Sign In New user? Start here.

‘शाळा’ पेक्षा ‘आजोबा’ माझी जास्त Ambitious फिल्म - सुजय डहाके

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘शाळा’ पेक्षा ‘आजोबा’ माझी जास्त Ambitious फिल्म - सुजय डहाके

   ‘शाळा’ या पहिल्याच चित्रपटाने ज्याला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. कमी वयातही अनेक पुरस्कार मिळवून दिले. वेगवेगळ्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये सन्मान मिळवून दिले. असा ‘शाळा’ या सिनेमाचा तरूण आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सुजय डहाके! सुजय नेमका काय आहे, कसा आहे, एवढ्या कमी वयात त्याला मिळालेलं यश कसं वाटतंय, अशा काही खाजगी गप्पा! सोबतच त्याच्या आगामी ‘आजोबा’ या चित्रपटाविषयीच्या गप्पा त्याने झगमग डॉट नेटचे प्रतिनिधी अमित इंगोले यांच्याशी शेअर केल्या...

   अमित - तुझा सिनेमाचा प्रवास कसा सुरू झाला?

   सुजय - खरंतर मला माहितही नव्हतं की, मी कधी सिनेक्षेत्रात येईल. १२ वी नंतर चांगले टक्के होते म्हणून मी इंजिनिअरींगला गेलो आणि पहिलं वर्ष संपताना असं वाटलं की आपण हे काय करतोय? कारण त्यावेळी असं फॅड होतं की इंजिनिअर होऊन परदेशात पळायचं! बहुतेक जणांचं हेच स्वप्न असायचं! मी विचार केला की असंही स्वप्न असू शकतं का? मला हे सगळं जमण्यासारखं नव्हतं. म्हणून मी इंजिनिअरिंग सोडलं. तोपर्यंत मला पुढे काय करायचंय हेही माहित नव्हतं. मग विचार केला की, आपल्याला सिनेमा आवडतो आणि जर या क्षेत्रात जायचं आहे, तर काय काय शिकावं लागेल. त्यानंतर एफटीआयआय मधून अनेकांचे सल्ले घेतले. तेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लिट नसल्याने एफटीआयआयला सुद्धा जाऊ शकत नव्हतो. त्यादरम्यान पुण्यात मास कम्युनिकेशनचा कोर्स सुरू झाला होता. मग मी तो केला. पुढे सिनेमाचा आणखी जास्त अभ्यास करावा म्हणून मुंबईतून दोन वर्षाचा Film semiotics हा कोर्स केला. ज्यात फिल्म क्रिटीक या विषयावर सखोल शिक्षण दिलं जातं. यातून माझी सिनेमाची Theory पक्की झाली होती. त्यानंतर विचार केला की सिनेमाचा टेक्निकल पार्ट शिकायला हवा. म्हणून International Academy of Film and Television, Phillipines मधून एक वर्षाचा कोर्स केला.

Sujay Dahake Interview

   अमित - परदेशातील शिक्षणाचा कसा अनुभव होता?

   सुजय - तिकडचे शिक्षण अतिशय चांगले होते. २ महिन्याची एक टर्म असायची. त्यात वेगवेगळ्या देशांचे प्रोफेसर आम्हाला येऊन शिकवायचे. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील सिनेमांचा अभ्यास करता आला आणि त्यामुळे एक कॉन्फीडन्स सुद्धा यायला लागला. त्यावेळी माझ्या जवळ ‘शाळा’ ही कादंबरी होती. मग जे काही मी शिकायचो ते सर्व प्रयोग एक अभ्यास म्हणून मी या कादंबरीवर करायचो. तो कोर्स संपल्यावर दिड वर्ष मी तिथेच थांबलो. एका हॉलिवूड स्टुडिओत असोसिएट प्रोड्युसर म्हणून नौकरी करायला लागलो. तेव्हा वेगवेगळ्या कामानिमित्ताने बरेच देश मला फिरता आले. दोन हॉलिवूड फिल्मसाठीही काम करता आले. प्रोडक्शनचा बराच अभ्यास या दरम्यान झाला. अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि रिलॅक्समध्ये तिकडे काम चालतं. जसे हॉलिवूडमध्ये दिवसाला फक्त आठ शॉट्स पूर्ण केले जातात. म्हणजे त्याचा एक सीन सुद्धा पूर्ण होत नाही. त्यानुसारच मी सुद्धा ‘शाळा’ साठी जास्त स्ट्रेसफुल काम न करता दिवसाला फक्त ४ सीन असं काम केलंय.

   अमित - तिकडून शिक्षण घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा मराठीच चित्रपट करण्याचं का ठरवलंस?

   सुजय - त्याचं कारण असं होतं की, तिकडे शिकत असताना ‘शाळा’ या कादंबरीला मी एका स्कूल सारखं वापरलं आणि जेव्हा मी तिकडून परत आलो तेव्हा विचार केला की एवढा अभ्यास आपला या कादंबरीवर झालाय आणि अजूनपर्यंत यावर सिनेमा आलेला नाहीये. एक हिंदी सिनेमा यावर तयार झाला होता. पण तो रिलज झाला नव्हता. आणि एक नाटक आलं होतं. मग तो सिनेमा का रिलिज झाला नाही याचाही मला अभ्यास करायला मिळाला. एकतर त्यात आत्ताची शाळा दाखवण्यात आली होती. दुसरं असं लक्षात आलं की, या कथेसाठी प्रेक्षकांना कमर्शिअल सिनेमा आवडत नाहीये. या कादंबरीला ती कथा जितकी चिकटून करू तेवढी ती लोकांना आवडेल. त्यानंतर ‘शाळा’ चा प्रवास सुरू झाला.

Sujay Dahake Interview

   अमित - ‘शाळा’ चा अनुभव कसा होता?

   सुजय - मस्तं अनुभव होता. नुकताच मी परत आलो होतो. तेव्हा साधारण माझं वय २४ होतं. बोकीलांकडून राईट्स घेतले. त्यानंतर प्रोड्युसरचा शोध सुरू केला. त्यानंतर तब्बल ४१ वा प्रोड्युसर फायनल झाला आणि फिल्मचं काम सुरू झालं. यात मी जे फॉरेन डिओपी वापरले ते माझे फिलिपिन्समधील शिक्षक होते. त्यांना कॅमेरामन म्हणून घेण्याचं कारण म्हणजे आम्ही या कथेवर बरच डिस्कस करायचो. जेव्हा भारतात येऊन यावर फिल्म करायचं ठरवलं तर त्यांचच नाव माझ्या डोक्यात आलं. आणखी एक दुसरं कारण होतं की, जो नवीन कॅमेरामन येईल, तो सगळ्याच गोष्टी नवीन नजरेने बघेल आणि तेच या सिनेमासाठी खूप गरजेचं होतं. कारण ही फिल्म निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. तसंच म्युझिकबद्दल होतं की, युनिव्हर्सल म्युझिक हवंय, म्हणून वेस्टर्न क्लासिकल म्युझिक मी त्यात वापरलं. ‘अग्नी’ बॅन्डने या फिल्मसाठी दोन गाणी केलीत. पुण्यात मी आणि अभिनय एक ऑफीस शेअर करत होतो. मी व्हिडीओ आणि तो ऑडिओ! आमची ओळख झाली. फिल्मवर चर्चा झाली आणि तो म्हणाला की, मी तुला गाणी करून देतो. ही गाणी त्यांना भिमसेन जोशींच्या आवाजात रेकॉर्ड करायची होती. पण दुर्देवाने त्याच वर्षी ते गेले. म्हणून अभिनयने त्याच्या आणि रेखा भारद्वाज यांच्या आवाजात ती गाणी केली.

   खरंतर ज्यावेळी या फिल्मवर आम्ही काम सुरू केलं तेव्हा मी अजिबात विचार केला नव्हता की, एवढे यश मिळेल. कारण हा सिनेमा म्हणजे एक प्रयोग होता. ब-याच लोकांनी मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. पण त्या गोष्टी न मानता मी मला जे पटलं, त्यानुसार ही फिल्म तयार केली. थोडा शहाणपणाच करून माझंच डोकं लावलं आणि माझ्या त्याच शहाणपणाचा मला फायदा झाला.

Sujay Dahake Interview

   अमित - तू ‘शाळा’चं दिग्दर्शन एवढं चांगलं केलं आहे. तर तूझेही तुझ्या शाळेतले अनुभव असेच होते का? किंवा इतरांप्रमाणे तुझ्याही जीवनात कुणी शिरोडकर होती का?

   सुजय - (हसत) हो! अनुभव तर सारखेच होते. म्हणूनच कदाचित या कादंबरीवर मला चांगलं काम करता आलं. पण मी म्हणेल की, ते वय जास्त महत्वाचं होतं आणि ती कथा प्रत्येकाचीच आहे. कारण या वयातून सर्वच गेलेले आहेत. त्या कथेत पूर्णपणे मी स्वत:ला उतरवले. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही फिल्म ही त्या डिरेक्टरची बायोग्राफी असते. त्याच्या वागणूकीचा, तो राहत असलेल्या भागाचा, भाषेचा प्रभाव त्याच्या फिल्मवर असतोच असतो.

Sujay Dahake Interview

   अमित - ‘आजोबा’ या तुझ्या नवीन फिल्मबद्दल सांग.

   सुजय - ‘आजोबा’ ही फिल्म माझ्यासाठी ‘शाळा’ पेक्षा जास्त Ambitious फिल्म आहे. एक फिल्ममेकर म्हणून मला स्वातंत्र्य आहे की मी एखाद्या विषयावर सडेतोड भाष्य करू शकतो. हे ‘शाळा’त करता आलं नाही. कारण प्रेक्षकांना तो फक्त एक अनुभव द्यायचा होता. मला खूप आधीपासून Environment Conservation या विषयावरती बोलायचं होतं. ‘शाळा’ बनवताना भरपूर अशा घटना ऎकल्या की गावात बिबट्या आलाय, त्याला लोकांनी जिवाने मारले. पण ही त्यांना मारण्याची वृत्ती कुठून आली? जितका जगण्याचा हक्क आपल्याला आहे तितकाच त्यांनाही आहेच! त्यांनी आपल्या जागेवर अतिक्रमण केलेलं नसून आपण त्यांच्या जागेत घुसलोय. हे सर्व या सिनेमातून दाखवणार आहे. पण शेवटी काहीही सांगायला हिरो लागतो. ती लिंक मला ‘आजोबा’ मध्ये मिळाली. २००९ मध्ये जुन्नरला एक बिबट्या विहीरीत पडला आणि त्याला एका wildlife biologist ने कॉलर केलं. म्हणजे त्याच्या शरीरावर चिप लावून त्याला जंगलात सोडून दिलं. तो जिथे जाईल हे सर्व तिला कळत होतं. तो बिबट्या १२० किलो मीटरचा पल्ला गाठून २९ दिवसात बोरीवलीच्या संजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये गेला. या प्रवासा दरम्यान त्याने अनेक Man Made Barriers पार केले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने ७० मीटरची खाडी पार केली. जे बिबट्या कधीच करत नाही. कारण बिबट्याला पाणी बिलकुल आवडत नाही. एवढं सगळं त्याने का केलं, तो कसा गेला हे सर्व मुद्दे मी या कथेतून मांडतोय. प्रेक्षकांना साधारण मे २०१३ मध्ये ही फिल्म बघायला मिळेल.

Sujay Dahake Interview

   अमित - या मुव्हीला ‘आजोबा’ असं टायटल देण्याचं कारण?

   सुजय - हा बिबट्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर ती चिप बेकार झाली असावी. त्यामूळे २९ व्या दिवसापासून त्याचा नक्की पत्ता माहित नव्हता. पण तो नॅशनल पार्क मध्येच असेल असा अंदाज होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०११ च्या डिसेंबरमध्ये घोडबंदर रस्ता क्रॉस करताना एक बिबट्या मरण पावल्याची बातमी मिळाली. त्याला स्कॅन केल्यावर ती चिप सापडली आणि त्या चिपवर नाव होतं ‘आजोबा’...या चिपवर असं नाव का होतं तर, जेव्हा हा बिबट्या विहीरीत पडला होता, तेव्हा त्याच्यासोबत एक कुत्राही विहीरीत पडला होता. दोन दिवस ते विहीरीत होते. पण बिबट्याने कुत्र्याला खाल्लं नाही. खूप शांत होता तो...त्या दोन दिवसात तो पॅनिक झाला नाही, की चिडला नाही....हे सगळं एका बिबट्याच्या वागणूकीच्या अगदी विरूद्ध होतं आणि जेव्हा त्याला त्या बायोलॉजीस्टने बघितलं, त्याचं चेकअप केलं. त्यात सर्व नॉर्मल होतं. तरीही तो खूप शांत होता. तिलाही प्रश्न पडला की, हा इतका का शांत. म्हणून तिने त्याला ‘आजोबा’ नाव दिले होते. म्हातारपणात लोकं जशी शांत होतात, तसंच तिला त्या बिबट्याचं रूप दिसलं होतं.

Sujay Dahake Interview

   अमित - मराठी सिनेमाच्या बदलत्या रूपाबद्दल तुझं काय मत आहे?

   सुजय - खरंतर हा बदल का जाणवतोय? याचं कारण जर का आपण बघितलं तर, हे लक्षात येईल की इतके वर्ष मराठीमध्ये जे कोणी फिल्म मेकर होते त्यांचं ज्ञान कोणाला ना कोणाला असिस्ट करून मिळवलेलं ज्ञान होतं. त्यामुळे ज्यांच्याकडून ते शिकले, तोच सिनेमा त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला. हे चित्र होतं ८०-९० च्या दशकातलं...आत्ताचं चित्र असं आहे की, जे काही सिनेमे येताहेत, त्यातील बहुतेकांचं ‘सिनेमा’ या माध्यमाचं शिक्षण झालेलं आहे. उमेश, गिरीश असे कितीतरी नावं घेता येतील. हे सिनेमाचं ज्ञान आल्यामुळे आता सिनेमाचे विषय बदलले आहेत. जॉनर बदलला आहे. आणि टेक्निकलीही बदल होतांना दिसत आहेत.

Sujay Dahake Interview

   अमित - आजचे मराठी चित्रपट हे फिल्म फेस्टीव्हलसाठीच तयार केले जातात. अशी टिका होत असते. त्याबद्दल काय सांगशील?

   सुजय - ‘वळू’ सिनेमा आला त्या काळात असं होतं की, प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला थिएटरमध्ये जातंच नव्हता. म्हणजे ‘श्वास’ आला तरी त्याच्याने काही फरक नाही पडला. बॉक्स ऑफीसवर या सिनेमाने काहीच कमाई केली नाही. आता सिनेमाचा दर्जातर वाढतोय, पण प्रेक्षक येत नाहीयेत. मग प्रेक्षक कसा तयार करायचा, तर ‘वळू’ दरम्यान ही गोष्ट सुरू झाली की, प्रेक्षक मिळवूया. जर आपला नाहीतर बाहेरचा तरी...त्यामुळे मराठी फिल्म वेगवेगळ्या फेस्टीव्हल मध्ये दाखल होऊ लागल्या आणि बाहेरच्या लोकांनी खूप चांगली साथ दिली. मग आपली जशी वॄती आहे की, बाहेरून Appreciation मिळालं, की मग आपण त्याची किंमत करतो. तसंच अलिकडच्या मराठी सिनेमाबद्दल झालं. नंतर तो ट्रेंडच सुरू झाला. आधी फिल्म फेस्टीव्हल आणि नंतर थिएटर...प्रेक्षक नेहमी ओरडतात की, सिनेमा आल्याचं आम्हाला माहितच नाही...पण पेपर मधील जाहीरात तुम्ही बघता का? छोटी का होईन ती सिनेमाची जाहीरात असते. ती बघून तर सिनेमा बघायला जा...टिव्हीवर जाहीरात आली नाही किंवा त्याचे पोस्टर लागले नाही, म्हणून प्रेक्षक सिनेमाचा दर्जा ठरवायला लागले आहेत. हे मात्र चुकीचं आहे...

Sujay Dahake Interview

   अमित - पुन्हा जर तुला कोणत्या कादंबरीवर चित्रपट करायचा असेल, तर ती कुठली कांदबरी असणार?

   सुजय - हो! भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ या कादंबरीवर मला काम करायला आवडेल. पण ‘कोसला’ केलं तर ती सर्व सिरीजच मला करावी लागेल आणि त्यात साधारण आठ-दहा वर्ष तरी जातील. पण या कादंबरीवर काम करायचं, हा विचार पक्का आहे.

Sujay Dahake Interview

   अमित - हिंदी सिनेमा करण्याचा काही प्लॅन?

   सुजय - ब-याच ऑफर आल्या आहेत. पण आधी मला हिंदी भाषेचा अभ्यास करावा लागेल. कारण माझं हिंदी तसं फार चांगलं नाहीये. भाषेचा अभ्यास केल्यानंतरच मी विचार करेन. तसा माझा काही हिंदीत सिनेमा करावा, असा अट्टहास नाहीये. सिनेमा हीच माझी भाषा आहे.

   अमित - एवढ्या कमी वयात एवढं यश बघून कसं वाट्तंय?

   सुजय - मला तर वाटतं की, पहिल्याच सिनेमाला एवढं सगळं यश मिळायला नको होतं. कारण मला खूप प्रश्न पडले आहेत. काय आहे की, कोणतही Award's तुम्हाला ६० टक्के खाली नेतं आणि ४० टक्के वरती नेतं. यश मिळालं ठिक आहे. म्हणजे निर्मात्यांच्या दृष्टीने चांगलंच आहे. पण Awards मध्ये मला फारसा रस नाही. कारण काय आहे की, आता मी ‘आजोबा’ हा सिनेमा जरी केला, तरी माझं कम्पॅरीझन हे ‘शाळा’ सोबतच होणार आहे. विषयातही काही साम्य नाहीये. पण तरीही मला ते फेस करावं लागणार आहे.

   - अमित इंगोले