Sign In New user? Start here.

‘कुहू’पेक्षा ‘स्पृहा’ थोडं बेटर व्हर्जन आहे - स्पृहा जोशी

Spruha Joshi interview

‘कुहू’पेक्षा ‘स्पृहा’ थोडं बेटर व्हर्जन आहे - स्पृहा जोशी

 
 
 

   आज अनेक तरूण प्रतिभावंत अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वात दाखल होतांना आपण पाहतो. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात त्या सह्जतेने वावरतांना दिसून येतात. याच अनेक अभिनेत्रींपैकी एक नावाजत असलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरवात केलेली स्पृहा आज आपल्याला अनेक मालिका,चित्रपट आणि नाटकात पहायला मिळते. तिची ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील ‘कुहू’ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अतिशय वेगळ्या या भूमिकेसारखीच प्रत्यक्षात सुद्धा ती तशीच आहे का? तिची काय स्वप्न आहेत ? तिचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला, अशा अनेक प्रश्नांना तिने अगदी सहजपणे उत्तरे दिली, जेव्हा झगमग डॉट नेटचे प्रतिनिधी अमित इंगोले यांनी तिच्याशी संवाद साधला....

   अमित - स्पृहा तुझ्या अभिनयाची सुरवात कधी आणि कशी झाली ?

   स्पृहा - दादरच्या बालमोहन विद्यामंदिरची मी विद्यार्थीनी होती. बालरंगभूमीच्या विकासासाठी ज्यांनी मोठं काम केलं,
त्या विद्या पटवर्धन माझ्या शिक्षीका होत्या. त्यांच्याकडून मला रंगभूमीची बाराखडी शिकता आली.अनेक एकांकीका मी शाळेत असताना केल्या होत्या. त्यानंतर सहावीत असतांना मी पहिल्यांदा टीव्हीवर काम केलं. ई टीव्ही मराठी म्हणजेच तेव्हाच्या अल्फा टीव्हीवर आमची एक ‘दे धमाल’ नावाची बालकलाकारांची मालिका आली होती. त्यामुळे माझा अभिनयाचा खरा प्रवास पाचवीत असतानापासूनच सुरू झाला. त्यानंतर अनेक कामे करत असताना एका कामातून दुसरी कामे मिळत गेली. एकीकडे शाळा आणि ही कामे अशी सोबतच चालू होती. त्यानंतर ‘रूईया कॉलेज’ मध्ये आल्यानंतर माझ्यातल्या गुणांना आणखी वाव मिळत गेला.मुळात हे कॉलेज नाटकांसाठी, अनेक कलाकारांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे अभिनयाचं प्रशिक्षण मला कुठल्याही नाट्य शिबिरात न जाता, या कॉलेजमध्येच मिळत गेलं. इथे असतानाच मी सात-आठ एकांकीका केल्यात. असं सगळं चालू असताना आपलं स्वत:चं प्रिपरेशन होत राहतं की, हे आपल्याला जमतं का? असं करता येतंय का..? हीच वाट मला रूईया कॉलेजमध्ये मिळाली. त्यानंतर ‘ग म भ न’ या एकांकीकेतून मला गजेंद्र अहिरेंचा ‘मायबाप’ चित्रपट मिळाला. ‘अनन्या’ या एकांकीकेतून ‘अग्निहोत्र’ ही मालिका मिळाली. त्यानंतर मग ‘मोरया’ आणि इतर कामे मिळत गेली.

Spruha Joshi interview in marathi

   अमित - इतक्या लहान वयातच टीव्हीवर काम करण्याचा अनुभव कसा होता?

   स्पृहा - खरंतर आम्हाला तेव्हा असं काही वाटतंच नव्हतं की, आम्ही काही खूप मोठं काम करतोय. तेवढी समज आमच्यात आली नव्हती. ते सर्व आम्ही एक मजा म्हणूनच करीत होतो. आठवडाभर शाळा करून शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच आमचं शूटींग असायचं. त्यामुळे ते काम आमच्यासाठी एखाद्या पिकनिक प्रमाणेच होतं. सगळे मित्र-मैत्रीणी एकत्र असल्याने खूप धमाल, मजा, मस्ती करत ती मालिका आम्ही केली होती. धमाल करण्यापलिकडचा सिरियसनेस कधी विद्याताईंनी आमच्यात येऊच दिला नाही. किंवा आमच्या डिरेक्टरांनी येऊ दिला नाही. या मालिकेनंतर बालकलाकार म्हणूनच मी ‘आभाळमाया’, ‘एक हा असा धगा सुखाचा’ अशा मालिकांसाठीही मला कामे करायला मिळाली.

   अमित - अभिनयासोनतच तू लिखाण आणि सूत्रसंचालन सुद्धा करतेस, हे सर्व एकत्र करणं कसं जमतं ?

   स्पृहा - मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी ऎकमेकांच्या हातात हात घालून चालणा-या आहेत. त्यामुळे यांचा मला माझ्या अभिनयात किंवा इतरही गोष्टीत कुठेतरी उपयोग होतच असतो. मी खरंच मला नशीबवान समजते की, माझे सर्व छंद हे ऎकमेकांशी निगडीत आहेत.

   अमित - रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिनही माध्यमात तू काम करते आहेस, तुला कोणतं माध्यम जास्त आवडतं ?

   स्पृहा - खरंतर तिनही माध्यमांची त्यांची त्यांची गंमत आहे. टिव्ही या माध्यमातून अतिशय कमी वेळात तुम्ही प्रचंड प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकता. सिनेमा करणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि नाटकाचं असं आहे की, तुम्ही थेट लोकांशी बोलत असता. तुमच्या कामावर ताबडतोब प्रेक्षकांच्या चांगला-वाईट प्रतिक्रिया तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे मला नाटक खूप आवडतं. इतरही माध्यमात काम चालूच असतं, पण नाटकाची एक वेगळीच गंमत आहे.

   अमित - ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील भूमिका तुला कशी मिळाली ?

   स्पृहा - या मालिके संदर्भात पहिल्यांदा मला रंगा(श्रीरंग गोडबोले) सरांचा फोन आला की, नवीन सिरीयल करतोय. तुला काम करायला आवडेल का..? मी म्हणाले विचार करून सांगते...! त्यानंतर मला एक दिवस सतीश राजवाडेचा फोन आला आणि म्हणाला की, या मालिकेसाठी असा असा ग्रुप आहे. तुझी भूमिकाही छान असून तू ही भूमिका करावी, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. ‘कुहू’च्या भुमिकेबद्द्ल ऎकल्यावर मला ती भूमिका आवडली होती. मग त्यानंतर फार काही विचार न करता मी होकार दिला.

   अमित - या मालिकेतील ‘कुहू’ रिअल लाईफ मध्येही ती तशीच आहे का?

   स्पृहा - खरंतर फार टोकाचं आहे हे कुहूचं कॅरेक्टर...! ते बघायला फार मजेशीर वाटतं, पण प्रत्यक्षात भिती वाटेल मला अशा कॅरेक्टरची..(हसत). इतकही आपण हळवं राहून किंवा स्वप्नात राहून चालत नाही. हळवेपणा जरी असला तरी कुहू एवढा तो टोकाचा असू नये. स्पृहा थोड बेटर व्हर्जन आहे...असं मला वाटतं...!

Spruha Joshi interview in marathi

   अमित - या क्षेत्रात तुझा गॉडफादर कोण आहे ?

   स्पृहा - खरंतर माझा कुणी गॉडफादर नाहीये. घरातील सुद्धा या क्षेत्रात कुणी नाहीत. पण हो...मी आत्तापर्यंत केलेल्या माझ्या कामालाच माझा गॉडफादर म्हणेन. कारण एका कामातून दुसरी कामे मिळत गेलीत.

   अमित - तू आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी तूझी आवडती भूमिका कोणती आहे?

   स्पृहा - मला ‘अग्नीहोत्र’ मधील उमा बंड ही भूमिका फार आवडते. कारण एक तर ती भूमिका करणं माझ्यासाठी चॅलेंन्ज होतं. त्यावेळच्या वयापेक्षा खूप मोठ्या वयाची ती भूमिका होती. ती भूमिका तशीच साकारणं आणि लोकांना पटवून देणं की, ही मुलगी अशी आहे, हा विश्वास देणं खूप कठीण होतं माझ्यासाठी...पण ते कॅरेक्टर लोकांना खूप आवडलं होतं.

Spruha Joshi interview in marathi

   अमित - मराठीतल्या कोणत्या अभिनेत्रींसारखं तुला व्हायला आवडेल ?

   स्पृहा - यासाठी फक्त एकच नाव नाहीतर, बरीच नावं मला घ्यावी लागतील. सुरवात केली तर भक्ती बर्वें, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे या सर्वांची कामे बघूनच मी घडलेय. त्यांची इतकी ख्याती ऎकलीय की, त्यांनी केलेल्या कामापैकी थोडं तरी मला करता यावं, अशी माझी इच्छा आहे. त्यानुसार माझे प्रयत्न चालू आहेत.

   अमित - तुझा ड्रिम रोल काय आहे?

   स्पृहा - ‘स्वामी’ मालिकेतील रमा ही भूमिका हा माझा ड्रिम रोल म्हणता येईल. जो मृणाल कुलकर्णी यांनी केला होता. इतरही अनेक भूमिका आहेत ज्या मला खूप आवडतात. पण रमाची भूमिका माझ्या मनाला अतिशय भावलेली आहे.

   - अमित इंगोले

 
 
 

Other Interview link