Sign In New user? Start here.

गझल गंधर्व सुधाकर कदम

* गझल गंधर्व सुधाकर कदम *

 
 
 

आद्य आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत. १९८० ते १९८३ या चार दशकात सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.(आमच्या या मेहनतीचे फ़ळ सध्याचे गायक चाखत आहेत) १९८३ मध्ये"भरारी"नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल "Outstanding Young Person"(१९८३),"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६), "Man Of TheYear2001"(यु.एस.ए.), "कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३), "शान-ए-गज़ल"(२००५),"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६) "गझल गंगेच्या तटावर..."(२००८), "सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले. अनेक म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले. सध्या नवोदित गायकांना मराठी गझल गायकीचे शिक्षण देत आहे. ७०-८० च्या दशकात सुरेश भटांबरोबर गावोगावी फिरून मराठी गझलचा प्रसार करणारे संगीत दिग्दर्शक / गायक सुधाकर कदम यांनी झगमगला दिलेल्या एका खास मुलाखतीत सुरेश भटांच्या काही खास आठ्वणींना उजाळा दिला. त्यांच्याबरोबर घडलेल्या अनेक किस्स्यांनाही त्यांनी यावेळी व्यक्त केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सुधाकर कदम हे गेल्या काही वर्षांपासून गायन करू शकत नाहीत. ते सद्या फक्त संगीत दिग्दर्शनाचंच काम करीत आहे. त्यांची झगमग प्रतिनिधी अमित इंगोले यांनी घेतलेली एक खास मुलाखत....

गझल गायनाची आणि स्वरबद्ध करण्याच्या सुरवातीबाबत सुधाकर कदम सांगतात, "मी माझी पहिली गझल कंपोझिशन केली ती यवतमाळच्या शंकर बडे यांची होती. ‘आम्ही असे दिवाने, आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही’ असे ते बोल आहेत. त्याआधी यवतमाळच्या एका ऑर्केस्ट्रामध्ये १९६५ साली मी ऑर्गन वाजवायचो. पुढे नोकरी निमित्त आर्णीला(यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव) जावं लागलं. मग ऑर्केस्ट्रामध्ये वाजवणं बंद. आर्णीला आल्यावर काहीतरी वेगळं तर करायचं होतंच. मग गझलेला चाली बसवनं सुरू केलं. मग या गझलेला चाल बसविली. नंतर मी लाईट म्युझिकचे प्रोग्राम करायचो त्यात सरोद वाजवायचो. अशी स्वत:च्या कार्यक्रमांची सुरवात झाली होती".

७०-८० च्या दशकात मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्यासोबत कदम यांनी मराठी गझल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप पायपीट केली आहे. त्यांच्याबरोबरच्या अनुभवांबद्द्लही ते सांगतात, "अनुभव चांगला होता तसा, पण त्रास खूप होता. सुरेश भटांची आणि माझी भेट अशी की, विदर्भ साहित्य संघाची ते सुरवात करणार होते. त्या कार्यक्रमाला मला त्यांनी गाण्यासाठी बोलवले. तेव्हा मी गायिलेल्या "आम्ही असे दिवाने"ची चाल त्यांना खूप आवडली होती. (गेल्या १५ वर्षांपासून कदम यांनी गाणं बंद केलं असूनही यावेळी त्यांनी या गझलेल्या दोन ओळी गाऊन दाखविल्या.) त्यानंतर सुरेशजींनी मला घरी बोलवले. आणि माझ्याकडे दोन तीन गझल दिल्या. त्यावर मी चाली बसवून त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यातील "हा ठोकरून गेला"ची चाल त्यांना आवडली. मात्र ‘कुठलेच फुल आता’ या गझलेची मी उडती चाल बसवली. ते त्यांना आवडली नाही. त्यावर ते म्हणाले की, "सुधाकरराव तुम्ही एका घरंदाज बाईला तमाशात नाचवत आहात" ही त्यांची त्या गझलेच्या चालीवर प्रतिक्रिया होती. पण त्यांनी नंतर मला सर्व समजावून सांगितले. आणि ही चाल कशी असावी यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या फरिदा खानम, मेहंदी हसन यांच्या कॅसेट्स मला दिल्या. म्हणाले की, हे ऎक आणि परत एक दोन गझल दिल्या. तेव्हापासून आमचं ट्यूनिंग जुळायला लागलं. मग गावोगावी फिरून आम्ही कार्यक्रम करायला लागलो".

आजची तरूणपिढी जरी मराठी गझलच्या प्रेमात पडली असली, तरी गझल नेमकी काय असते? कशी असते? हे त्यांना नाही माहिती. त्याबद्दल ते सांगतात, "गझलेचं एक तंत्र आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मोठा आशय मांडणे. हे ज्याला जमलं त्याला गझल जमली. उर्दूमध्ये गझल गातांना बरीच सुट मिळते. मात्र मराठीत ती मिळत नाही. त्यामुळॆ काय होतं की, आशय कुठेतरी बाजूला राहतो आणि तंत्र समोर येतं. आजच्या तरुणपिढीकडे आशय चांगला आहे. मात्र ते तंत्रात कुठेतरी फसतात. आणि गझलेतला मूळ आशय समोर येत नाही".

सुरेश भटांची एक खास आठवण त्यांनी सांगितली, "ब-याचदा त्यांच्याबाबतीत अनेक लोक वाईट सांगतात की, ते घाणेरडे होते. तंबाखू खाऊन कुठेही फेकायचे. दारू प्यायचे. मात्र मी इतके वर्ष त्यांच्या सोबत होतो. पण दारू पून झिंगलेले सुरेश भट मी नाही पाहीले. आपल्याच मस्तीत जगणारे एक कलंदर व्यक्ती होते. बिनधास्त जगायचे. आणि तोच बिनधास्तपणा त्यांच्या गझलेतही ब-याचदा दिसून येतो. शिवाय एकढे मोठे कवी असूनही त्यांच्यात एक छोटंसं बाळ कुठेतरी दडलेलं होतं. त्यांच्यासोबत असतांनाचा औरंगाबादचा असाच एक क्षण आठवतो की, एका कार्यक्रमानिमित्त आम्ही तेथे गेलो आणि त्यांनी मला काही गझल दिल्या चाली बसवायला. त्यातील एक शेर मला समजला नाही. मी त्यांना बोललो की, हे काही जमलं नाही. पण त्यांचं म्हणनं होतं की, "हा शेर लोकांनी ऎकल्यावर त्याचा अर्थ कळायला हवा", असं म्हणून ते हसायला लागले. आणि मला म्हणतात कसे की, कवी तू आहे? की मी आहे? मी म्हणालो तुम्हीच...त्यावर ते म्हणतात की, तू तुझं काम कर मला माझं काम करू दे. मी माझे शब्द बदलणार नाही. हा किस्सा इथे संपला आणि आम्ही पुण्याला आलो. इथे एका मैफिलीत मी गात असतांना त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाले की, सुधाकर इथे मी जसा सांगतो तसाच सूर का घेत नाही? मी त्यावर त्यांना म्हणालो की, घ्या तुम्हीच गाऊन दाखवा. असं मी म्हणताच त्यांना औरंगाबादचा किस्सा आठवला आणि हसायला लागले असे ते सुरेश भट".यानंतर परत भटांचा एक किस्सा सुधाकर कदमांनी सांगितला. "त्यांच्या स्वभाव असा होता की, काही झालं की, इसको मारेंगे, उसलो मारेंगे असं.....मग एकदा आम्ही असंच नांदेडला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथून त्यांनी सोबत असावी म्हणून कुकरी आणि तलवार विकत घेतली. औरंगाबादपर्यंत हे शस्त्र आमच्या सोबत होते. तेथून आम्ही यवतमाळला जायला निघालो. आणि रस्त्यात आमची बस बंद पडल्याने दुस-या बसमध्ये आमच्या दोघांच्याही बॅग्स घेऊन बसलो. यवतमाळला पोहचलो आणि सुरेशजींना म्हटलं की, मी आता जातो. आणि माझी बॅग मी काढली. त्यांनी बॅग ठेवायच्या कॅरीअरकडे बघीतलं. आणि विचारलं की, सुधाकर अरे आपली कुकरी आणि तलवार कुठे आहे? तर ते शस्त्र आम्ही आधीच्या बसमध्ये विसरल्याचं माझ्या लक्षात आलं. यावर सुरेशजी एकदम व-हाडी स्टाईलने मला म्हणतात की, "कायचा मराठा बे लेका तू..? तूले एक तलवार बी नाई सांभायता आली..".यावर बसमधील सर्वच लोक हसायला लागले. मीही म्हटलं की, त्यांना काहीतरी बोलावं तर मी म्हणालो की, "बावाजी(सुरेश भट) म्या तं फक्त तलवार हारवली. पण तूमी तं अख्खी पेशवाई गमावली". नंतर आम्ही सर्वच हसायला लागलो. आणि त्यांनी मला बस मधून उतरायला सांगितलं. असे ते सुरेश भट होते"स्स्स.

झगमगच्या सर्वच रसिक वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

-अमित इंगोले.