Sign In New user? Start here.

महिलांनी खूप सक्षम होणं गरजेचं आहे - परी तेलंग

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

महिलांनी खूप सक्षम होणं गरजेचं आहे - परी तेलंग

   ‘आभाळमाया’, ‘गोजिरवाण्या घरात’, ‘ओळख’, ‘कळत नकळत’ अशा गाजलेल्या आणि लोकप्रिय मालिकांमधून अभिनय केल्यानंतर अभिनेत्री परी तेलंग ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘लक्ष्य’ या गुन्हेगारी विश्वावर आधारीत मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका गेली दिड वर्षे करीत आहे. दिशा सुर्यवंशी हे तिच्या भूमिकेचं नाव असून गुन्हेगारांविषयी अत्यंत चिड आणि महिलांविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेल्या लेडी इन्स्पेक्टरची ही भूमिका आहे. अलिकडेच महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर आणि तिच्या या भूमिकेबद्दल महिला दिनानिमित्त परी तेलंग हिच्याशी केलेली बातचीत....

   १) स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘लक्ष्य’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेबद्दल आणि मालिकेबद्दल सांग.

   - मी लक्ष्य या मालिकेत दिशा सुर्यवंशी नावाच्या सब इन्पेक्टरची भूमिका करतेय. बेसिकली ही क्राईम ओरिएन्टेड मालिका आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे का व कसे घडतात याचं एकप्रकारे सामाजिक प्रबोधन सुद्धा होतं. की अशी अशी परिस्थीती असली की काय काळजी घ्यायला हवी, या गोष्टींचा प्रेक्षकांनाही फायदा होतो आणि याचा फायदा मलाही झाला. दिशाची मी जी भूमिका करीत आहे ती मुलगी एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेली, स्वकर्तुत्वावर उभी राहिलेली मुलगी आहे. या भूमिकेचं नाव आधी दुर्गा असं ठेवायचं ठरलं होतं. पण ते थोडं फिल्मी वाटेल म्हणून दिशा असं करण्यात आलं. मुळात तिचा स्वभाव म्हणजे गुन्हेगारांविषयी तिच्या मनात प्रचंड ची्ड आणि बायकांविषयी सॉफ्ट कॉर्नर...

   २) ही भूमिका तुला कशी मिळाली ?

   - दिशा या भूमिकेसाठी शोध सुरू होता तेव्हा माझे वडिल भूषण तेलंग यांच्याकडून मला या मालिकेची स्टोरी करण्यासाठी विचारणा करण्यात आली. आदेश बांदेकर यांनी सुद्धा मला खूप आग्रह केला की तू स्टोरी कर...पण मी त्यांना सांगितले की मी लक्ष्य मध्ये जर काही करेन तर ती दिशा भूमिकाच...त्यानंतर मग आदेश बांदेकरांनी मला सांगितले की, ‘परी तू करणार आहेस इन्स्पेक्टरची भूमिका’. आणि मग त्यानंतर ऑडिशन झालं, लूक टेस्ट झाली.

   ३) या मालिकेत इन्सपेक्टरचीच भूमिका करायची यामागे काही स्पेशल कारण होतं का?

   - खरंतर एक आर्टीस्ट म्हणून एक स्वार्थ असतो ना तो माझ्यात या भूमिकेसाठी होता. मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. पण जेव्हा ब-याचदा मी अशाप्रकारच्या मालिका बघायचे तेव्हा मनात असं यायचं की, मराठीत जेव्हा अशी मालिका बनेल तेव्हा मला त्यात कॉप प्ले करायचाय.याआधीही एकदा इन्स्पेक्टरची भूमिका करण्याची संधी आली होती मात्र ती काही कारणास्तव करता आली नाही. खूप दिवसांपासूनची ती माझ्या इच्छा लक्ष्य च्या माध्यमातून पूर्ण झाली.

   ४) तुझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका अतिशय वेगळी अशी आहे, आणि मालिकेचा विषय सुद्धा...मग त्यानुसार तु कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला किंवा तयारी केली ?

   - खरंतर इन्स्पेक्टर ची भूमिका करताना तुम्हाला इमोशनमध्ये काही प्रमाणात मागे यावं लागतं. काय होतं की गुन्हेगारांसमोर एका पोलिसाला वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं. एखाद्या गोष्टीवर पटकन रिअ‍ॅक्ट करता येत नाही. कधी कधी गुन्हेगारांकडून काही गोष्टी काढून घेण्यासाठी पोलिसांना सुद्धा अ‍ॅक्टर व्हावं लागतं. पण कुठल्याही गोष्टीवर पटकन रिअ‍ॅक्ट करता येत नाही. माझ्या नशीबाने मला खूप चांगले चांगले दिग्दर्शक भेटत गेले आणि त्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. एक अनुभव इथे मला सांगायला खूप आवडेल तो म्हणजे....मला विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची संधी मिळाली. 'Which was amazing experience'. मी तर त्यांना भेटल्यापासून त्यांचे फॅन झाले. कारण त्यांचं वागणं, बोलणं, केसेमधील त्यांचा सखोल अभ्यास केवळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. गुन्हेगारांची पार्श्वभूमी, त्यांची नावं हे सगळंच....त्या क्षेत्रात सातत्याने काम करून जी मॅच्युरिटी येते ना ती त्या माणसाला भेटून खूप प्रकर्षाने जाणवत होती. दिशा सुर्यवंशी प्ले करणं हे मी कशाशीच कम्पेर नाही करू शकत.

womens day special interview of pari telan

   ५) गुन्हेगारी विश्वाच्या मालिकेतून अनेक बारकावे तुला माहित झाले असतील, त्यानुसार महिलांच्या सुरक्षेबद्दल तू काय मत मांडशील ?

   - आता जो एक मोठा गुन्हा दिल्लीत घडला. त्या घटनेमुळे अचानक महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचा अचानक बवाल झाला असं मी म्हणेन. परंतु त्याहीपूर्वी महिलांवरती अत्याचार होत होतेच. अगदी बेसिक लेव्हलवरती असतील पण होत होतेच. पण दिल्लीत झालेला गुन्हा अतिशय विकृत पद्धतीचा होता. एकंदर मी म्हणेन महिला काय किंवा इतर कुणी काय...आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपली स्वत:ची असते. आता गुन्हेगार सुद्धा काय जन्मताच गुन्हेगार बनून येत नाही. हे आपल्यातलेच असतात. कधी कधी परिस्थीती अशी ओढवते की सामान्य माणसाला सुद्धा गुन्हेगार बनवते. त्यासाठी मी म्हणेन की आपल्या ज्या काही नैतिकता आहे. या नैतिकतेचं मुळ धरून याचा विचार करावा की आपण कुठे विकृतीला खतपाणी तर घालत नाही आहोत ना...! महिलांच्या कपड्यांवरून सुद्धा मध्ये खूप चर्चा सुरू होती. याचाही विचार आपण स्वत:हून करायला हवा असं मला वाटतं. आता वेगवेगळ्य़ा माध्यमातून आपल्यासमोर कशाप्रकारचे गुन्हे घडतात हे येत असतं. सतत माहिती मिळत असते. कशामुळे काय झालं हे माहित होत असतं. त्यावरून आपणच सतर्क रहायला हवं. अर्थात वेळ काही सांगून येत नाही. सतर्क राहण्यासोबतच महिलांनी खूप स्ट्रॉंग रहावं असं मी सांगेन.

   ६) नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात स्त्रियांसाठी वेगळी बॅंक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, यावर काय प्रतिक्रिया...? यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष द्यायला हवं असं वाट्तं का?

   - खरंतर या गोष्टीवर मला हसू आलं. मला अगदी असं वाटत नाही महिलांसाठी वेगळी बॅंक करून काही साध्य होईल मला काहीच माहिती नाही. कदाचित माझी तेवढी समज नसावी. पण कधी कधी सरकारविषयी निर्णयांवर मला खूप हसू येतं. अनेक महत्वाच्या गोष्टी असूनही त्यावर जास्त लक्ष केंद्रीत करीत नाहीत. भारतातील लोकांचा परदेशात असलेला काळा पैसा जर देशात आला तर त्यातून आपले खूप प्रश्न मार्गी लागतील. त्यासोबतच भारतीय नागरीकांवर होणा-या अत्याचारावर लवकरात लवकर न्याय मिळवून देणं अशा महत्वाच्या गोष्टींवर सुद्धा सरकारने अधिक लक्ष द्यायला हवं.

   ७) एकंदर ‘लक्ष’ या मालिकेतील दिशा सुर्यवंशी या भूमिकेचा तुझ्या वयक्तिक जीवनावर काय प्रभाव पडलाय ?

   - ज्याप्रमाणे इन्स्पेक्टर दिशा सुर्यवंशी विचार करते त्याचप्रमाणे मला सुद्धा विचार करायची सवय झालीये. सुरवातील काम करताना मी स्क्रिप्ट वाचून काढायची. त्यानुसार काम करायची. मात्र आता दिड वर्षानंतर मला पहिल्या तीन सीन्स मध्ये कथेचा ग्राफ कसा जाणार आहे हे आधीच कळतं. माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा आता असं होतं ना की, कुणाशी बोलताना, वागताना माझं पोलिसी डोकं चालत रहातं. माझे मित्र सुद्धा मला म्हणत असतात की, ‘आता तुझ्याकडून काही लपवू शकत नाही कारण तू पोलिस आहे’. हे ऎकून मलाही छान वाटतं. एक वेगळंच हसू माझ्या चेह-यावर फुलतं. आपल्याकडे म्हणतात की ब्रम्ह देवाने सृष्टी निर्माण केली आहे, मी म्हणेन की आर्टीस्ट लोक खूप लकी असतात कारण आम्ही प्रत्येक कॅरेक्टरचे ब्रम्ह देव असतो. त्या कॅरेक्टरमध्ये ब्रम्ह देव म्हणून मला कसे रंग भरायचे आहेत हे एक आर्टीस्ट ठरवतो. लेखकाने एक कॅरेक्टर स्केच दिलेलं असतं पण त्याला रंगवणं संपूर्णपणे माझ्या हातात असतं. त्यामुळे It's Privilage की एक अभिनेत्री म्हणून एका आयुष्यात मी कित्येक आयुष्य जगू शकते. एक सहा वर्षाची मुलगी माझी फॅन आहे. मी तिला विचारले की, तुला काय व्हायचंय ? तर ती म्हणाली, ‘मला दिशा सुर्यवंशी बनायचंय’. ही गोष्टही माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण मी ते कॅरेक्टर तसं उभं करू शकले.

   दिशा सुर्यवंशीची एक आणखी मह्त्वाची गोष्ट म्हणजे, एसीपींचं एक ब्रीदवाक्य आहे 'No emotion's'. पण आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये केशव आणि दिशा सुर्यवंशी हे दोनच कॅरेक्टर आहेत जे प्रत्येकवेळेला इमोशनल होतात. सोबतच दिशा सर्वांपेक्षा लहान आहे त्यामुळे ती चुका करते. ती चुका सुद्धा आत्मविश्वासाने करते. ती जितक्या आत्मविश्वासाने चुका करते तितक्या समर्थपणे पचवते आणि मान्यही करते. की हो माझे चुकले आणि सुधारणा करून पुढे जाते.

   ८) इन्स्पेक्टर दिशा सुर्यवंशी म्हणून महिलांना काय सांगशिल?

   - महिलांनी स्वत:ला इतकं सशक्त बनवा की कुठलिही ताकद तुम्हाला ब्रेक नाही करू शकली पाहिजे. जनरली मला ब-याचदा महिलांच्या सुरक्षीततेबद्दल प्रश्न विचारला जातो. पण हा प्रश्नच का निर्माण होतो असा प्रश्न मला पडतो. आपल्याकडे किरण बेदी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला आदींचा आदर्श डोळ्यांसमोर खूप स्ट्रॉंग व्हावे. इतर कोणावरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: अधिक सक्षम, जागॄत, सतर्क महिलांनी रहावे.

   अमित इंगोले