Sign In New user? Start here.

Interview of rashi butteन संपणा-या शोधाची सुरूवात म्हणजे ‘लोकमान्य’ - सुबोध भावे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आणि आपल्या जहालमतवादी भूमिकेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळा आयाम प्राप्त करून देणारे नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य - एक युगपुरूष’ हा चित्रपट येत्या २ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. यात लोकमान्यांच्या भूमिकेचा शिवधनुष्य पेलणारे अभिनेते सुबोध भावे सांगतायत त्यांच्या भूमिकेविषयी..

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

न संपणा-या शोधाची सुरूवात म्हणजे ‘लोकमान्य’ - सुबोध भावे

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आणि आपल्या जहालमतवादी भूमिकेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळा आयाम प्राप्त करून देणारे नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य - एक युगपुरूष’ हा चित्रपट येत्या २ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. यात लोकमान्यांच्या भूमिकेचा शिवधनुष्य पेलणारे अभिनेते सुबोध भावे सांगतायत त्यांच्या भूमिकेविषयी..

१.लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित पहिलाच चित्रपट येतोय आणि त्यात तू खुद्द लोकमान्यांची भूमिका करतोयस या विषयी काय सांगशील ?

लोकमान्य टिळकांसारख्या थोर व्यक्तिमत्वावर एकही चित्रपट बनू नये किंवा चित्रपटाच्या दृष्टीने तो विषय दुर्लक्षित राहिला याबद्दल माझ्या मनात नेहमी खंत होती. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक वाचलं आणि मला शाळेतील इतिहासाच्या पुस्तकापलिकडील टिळक जाणून घेता आले. ते पुस्तक वाचून मी टिळकांच्या कार्याने, देशभक्तीच्या विचारांनी पुरता झपाटून गेलो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू सर्वसामान्यांपर्यंत चित्रपटाच्या रूपाने पोहोचावेत अशी माझी इच्छा होती. आणि तसे प्रस्ताव घेऊन मी अनेक निर्माते-दिग्दर्शकांकडे गेलो. त्यावेळी अशा चित्रपटात आपण भूमिका करावी हा विचारही डोक्यात नव्हता. लोकमान्यांचं चरित्र रूपेरी पडद्यावर यावं ही प्रांजळ भूमिका त्यामागे होती. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच एके दिवशी अचानक ओम आणि नीनाताईंचा फोन आला आणि त्यांनी लोकमान्य चित्रपटाविषयी सांगितलं आणि यात लोकमान्यांची भूमिका मी करावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. खरं तर लोकमान्यांच्या आयुष्यावर चित्रपट येतोय हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती पण त्यांच्या भूमिकेविषयी मी कधीच विचार केला नव्हता. पण मग ओम राऊतशी भेट झाली त्याने चित्रपटाची कथा-पटकथा ऐकवली ती आवडली आणि मी या भूमिकेसाठी होकार दिला. पण त्यांनंतरही जवळपास सहा महिने मी मनाची तयारी करत होतो. मी स्वतः या भूमिकेसाठी तयार नव्हतो याचं कारण म्हणजे टिळकांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व मला पेलवेल की नाही याची भीती होती. हे खूप जबाबदारीचं काम होतं. शिवाय माझा स्वभाव किंवा दिसणं हे तसं मृदु आहे आणि मी आजवर ज्या भूमिका केल्या त्या साधारणपणे याच प्रकारात मोडणा-या होत्या. याउलट टिळकांचा स्वभाव, वागणं, बोलणं, दिसणं सगळंच माझ्या विरूद्ध होतं त्यामुळे मी थोडा साशंक होतो.

२. पण मग ही शंका कशी दूर झाली ?

ही शंका दूर होण्यामागचं श्रेय मी दिग्दर्शक ओम राऊत आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना देईन. कारण मी लोकमान्य साकारू शकेन हा विश्वास ओमच्या मनात होता आणि मी लोकमान्यांसारखा दिसू शकेन याबद्दलचा विश्वास विक्रम गायकवाड बाळगून होते. खरं तर मी विक्रमजींना जादूगार मानतो कारण त्यांच्या बोटात अशी काही जादू आहे की ते तुमचं रूप पूर्णपणे पालटवून टाकतात. त्यांनी अतिशय बारकाईने एकेक गोष्ट निरखून लोकमान्यांशी साधर्म्य साधता येईल असा मेकअप केला. टिळकांच्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख असलेली मिशी, त्यांच्यासारखी चेहरापट्टी यावर मेहनत घेत मला त्या साच्यात बसवलं आणि टिळकांचं ते रूप साकार झालं. विक्रमजीं जेव्हा माझा मेकअप करत होते तेव्हा मी डोळे मिटून घेतले होते. पूर्ण मेकअप झाल्यानंतरच मी आरशात बघण्याचं ठरवलं होतं आणि जर आपला लुक लोकमान्यांशी जुळला तरच आपण ही भूमिका करायची हेही मनाशी ठरवलं होतं. मेकअप पूर्ण झाला आणि मी जेव्हा स्वतःला आरशात बघितलं तेव्हा क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसला नाही आणि तिथे ख-या अर्थाने माझा ‘सा’ मला सापडला.

३. मेकअपने आत्मविश्वास दिला पण देहबोली आणि संवादफेकीसाठी काय मेहनत घ्यावी लागली ?

लोकमान्य साकारायचे म्हणजे मेहनत ही करावीच लागणार हे मनाशी पक्कं होतं. लोकमान्य जेवढे प्रभावी वक्ते होते तेवढंच प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कुस्तीच्या आखाड्यात आणि दररोजच्या व्यायामातून त्यांनी शरीरयष्टी कमावली होती. तशा प्रकारची शरीरयष्टी कमावण्यासाठी मला तशाच पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं होतं. यासाठी आमचे फिटनेस ट्रेनर शैलेश परूळेकर सर यांची मदत झाली. हा व्यायाम,त्यातील विविध पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. आहाराचं वेळापत्रक बनवलं त्याचा मला खूपच उपयोग झाला आणि मी भूमिकेला साजेशी शरीरयष्टी कमवू शकलो. संवादफेकीसाठी आम्हाला टिळकांच्या काही ध्वनिफिती उपलब्ध झाल्या होत्या. टिळक त्याकाळी सभा घेत तेव्हा आजच्या सारखे माईक्स, लाऊडस्पिकर्स सारखी व्यवस्था नव्हती. पण टिळकांचा आवाज, संवादफेक एवढी जबरदस्त होती की सभेतील शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा. तो आवेश, तो प्रखरपणा मी माझ्या संवादातून कसा येईल यावरही मेहनत घेतली. आज चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादातून, माझ्या वेशभूषेतून “मी टिळकांसारखाच दिसतोय” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विविध स्तरांतून मिळत आहेत त्यामुळे आम्हा सर्वांची मेहनत सार्थ झालीय असं वाटतंय.

४.या चित्रपटातून प्रेक्षकांना लोकमान्यांचे कोणते विशेष पैलू बघायला मिळतील ?

लोकमान्यांचं अफाट कार्य तीन तासांच्या चित्रपटात बसवणं तसं कठीण काम आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आणि शोध घेण्यासाठी एक चित्रपट पुरेसा ठरणार नाही त्यामुळे हा चित्रपट म्हणजे या न संपणा-या शोधाची एक सुरूवात आहे असं मला वाटतं. हा चित्रपट लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित असला तरी तो चरित्रपट नाहीये तर लोकमान्यांचा विचारपट आहे. लोकमान्यांची देशभक्ती हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. ब्रिटीशांच्या विरोधात त्यांनी पुकारलेला जहालमतवादी लढा, चाफेकर बंधूंना दिलेली सशस्त्र क्रांतीची प्रेरणा, त्यांची पत्रकारिता, समाजसुधारणेबद्दलचे विचार, शैक्षणिक धोरण त्यामागे असलेली देशभक्तीची भावना यात बघायला मिळणार आहे. टिळकांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोचवणं या उद्देशातून हा चित्रपट बनवला आहे त्यामुळे त्यांच्या या विचारांवर या चित्रपटात भर देण्यात आला आहे.

५. दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

ओमची आणि माझी खुप जुनी ओळख आहे आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. ओमचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला तरी तो नवखेपणा चित्रपटात कुठेच जाणवत नाही. खरं तर पहिल्याच चित्रपटासाठी ऐतिहासिक विषय निवडणं हे खूप धाडसाचं काम आहे. त्यासाठी प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीची गरज असते. मला वाटतं ओममध्ये हे सर्व गुण आहेत. लोकमान्यांची भूमिका जरी मी साकारत असलो तरी ती भूमिका कशी असेल? ती कशा प्रकारे सादर व्हावी? याचा सर्व आलेख ओमच्या तयार मनात होता. कोणताही कलाकार हा दिग्दर्शकाचा अभिनेता असतो. दिग्दर्शक म्हणेल त्याप्रकारची भूमिका त्याला साकारावी लागते. यासाठी दिग्दर्शकाच्या मनात भूमिकेते सर्व आराखडे पक्के असणं गरजेचं असतं आणि ते ओमच्या बाबतीत लागू होतं. केवळ माझीच नाही तर इतर सर्व व्यक्तिरेखा काय असतील ? कशा असतील ? त्या कथेत कशा प्रकारे येतील ? या सर्व बाबींचा ताळेबंद ओमच्या मनात पक्का होता त्यामुळेच सर्व कलाकार आपापल्या भूमिका व्यवस्थितपणे पार पाडू शकले.

-गायत्री तेली