Sign In New user? Start here.

अनुभवी कलाकारांसोबत काम करणं खूपच ग्रेट फिलिंग - सुकन्या काळण

अनुभवी कलाकारांसोबत काम करणं खूपच ग्रेट फिलिंग - सुकन्या काळण

 
 
 

आज अनेक वाहिन्यांवरील नृत्य -गाण्यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक विविध मालिकांमध्ये भूमिका साकारताहेत..हिंदी-मराठी चॅनल्सवर अनेक नवे चेहरे आज पहायला मिळत आहेत. गायन, नृत्य या स्वत: मधल्या टॅलण्टला प्लॅटफॉर्म मिळवून देताना त्यांना अभिनय क्षेत्राची दारं खुली झाली आहेत. त्यातीलच एक ओळखीचा चेहरा म्हणजे सुकन्या काळण..

‘एका पेक्षा एक’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून स्पर्धक आणि नंतर कोरिओग्राफर म्हणून आलेल्या सुकन्या काळणला अभिनयात असाच मोठा ब्रेक मिळाला आहे. मी मराठीवर सोम ते शनि. सुरू झालेल्या ‘कन्यादान’मालिकेत. ‘कन्यादान’ मध्ये ती सखीच्या मध्यावर्ती भूमिकेत दिसत आहे. या निमित्ताने तिच्याशी केलेली ही खास बातचीत.

* डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून तू एकदम मालिकेत कशी आलीस आणि या भूमिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

- मला सुरवातीपासूनच नृत्याची आणि अभिनयाची आवड आहे. ‘कन्यादान’ या मालिकेसाठी प्रॉडक्शन हाऊसमधून प्रथम फोन आला, आणि त्यांनी या भूमिकेसाठी विचारणा केली. मी त्याची रितसर ऑडीशन दिल्यावर माझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. या मालिकेच्या निर्मात्या सौ.नीता प्रसाद लाड यांचाही मला खूप सपोर्ट मिळाला. माझ्यासाठी ही महत्वाची संधी ठरली.

* ‘कन्यादान’ मधील तुझ्या भूमिकेविषयी काही सांगशील?

- ‘कन्यादान’ मध्ये मी सखी नावाची व्यक्तीरेखा साकारतेय. हळव्या मनाची, संस्कारी, सहनशील आणि प्रेमळ सखी साकारताना खूप मजा येतेय. या भूमिकेला छटा असल्याने माझ्यातील अभिनय क्षमतेलाही नक्कीच वाव मिळेल.

* मालिकेतील मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे?

- खुपच छान! पहिल्याच मालिकेत विनय आपटे, क्षमा देशपांडे, सुलेख तळवळकर, क्षमा निनावे, विघ्नेश जोशी सारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करायला मिळतंय हे माझ्यासाठी खूपच ग्रेट फिलिंग आहे. या सगळ्यांकडून प्रत्येकवेळी नविन काहीतरी शिकायला मिळत आहे. याचा माझ्या अभिनयात फायदा होतोय. या मालिकेचे दिग्दर्शक विठ्ठल डाकवे यांनीही मला खूप सांभाळून घेतलंय. सगळेच खूप को-ऑपरेटीव्ह व टोमवर्क ने काम करणारे असल्याने दडपण येत नाही.

* शिकत असतांना तु या क्षेत्रात आलीस, तेंव्हा अभिनय आणि शिक्षण कसे बॅलन्स करतेस?

- नृत्य आणि अभिनय माझी आवड असली तरी शिक्षण मी कधीच अर्धवट सोडणार नाही. मी रूईला कॉलेजला बारावी पास होऊन एफ.वाय.ला अ‍ॅडमिशन घेतलं आहे. मला बाल मानसशास्त्राचा अभ्यासक्रम करायचा आहे. अभ्यास सांभाळून मी माझ्या आवडी जपण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहे, कारण जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवायचे आहे.

* या क्षेत्रात आल्यावर घरच्यांची भूमिका काय होता?

- माझ्या घरी माझ्या आई-बाबांनी मला व माझ्या भावाला आमच्याच आवडीची कोणतही क्षेत्र निवडण्याची मुभा दिली. त्यांमुळे मला फार अडचणी आल्या नाहीत. उलट मदतच झाली. त्यांच्या सपोर्ट शिवाय माझा प्रवास अशक्यच म्हणावा लागेल.

* प्रेक्षकांची एखादी लक्षात राहणारी दाद कोणती सांगशील?

- अशा ब-याच आठवणी आहेत. एका पेक्षा एक एक च्या वेळेस ट्रेन ने प्रवास करताना एका मुलीने चक्क १०० रू शगुन म्हणून दिले होते. एकाने तर कविता वैगेरे बनवून घरी पोस्टाने पाठविल्या होत्या. कौतुकाची थाप आणि आशिर्वाद तर नेहमीच प्रेक्षकांकडून मिळत आले आहे.

* भविष्यात चित्रपटात काम करण्याचा मानस आहे का?

- हो! का नाही. एखादी चांगली संधी किंवा मनाजोगी भूमिका करायला मिळाली तर मी नक्की काम करेन..