Sign In New user? Start here.

चित्रपटांच्या आवडीतून चित्रपट निर्मितीकडे - विश्वजीत गायकवाड

चित्रपटांच्या आवडीतून चित्रपट निर्मितीकडे - विश्वजीत गायकवाड

 
 
 

आज मराठी इंडस्ट्रीची घोडदौड बघता अनेक नवीन निर्मात्यांची फौज मराठी इंडस्ट्रीत दिसून येत आहे. कधी काळी लाखोंच्या घरात रूपये खर्च करून चित्रपट तयार केले जात होते. मात्र आज अनेक चांगल्या विषयांना घेऊन त्यावर भरमसाठ पैसा खर्च करून एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी तयार केला जात आहे. या नवीन निर्मात्यांच्या फळीत आणखी एका नवीन आणि तरूण निर्मात्याची भर पडली आहे. तो म्हणजे विश्वजीत गायकवाड...यांची निर्मिती असलेला ‘येड्यांची जत्रा’ हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत....

* ‘येड्यांची जत्रा’च्या माद्यमातून तू निर्माता म्हणून पहिल्यांदा इंडस्ट्रीट दाखल होत आहेस. मुळात तू एक सिव्हिल इंजिनिअर असून चित्रपट निर्मितीकडे कसा आलास?

- खरंतर मला चित्रपटाची लहानपणापासून आवड होती. माझे वडिल सुद्धा इंजिनिअर आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा होती की, मुलानेही इंजिनिअर व्हावं. त्यानुसार मी माझं इंजिनिअरींग पूर्ण केलं. पण मी बाबांना सांगितलं होतं की, इंजिनिअर झाल्यानंतर माझा मार्ग मी स्वत:चा निवडेल. त्यानुसार मग आम्ही एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. इतरही काम करता करता मला हे प्रोडक्शन हाऊस सुद्धा चालवता येतं हे माझ्या लक्षात आलं आणि ही निर्मिती संस्था चालू झाली. त्यानंतर मला मिलिंद भेटला. मिलिंद हा अतिशय हुशार दिग्दर्शक असून त्याच्याकडून दिग्दर्शनाच्या आणि सोबतच निर्मितीच्याही अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

viswajit gayakvad yedyanchi jatra

* हा चित्रपट करायचा विचार मनात कसा आला?

- खरंतर मिलिंद आणि माझी भेट अचानकपणे झाली. माझ्या एका मित्राच्या माध्यमातून मी एक स्टोरी शोधत होतो. एकदा असंच एका हॉटेलमध्ये मी एका व्यक्तीला भेटायला गेलो आणि तिकडे मला मिलिंद भेटला. त्याने सांगितलं की, माझ्याकडे एक स्टोरी आहे तुला ऎकायला आवडेल का? मी ती स्टोरी ऎकली आणि मला आवडली. कारण या स्टोरीवर अजून कुणी कामही नव्हतं केलं. हागणदारी या विषयावरंच हा चित्रपट आहे असं म्हटल्यावरंच हसायला येतं. त्यामुळे प्रेक्षकांना यातून धमाल पहायला मिळणार आहे. धमाल सोबतच समाजासाठी एक सोशल मॅसेज सुद्धा आहे. त्यामुळे ही फिल्म केली.

* तुझी पहिलीच फिल्म असल्याने कसा एकंदर अनुभव होता?

- खुप चांगला अनुभव आला...खरंतर मी स्वत:ला नशीबवान समजतो की, माझ्या पहिल्याच फिल्ममध्ये भरत जाधव, विनय आपटे, मोहन जोशी, पॅडी अशा दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करण्य़ाची संधी मिळाली. ही माझ्या खुप मोठी गोष्ट आहे. तसेच नवनवीन गोष्टीही शिकायला मिळाल्या.

* नवीन कुठल्या प्रोजेक्टवर सध्या काम करतोय?

- हो..! सद्या चार चित्रपटांवर आमचं काम चालू आहे. एप्रिलमध्ये ‘गिन लिया आसमां’ ही फिल्म येत आहे जी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असेल. यात चित्रपटातून पहिल्यांदाच रविना टंडन मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तनुजा चंद्राची एक फिल्म आहे ती सुद्धा मार्चमध्ये रिलीज होईल. काही चित्रपटांची बोलणी सुरू आहे.

अमित इंगोले