Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘टुरिंग टॉकिज’ची संस्कृती लोकांपुढे आणावी, हा उद्देश मनात कुठेतरी दडला होता-तृप्ती भोईर

Trupti bhoir interview for touring talkies
Trupti Bhoir
Add Comment

   ‘टुरिंग टॉकिज’ची कल्पना कशी सुचली?

   चित्रपटाची कल्पना मला सुचली नाही, तर ती प्रत्यक्षात अनुभवली आहे. त्याचं झालं असं, ‘तुङया माङया संसाराला अजून काय हवं?’ हा निर्माती म्हणून माझा पहिला चित्रपट. त्यात मी कामही केलं होतं. अक्षरश: कर्ज काढून चित्रपट बनवला. दुर्दैवाने तो चित्रपट मुंबई-पुण्यात चालला नाही. मला कर्जही फेडायचं होतं. मग कुणीतरी सांगितलं की, ‘टुरिंग थिएटरमध्ये तुमचा सिनेमा चालेल. त्यातून पैसे मिळतील. कर्ज फेडण्याची चिंता नसेल.’ तोर्पयत ‘टुरिंग टॉकिज’विषयी फारसं माहीत नव्हतं. साताऱ्यात पहिल्यांदा टुरिंग टॉकिज पाहिलं. म्हसवडची जत्रा होती ती. तिथेही माझा चित्रपट चालला नाही. जवळ जवळ दहा ते पंधराजण प्रत्येक खेळाला तिथे असायचे. ‘तंबूतील थिएटर’मध्येही चित्रपट चालत नाही, ते पाहून मला दु:ख झालं. त्यानंतर मी एक सर्व्हे केला. त्या सर्व्हेत चित्रपट का चालत नाही, याची कारणं शोधली. सर्वात प्रमुख कारण होतं तर चित्रपटाची जाहिरात करणारे बॅनर्स. माङया चित्रपटांचे बॅनर खूपच सौम्य होते. म्हणजे त्यात मारधाडीची चित्रं नव्हती. रडणारी नायिका नव्हती. आग नव्हती. बॅनरवर एकही रक्तरंजित प्रसंग नव्हता. मी सातारा गावात गेले. तिथून तंबूत लागणाऱ्या चित्रपटांच सीडी कव्हर शोधून काढले. तिथे एक मस्त सिडी कव्हर मिळाले . त्या कव्हरच्या चित्रात श्रीदेवी घाबरून उभी होती. शत्रुघ्न सिन्हा तिच्या मागे पळत होते. मिथुनदांच्या हातात धारदार रक्ताळलेला चाकू होता. मी काय केलं, जे माङया चित्रपटात नाही, ते आहे म्हणून दाखवण्यासाठी एका बाहेरच्या डिझायनरकडून पोस्टर डिझाइन करून घेतलं. श्रीदेवीचा चेहरा कापून तिथे माझा ‘तुङया माङया..’ चित्रपटातला भेदरलेला चेहरा लावला. शत्रूघ्न सिन्हांचा चेहरा कापून त्या जागी विलास उजवणेंचा चेहरा चिकटवण्यात आला. मिथूनदांचा चेहरा कापून तिथे आनंद अभ्यंकरांचा चेहरा चिकटवला. आमच्या सभोवताली आग दाखवली. मागे धूर आणि पाणी दाखवलं. त्यात दृश्यात अशोक शिंदे आणि उपेंद्र लिमये चेहरे कापून लावले. या पोस्टरच्या मध्यभागी एक जागा रिकामी ठेवली गेली. त्या जागेत ज्या देवाची यात्रा त्यांचा फोटो लावण्यात आला. म्हणजे या चित्रपटात ज्यांना सासू-सुनांची भांडणं बघता येतील. मारधाड पाहता येईल. देव बघण्यासाठी आलेल्यांना देवाचं दर्शन होईल, अशा प्रकारे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' चा बॅनर तयार करण्यात आला. असा चित्रपटाचा भडक बॅनर ज्या तंबूथिएटरमध्ये चित्रपटाचा खेळ होणार होता, त्याच्या बाहेर लावला. बॅनर बदलला त्या दिवशी ‘तुङया माङया..’ पाहायला दीडशे जणं आली होती. मग मला कळलं की, चित्रपटाची जाहिरात आपल्याला करणं भाग आहे. त्याशिवाय काहीच गत्यंतर नाही. मग ‘लकी ड्रॉ’ काढण्याची कल्पना लढवली. गावागावात जाऊन तशाप्रकारची पत्रकं वाटली. विजेत्यांना सोन्याची दागिने मिळणार असं जाहिरातीत स्पष्ट लिहिलं होतं. नंतर सोनाराकडे गेले. सगळ्यात स्वस्तात स्वस्त काय मिळेल,असं विचारलं. तर त्याने ‘नथ’ हा दागिन्यांचा एकच पर्याय माङयासमोर ठेवला. नथीची किंमत होती साडेआठशे रुपये. सोन्याची नथ बनवून घेतली. ती नथ लकी ड्रॉ म्हणून काढल्यावर एका शोला आठशे लोकं माङया तंबूत आले . मग प्रत्येक शोला तंबू आठशे आठशेंनी भरायला लागला. मग चोर बाजारात जाऊन फ्रीज, टीव्ही, टेपरेकार्डर या इलेक्चट्रॉनिक वस्तू स्वस्त दरात विकत घेतल्या. त्या वस्तूंचं टुरिंग टॉकिजच्या बाहेर डिस्प्ले तयार केला. त्या वस्तूंमुळे प्रत्येक शोच्या बाहेर हजार-दीडहजार माणसं यायला लागली. अशाप्रकारे साडेतीन महिने मी ‘टुरिंग टॉकिज’ चालवणाऱ्या लोकांबरोबर राहिले. ते जसे प्रवास करतील, तसा मी त्यांच्याबरोबर प्रवास केला. माङयाकडे कामासाठी मी नऊ मुलं ठेवली. त्यांना स्वत:च स्वयंपाक करून वाढे. हिरॉईन गावात स्वत:च घर घेऊन राहतेय, असं कळल्यावर गावातल्या प्रेक्षकांमध्ये कुतूहल वाढू लागलं. मला बघण्यासाठी गावकऱ्यांचा माङया घरासभोवताली गराडा पडायचा. एक दिवस ही गर्दी इतकी वाढली की, मला नैसर्गिक विधींसाठी बाहेर पडणंही अशक्य झालं. शेवटी शेतावरच चिंपाट घेऊन जावं लागे. त्यावेळी वाईट शेरेबाजी व्हायची, माङयासाठी अशाप्रकारची शेरेबाजी ही खूपच लाजीरवणी गोष्ट आहे. काही वेळेला लाज बाजूला ठेवावी लागते हा पूर्ण अनुभव म्हणजे चित्रपट ‘टुरिंग टॉकिज’. शहरी संस्कृतीत वाढलेले हा अनुभव वाचताना पोटधरून हसतील. कारण त्यांना टुरिंग टॉकिजचा अनुभवच नाही. त्यामुळे ते टुरिंग टॉकिजकडे तुच्छतेने बघतात. तिसऱ्या दर्जाचे चित्रपट टुरिंग टॉकिजमध्ये लागले जातात, अशी शेरेबाजी केली जाते.पण एक गोष्ट स्पष्ट करते कि प्रत्यक्षात शहरी भागात जिथे निर्मात्याला पैसे सुटत नाही तिथे ‘माहेरची साडी’, ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’ या चित्रपटांना एक-एक कोटी रुपये टुरिंग टॉकिजने कमवून दिले आहेत. मराठी चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्रेक्षक आहे, तो टुरिंग टॉकिजमध्ये आहे. या भागात मराठी कलाकारांची मोठी क्रेझ आहे. या निमित्ताने खेड्याखेड्यांमध्ये आपला चित्रपट पोहोचतो. हे सगळे अनुभव मला शहरी प्रेक्षकांर्पयत पोहोचवायचे होते, या चित्रपटाच्या टुरिंग टॉकिजमधल्या यशासाठी जाहिरातीमध्ये कुठल्या कुठल्या क्लूप्त्या लढवल्या ते सर्व प्रेक्षकांर्पयत पोहोचवायचं होतं, होत्याचं नव्हतं करून चित्रपट चालवला तो हिट केला ही गोष्ट प्रेक्षकांना माहीत पडावी हे माङया दृष्टीने महत्वाचे होतं. तसंच ‘टुरिंग टॉकिज’ची संस्कृती लोकांना माहीत पडावी, हा उद्देश मनात कुठेतरी दडला होता. ज्यांना माहीत आहे त्यांनी या संस्कृतीला आपलं म्हटलं नाही ही खंत मनात होती. टुरिंग टॉकिजने मला नाव दिलं, पैसाही दिला याचं ॠण माङयावर होतं. त्यामूळे मी तीन-साडेतीन वर्षापूर्वीच ठरवलं होतं की, टुरिंग टॉकिजवर चित्रपट काढायचा.

   दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे या चित्रपटाला कसे येवून मिळाले ? एकंदर मुळात चित्रपटाला सुरुवात कशी झाली?

   एक दिवस गजेंद्र अहिरेंनी मला भेटायला बोलावलं. त्यावेळी बोलण्याच्या ओघात टुरिंग टॉकिजमधून चित्रपट प्रदर्शित करताना मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले. तर तेही टुरिंग टॉकिजचा विलक्षण अनुभव ऐकताना एकदम अवाक झाले. माझ्या बोलण्यात कुठेतरी ‘बिट्वीन द लाइन्स’ चित्रपट करण्याचे भाव, गजेंद्रंनी बरोबर ओळखले. ‘टुरिंग टॉकिज’साठी भेटण्यापूर्वी ग्रजेंद्रनी माझ्यासोबत ‘हॅलो जयहिंद’हा चित्रपट केला होता. त्यामुळे ग्रजेंद्रंना माझ्या कामाची पद्धत माहीत होती. ‘टुरिंग टॉकिज’च्या निमित्ताने आम्ही दोघांनी एकत्र काम केलं.

   चित्रपटात तू मध्यवर्ती पण डिग्लॅमराईड भूमिका स्वीकारण्यामागची भूमिका काय होती? भूमिकेसाठी काय काय तयारी केलीस? हा मेकओव्हर कसा घडला? त्याविषयी विस्ताराने सांगशील..

   चित्रपटात ‘चांदी’ ही भूमिका मुद्दामहून वठवलेली नाही. ‘टुरिंग टॉकिज’मध्ये पुरुषांची मक्तेदारी सर्वात जास्त आहे. स्त्री कधीच टुरिंग टॉकिज चालवू शकत नाही किंवा चालवायला जात नाही. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे घराच्या बाहेर आठ महिने रहावं लागतं. ऊन-वाऱ्या ची पर्वा न करता गावोगावी फिरावं लागतं. त्यात तंबूवर अनेकदा हल्ले होतात. दारू पिऊन धिंगाणा करणारे सतत आजूबाजूला असतात. त्यामुळे एकट्या बाईची तिथे डाळ शिजू शकत नाही. त्यामुळे ‘चांदी’ला तिथे टिकाव धरायचंय म्हणून तिने पुरुषी पोषाखाचा स्वीकार केलाय. ‘चांदी’ या भूमिकेसाठी मी जिरो कट केला. अर्ध्या इंचाचे केस कापले. केस कापताना माझ्या खूपच जीवावर आलं. कारण मला केस अत्यंत प्रिय होते. इथे सांगण्यासारखी गोष्ट ही की, आर्टिस्टचं शरीर त्याची बोट, नख, चेहरा आणि केस हे त्यांचं स्वत:साठी नसून कॅमेऱ्याला टिपण्यासाठी असतं. कुठलीही भूमिका साकारताना जेव्हा असे मेकओव्हरचे आव्हानात्मक प्रसंग येतात तेव्हा स्वत:साठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, यापेक्षा भूमिकेसाठी काय महत्वाचे आहे, त्याचा विचार केला पाहिजे. साडेतीन महिने मी आयब्रो, ब्लीच, फेशियल, पेडीक्यूअर, मेनिक्यूअर या पैकी कुठल्याच गोष्टी केल्या नाहीत. दररोज मी तासभर उन्हात उभी राहायचे. कारण ‘चांदी’ या भूमिकेला राकटपणाची गरज होती.

   चित्रपट तुम्हाला कलावंत म्हणून किती समृद्ध करून गेला? तुमच्या भूमिकेचं वेगळेपण काय आहे?

   ‘टुरिंग टॉकीज’मध्ये मी जी चांदी ही भूमिका साकारली आहे, ती प्रत्येक स्त्रीच्या आत एका प्रबळ स्त्रीचं रूप दडलेलं असतं. पण तिला या पुरुषप्रधान देशात स्वत:चा प्रबळपणा, चातुर्य वापरता येत नाही,तसंच आयुष्यात मी सगळ्या गोष्टी करू शकते. मला पुरुषाची गरज नाही’ ही ताकद जी फारच कमी स्त्रियांना असते ती या भूमिकेतून व्यक्त करता आली. ‘चांदी’ही कोणालाच घाबरत नाही. ती पुरुष म्हणूनच वावरत असते. फक्त ती शरीराने स्त्री आहे. ती बेडर आहे. ती वेळप्रसंगी कुठलंही काम करते; पण ते करण्यासाठी ती पातळी सोडत नाही. ‘चांदी’ला हात उगारण्याची गरज भासत नाही. तिने एका नजरेने जरी पाहिलं तरी समोरचा गर्भगळीत झालाच पाहिजे, इतकी भेदकता तिच्या नजरेत आहे. अशा प्रकारे ती कडक आणि कणखर असते. या चांदीचा वीकपॉइंट असतो चित्रपट. ती त्यासाठी तिची कितीही कष्ट उपसण्याची तयारी असते.

   चित्रपटाचे सहकलावंत सुबोध, किशोर, मिलिंद शिंदे, नेहा पेंडसे, सुहास पळशीकर आणि बाल कलाकार चिन्मय संत यांच्या सोबतचे अनुभव सांग.

   खूप चांगले अनुभव आहेत. किशोर, सुबोध, मिलिंद आणि सुहासजी हे मला अभिनयाच्या क्षेत्रात ‘वडील’ आहेत. मला असं कधीच वाटलं नव्हतं की, चित्रपटाची कल्पना ऐकल्यावर यांची प्रतिक्रिया इतकी सकारात्मक असेल. पण यांनी मला चांगलं सहकार्य केलं. सांभाळून घेतलं. मला अजूनही सुबोध भावेबरोबरचा माझा पहिला सीन आठवतोय. माझी अक्षरश: घाबरगुंडी उडाली होती. मला काही सुचतच नव्हतं. संवाद बोलता येत नव्हते. नंतर सुबोध बरोबर फार खेळीमेळीने काम झाले आणि सगळ्या गोष्टी नीट जमून आल्या. बालकलाकार चिन्मय हा वयाच्या मानाने खूपच समंजस आहे. भविष्यात श्रेष्ठ कलावंत होण्याचे गुण त्याच्यात आहेत. नेहा दक्षिणेत काम करते. इथेही काम करते. सुंदर मुलींना, मोठ्या अभिनेत्रींना अँटिट्यूड असतो, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र नेहा याला अपवाद आहे. ती समजूतदार आहे. मिलिंदही गुणी कलाकार आहे. मला आठवतंय ना, 47 डिग्री तापमान होतं, भरपूर गरम होत होतं. काही जणांच्या नाकातून रक्तही आलं. उल्ट्या झाल्या. तापही येत होता. पण प्रत्येक जण सहकार्य करत होता. आता मला कामच करायचं नाही, हा अँटिट्यूड कोणीही जपला नाही.

   एकाच वेळेस निर्माती आणि अभिनेत्री अशा दोन्ही भूमिका पेलल्यात?

   जशा आजर्पयत पेलत आले आहे अगदी तशीच. माझा शॉट करताना अॅक्शन म्हटल्यावर मी अभिनेत्री असते. शॉट संपल्यावर निर्माती म्हणून माझं सेटवर सगळीकडे लक्षं असतं. कोणाला काही कमी तर पडत नाही ना, काही चुकीच्या गोष्टी घडत नाही ना, खाण्यात आज काय असेल, कला दिग्दर्शकाने काय तयारी केली आहे, दुसऱ्यादिवशीच्या कामाचं वेळापत्रक तयार झालं आहे का, ही नजर फिरती आहे. आता या गोष्टी माङया सवयीच्या झाल्या आहेत.

   टुरिंग टॉकिजचं निर्मितीमूल्य उच्च आहे. संगीत,पाश्र्वसंगीत, छायाचित्रण,संकलन याबद्दल विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल.

   संगीत आहे ते इलयाराजांनी मेहनतीने केलं आहे. गावाकडचं संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाफ आजर्पयत कुठल्याही मराठी चित्रपटात झालेला नाही. तो मिलाफ ‘टुरिंग टॉकिज’मध्ये पाहायला मिळेल. बल्लू सलुजा यांनी निराळ्या पद्धतीने चित्रपटाचं संकलन केलेलं आहे.आत्तार्पयत कुठल्याही चित्रपटात न वापरलेलं वेगळ्या धाटणीचं संकलन इथे पाहायला मिळेल. अमोल गोळेने चित्रपटाचं चित्रीकरण ‘फाईव्ह डी’ कॅमे ऱ्या वर केलेलं आहे. अमोलची कॅमेरा हाताळणी यातच जादू आहे. अफलातून चित्रीकरण आणि चित्रपटाच्या निर्मितीमुल्यात भर ही किमया उत्तम प्रकारे अमोलने केली आहे.

   चित्रीकरण करताना आठवणीतला एखादा प्रसंग सांगाल?

   ट्रक चालवण्याचा प्रसंग जो माङयासाठी खूपच मेजर होता. ट्रक चालवणं हे माझं काम नाही. आजर्पयत साधी गाडी चालवली नाही. त्यामुळे ट्रक चालवणं माङयासाठी महत्वाचे होतं. मी फायनली चालवला. तेव्हा पोटात गोळा आला होता. रिव्हर्स गियर नाहीत, असे ट्रक चालवणं,ब्रेक नाहीत असे 1940, 45 सालातील ते ट्रक होते. चित्रीकरण करताना तिसऱ्यादिवशी माझा गुडघा मोडला. मोडक्या गुडघ्याने काम करत होते. तो दिवस मी नाही विसरणार. चित्रीकरणातील एका दिवशी ‘टुरिंग टॉकिज’च्या सगळ्या गाड्यांना मी बोलावलं होतं. कारण त्यादिवशी आम्हाला ग्लायडरने शॉट घ्यायचा होता. त्यादिवशी फक्त दोनच गाड्या आला. त्यादिवशी माझी तारांबळ उडाली. काय करावं ते सुचत नव्हतं. ग्लायडर शॉटमध्ये कमीत कमी सात ते आठ गाड्या लागतात. अमोलला ग्लायडरकडे जायला सांगितलं. आर्ट डिरेक्टरला घेऊन मुख्य रस्त्यावर आलो. जो मिळेल तो ट्रक थांबावयला सुरुवात केली. पिक्चरमध्ये काम करण्याचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. पैसेही देऊ केले. या प्रयत्नातून आम्ही आठ ट्रकड्रायव्हरना मनवलं. ते ट्रक घेऊन चित्रीकरणस्थळी आले. त्या ट्रकना रंगवलं. बॅनर लावले. भोंगे लावले. झेंडे लावले. टुरिंग टॉकिजचे ट्रक बनवायचा प्रयत्न केला आणि आम्ही तो शॉट साकारला.

   चित्रपटातला सर्वात प्रभावी प्रसंग सांगा?

   चित्रपटाचा नायक चांदीला सांगतो, ‘मला माहीत आहे, तुला तुझं टुरिंग टॉकिज परत मिळवायचं आहे. कारण ते तुङया जगण्याचं साधन आहे. त्यावर तुझं पोट आहे.’, त्यावर चांदी म्हणते, ‘ब्रेड बटरचं काय घेऊन बसलात ‘टुरिंग टॉकिज’ हा माझा प्रियकर आहे. जेव्हा माझा जन्म या टुरिंग टॉकिजच्या प्रोजेक्टरच्या बाजूला झाला त्या प्रोजेक्टरची घरघर माझी अंगाई होती. माझी आई मला बाळवट्यामध्ये बांधून या टुरिंग टॉकिज’बरोबर गावभर फिारयची, आणि आम्ही इंडियन न्यूज दाखवायचो. त्या इंडियन न्यूज मध्ये माझी आई निरोधची जाहिरात करायची. तेव्हा सगळेजण माङया आईची ‘निरोधवाली बाई’ म्हणून मस्करी करायचे. तरीसुद्धा माङया आईने टुरिंग टॉकिजचा रागराग केला नाही. तर त्याच्याविषयीचं प्रेम ती माङया मनावर जडवून गेली. आणि आम्ही तेच केलं. एकदिवशी आई गेली आणि टुरिंग टॉकिज शिल्लक राहिलं.’ हा खूपच मनाला भिडणारा प्रसंग आहे.

   या चित्रपटाच्या निमित्ताने टुरिंग टॉकिजच्या व्यवसायाची एक बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे.

   टुरिंग टॉकिजच्या सद्यस्थितीबद्दलचं तुमचं मत काय? या चित्रपटाच्या निमित्ताने ‘टुरिंग टॉकिज’चा व्यवसाय करणा:यांना या चित्रपटाचा कसा फायदा होईल?

   टुरिंग टॉकिजची सद्यस्थिती खूपच वाईट आहे. 1985 साली 2000 टुरिंग टॉकिज होते. आता पूर्ण भारतात फक्त 32 आहेत. हा व्यवसाय आता समाप्तीच्या चरणावर आहे. तंबू शिवणारी फक्त दोनच कलाकार आज जिवंत आहेत. जर अजूनही कोणी यांना मदतीचा हात दिला नाही तर चित्रपटाची ‘टुरिंग टॉकिज’ ही संस्कृती इतिहास जमा होईल. एक ठेवणीतली चित्रपट संस्कृती म्हणून आपण टुरिंग टॉकिजचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. ‘टुरिंग टॉकिज’ चित्रपटामुळे भारतीय चित्रपटाची ‘तंबुतील चित्रपट’, तंबूतलं चित्रपटगृह ही कल्पना लोकांर्पयत पोहोचेल. चित्रपटाची संस्कृती जिथे सुरू झाली आणि पहिला चित्रपट जिथे दाखलवला गेला तो तंबू होता. या संस्कृतीने चित्रपटाशी निगडीत सर्वानाच मोठं केलं. अशा या संस्कृतीला माङया चित्रपटामुळे ऑक्सिजन मिळेल. तरुणाईचं पाठबळ लाभेल. राजकीय नेत्यांर्पयत ही गोष्ट जाईल. कदाचित टुरिंग टॉकिजवाल्यांना यांच्याकडून हातभार लाभेल. अनुदाची सोय होईल. या संस्कृतीची कधी कोणाला तोंडओळख झाली तर कुणी गणपतीत, नवरात्रीत, दिवाळीत टुरिंग टॉकिजला बोलवेल.

   हा चित्रपट इतर मराठी चित्रपटांपेक्षा कसा वेगळा ठरतो?

   चित्रपटाच्या प्रेमापोटी धडपडणाऱ्या एका जिद्दी स्त्रीची कथा सादर करतानाच तंबू थिएटर या संस्कृतीचा गावरान ठसका आणि खऱ्या चित्रपटप्रेमींचे दर्शन घडवतो. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शंभरीला मानवंदना देणारा हा खराखुरा भारतीय सिनेमा आहे.

   चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा?

   प्रेक्षकांनी शंभर वर्षापूर्वीचा चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी तरी पाहावा. कारण शंभूर वर्षापूर्वी तंबूत कसा चित्रपट चालायचा आणि जे सध्या 32 तंबूवाले चित्रपट कसा चालवत आहेत, त्याचा अनुभव मिळेल यासाठी पाहावा. तसंच प्रेक्षकांना भविष्यात टुरिंग टॉकिज पाहायला मिळेल की नाही ही शंका आहे. या चित्रपटातून किशोर कदम एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा अफलातून अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट आवर्जून बघावा. ही एक वेगळी धमाल मजा आहे.