Sign In New user? Start here.

दिलखुलास शिवाजी साटम

Shivaji Satam

दिलखुलास शिवाजी साटम

 
 
 

शुटिंगच्यावेळी या चतुरस्त्र अभिनेत्याशी 'झगमग टीम'ने संवाद साधला; तेव्हा पडद्यावरच्या या 'कणखर' अभिनेत्याच्या स्वभावाचा मोकळेपणा, सहज खेळकरपणाही उलगडत गेला. 'अभिनय क्षेत्रात 'ढकलला' गेलो...!', असं मिश्‍किलपणे सांगणाऱ्या साटम यांची, त्यांच्या उमेदीच्या काळातल्या श्रेष्ठांविषयीची आदराची भावना 'वसंतराव त्यावेळी नसते, तर मी नट झालो नसतो...', अशा प्रांजळ निवेदनातून व्यक्त होत गेली.
एका बाजूला सेटवर नव्या शॉटस्‌ची तयारी, प्रत्यक्ष शॉट असा उद्योग सुरू असतानाच 'झगमग टीम'ला प्रत्येक शॉटच्या दरम्यान साटम भेटत गेले आणि मुलाखतीतून 'शिवाजी साटम' यांच्या कारकीर्दीचा विस्तृत पट साकारत गेला. या मुलाखतीचा सारांश -

प्रश्‍न - थिएटरमधून कारकीर्दीची सुरूवात केल्यानंतर फिल्म आणि टीव्हीमध्ये सातत्याने काम करणे किती चॅलेजिंग वाटते ?
शिवाजी साटम - खरंय. मी फक्त टेलिव्हिजन आणि फिल्म या दोनच माध्यमांमध्ये काम केलं नाहीय. माझी अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवातच मुळी थिएटरमधून झालीय. रंगमंच हे माझं मुळ स्थान म्हणा नं. टीव्ही, फिल्म आणि थिएटर या तिन्ही माध्यमांमध्ये फरक तर आहेच. शिवाय, एक अभिनेता म्हणून हे फरक फार ठळकपणे जाणवतात. थिएटरमध्ये शारीर अभिनय महत्वाचा. अभिनेत्याला शरीरातून अभिनय व्यक्त करून दाखवावा लागतो. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, ते शरीरातून व्यक्त करावं लागते. थिएटरमध्ये बसलेल्या आठशेवर प्रेक्षकांना तुम्ही काय म्हणता ते कळले पाहिजे. शिवाय, मेकअपमध्ये फरक होतो. थिएटरमध्ये अभिनयातली प्रत्येक गोष्ट ही 'लार्जर दॅन लाईफ' असते. टीव्हीमध्ये वेगळं आहे. हा 'मीडिया ऑफ क्‍लोज आय', आहे. टीव्ही खूप खासगी, वैयक्तिक आहे. जणू एकानं दुसऱ्याला गोष्ट सांगावी, इतका. फिल्म हे या दोन्ही माध्यमांचे 'कॉम्बिनेशन' आहे. फिल्म हे तसं इतर दोन्हींपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचंही माध्यम आहे. अभिनेता म्हणून टीव्ही हे व्यक्तिरेखेभोवती फिरणारं माध्यम आहे.

प्रश्‍न - मग, या तिन्हींपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणं जास्त आवडतं?
शिवाजी साटम - अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला फक्त अभिनय करणं आवडतं. माध्यम कोणतं आहे, याची काळजी मी करत नाही कधी. आणि तसंही थिएटर हे माझं घर आहे. घर सोडतं का कोणी...? हा, एक आहे. मला फक्त एकाच एक मीडियममध्ये काम करण्यात समाधान वाटलं नाही. त्यामुळं तिन्ही माध्यमांमध्ये काम करायला मला आवडतं...एक कलाकार म्हणून अभियन महत्वाचा. कॅमेरा माझ्याकडं कसा पाहतोय, यापेक्षा मी कसा अभिनय करतोय, हे जास्त महत्वाचं मानतो मी. साहजिकच, मी स्टेजवर आहे की छोट्या पडद्यावर दिसणार आहे की मुव्हीच्या पडद्यावर याचं फारसं काही राहात नाही माझ्यादृष्टीनं. प्रत्यक्ष कामाचं म्हणाल, तर फिल्ममध्ये काम करताना मध्ये मध्ये विश्रांती मिळते पुरेशी. फिल्मची डेप्थ मोठी आहे. मला माझ्या रुचीनुसार अभिनय जरूर करता येतो. टीव्हीचं काम सुपरफास्ट असते. असे खूपसारे वेगळेपण प्रत्येक मीडियममध्ये आहे.

प्रश्‍न - 'एक शून्य शून्य' ते 'सीआयडी' हा छोट्या पडद्यावरचा प्रवास कसा पाहता तुम्ही?
शिवाजी साटम - वैयक्तिकरित्या पाहिलं, तर मी तसाच आहे. जसा होतो तसा. स्वभाव काडीचाही बदलेला नाही ! टिपिकल मीडल क्‍लास मराठी माणूस. मीडियामध्ये नक्कीच मोठे बदल झालेत या काळात. खरं म्हणजे असं होतच असतं. आपण नाही का नॉस्टेल्जिक होत म्हणतो, की शाळेत कसं छान वाटायचं वगैरे. त्याच टाईपचं मलाही वाटतं. व्यावसायिक अंगानं पाहिलं, तर तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे आता. 'सीआयडी' ची मालिका आम्ही अक्षरशः एखाद्या चित्रपटाप्रमाणे शूट करतो आता. प्रत्येक एपिसोडला पाच ते सात दिवस आणि दिवसाचे बारा तास शुटिंग वहायचे.

प्रश्‍न - पडद्यावरच्या कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याच्या या अभिनय कारकीर्दीची सुरूवात कशी झाली?
शिवाजी साटम - माझी सुरुवात झाली ती रंगभूमीवर. गणपतीच्या उत्सवात. आमच्याच कॉलनीत. आमच्याच सोसायटीत. मित्रांनी जबरदस्ती करून स्टेजवर ढकललं. यावर्षी नाही केलंस आमच्यासोबत काम तर आम्ही नाही करणार नाटक, असं बजावून मला ढकललं. टु बी ऑनेस्ट या नाटकात मी भाग घेतला आणि नाटकाची वाट लावली...! आमचा एक मित्र, जो विंगेत उभा होता, त्यानं प्रॉम्टिंगंचं स्क्रिप्ट अक्षरशः फेकून दिलं होतं...ते स्क्रिप्ट स्टेजवर येऊन पडलं होतं. एक मित्र स्टेजवर सोफ्याच्या मागं लपून बसला होता. आम्हाला प्रॉम्टिंगसाठी. त्यानं डोक्‍यावर हात मारून घेतला होता. या सगळ्या गदारोळाला मी कारणीभूत होतो...!! कारण, मी स्टेजवर थेट चौदा पानांची उडी मारली होती...!!! माझी एन्ट्री ही अशी झालीय. पण, खरं सांगू, मी हे सगळं एन्जॉय करत होतो. नाटक संपल्यानंतर सगळ्यांनी मला बदडलंय छान. पण, मी ठरवलं पुढच्या वर्षी मी करणार काम. बाळ धुरी आमच्या नाटकाला प्रमुख पाहुणे होते. त्यांनी एक मेजर कॅरेक्‍टरचा रोल दिला. व्यावसायिक रंगभूमीवर. नाटकाचं नाव होतं, 'संगीत वरदान'. नाटकात दोन स्टार होते. संगीतरत्न डॉ. वसंतराव देशपांडे आणि सुमतीबाई टिकेकर. मोठी दिग्गज मंडळी. माझ्याच्यानं काही जमणार नाही, असं वाटलं. पण, मित्रांनीही गळ घातली. दोन महिने तालमी केल्या. बरं, तालमी चोख. हा किस्सा फार महत्वाचा. कारण, तो घडला नसता, तर आज आपण इथं भेटलो नसतो...! तालमी ठोकून बसवत होतो. कॉमा, फुलस्टॉप सगळं नीट बसवत होतो. सगळं काही झोपेतून उठवलं, तरी पाठ. दोन पात्रं मी रंगवत होतो. दुसऱ्या अंकात एक जवाईराज आणि रजपूत राजा. तो जो जवाईराज असतो, तो ग्रे कॅरेक्‍टरचा. व्हिलनीश. त्यानं देशपांडेंच्या प्रेयसीला पळवून नेलेलं असतं. माझी एन्टी दुसऱ्या अंकातली. रवींद्र नाट्य मंदिरला प्रयोग होता. मी एंट्री घेतली आणि समोर ऑडियन्स पाहिला आणि मी फ्रिज झालो. मला घाम फुटला. कंठ फुटेना. वाक्‍य आठवेना. मी नुसा उभा. तसाच्या तसा. वसंतरावांनी पाहिलं. त्यांनी तो अख्खा अंक कसा सावरला मला माहिती नाही. नंतर बाळ धुरींनी माझा कान धरला. मला म्हणाले, तु माझं नाक कापलंस...! पहिल्यांदा जा आणि बुवांची (वसंतरावांची) माफी माग. बुवा मेकपरूमध्ये पहुडले होते. ते मला शिवाजी सावंत म्हणायचे. 'काय शिवाजीराव सावंत काय झालं?...' बुवांनी विचारलं. मी प्रांजळपणे सांगितलं, 'मी घाबरलो आणि विसरलो...'. बुवा म्हणाले, '४०० प्रयोग करूनही कधी कधी आमचंही असं होतं. दोष कुणाचा असेल मग? तुझा नाही. त्या जागेचा. ती जी वास्तू आहे तिचा दोष...' अरे, किती मोठं मन...समोरच्या कलाकाराला सांभाळून घेण्याचा किती हा मोठेपणा...मग मला विचारलं, 'तिसऱ्या अंकाची तालीम पाठ आहे का नीट?' तरीही बुवांनी प्रॉडक्‍शनवाल्याला सांगितलं, 'हे बघ, हा गणपती एकदा मखरात बसला की तू स्क्रिप्ट घेऊन जवळ उभा राहा. म्हणजे काही व्हायला नको.' त्यावेळी जर कोणी असा भडकू नट असता, तर मी नट झालोच नसतो. मी धसकाच घेतला होता. पण, वसंतरावांनी प्रेमळपणे पाठीवर हात फिरवला. बाळ धुरी, मोहन कोठीवान आदींनी सांभाळलं आणि माझ्यातला कलाकार जन्माला आला. १९७६-७७ ची ही गोष्ट....

प्रश्‍न - टीव्हीवर कसा प्रवेश झाला?
शिवाजी साटम - टीव्हीमध्येही काहीसं असंच झालं. दूरदर्शन वाहिनीवर त्यावेळी 'ज्ञानदिप' नावाची सिरियल होती. बबन दळवी, माझा मित्र तिथे मला घेऊन गेला. कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा काम केलं. लक्षात आलं, की अरे, समोर कॅमेरा असो वा प्रेक्षक. आपल्याला तर फक्त अभिनय करायचाय. कॅमेरा असला काय नसला काय. सारखंच. हे अगदी पचनी पडलं. तेव्हापासून कॅमेरा कुठून कुठं फिरतो आहे, याची मी फारशी फिकीर केली नाही. मी माझं काम केलं.

प्रश्‍न - 'एक शून्य शून्य' पासून तुम्ही बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत आहात...
शिवाजी साटम - बबन दळवीनंच बी. पी. सिंहांकडं नेलं. ते 'एक शून्य शून्य' करीत होते. आम्ही भेटलो आणि नंतर इतिहास घडला...माझी टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. सगळीकडं मी आहे. 'आहट'पासून ते 'सीआयडी'पर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. सगळ्या सिरियल्स हीट आहेत. प्रत्येक सिरियलमध्ये मी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारलीय. हा सगळा प्रवास धमाल आहे. आनंदी आहे.

प्रश्‍न - या सगळ्या भूमिका एकसुरी वाटतात का?
शिवाजी साटम - तसं नाहीय. मी मनाला भावेल, मला पटेल तेच केलं. खूप हिंदी चित्रपट केले. स्टेजवर अप्रतिम आणि मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. विजया मेहता, आत्माराम भेंडे, मधुकर तोरडमल, सतिश दुभाषी. हिंदीत गुलजार, सुभाष घई, पार्थो घोष, महेश मांजरेकर, हॅरी बावेजा...यांच्याबरोबर कामं करता आली. ही सगळी कामं खूप वेगळी होती. सिनेमा येतो आणि जातो. त्यामुळं कदाचित हे रोल्स विस्मरणात जातात. 'सीआयडी'सारखी सिरियली तेरा वर्षे चालतेय. त्यामुळे मला त्याच कॅरेकटरने ओळखलं जातंय. मी अभिनय एन्जॉय केलाय.

प्रश्‍न - तुम्हाला स्वतःला टीव्ही सिरियल्स किती आवडतात आणि कोणत्या?
शिवाजी साटम - अगदी मनापासून सांगायचं तर मराठीत विषय अप्रतिम आहेत. असे विषय हिंदीत नाहीत. हिंदीत विषयाचं फारस नाविन्य नाही, असं म्हटलं तरी चालेल. तिथं फारसं काही करत नाहीत. अरे, हिंदीतलं चांगलं साहित्य आणा नं. 'सास बहूँ...' एज व्हॉट? मराठीतला रिऍलिटी शो पाहा. 'सारेगम' पाहा. छोटी मुलं जे गातात ते अप्रतिम असतं. जज म्हणून जे येतात, ते ज्या पद्धतीनं समजावतात, त्यानं आपलंसुद्धा शिक्षण होत असतं. हिंदीत काय आहे...? मराठीच्याबद्दल आनंद हा आहे. अभिमान तो हा आहे. आमच्याकडं रिऍलिटी शोलासुद्धा भक्कम बेस आहे. बाकी टीव्ही सर्फिंगमध्ये मला नॅशनल हिस्ट्री चॅनल्स आवडतात. हिस्टरी, नॅशनल जिऑग्राफिक, ऍनिमल प्लॅनेट ही ती चॅनेल्स. खरं सांगू का, मी 'सीआयडी' एन्जॉय नाही करू शकत ! म्हणजे मी माझीच सिरियल पाहताना 'क्रीटीक' बनतो. चिकित्सा सुरू होते माझ्याकडून...त्यामुळं स्वतःची सिरियल एन्जॉय नाही करता येत !

प्रश्‍न - तुम्हाला तुम्ही साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती सर्वाधिक आवडली...?
शिवाजी साटम - 'उत्तरायण' पाहिलाय? ती आवडती फिल्म आणि त्यात साकारलेली भूमिका सर्वाधिक आवडती. या फिल्मला ऍवॉर्डस्‌ही मिळाली आहेत. तीनदा या फिल्मचं स्क्रिनिंग लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालं. देखणी लव्ह स्टोरी आहे ही. त्याशिवाय 'दे धक्का'मधली भूमिका आवडते आणि अगदी आता, अभिजितच्या फिल्ममध्ये 'हापूस'मध्ये साकारलेली भूमिका. त्यात घरातल्या थोरल्या माणसासारखं कॅरेक्‍टर उभं केलंय. टीपिकल कोकणी माणूस. फणसासारखा. आतून गऱ्यासारखा मऊ. वयाची पन्नाशी ओलांडली, तरी आईबरोबर दहा वर्षांचं मुल होऊन बागडणारा. आईलाही हा मोठा माणूस वाटत नाही, मुलगाच दिसतो. ती गालावरून हात फिरवत बोलते...फार सुरेख कॅरेक्‍टर मिळालंय 'हापूस'मध्ये.

प्रश्‍न - मुलगा अभिजित 'हापूस'च्या निमित्ताने पूर्णवेळ दिग्दर्शनात उतरला. त्याच्यासोबत तुमचाही दिग्दर्शनाचा काही विचार?
शिवाजी साटम - अजिबात नाही ! ते माझं क्षेत्र नाही. मी अभिनेता. अभिनयातच खूश आहे. दिग्दर्शन खूप वेगळं क्षेत्र आहे. तिथं खूप पेशन्स हवा. वेगळी समज हवी. अष्टपैलूत्व हवं. एकाचवेळी तो बिझनेसमन, ऍक्‍टर, टेक्‍निकली परफेक्‍ट माणूस हवा. मी अभिनयातच सुखी आहे !

प्रश्‍न - जाता जाता, शेवटचा प्रश्‍न. समजा, ऍक्‍टिंगमध्ये शिवाजी साटम उतरले नसते तर...?
शिवाजी साटम - क्रिकेटर झालो असतो ! मला क्रिकेट प्रचंड आवडतं. कदाचित पायलटही झालं असतो. तेही आवडीचं क्षेत्र होतं एकेकाळी...