Sign In New user? Start here.

‘पुरस्कार हे क्षणीक आनंददायी‘-सुबोध भावे

* ‘पुरस्कार हे क्षणीक आनंददायी‘-सुबोध भावे *

 
 
 

संगीत नाटकांना अजरामर करणारे ’बालगंधर्व‘ यांची भूमिका साकारून 21 व्या शतकात बालगंधर्वांच्या आठवणींना उजाळा देणारा अभिनय साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारा असा सुबोध भावे...सुबोध भावे याने आजपर्यंतच्या कारकिर्दीत ४६ मराठी चित्रपटात काम केले असून, अनेक मराठी नाटकांमधून, तसेच छोट्यापडद्यावरूनही अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे...अशा या बहुगुणी कलाकाराशी झगमग डॉट नेट ने केलेली ही खास बातचीत -

* नुकताच तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मिफ्ता पुरस्कार मिळाला. त्यावेळी आम्हीही तिथे होतो. ज्यावेळी स्टेजवर तुझं नाव घेण्यात आलं तेव्हा सर्वांच्या नजरा स्टेजकडे लागुन होत्या की, तू आणि नितीन देसाई सोबत पुरस्कार घ्यायला याल. मात्र तू तिकडे पोहचू शकला नाहीस. तेव्हा कळले की तिथेही तुझे खूप जास्त फॅन्स आहेत. सर्वांनी तुला खूप मीस केलं. काय प्रतिक्रिया आहे तुझी?

- मी पण फार मीस केलं, पण मला फार आवडलं असतं स्वत: येऊन पुरस्कार स्विकारायला. पण गोव्यात काही प्रयोग होते. मी पहिल्यांदा माझ्या ‘कळा ज्या लागल्या जीवा’ या नाटकाचे गोव्यात प्रयोग करत होतो. त्यामुळे माझासाठी ते खूप महत्त्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे शौनक अभिषेकी दरवर्षी गोव्यामध्ये जितेंद्र अभिषेकींच्या नावाने शास्त्रीय संगीत महोत्सव भरवतो. गेले दोन तीन वर्ष मला त्या महोत्सवामध्ये जायला वेळ मिळाला नव्हता. ते माझ्या प्रयोगाला लागूनच होते. मला ते ही एकायचं होतं. मला हे नाटक आणि महोत्सव जास्त महत्वाचा होता. पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच आणि मला असं वाटतं की माझी सर्व टीम तिथे गेली होती. मला हे ही कळालं की तिथे नामांकनासाठी नाव घेत असताना तिकडची सगळी लोक ओरडत होती की, मला पुरस्कार मिळाला पाहिजे. या पेक्षा एखाद्या कलाकाराच्या दृष्टीने समाधानाची बाब कोणती असते, की पुरस्कारासाठी माझ्या नावाचा पुकार व्हावा. ह्यातच मला तो पुरस्कार मिळाला असं समजतो. त्यामुळे प्रत्यक्ष जरी मिळाला नाही तरी अप्रत्यक्ष रीत्या मिळाला.

* बालगंधर्वनंतर तुझ्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे, काय वाटतं तूला?

यावर तो म्हणाला की, अनेक लोकांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. त्यांना असं वाटत की मी, महात्मा जोतीबा फुले, स्वामी विवेकानदं यांची भुमिकाही साकारु शकतो. संत तुकारामांवर मी भुमिका करतोच आहे. मला असं वाटतं की, या निमित्याने का असेना एखाद्या असामान्य व्यकतीमत्वाला लोक माझ्यात बघतात आणि ती भुमिका माझ्याकडुन व्हावी असं त्यांना वाटतं. ती खरच घडेल की नाही ते मला माहित नाही. मला असं वाटतं की या निमित्त्याने मी एक वेगळी कलाटणी घेईल.

* नुकताच टोरांटो येथे झालेल्या झगमग मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व दाखविण्यात आला. तिथे प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसादही मिळाला. झगमगच्या या उपक्रमाबद्द्ल काय सांगशील?

- मला असं वाटायचं की इतकी मराठी लोकं इतक्या मोठ्या सख्येंने गुजरात, मध्य-प्रदेशमध्ये राहतात मग त्यांच्या पर्यंतं मराठी चित्रपट का नाही पोहचत? पण ‘मिफ्ता’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट परदेशात पोहचत आहे, ही खरंच चागंली गोष्ट आहे. बृहन महाराष्ट्रमंडळाचे अनेक कार्यक्रम होतात. सातत्याने वेगवेगळे चित्रपट तिथे दाखवले जातात. मला असं वाटतं की, हे मराठी कार्यक्रम, मराठी चित्रपट तिथल्या मराठी लोकांना जोडणारी नाळ आहे. आणि टोरांटो मध्ये होणारा मराठी चित्रपट महोत्सव मला वाटतं की त्यातलाच एक भाग आहे. ज्या निमित्ताने कॅनडा मध्ये असणा-या अनेक मराठी बांधवांना मराठी चित्रपट प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा जो आनंद आहे, तो वेगळाच आहे. निश्चीतपणे या लोकांमुळे पुन्हा पुन्हा असा प्रतिसाद मिळत राहील असं मला वाटतं. कायम वेगवेगळ्या व्यक्तीरेखातुन लोकांपर्यत पोहचावं हीच माझी अपेक्षा आहे.

* या पुरस्कारानंतर तुझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्याबद्दल काय सांगशील?

- अभिनयाशिवाय मला काहीच येत नाही. जे येतं ते सातत्याने चागलं करण्याचा मी प्रयत्न करत राहील. असा प्रयत्न प्रत्येक कलाकाराने करावा असं मला वाटतं. पुरस्कार हे तेवढया काळापुरता आनंद देऊन जातात. पुरस्कार हा त्या टप्प्यातला एक भाग आहे. पण अंतिम ध्येय हे प्रत्येक व्यक्तीरेखा चांगल्यातली चांगली लोकांसमोर आणत राहणं हेच असले पाहिजे. आणि माझीही हीच अपेक्षा आहे.

* सद्ध्या चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपाबद्द्ल, कथानकांबद्द्ल काय सांगशील?

- चांगले प्रयोग मराठीत होतात. माझे अनेक तरुण मित्र मराठीत चांगले दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आहेत. ते सातत्याने एक वेगळा विषय माडंण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की, मराठी चित्रपटसृष्टीचा विकास होण्यासाठी सातत्याने नवे नवे प्रयोग होणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमची चित्रपटसृष्टी जिवंत आहे.

* तू आधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढे चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा काही विचार आहे का?

- दिग्दर्शनात अर्थात मला रस आहे. कारण कॉलेज मध्ये असताना मी माझी सगळी नाटकं स्वत: दिग्दर्शित करायचो. ‘कट्यार काळजात घुसली’ हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक आहे. पुढे ही काही नाटकं आहेत ज्यात मला काम करायची ईच्छा आहे. संगीत ‘मानापमान’ हे मी आणि निपूण मिळून करु.

* बालगंधर्वनंतर कुठले नवीन प्रोजेक्ट आहेत?

- आता बरंच काही सुरु आहे. त्यात "अय्या" नावाचा हिंदी चित्रपट मी राणी मुखर्जी सोबत करतोय. अनुराग कश्यप निर्माते आहेत. सचिन कुडंलकर दिग्दर्शक आहेत. अजून काही प्रोजेक्ट्सची बोलणी सुरु आहे. त्यातला एक ठरेल.

- स्नेहा मुथा.