Sign In New user? Start here.

आपण सगळेच रोज नवीन कलाकार

 
 
 

अनेक मालिका, चित्रपटांचे निर्माते, लेखक, अभिनेता श्रीरंग गोडबोले हे ‘मिफ्ता’ सन्मान सोहळ्याच्या नाटक विभागासाठी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. नाटक चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अनुभव अतिशय दांडगा असल्याने त्यांना ही जबाबदारी सोपवण्य़ात आली होती. एकूण तीन लोकांची कमिटी यासाठी निवडण्यात आली आहे. श्रीरंग गोडबोले यांना या पुरस्काराबद्द्ल काय वाटतं आणि सध्याच्या रंगभूमीविषयी त्यांच्याशी केलेल्या गप्पा.....

सुरवातीला ‘मिफ्ता’ या पुरस्कार सोहळ्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, "भारतीय विशेषत: मराठी चित्रपट आणि रंगभूमीला जागतीक पातळीवर नेणारा हा पुरस्कार सोहळा आहे. आणि त्याचं एक वेगळंच मह्त्व मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालं आहे.

भारताबाहेर अशा पद्धतीने घेतल्या जाणा-या या पुरस्कारामुळे मराठी चित्रपट आणि रंगभूमीचा फायदा कसा होणार आहे याबद्दल ते म्हणतात की, "मुळात पुरस्कार हे फायद्यासाठी नसतातच. कलाकारांना काहीतरी त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून असतात. कुठल्याही पुरस्काराचा मुख्य उद्देश हा इंडस्ट्रीचा फायदा होणं नसतोच.

यावर्षी होणा-या सोहळ्यात त्यांच्या भूमिकेबद्दल ते सांगतात," या सोहळ्यातील नाटक विभागासाठी मी परिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. पुरस्कारासाठी ज्या नाटकांच्या एन्ट्रीज आलेल्या असतात त्यातून काही नाटकांना निकष लावून निवडतो. यासाठी सगळी नाटकं आम्हाला बघावी लागली. आणि बघून मग आमचं परिक्षकांचं मंडळ यावर निर्णय घेतला. या कमिटीत माझ्याबरोबर भारती आचरेकर आणि जयंत पवार यांचा समावेश आहे.

या पुरस्कारासाठी अनेक एन्ट्रीज येत असतील आणि त्यातील काहींची निवड करतांना कधी दडपण येत नाही का? असं विचारता ते म्हणाले की, " नाही बुवा..! दडपण कधीच येत नाही कारण आपण सदसदविवेक बुद्धीने काम करत असतो. आणि आपल्याला बरं वाईट कळतं असं संयोजकांना वाटतं म्हणून त्यांनी आमची निवड केलेली असते. पण कधी कधी काय होतं की, दोन चांगली नाटकं असली की मग निवडतांना त्रास होतो दडपण येत नाही.

तीन परिक्षक म्हणून एकत्र काम पाहतांना एखाद्या निवडीवरून कधी वाद होत असतीलंच, यावर ते म्हणतात की, " वाद होत नाही चर्चा होते. कसं आहे की, " जयंत काय आणि भारती काय आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. एकमेकांच्या आवडी-निवडी पण आम्हाला माहिती असतात. आणि जे आपण Sensibility म्हणतो ती आमची सर्वांची सारखीच असते. त्यामुळे असं नाही होत की एकाला काहीतरी वेगळंच आवडलं आणि दुस-याला काहीतरी भलतंच आवडलं.

एक लेखक आणि निर्माता म्हणून सध्याच्या बदलत्या मराठी रंगभूमीविषयी काय सांगाल? असं विचारता ते म्हणाले की," चांगलं आहे. म्हणजे मला तरी जिवंत वाटतं. कारण आपल्याकडे जे काही नवीन टॅलेंन्ट येतं ते मराठी थिएटरमधून आणि विविध नाट्य स्पर्धातून येतं. तसंच रंगभूमीवर नवीन नवीन लोकं येण्यासाठी जी यंत्रणा लागते ती आपल्याकडे खूप चांगली आहे. त्यामुळे सुवर्ण युग पूर्वी होतं असं म्हणणा-यातला मी नाहीये. मराठी रंगभूमीचं सुवर्णयुग सततच चालू असतं. सध्या जर तुम्ही भारतीय रंगभूमीचा आढावा घेतला तर मराठी आणि बंगाली रंगभूमी यांची खूप मोठी परंपरा आहे. पण सध्या जर का तुम्ही बंगाली रंगभूमी पाहिली तर जो दबदबा आधी होता तो आता दिसत नाही. आता मराठीचाच दबदबा आहे सगळीकडे...

एक लेखक आणि निर्माता म्हणून या पुरस्काराकडे तुम्ही कसे बघता असं विचारता ते म्हणाले की," इथे माझी सध्या परिक्षकाची आहे. पण मला वयक्तीक जर का विचाराल तर पुरस्काराचं तसं महत्व हे क्षणीक असतं. पण आपल्याला सध्या आवश्यकता आहे ती मराठी सेलिब्रेट करण्याची. मराठी सिनेमा, नाटक, सिरीअल्सना जास्तीत जास्त मराठी प्रेक्षक मिळाला पाहिजे. त्यांना हे सांगायची गरज असते की हे चांगलं आहे. अजूनही मराठीचा प्रेक्षक फक्त १८% टक्के आहे. बाकीचा ८२% प्रेक्षक हा हिंदी, इंग्रजीकडे जातो. त्यामुळे त्यांना सांगायची गरज आहे की मराठी सिनेमा बघा, मराठी नाटक बघा. म्हणजेच प्रेक्षकांशी कम्युनिकेट करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आहे. अशा पुरस्करातून एखाद्याला बक्षीस मिळालं तर त्यावर चर्चा होते. मला वाटतं ते महत्वाचं आहे. त्यामुळे अशा पुरस्कार सोहळ्याची मराठी इंडस्ट्रीला खरंच गरज आहे असं मी म्हणेन.

शेवटी नवीन कलाकारांना काय सांगाल असं विचारता अतिशय गमतीने ते म्हणाले की," सगळेच नवीन कलाकार आहेत. मी नवीन कलाकार आहे. आपण सगळेच नवीन कलाकार असतो. त्यामुळे मी कुणाला काय सांगणार..?

-अमित इंगोले.