Sign In New user? Start here.

`भारताबाहेरही मराठी रंगभूमी जोरात - सुभग ओक

भारताबाहेरही मराठी रंगभूमी जोरात - सुभग ओक

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

भारताप्रमाणे भारताबाहेरही मराठी रंगभूमीला जोपासणारे अनेक कलावंत आहेत. त्यातीलच एक म्हणजे सुभग ओक. भारताबाहेर राहून सुद्धा लहानपणापासून असलेली नाटकांची आवड त्यांनी जोपासली आहे. प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करण्यासाठी स्वत:ची नाट्य संस्था स्थापन करून अनेक दर्जेदार नाट्कांची निर्मिती केली. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनय आणि लेखन सुद्धा जोपासलं आहे हे विशेष. बीएमएमच्या शिकागो येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झालेया अधिवेशनात त्यांच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा अतिशय जोरदार प्रतिसाद लाभला. त्यांच्या या दोन्ही प्रयोगांची आणि त्यांच्या अनुभवांची माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत...

तुम्ही आतापर्यंत नाट्यक्षेत्रात केलेल्या कामांबद्द्ल माहिती करून घ्यायला आम्हाला आवडेल, " मी गेली दहा वर्ष अमेरिकेत आहे. मुंबईत असतांना सुद्धा वयाच्या अगदी सहाव्या वर्षापासून मी बाल रंगभूमीत काम करायला सुरवात केली. १९९२ सालच्या नाट्य दर्पण रजनीमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मला मिळाला आणि तेव्हा पासून नाटकांची आवड निर्माण झाली. सुधाताई करमरकर, विनोद हडप, अमित ओक, या सर्वांकडून मी त्यावेळी बालनाट्याचे धडे घेतले. त्यानंतर आंतरनाट्य़ या संस्थेव्दारे प्रायोगिक नाटकं करायचो. त्यात मी विजय केंकरे, अतुल परचुरे, तुषार दळवी, रेणुका शहाणे, नीना कुलकर्णी यांच्याबरोबर काम केलीत. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर स्वत:ची संस्था काढावी असं वाटत होतं. मग मी ‘बालभारती नाट्य संस्था’ म्हणून पार्ल्यात नाटकांची शिबीरं घेणारी संस्था काढली. यातून आम्ही साधारण चार ते पाच वर्ष नाटकं सादर केली. अजित भुरे यांच्यासोबत एक ग्रिप्स पद्धतीचं नाटकही त्यावेळी बसवलं होतं. त्याचं लेखन श्रीरंग गोडबोले यांनी केलं होतं. त्यानंतर माझ्या संस्थेमार्फ़त ‘नको रे बाबा’ हे नाटक केलं. याच संस्थेमार्फ़त अशी अनेक नाटकं चालूच होती. मग मी एमएस केलं आणि अमेरिकेत आलो. इथेही मला माझी कला जोपासता यावी म्हणून इथेही मी नाटकं बसवायला सुरवात केली. गेली दहा वर्ष इकडे मी थिएटर करतोय. त्यात‘ ‘राधाबाई’, ‘लग्नाची बेडी’, ‘जावई माझा भला’, ‘वा-यावरची वरात’, ‘चार दिवस प्रेमाचे’ अशा वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आम्ही केलीत. त्यानंतर २००५ साली मी माझी स्वत:ची ‘एक्सपरीमेंट’ नावाची संस्था इकडे काढली. याचा मूळ उद्देश हाच की वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर करावी. एका अधिवेशनात मी ‘नको रे बाबा’नाटक केलं त्यात सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, अमित ओक हे भारतातले कलाकार इकडचा मी आणि आणखी काही कलाकार त्यात होतो. यात माझी बायको श्रद्धा देवधर हीने खूप मदत केली. तसेच मागच्या म्हणजे फिलाडेल्फियाला झालेल्या अधिवेशनात मी स्वत: लिहीलेलं ग्रिप्स पद्धतीचं चिल्ड्रेन थिएटर केलं होतं. आणि यावेळी शिकागोमध्ये तर तीनही दिवस माझे कार्यक्रम आहेत".

यावेळी सादर झालेल्या कार्यक्रमांबद्द्ल काय सांगाल असं विचारता ते म्हणाले की, "पहिल्या दिवशी मी ग्रिप्स पद्धतीचं सादरीकरण केलंय. ज्यात लहान मुलांचा अभिनय मोठी माणसं करत असतात. "जॅम सॅम जॅमी" याची कथा अशी आहे की, एका मुलाला डान्सिंग, अ‍ॅक्टींग आवडते आणि त्याची आई त्याच्या मागे अभ्यासाचा नांदा लावते. तो मुलगा एक दिवस रडतो, भांडतो आणि उपाशी झोपतो. त्याच्या स्वप्नात एक जीनी येतो आणि तो जीनी त्या मुलाची मदत करतो. त्याचं होमवर्क करून देतो. त्याच्या आईवडीलांना समजावतो की, ह्या मुलांना जे करावयाचे आहे ते करू द्या. अशा पद्धतीचं या नाटकाचं कथानक आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी भारतातून फक्त एक कलाकार घेतला आहे. त्यात मी, माझा भाऊ अमित ओक, मुकूंद मराठे, आणि एक अभिनेत्री वृषाली अटलांटामधून आहे".

कोणत्या गोष्टींना डोळ्यांसमोर ठेवून या विषयाची निवड केली? यावर ते म्हणाले की, "कसं आहे की, इकडच्या मुलांना काय वाटतं. त्यांना काय आवडतं ह्या गोष्टींना जास्त ध्यानात घेतलं होतं. आम्ही इकडे बघतो की, इकडच्या मुलांना सुट्ट्या लागल्या की सगळंच करायचं असतं. पण त्यांच्या डोक्यावर आई-वडिलांची टांगती तलवार पण असते की, अभ्यास केला पाहिजे. या सगळ्यात मुलं कधी कधी दमून जातात. या सर्व गोष्टींना एका जीनीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न मी यात केला आहे".

मराठीतून सादर हॊणा-या अशा नाटकांना प्रेक्षकवर्ग मिळतो का? याबाबत ते म्हणाले की, " काय असतं की ह्या नाटकांचं लिखाण हे फक्त मराठीत आम्ही करत नाही. थोडं मराठी, थोडं इंग्रजी असं त्यात आम्ही करतो. म्हणजे जेणेकरून मुलांना ते समजेल. खरंतर तुमचा प्रश्न चांगला आहे की प्रेक्षकवर्ग मिळतो का? तर हो गेली तीन वर्ष मी हे प्रयोग करतो आणि याला हाऊसफुल्ल प्रेक्षक असतात", असं त्यांनी सांगितलं.

यावेळी केलेल्या दिग्दर्शनाच्या आणि लेखनाच्या अनुभवाबद्द्ल सांगतांना ते म्हणतात की, " (हसत) यावेळचा अनुभव थोडा वेगळाच होता. तो असा की, मुळात मी यावेळी ग्रिप्स करणार नव्हतो. मला समीप रंगमंच बरोबर काम करायचं होतं. पण भारतातून येणारं असंच एक नाटक कॅन्सल झालं. मग मला बीएमएममधून फोन आला आणि मी हे नाटक वेळेवर तयार केलं. घाईतच मला याचं लिखाण करावं लागलं. तसंच या नाटकात असणारे चारही कलाकार हे चार टोकावर असतात. यातून लोकांना मला हे सांगायचं आहे की, "डिस्टन्स नो बार". आम्ही चारही जणांनी कॉन्स्फरन्सवर, व्हॉईस चॅटवर आम्ही तालीम केली आहे. लेखन करतांना हाच विचार केला होता की, हा मला हे नाटक ऑनलाईन बसवायचं आहे. हा खरंच खूप वेगळा प्रयोग होता माझ्यासाठी".

समीप रंगमंचबरोबर सुद्धा तुम्ही काम केलं त्याबद्द्ल काय सांगाल? यावर ते म्हणाले की, " समीप रंगमंच जसं नाव आहे तसंच त्याचं काम आहे म्हणजेच विदाऊट एनी स्टेज, विदाउट एनी प्रॉप, विदाऊट एनी मेकअप. आहार्य अभिनय कमीत कमी वापरून कथानक माडणं हे समीपचं कार्य आहे. आंगीक, वाचीक आणि सत्व लोकांसमोर साधेपणाने सादर करणं याउद्देशाने मी समीपकडे बघतो. समीप बरोबर मी योगेश सोमण याची लिहीलेली ‘गप्पा’ ही एकांकिका सादर करणार आहे. यात दोनच पात्र असून आणि ही लाईट कॉमेडी असून अगदी सोपा विषय आहे. मला वाटतं की, जर आंगीक आणि वाचीक अभिनय चांगला झाला तर नाटकाला इतर गोष्टींची गरजच पडतच नाही. हेच मला समीपमधील आवडतं. लोकांच्या समोर जाऊन लोकांच्या मनाला भिडेल असं काहीतरी सादर करणं, सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने सादर करणं अशी समीप रंगमंचची डेफिमेशन मी करु शकतो".

भारताबाहेर मराठी रंगभूमीची वाटचाल पाहता भारताबाहेरही मराठी रंगभूमीला चांगले दिवस आलेत का? याबद्द्ल तुमचं काय मत आहे? यावर ते म्हणाले की, " हो मी म्हणेन नक्कीच चांगले दिवस आले आहेत. सध्या वेगवेगळ्या विषयांची नाटकं येताहेत. आणि महत्वाचं म्हणजे लोकं ते उचलून धरताहेत. म्हणजेच मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण आलंय याबद्दल दुमत नाही. मागे शिकागो येथे एक आंतरराज्य एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. विविध विषयांच्या एकांकिका तिथे सादर करण्यात आल्या. त्यात मी पण एक एकांकिका सादर केली होती. म्हणजे सांगायचं हेच की इकडच्या लोकांनाही आता नाटकांबाबत खूप जाण आली आहे. बीएमएमच्या माध्यमातून प्रेक्षकांना चांगलं बघायची सवय लागली आहे. आणि आमच्यासारखी अनेक लोकं इथं आहेत जी झटून काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मराठीला आणि मराठी रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत आणि येत राहतील याबाबत मी आशावादी आहे".

एकंदर काय तर भारतातून बाहेर गेलेल्या कलाकारांनी तिथल्या मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनेक दारं उघडी करून दिली आहेत. आणि या नाट्य संस्थांच्या प्रयत्नांना भरभरून प्रतिसादही मिळतो आहे. ज्याप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही भारताबाहेर चांगले दिवस आलेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सुभग ओक यांना त्यांच्या पुढील प्रयोगांसाठी झगमग टीमतर्फ़े हार्दिक शुभेच्छा...!