Sign In New user? Start here.

‘लावू का लाथ’च्या निमित्ताने विजय पाटकरांची तिहेरी खेळी...

‘लावू का लाथ’च्या निमित्ताने विजय पाटकरांची तिहेरी खेळी...

 
 
 

विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे विजय पाटकर. जाहिरात, मालिका, नाटक, सिनेमा अशा चारही माध्यमात हौसेखातर अभिनेता म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास आज अभिनयाच्या वाटेवरून दिग्दर्शन, निर्मितीची मजल गाठणारा ठरला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’ या पाच यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर विजय पाटकर ‘लावू का लाथ’ हा सहावा धमाकेदार चित्रपट घेऊन येताहेत. ‘लावू का लाथ’ या चित्रपटातून विजय पाट्कर प्रथमच रूपेरी पडध्यावर निर्माता, दिग्दर्शन आणि अभिनेता अशी तिहेरी खेळी खेळताहेत त्यानिमित्ताने त्यांच्याशी ही खास बातचीत...

* दिग्दर्शक, अभिनेते तुम्ही आहातच पण, ‘लावू का लाथ’ या चित्रपटातून तुम्ही निर्माते म्हणून प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहात याविषयी काय सांगाल ? - या क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून याआधी पाच मराठी आणि दोन हिंदी चित्रपट केले आहेत. माझं कोणतंही प्रोजेक्ट मी माझं पहिलं प्रोजेक्ट असल्यासारखेच उत्साहाने करतो. त्यामुळे लावू का हाथ हा माझा आठवा मराठी चित्रपट असला तरी मला तो माझा पहिलाच मराठी चित्रपट वाटतोय. शिवाय यात मी प्रथमच निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. या चित्रपटासाठी निवडलेले कलाकार आणि त्यांच्याशी असणारा इतक्या वर्षांच अनुभव त्यामुळे काम करताना खूपच सहकार्य मिळालेच शिवाय प्रत्येकाच्या सजेशन्स मधून एक अस्सल गावरान विनोदी कलाकृती तयार झाली आहे.

vijay patkar interview

* ‘लावू का हाथ’ चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल काय सांगाल ?

- चित्रपटाचे शीर्षक लक्षवेधी असेल तर प्रेक्षकांची नक्कीच त्याविषयीची उत्सुकता वाढते. या चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार मी ‘लावू का लाथ’ हे शीर्षक निश्चित केले. कारण १५० वर्ष जुन्या चप्पलच्या रहस्याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून यातील धमाल विनोदी प्रसंग आणि त्यातून घडणा-या गंमतीला तितकेच वेगळे शीर्षक अपेक्षित होते.

* चित्रपटातील सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

-यातील ब-याच कलाकारांशी माझा १५-१६ वर्षांपासून कामाचा अनुभव आहे, यामुळे त्यांच्याशी काम करतानाचे ट्युनिंग येथेही कामी आले. मला दिग्दर्शक म्हणून नेमके काय अपेक्षित आहे ते त्यांना नेमके ओळखता आल्यामुळे हा चित्रपट अधिक रंगतदार झाला आहे. यात विजय कदम, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, कमलाकर सातपुते, किशोरी अंबिये, अर्चना पाटकर,जयंत सावरकर,राजन ताम्हाणे, हेमलता बाणे, अनंता कारेकर, किशोरी रावराणे, श्रद्धा निगवेकर सारख्या अनुभवी आणि नवोदीत उत्साही कलाकारांचा फौजफाटा एकत्र आला आहे. आम्ही सेटवर पडद्यामागे जितका आनंद चित्रपट करतांना घेतला त्याहून अधिक आनंद ‘लावू का लाथ’ हा चित्रपट पडद्यावर पाहताना तुम्हाला घेता येणार आहे.

* या चित्रपटातील गीत-संगीताबद्दल काय सांगल ?

- अविनाश-विश्वजीत या युवा संगीतकार जोडीने चिरपटाला संगीत दिले असून वेगवेगळ्या शैलीतील गाण्यांचा यात समावेश आहे. रोमॅंटीक सॉंग बरोबरच लावणीचा तडका असलेल्या या चित्रपटात श्रीगणेशाची आराधना करणारे जोशपूर्ण गीतही आहे. ‘हे सुखकर्ता गजानना...ही गणपतीची आराधना करणारे गीत वाईच्या ढोल्या गणपती मंदीर परिसरात चित्रीत करण्यात आले आहे. उमेश जाधव यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली अनेक कलाकारांचे दमदार नृत्यविष्कार यात पाहता येईल. वैशाली सामंत, आनंद शिंदे, राहुल सक्सेना, मैथिली जोशी आणी चिंतामणी सारख्या लोकप्रिय गायकांनी गायलेली चित्रपटातील गीते प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालतील.

* ‘लावू का लाथ’ हा चित्रपट १ जूनला प्रदर्शीत होतोय, प्रेक्षकांना काय सांगाल ? - आजवर माझ्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांनी पसंतीची दाद दिली आहे, माझी निर्मिती-दिग्दर्शन आणि अभिनय असलेला ‘लावू का लाथ’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे पैसा वसूल मनोरंजन करेल...त्यामुळे प्रेक्षकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा...!

झगमग टीम -