Sign In New user? Start here.

धमाल कॉमेडी असलेला ‘येड्यांची जत्रा’ - स्नेहा कुलकर्णी

धमाल कॉमेडी असलेला ‘येड्यांची जत्रा’ - स्नेहा कुलकर्णी

 
 
 

आज मराठी इंडस्ट्रीत अनेक मनोरंजनात्मक चित्रपटांची सध्या रेलचेल सुरू आहे. त्यात सामाजिक विषयांचेही भान तितकेच ठेवले जात असल्याचं दिसून येतं. असाच ग्रामीण भागातील स्वच्छतेवर आधारीत ‘येड्यांची जत्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपतगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने यातील मुख्य अभिनेत्री स्नेहा कुलकर्णी हिने झगमग टीमशी केलेली खास बातचीत..

* स्नेहा तुझा अल्पसा परिचय तू वाचकांना करून द्यावा.

नमस्कार प्रेक्षकांनो...! हा माझा पहिलाच चित्रपट आहे. तशी माझी या इंडस्ट्रीतील एंन्ट्री म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मधून...या शोची मी फर्स्ट रनरअप होते. त्यानंतर मला ब्रेक मिळाला तो बालाजी टेलिफिल्मच्या ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेसाठी...यातील प्रियाची भूमिका मी साकारली आहे. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये मी काम केलंय. ही झाली माझी सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची ओळख..पण बेसिकली मी एक कम्प्युटर इंजिनिअर आहे. माझं इंजिनिअरींग पूर्ण होऊन आत तीन वर्ष झाली आहेत.

* ‘येड्यांची जत्रा’तील तुझी भूमिका काय आहे?

- येड्यांची जत्रा हा खरंतर खुप कॉमेडी धमाल चित्रपट आहे. कॉमेडीच्या माध्यमातून या चित्रपटातून एक मॅसेज समाजासाठी दिला जाणार आहे. तो म्हणजे स्वच्छता किती महत्वाची आहे हे या चित्रपटातून पटवून देण्यात आलं आहे. आजही काही ग्रामीण भागात हागणदारी हा प्रकार बघायला मिळतो. तर हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे. त्यासंबंधीची माहिती या चित्रपटातून देण्यात येणार आहे. हा अतिशय गंभीर असा प्रश्न खुप कॉमेडी पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. जसं या चित्रपटाचं टायटल आहे त्यानुसार यातील सर्वच पात्रे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना खुप धमाल बघायला मिळणार आहे.

यातील माझं कॅरेक्टर आहे ते संगीचं म्हणजे संगीता...हे कॅरेक्टर मी भरत जाधव यांच्या अपोझिट करत आहे. माझं हे जे कॅरेक्टर आहे ते खुप चुलबुलं आहे, बडबडं कॅरेक्टर आहे. ती १० वीत जवळपास आठ वेळा नापास झाली आहे. गावभर हिंडणं एवढंच तिचं काम आहे. हिंदी चित्रपटांचीही ती खुप मोठी फॅन असते. शिवाय ह-यावर(भरत जाधव) प्रेम करायचं एवढंच तिचं काम असतं.

sneha kulkarni yedyanchi jatra

* या चित्रपटात मराठीतले अनेक दिग्गज कलाकार तुझ्यासोबत आहेत. कसा एकंदर अनुभव होता त्यांच्यासोबत काम करण्याचा?

- खरंतर ही मला मिळालेली खुप मोठी संधी होती असं मी म्हणेन..या चित्रपटात जवळपास मराठीतले बरेचसे मोठे कलाकार आहेत. विनय आपटे, मोहन जोशी, भरत जाधव, संदीप पाठक, विशाखा सुभेदार, पॅडी असे खुप छान कलाकार या चित्रपटात आहेत. जे मला खुप सिनिअर आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडनं खुप काही शिकायला मिळालं. माझी पहिलीच फिल्म असल्याने अनेक गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे अनेकांनी मला खुप सांभाळून घेतलं.

* पहिल्यांदाच चित्रपट करतांना काही अडचणी आल्यात का त्या कशा सोडवल्यात?

- खरंतर मला काही अडचणी आल्याच नाहीत. मालिका आणि चित्रपटांचं जे बेसिक शूटींग असतं ते सारखंच असतं. त्या काही फरक असतो तो हा की, फिल्म ही काही सीन पुरतीच मर्यादीत असते. त्यातच तुम्हाला तुमचं १०० टक्के द्यायचं असतं. तर मालिका ह्या अखंड चालणा-या असतात. त्यात आम्हाला अभिनय कौशल्य दाखविण्याचे भरपूर चान्स मिळतात. त्यामुळे चित्रपटात काम करत असतांना त्या स्क्रिप्ट्चा मी खुप अभ्यास केला. शिवाय अनेक लोकेशन्सवर शूटींग चालू होतं. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची संधीही मला मिळाली.

* दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

0 - मिलिंद कवडे हे खरंतर खुप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यांनी जरी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अलिकडेच एन्ट्री केली असली तरी त्यांच्याकडूनही मला खुप काही शिकायला मिळालं. शूटींग दरम्यान ते अगदी खेळीमेळीचं वातावरण ठेवत होते त्यामुळे टेन्शन न घेता काम करायला सोपं जायचं. कुठलिही गोष्ट अशी फोर्स करून काढण्यापेक्षा सीन समजावून सांगणं आणि त्या कलाकाराला तो सीन करायला लावणं हे त्यांचं तंत्र खुप चांगलं आहे.

* या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना काय सांगशील ?

- हो प्रेक्षकांना मी हेच सांगेन की, हा चित्रपट खरंच खुप बघण्यासारखा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आणि आपल्या आयुष्यात हसणं आणण्यासाठी सुद्धा हा चित्रपट एकदा तरी सर्वांनीच बघायला हवा, असं मी सर्वांना सांगेन.

अमित इंगोले