Sign In New user? Start here.

मराठी बॉयचा हिंदी ‘स्टॅण्डबाय’

 
 
 

संजय सुरकर यांचा येऊ घातलेला ‘स्टॅण्डबाय’ हा हिंदी चित्रपट सद्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. फुटबॉल या खेळावर आधारीत या चित्रपटातून प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हिंदी चित्रपट विश्वात दाखल होत आहे. त्याच्या या पहिल्याच हिंदी चित्रपटाविषयी त्याच्याशी केलेल्या गप्पा...

आदिनाथने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी सांगितले तो म्हणाला, " ‘स्टॅण्डबाय’ हा हिरो म्हणून माझा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यात मी राहूल नार्वेकर हे कॅरेक्टर करतोय. राहूल आणि शेखर या दोन जीवलग मित्रांची ही गोष्ट आहे. दोघेही फुटबॉल खेळणारे आहेत आणि त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो. त्यामुळे दोन मित्र, फुटबॉल, करिअर, खेळातले राजकारण असे अनेक विषय त्यात आहेत.

तू स्वत: कधी फुटबॉल खेळला आहेस का? असं विचारता तो म्हणाला की, " मी शाळेत असतांना खेळलोय, पण प्रोफेशनली कधी खेळलो नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मात्र आम्हाला चांगले दोन-तीन महिने फुटबॉलचे ट्रेनिंग घ्यावे लागले. मुंबईत भवन्स कॉलेजच्या ग्राऊंड्वर आम्हाला इंडियन टीमचे धनराज, राठोड सर आदींनी ट्रेन्ड केले.

या ट्रेनिंगच्या शूटींगसाठी काही उपयोग झाला का? यावर तो म्हणतो की, " नक्कीच झाला. आणि भरपूर झाला. कारण फुटबॉलचे शूट होते तेव्हा आमच्या भोवती सगळे नॅशनल आणि स्टेट लेव्हलला खेळलेले खरे फुटबॉल प्लेअर्स होते. आणि आम्हाला त्यांच्याबरोबर नुसते उभे राहायचे नव्हते तर खेळायचे होते. त्यासाठी या ट्रेनिंगची गरज होतीच. स्क्रीनवर हे सगळे दिसलेच.

या चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचा अनुभवही त्याने आमच्याशी शेअर केला, तो सांगतो की, " या फिल्ममधल्या मॅचचे शूटिंग पुण्याजवळच्या बालेवाडी स्टेडियममध्ये केले आहे. आम्हाला सलग पंधरा मिनिटे आणि अर्धा तास सलग खेळायचे होते. पाच कॅमेरे लावून ती मॅच शूट करायची असे ठरले होते. हे शूट होते त्याच्या आधल्या दिवशी माझे काही शॉट्स घ्यायचे होते. मी ग्राऊंडवर येतो आणि ओळीने सात-आठ बॉल जोरात गोलमध्ये मारतोय असे शूट होते. असे मी ४ - ५ वेळा केले. चार वेगळ्या अ‍ॅंगलने कॅमेरे लावले होते. हे करताना पायाचा स्नायू खूपच दुखावला. रात्री झोप येत नव्हती. दुस-या दिवशी पंधरा मिनिटांची मॅच खेळायची होती. आम्ही सगळे ग्राऊंडवर आलो. पहिल्या दोनच मिनिटात पायाचा स्नायू दुखावला असल्याने मी तिथे कोसळलो. आणखी खेळलो असतो तर माझा स्नायूच फाटला असता. मला उभेही राहता येत नव्हते. पण सुदैवाने आमचे फिजिओ तिथे होते त्यांनी मला ट्रीट केले आणि अर्ध्या तासात बरा झालो आणि मॅचसाठी उभा राहिलो.

संजय सुरकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंस, त्यांच्याबद्दल काय सांगशील? यावर तो म्हणाला की," या चित्रपटाचे दिग्दर्शक हे ब्रिलियंट आहेत. त्यांच्याबद्द्ल मी काय सांगणार? नॅशनल पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. काम करतांना अगदी मित्रांसारखे वागतात. सीन व्यवस्थित समजावून सांगतात. माझ्यासारख्या नवीन कलाकाराला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांच्यकडून खूप काही मला शिकायला मिळालं.

तुझे वडिल एक ज्येष्ठ कलाकार आहेत, त्यामुळे हिंदीतून काम करतांना त्यांच्या काही टिप्स तुला मिळाल्यात का? असं विचारता तो म्हणाला की, " अॅलज ए फादर, अॅलज ए हिरो, अॅडज ए स्टार असे ते बरेचकाही असले तरी जे काही करतो त्याला ते नेहमीच सपोर्ट करतात. ‘वेड लावी जिवा’ ही पहिली मराठी फिल्म मी अॅयज ए हिरो केली, ती माझ्या वडिलांनीच डिरेक्ट केली होती. त्या निमित्ताने मला त्यांच्याकडून खूपच शिकायला मिळाले. खरे सांगायचे तर मी वडिल्यांच्याकडून बरेच काही नेहमीच शिकत आलोय. माझे अभिनयाचे विद्यापीठ माझ्या वडिलांच्या रूपाने आमच्या घरातच आहे.

ही फिल्म मिळाली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?यावर ते म्हणाले की, " त्यांना खूप आनंद झाला. मला माझ्या मेरिटवर ही फिल्म मिळाली याचा तर त्यांना अधिकच आनंद झाला. ते मला नेहमीच पाठिंबा देत आलेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवीन. मला जे हवे ते करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मला नेहमीच दिले आहे. जे करायचे असेल ते कर पण बेस्ट कर. ते सर्वोत्तमच असायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

त्यांची कोणती गोष्ट तुला सर्वात जास्त आवडते? यावर तो म्हणाला की, " मी लहानपणापासूनच त्यांचे सगळे चित्रपट पाहत आलोय..त्यापैकी इन्स्पेक्टर महेश जाधव हे कॅरेक्टर मला खूप भावले.

आदिनाथ त्याच्या पुढील प्लॅनिंगबद्द्ल सांगताना म्हणाला की, " मला चांगल्या फिल्म्स करायच्या आहेत. उत्तम कलाकारांबरोबर काम करायचे आहे. आज असा ट्रेन्ड आहे म्हणून असे आणि तसा ट्रेन्ड आहे म्हणून तसे करायचे असा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. मला कोणत्याही एका रोलसाठी टाईपकास्ट झालेले आवडणार नाही. चांगल्या संधी मिळत जातील तसे काम करायचे असे ठरवले आहे.

‘स्टॅण्डबाय’ या पहिल्याच चित्रपटाकडून तुला काय अपेक्षा आहेत? असं विचारता तो म्हणाला की, " या चित्रपटामुळे फुटबॉल या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष जाईल. फुटबॉल आपल्याकडे भरपूर खेळला जातो, मात्र क्रिकेटएवढे महत्व त्याला आज दिले गेलेले नाही. ‘स्टॅण्डबाय’ चित्रपटामुळे तो पाहिल्यावर फुटबॉल या खेळाला महत्व यावे अशी माझी इच्छा आहे.

-अमित इंगोले.

-अमित इंगोले.