्रेफरन्स'

- अमित इंगोले