Sign In New user? Start here.

आई-वडीलांमुळे अभिनय क्षेत्रात आले - वीणा जामकर

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

आई-वडीलांमुळे अभिनय क्षेत्रात आले - वीणा जामकर

'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्या् वीणाने व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजलेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं. तिच्या नुकत्याच येऊन गेलेल्या ‘तुकाराम’ आणि ‘कुटूंब’ या सिनेमांमधील भूमिकाही चांगल्याच गाजल्या....या प्रतिभावंत अभिनेत्रीशी केलेल्या गप्पा....

* तूझ्या अभिनयाची सुरवात कशी आणि कधी झाली यापासून सुरवात करूया...

- माझ्या अभिनयाच्या कौशल्याला उभारी मिळाली ती माझ्या आई-वडीलांमुळे...ते दोघेही चांगले कलाकार आहेत. अगदी लहान असताना आईने सांगितले म्हणून मी एका नाटकात भाग घेतला होता. आईनेच मला ते सर्व शिकवले होते आणि नकळत तो माझा पहिला अभिनय अपेक्षेपेक्षा चांगला झाला होता. त्यामुळे घरातले सर्वच लोक सुखावले की हिला हे चांगलं येतं. त्यानंतर ख-या अर्थाने त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी खूप प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या शिबीरांमध्ये आणि बालनाट्य स्पर्धांसाठी घेऊन जाणे असं सर्व सुरू झाले. माझ्या आईच्या कंपनीतर्फ़े मी कामगार कल्याण मंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेतही काम केलं. माझ्या रायगड जिल्ह्यातील उरण या गावी मी काही वर्षे कथ्थक सुद्धा शिकले. एकंदर मला या अभिनयाच्या क्षेत्रातील शिक्षण आणि माहिती मिळावी याचाच प्रयत्न त्यांनी सतत केला. नववी-दहावी पर्यंत आल्यावर मला असं जाणवायला लागलं की हे आपल्याला चांगलं जमतंय तर आपण हेच पुढे करूया....मला दहावीनंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळायची एकदा त्यासाठीची मुलाखत कमलाकर सोनटक्के यांनी घेतली होती. तेव्हां त्यांनी मला रूपारेल कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला दिला. कारण तिथे मला नाटकांसाठी पूरक असं वातावरण मिळणार होतं आणि मनात अनेक स्वप्न घेऊन मी रूपारेल कॉलेजमध्ये दाखल झाले.

* रूपारेल ला आल्यानंतर तिथला सर्व अनुभव कसा होता ?

- रूपारेल कॉलेज हे नाटकांसाठी आधीपासून खूप प्रसिद्ध आहे. तिथे अनेक दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन नेहमी लाभायचे. मला वाटतं अभिनयाचं योग्य वातावरण रूपारेलमध्ये होतं. अनेक मोठ मोठ्या लेखकांच्या एकांकीका किंवा नाटक मला त्या पाच वर्षात करता आलं. त्यामुळे एकही अशी स्टाईल राहिली नाही की जी मला करायला मिळाली नाही. वेगवेगळ्या रंगांच्या भूमिका मला त्या पाच वर्षात तिथे करायला मिळाल्यात.

* चेतन दातार याच्याबरोबर सुद्धा सुरवातीलाच तूला काम करायला मिळालं...

- हो..! खरंतर कॉलेजमधील एका नाटकाच्या स्पर्धेसाठी चेतन परीक्षक म्हणून आला होता. माझ्यासाठी खरंच तो दैवदुर्मिळ योग होता. चेतन बरोबर मला फार कमी काम करता आलं. पण त्या काळात ज्या काही चार-पाच गोष्टी मी त्याच्याकडून शिकले त्या मला आयुष्यभर कामात पडतील अशाच आहेत. चेतनला जाऊन आता चार वर्ष झालीत आणि त्यानंतर मी खूप काम करायला लागले. अनेक प्रश्न उदभवतात आणि मग चेतनची कमतरता भासते. कारण तो खूप चांगलं मार्गदर्शन करायचा. या फिल्डमध्ये सिनिअर भरपूर असतात पण त्यातील गुरूच्या ठिकाणी असलेले फार कमी लोक असतात त्यातील एक म्हणजे चेतन होता, असं मी नेहमी सांगते. त्याच्यामुळेच मला आविष्कार या संस्थेची पायरी चढता आली. मला कॉलेजला जाईपर्यंत माहिती नव्हतं की ही संस्था काय आहे. पण त्याने शफाअत खान यांची एकांकीका आविष्कार मध्ये सादर करण्यासाठी बोलवलं होतं. त्यानंतर त्याने लिहिलेल्या ‘खेळ मांडियला’ या नाटकात मला काम करायला मिळाले. त्यानंतर चार नाटकं मी आविष्कार आणि चेतन बरोबर केलीत. हा अनुभव माझ्यासाठी एक कलाकार म्हणून खूप महत्वाचा आहे.

Veena Jamkar

* हा सर्व प्रवास सुरू होण्याआधी तूला कधी वाटले होते का की तूला अभिनेत्री व्हायचंय किंवा सिनेमात काम करायचंय ?

- खरंतर शाळेत असताना आमच्यासाठी फक्त नाटक हेच एक प्लॅटफॉर्म होतं. तेव्हा मालिका वैगेरे फार कमी असायच्या. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर फक्त नाटकच होतं. तेव्हा नाटकात काम केलं म्हणजे सिनेमातही काम मिळतं असं कुठेतरी डोक्यात होतंच. याचा अर्थ असा नाही की मी नाटकाकडे पायरी म्हणून बघत होते. मी माझा पहिला सिनेमा केला कॉलेजच्या तिस-या वर्षाला असताना ‘बेभान’ नावाचा..तोही अचानक माझ्याकडे चालून आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक हे आविष्कार मध्ये काम करायचे. खरंतर मला तेव्हा फार कळत सुद्धा नव्हतं.

* नाटकांबरोबर सिनेमांचा अनुभव कसा होता ?

- ‘बेभान’ सिनेमा झाला आणि वर्षानंतर मी ‘वळू’चं शुटींग केलं. मधल्या काळात मी पास-आऊट झाले, मग मी व्यावसायिक नाटकाची वाट बघत होते. तेव्हा माझ्याकडे काही कामही नव्ह्तं. कॉलेजला असताना माझ्याकडे भरपूर काम होतं आणि जेव्हा करिअर करायला घेतलं तेव्हा मी काम शोधत होते. खरंतर तेव्हा मी खूप भांबावले होते. मी आईकडे रडायचे सुद्धा...तिला म्हणायचे की, "असं कसं झालं..? मला वाटले की माझ्याकडे खूप काम असणार...पण आता काहीच नाही...वैगेरे वैगेरे...". पण त्यानंतर मला ‘वळू’ साठी ऑफर आली. शार्दूल सराफ या मित्राने मला फोन करून सांगितले की ‘वळू’ नावाचा सिनेमा आहे आणि ऑडिशन पुण्याला आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले होते की हे काय सिनेमाचं नाव आहे ? तो म्हणाला हो...! मी पुण्याला आधी जास्त गेले नव्हते म्हणून मी माझ्या बाबांना सोबत घेऊन पुण्याला पोहचले. मी त्या ग्रुपमधील कुणाला जास्त ओळखत सुद्धा नव्हते. गिरीश ला ओळखत नव्हते. फक्त उमेशची एक शॉर्टफिल्म मी आधी पाहिली होती. खरंतर या फिल्मपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीचे एक नवे पर्व सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मला मग एकएक चित्रपट मिळत गेले.

* ज्या मुलीला मुंबई - पुणे बस प्रवासाची भिती वाटते ती मुलगी इतक्या सहज या मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात कशी स्थिर झाली ?

- यासाठी खरं सांगू का...माझ्या आई-वडीलांचा पाठिंबा खूप महत्वाचा ठरला. माझ्या नकळत त्यांनी हे निर्णय माझ्यासाठी घेतले ते फार महत्वाचे होते. त्यामुळे मी मुंबईला पाच-सहा वर्षे एकटी राहू शकले. दुसरी गोष्टी म्हणजे मला माझ्या सुरवातीच्या काळातच अनेक चांगली माणसे भेटत गेली. बारावीला असताना मी सत्यदेव दुबे यांचा वर्कशॉप केला होता, चेतन दातार सारखा माणूस भेटला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याही फार कमी वयात..ह्या गोष्टीच मला खूप स्ट्रॉंग करत गेल्या. कधी कधी काय असतं की जे निर्णय इतरांना पटत नाही ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. मग ते चित्रपट निवडण्याचे असोत की भूमिका निवडण्याचे...पण मुळात तुम्हाला तुमच्या घरात काय संस्कार मिळालेत हे महत्वाचे असते.

* आठवणीतला एखादा खास किस्सा ?

- माझ्या प्रत्येक एकांकीकेला किंवा नाटकाला माझ्या घरातील कुणीना कुणी असायचंच. त्यांना मला स्टेजवर बघायची सवयच लागली होती. असाच एक किस्सा आठवतो. मी बारावीत असताना अभ्यासामुळे वर्षभर नाटक केले नव्हते. मग जेव्हा मी मुंबईला फर्स्ट इअरला जाण्यासाठी निघाले तेव्हा माझी आई म्हणाली की "राणी...!बाई तू आता नाटक कर बाबा...फार झालं" हे ऎकून मला खूप हसायला आलं होतं. जनरली आई-वडील मुलांना सांगतात की अभ्यास कर बाबा...पण इथे उलटच होतं. त्यामुळे मलाच खूप मजा वाटायची.

* तू केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांपैंकी ‘लालबाग परळ’ मधील भूमिका खूप कठीण होती, त्यासाठी कशाप्रकारची मानसिक तयारी तूला करावी लागली ?

- जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर तो सिनेमा आधारीत आहे. ते नाटक मी शाळेत असताना टिव्हीवर पाहिलं होतं. त्यातील प्रत्येक पात्र मला लक्षात होतं. पण जी भूमिका मला मिळाली ती आधी एका कलाकाराने खूप सुंदर केली होती. त्यामुळे माझ्यासाठी ती भूमिका आव्हान होतं. पण मी विचार केला की आपण आपल्या पद्धतीने ती भूमिका करायची. खरंतर काळाचौकीला मी राहण्याचा मला या भूमिकेसाठी खूप फायदा झाला. तिथेही तेच वातावरण होतं जे मी खूप जवळून पाहिलं होतं. मंजू या भूमिकेसारख्या अनेक मुली मी पाहिल्या होत्या. त्या माझ्या मैत्रिणी होत्या. सिनेमातील डार्क सीनचा मला कधी बाऊ नाही वाटला... कारण ती माझी भूमिका होती. समाजातील व्यक्तीरेखांचं हुबेहुब रूप सिनेमात आणण यासाठी खूप कसब लागतं. ती भूमिका तुम्हाला आतून समजायला हवी. मग सर्व सोपं होऊन जातं. मग सिनेमाच्या संहितेसाठी जर ते सीन्स योग्य असतील तर त्यात काहीच गैर वाटण्यासारखं नाही, असं मला वाटतं. त्यामुळे माझी मानसिकता व्यवस्थित तयार होती. मला माहित होतं ‘मंजू’ काय आहे.

Veena Jamkar

* तू एखादी भूमिका निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतेस ?

- भूमिका निवडताना त्या सिनेमाची कथा आणि त्यात माझी भूमिका काय आहे, कशी आहे याचा मी विचार करते. त्यात भूमिकेत काय वेगळं आहे जे मी आधी केलेलं नाहीये, हे मी बघते. तसं मला प्रत्येक प्रकारचं काम करायला आवडतं. पण मला आपल्या अवतीभवती असलेल्या सामान्य स्त्रियांच्या भूमिका ज्या चित्रपटाच्या नायिका असतात अशा भूमिका करायला आवडतं. कारण त्यांच्या विश्वाला अनेक कंगोरे असतात. आणि ते साकारण्यासाठी खूप कसब आपल्यात असावं लागतं. मी आत्तापर्यंत इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत की त्यातली मला कोणती आवडते हे सांगणं तसं कठीणच आहे. कारण मला माझ्या सर्वच भूमिका आवडतात. माझ्या सर्वात जास्त आव्हानात्मक भूमिका ‘लालबाग परळ’मधील मंजू, ‘गाभ्रीचा पाऊस’ मधील अंजना, 'पलतडचो मुनिस' या कोकणीं सिनेमातील ह्या होत्या.

* एका अभिनेत्रीमध्ये बोल्डनेस असणं कितपत मह्त्वाचं वाटतं तूला ?

- स्पर्धा आहे म्हणून बोल्ड्नेसपणा हवा ही फार व्यावसायिक भूमिका आहे. ग्लॅमर फिल्डमध्ये आहोत म्हणून ते असावं का..? या प्रश्नावर एखादीचं उत्तर हो असेल तर एखादीचं नाही असेल. तर मग त्या त्या व्यक्तीच्या मताचा आपण आदर करायला हवा. कारण शेवटी तुम्ही स्वत:ला कॅरी कसं करता ते महत्वाचं आहे. याबाबत दोन गोष्टी आहेत....व्यावहारिक दृष्ट्या बघता तुम्हाला हे सर्व कॅरी करावं लागतं, हे प्रत्येकाने आपल्या आवडी प्रमाणे ठरवावं. आणि तसं असणं काही गैर नाही वाटत मला...जर तुमच्या रोलची गरज असेल तर त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाहीये. जितका बोल्डनेस इतर सिनेमांमध्ये असतो तितका बोल्डनेस आपल्या मराठी सिनेमांमध्ये येऊ सुद्धा शकत नाही. कारण हा सिनेमा काही लोकांना डोळ्य़ांसमोर ठेऊन केला जातो. ते त्यांना पटणार आहे का, आवडणार आहे का याचाही विचार केला जातो. थेटपणे काही दाखवण्यात मला गैर वाटत नाही. पण ते दिग्दर्शक कसा दाखवतो ते महत्वाचं ठरतं. त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा ठरतो.

* रंगभूमी आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांपैकी तूझं आवडतं माध्यम ?

- खरंतर काही वर्षांपपूर्वी जर हा प्रश्न मला केला असता तर मी नाटक जास्त आवडतं असं उत्तर दिलं असतं. आता मी असं म्हणेन की ही दोन्ही माध्यमं खूप वेगळी आहेत. दोन्हीत अभिनय ही गोष्टी कॉमन असली तरी त्यांचे कॅनव्हॉस वेगळे आहेत. या दोन्हीत आपण काहीही कम्पेअर करू शकत नाही. नाटक मोठं की सिनेमा हे ठरवू शकत नाही, असं मला वाटतं. नाटकात अभिनय करण्याचा आनंद हा असतो की तुम्हाला थेट रिअॅठक्शन मिळते, एखादी भूमिका दोन तास सलग करण्याचाही आनंद असतो. पण सिनेमाचं मोठेपण हे आहे की तुम्हाला काही लिमिटेशन नसतात. १०० वर्षांनंतरही तुम्हाला तुमचं काम पाहता येतं. म्हणून सिनेमाही मोठा आहे आणि जिवंत कला म्हणून नाटकही तितकंच मोठं आहे.

* प्रेक्षकांना तूझ्या आणखी कोणत्या चांगल्या भूमिका भविष्यात बघायला मिळणार आहेत ?

- ‘कुटूंब’ आणि ‘तुकाराम’ हे दोन सिनेमे नुकतेच येऊन गेलेत. त्यानंतर ‘दॄष्टीदान’ नावाचा एक माझा सिनेमा येतोय. हा स्त्रीप्रधान सिनेमा असून त्यात मी एका अंध मुलीची भूमिका करीत आहे. ही १९०४ सालातील एक लव्हस्टोरी आहे जी मी पहिल्यांदा करतेय. त्यानंतर उमेश नामजोशी यांची ‘प्रिय आई’ ही एक आधुनिक फिल्म सुद्धा करीत आहे. ज्यात मी एका नर्सची भूमिका साकारणार आहे. ह्या दोन्ही भूमिका अतिशय वेगळ्या आहेत ज्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.

अमित इंगोले