Sign In New user? Start here.

नरेंद्र मोदींची मुलाखत घ्यायची आहे - सुधीर गाडगीळ

 
 
 

- अमीत इंगोले
( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )

आपल्या बोलण्यातून आणि अभ्यासपूर्ण प्रश्नांतून मुलाखतदाराचं जीवन उलगडणारे प्रसिद्ध निवेदक, पत्रकार सुधीर गाडगीळ आपल्या सर्वांनाच सुपरीचीत आहेत. त्यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या समोर आणल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रसिद्ध व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्याविषयी अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात दडलेले असतात. याच सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांच्या माध्यमातून या प्रसिद्ध लोकांचं व्यक्तीमत्व जगासमोर आणण्याचं काम सुधीर गाडगीळ यांनी केलं आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३००० मुलाखती घेतल्या आहेत. बीएमएमच्या शिकागोला होणा-या अधिवेशनात ते पुन्हा हिंदी/मराठी चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे याची मुलाखत घेणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत....

बीएमएम अधिवेशनातील एकंदर निवेदनाच्या अनुभवांबद्दल काय सांगाल? यावर ते बोलू लागले की, "मी बीएमएमच्या जवळपास सर्वच अधिवेशनाला हजर होतो. एखादंच सुटलं असेल. मी आत्तापर्यंत याच अधिवेशनांमध्ये माधुरी दिक्षीत, नाना पाटेकर, आशा भोसले, नरेंद्र जाधव, डॉ.श्रीराम लागू यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याचबरोबर अमेरीकेतल्या ५७ पेक्षा जास्त गावांमध्ये ‘मुलखावेगळी माणसं’ या माझ्या कार्यक्रमाचे प्रयोग केलेत. लोकांना कार्यक्रमाची माहिती झाली की अनेक लोकं आवर्जून येतात. हजारो रसिक हजेरी लावतात. मागे फिलाडेल्फियाला झालेल्या अधिवेशनाला तर तब्बल ६ हजार लोक उपस्थित होते. अतिशय चांगला अनुभव आहे या अधिवेशनांचा मला....

परदेशात अनेक कार्यक्रम तूम्ही केलेत, तुम्हाला तिथल्या प्रेक्षकांनाही जवळून पाहता आलं, जाणून घेता आलं, मग प्रेक्षकांबद्दल काय सांगाल? यावर ते म्हणाले की, "तिथल्या प्रेक्षकांना आपण थोडं जरी दिलं, तरी ते आपल्याला भरभरून देतात. आपल्याकडील माणसं आलेत म्हटल्यावर तर आपल्याला काय सर्व्हिसेस देऊ आणि काय नाही असं त्यांना होतं. त्यांच्यातच आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागते. इतकं प्रेम ते देतात" असं सुधीरजींनी सांगितलं.

मुलाखतीच्या वेळी समोरील व्यक्तीच्या मनातलं बाहेर काढनं कसं जमतं? हे वेळेवर करता की," नाही वेळीवर जी होते ती फसगत असते. जेव्हा तुम्हाला एखाद्याची मुलाखत घ्यायची असते. तेव्हा त्याची पूर्वतयारी तूम्हाला करावीच लागते. चोवीस तास सतर्क रहावं लागतं. त्या माणसाविषयीची सगळीच माहिती ठेवावी लागते. तेव्हा कुठं बायोडाटापलीकड्चे प्रश्न तुम्ही त्याला विचारू शकता. आणि त्यांच्याविषयीच्या विविध विषयांवर बोलू शकता", असं ते म्हणाले.

प्रत्येकाच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी खूप तयारी करावी लागत असेल? यावर ते म्हणाले की, " नक्कीच..! खूप कमी वयात मी पत्रकार बनल्याने त्या अनुभवाच्या जोरावर समोर कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याची भीती वाटत नाही. भेटणारा प्रत्येक माणूस आणि हाती पडणारं प्रत्येक पुस्तक वाचायला लागतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला असल्याने कुठला प्रश्न विचारण्यासही भीती वाटत नाही. एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनातील प्रश्न, मी माध्यम बनून विचारतो. लोकांच्या रुचीचे, आवडीचे प्रश्न विचारल्याने लोकांना ते आवडतं", असं त्यांनी तयारीबाबत बोलतांना सांगितलं.

या अधिवेशनात तुम्ही श्रेयसची चंदेरी गप्पा करणार आहात, त्याबाबत काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, " त्याचा ‘इकबाल’ ते ‘ओम शांती ओम’ पर्यंतचा प्रवास. तसंच एका कॉमन घरातील मराठी अभिनेत्याला हिंदी चित्रपटसृष्टीत उभं राहण्यासाठी काय करावं लागतं. त्याचे ते अनुभव याबाबत त्याच्याशी मी बोलणार आहे. श्रेयस हा एक चांगला मिमिक्री आर्टीस्ट सूद्धा आहे जे लोकांना माहिती नाही. तर मी त्याला काही नकलाही करायला लावणार आहे. तसंच तो एक उत्तम क्रिकेट खेळाडू आहे. त्याबाबतही त्याच्याशी गप्पा रंगतील,"असं ते म्हणाले.

तुमची संकल्पना असलेला ‘नमन नटवरा’ हा शास्त्रीय संगीताचा सुरेल कार्यक्रमाबद्द्ल बोलतांना ते म्हणतात," मुळात मराठी लोकांना राजकारणात आणि नाट्यसंगीतात जास्त इंन्ट्रेस्ट असतो. याचा विचार करून हा कार्यक्रम निर्मित केला आहे. ३० वर्षापूर्वी मी नाट्यसंगीताविषयी काही व्याख्याने ऎकली होती. त्यांच्या संदर्भ घेऊन नाट्यसंगीताची जी आपली परंपरा आहे, ती उलगडण्याचा प्रयत्न मी यातून करणार आहे. यासाठी नाट्यसंगीताच्या अनेक पुस्तकांचा, त्यासंबंधीत लोकांना भेटून केलेला अभ्यास, काही जुन्या कार्यक्रमातून नोंदवून ठेवलेल्या नोंदी, या माहितीला एक्स्पोजर मिळण्याची वेळ आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली आहे. संगीतनाटक मधेच कुठेतरी ठप्प झालं होतं त्याचाही उलगडा यातून होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे हे गाणार आहेत. माझ्या घरापासून आनंदचं गाणं सुरू झालं. आणि मग नंतर टिव्ही वाल्यांनी त्याला अनेक कार्यक्रम दिलेत. मंजुषाचंही तसंच, मी तीचे अनेक सोलो प्रोग्राम केले आहेत," असं त्यांनी सांगितलं.

तीन हजार मुलाखतींपैकी तुम्हाला खास लक्षात असलेली मुलाखत कुठली? आणि का? यावर ते म्हणाल की," अशा अनेक आहेत. पण व्यक्तीविशेष म्हणाल तर अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, सचीन तेंडुलकर, आशा भोसले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती माझ्या खास लक्षात आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. हे सगळेच इतके मोठे असूनही त्यांच्यात माणूसपण आहे. ते अजूनही जमीनीवरच आहेत. कधी कधी जर एखाद्या मुलाखतीतील प्रश्नावर वादंग झालं तर कुणीही म्हणेल की, मी ते बोललोच नाही. पण बाळासाहेब असे आहेत की, ते पाठ फिरवत नाहीत. कितीही काहीही झालं तरी ते मीच बोललो असं कबूल करणारे ते आहेत," असं त्यांनी बाळासाहेबांविषयी सांगितलं.

इतक्या मोठ मोठ्या लोकांच्या मुलाखती घेऊनही, कुणाची मुलाखत घ्यायची राहिलीय असं कुणी? हे त्यांना विचारता एका सेकंदात त्यांच्या तोंडून "नरेंद्र मोदीं"चं नाव आलं.