Sign In New user? Start here.

प्रत्येक माणूस स्वत:ला ‘अजिंक्य’ मध्ये बघेल - तेजस देऊस्कर

प्रत्येक माणूस स्वत:ला ‘अजिंक्य’ मध्ये बघेल - तेजस देऊस्कर

 
 
 

   खेळ आणि त्यामुळे होणारे नातेसंबंधातील वाद, त्यातून मिळणारे मार्ग अशा वेगवेगळ्या अंगावर भाष्य करणारा एक वेगळा ‘अजिंक्य’ हा चित्रपट येत्या ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाची कथा आणि पटकथा तेजस देऊस्कर याने लिहिली असून चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यानेच केले आहे. लंडनहून फिल्म मेकींगचे शिक्षण घेऊन आलेल्या तेजसचा एक दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच कमर्शिअल चित्रपट आहे. मुळचा नागपूरकर असलेल्या या तरूण दिग्दर्शकाने अनेक शॉर्टफिल्म्स तयार केल्या असून त्याने याआधी एका चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे. अशा या बहुरंगी कलाकाराशी ‘अजिंक्य’च्या निमित्ताने केलेली ही खास बातचीत.....

   * ‘अजिंक्य’ या सिनेमाची कथा - संकल्पना तूला कशी सुचली ?

   - बेसिकली मी स्वत: एक बाक्सेटबॉल प्लेअर होतो. लहानपणापासूनच कोणत्या ना कोणत्या खेळाशी मी कनेक्ट होतोच. कोणत्याही खेळाचं जग असतं ते अतिशय वेगळं असतं. त्यात तुम्हाला इनव्हॉल्व व्हावं लागतं. काही कालावधीने ती इनव्हॉल्वमेंट इतकी वाढते की, मग इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. बास्केटबॉल आणि इअतर खेळ खेळत असताना मला जे अनुभव आलेत ते एकत्रित करून या सिनेमाच्या कथानकात मी टाकले आहेत. या सिनेमाचा काही भाग काल्पनिक आहे आणि काही भाग हा माझ्या अनुभवांचा आहे. तसंही एखादा सिनेमा करताना आपल्याला तो फक्त रिअॅ लिटीवर करून चालत नाही.

   * या सिनेमाचं कथानक काय आहे ?

   - कथानकाबद्द्ल सांगायचं झाल्यास मला असं वाटतं की, प्रत्येक माणूस स्वत:ला तिथे ठेवू शकेल असं आहे. एकीकडे काम असतं आणि कामामध्ये इनव्हॉल्वमेंट, पॅशन असतं. प्रत्येकालाच कुठेतरी अॅंम्बीशन असतं की, ही उंची गाठायची आहे. आणि दुसरीकडे आपलं फॅमिली लाईफ असतं. या दोघांमधील बॅलन्स ठेवणं मग कठीण होतं. ह्या सर्व गोष्टी होत असताना नातेसंबंधाकडे थोडं दुर्लक्ष केले तरी चालेल असं आपण गृहीत धरून चालतो. बेसिकली या सिनेमाचं कथानक तुमचं फॅमिली लाईफ आणि तुमचं पॅशन यावर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर, एका बास्केट बॉल खेळाच्या कोचला मिळालेल्या सक्सेसमध्ये तो इतका गुरफटून गेला आहे की त्याला फॅमिलीकडे लक्ष द्यायला फुरसतच नाहीये. त्यात काय घडतं, कसं घडतं हे सर्व यात बघायला मिळेल.

tejas deoskar interview

   * प्रसिद्ध अभिनेता संदिप कुलकर्णी सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

   - खरंतर मी त्याच्याबरोबर एक दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच काम केलंय. तसं मी त्याच्याबरोबर याआधी काम केले आहे. त्यांची भूमिका असलेला एक ‘प्रतिसाद’ मी लिहिला होता. आमची ओळख तशी जुनी असल्यामुळे काम करताना कम्फर्ट लेव्हल मस्त होती. गेल्या एक - दिड वर्षांपासून मी या प्रोजेक्टवर काम करीत होतो आणि सुरवातीपासून संदिपचंही योगदान त्यात होतं. या कारणाने काम करणं मला सोपं झालं. एकतर तो खूप सिनिअर नट आहे आणि मी एक नवोदित दिग्दर्शक...तरीही हा गॅप मला कधी जाणवला नाही. उलट त्याचं खूप मार्गदर्शन मला मिळाले.

   * लंडनवरून फिल्म मेकींग शिकून आल्यानंतर पहिल्यांदा मराठीच सिनेमा करायचं कसं ठरलं ?

   - दोन गोष्टी आहेत. एकतर मी लंडनला शिकायला गेलो ते इकडे इंडस्ट्रीत पाच-सहा वर्ष काम केल्यानंतर...मी अनेक शॉर्ट फिल्म्स केल्यात आणि सोबतच लिखाण सुद्धा केले आहे. त्यानंतर मला असं वाटलं की, आपल्याला थोडं आणखी स्पेशलाईज्ड नॉलेज हवंय त्यासाठी मी लंडनला गेलो. पण मराठी सिनेमा करायचाय हे आधीपासूनच ठरले होते. मराठी ही आपली मातृभाषा असल्याने पहिलं काम त्यात करणं सोपं जातं. दुसरी गोष्ट अशी की मराठी सिनेमा हा आजही खूप पर्सनल रिलेशनशिपवर होतो. कुठेतरी ही गोष्ट निगेटीव्ह सुद्धा आहे आणि पॉझिटीव्ह सुद्धा..आज मी हिंदीमध्ये ३ कोटीची फिल्म करून यश अचिव्ह करणं मला सद्यातरी शक्य नाही. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की, मराठीत सिनेमा का नाही बनवायचा..? माझा काही अट्टहास नाहीये की हिंदीत सिनेमा बनवायचाय.

   * या सिनेमाच्या दिग्दर्शनाआधी तू काय केले आहे ?

tejas deoskar interview

   - मी माझी पहिली शॉर्टफिल्म ‘कलाकार’ ही २००५ साली केली होती. ही वेगवेगळ्या देशांमधील फेस्टीव्हल्सला गेली आणि अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. त्यानंतर मी कधी कुणाला असिस्ट केले नाही. मी माझ्या पद्धतीने काम करीत राहिलो. आता माझ्या ७ ते ८ शॉर्टफिल्म्स करून झाल्यात. त्यानंतर २०१० मध्ये मी एक ‘प्रतिसाद’ नावाची फिल्म लिहिली. इथूनच मी सिनेमा क्षेत्रात डायरेक्ट कनेक्ट झालो. त्यानंतर आता ‘अजिंक्य’ आणि त्यानंतरची माझी फिल्म सुद्धा तयार झाली आहे.

   * ‘अजिंक्य’ची कथा आणि पटकथा तूच लिहिली आहेस, त्या अनुभवाबद्द्ल सांग.

   - याची कथा माझी आहे आणि पटकथा माझ्यासोबत गौतम पोद्दार याने लिहिली आहे. मला असं नेहमी वाटतं की, दिग्दर्शक आणि लेखक हा वेगळा असायला नकोच....कारण दोघांनाही एक गोष्ट सांगायची असते आणि दोघांसाठीही माध्यम एकच असतं. त्यामुळे तुम्हाला जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर तुमच्यात एक उत्तम लेखक असणं आवश्यक आहे. त्यामुळे दिग्दर्शन आणि लेखनाचा अनुभव खूप चांगला होता. एकतर कथा माझीच होती. त्यातील अनुभव मी लिहून काढले. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या नवीन दिग्दर्शकाला एखादा प्रतिथयश लेखन पटकथा लिहून देईल हे इतकं सोपं नाहीये. त्यामुळे मी स्वत:च कामाला सुरवात केली.

   * याआधी करिअर आणि नातेसंबंधातील वाद असे विषय हाताळले गेले असताना यातून काय नवीन बघायला मिळणार आहे ?

   - सगळ्यात महत्वाचं आहे की स्वत:वरचा जो विश्वास आहे तो आपल्या आयुष्यात सगळीकडे नाही. आणि खेळ हा असा एक भाग आहे तुमच्या आयुष्यातला की ज्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्याला बरं करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो. या सिनेमामध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकतं की, खेळ म्हणजे नेमकं काय तर आपल्या गुणांना चांगलं बनवणं आणि त्याचा उपयोग आपल्या चांगल्या जीवनासाठी करून घेणं. खेळ हे एक टीमवर्क असतं. तसंच आपलं आयुष्याचं आहे. तुमच्या फॅमिलिच्या सहकार्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. हेच या सिनेमातून मी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

tejas deoskar interview

   * एक अख्खी फिल्म पहिल्यांदाच दिग्दर्शित करण्याचा अनुभव कसा होता ?

   - खूपच छान होता. कधी कुठे असं जाणवलं नाही की, खूप मोठं काम आहे. त्याचं माझ्या टीमने मला खूप सपोर्ट केला. सहकार्य केलं. दुसरी गोष्ट अशी की, सिनेमा बनवणं खूप लॉजिकल असतं. खरा सिनेमा हा तुमच्या स्क्रिप्टवर बनतो. जर स्क्रिप्ट तुमची पक्की असेल तर तुमच्या सर्वच गोष्टी चांगल्या होतात. तसंच माझं असल्याने मला काम करताना फार अडचणी आल्या नाहीत.

   * ‘अजिंक्य’चं मार्केटींग आणि ऑनलाईन प्रमोशन कसं करतोय ? त्याबद्दल तुझं काय मत आहे ?

   - ‘अजिंक्य’चे ऑनलाईन प्रमोशन हे न्युजमॅक्स मल्टिमिडिया प्रा.लि. तर्फ़े अतिशय उत्तम प्रकारे केले जात आहे. ऑनलाईन प्रमोशन हा अलिकडे खूप महत्वाचा भाग झालाय असं मला वाटतं. ऑनलाईन प्रमोशनशिवाय काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन मार्केटींग खूप महत्वाची आहे. युथफुल सबजेक्ट असेल तर याचा आपल्याला खूप फायदा होतो. सध्याची स्थिती पाहता ऑनलाईन मार्केटींग ही दिवसेंदिवस वाढणारच आहे. त्याची गरज पडणारच आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही हे अगदी खरं आहे.

   - अमित इंगोले