Sign In New user? Start here.

 

* एका मैफलीची कथा.! भाग - २ *

 
kaushal katta

 

मी त्यांच्या प्रश्नाने गारच झालो! खुद्द गुलाम अलि आपल्याला त्यांची खाजगी तालीम पहायला बोलवताहेत यावर माझा विश्वास बसेना. माझ्यासाठी या घडामोडी स्वप्नवत होत्या. मी होकारार्थी मान डोलावली. त्यांनी दुपारी साडे चारला मला बोलावलं. मी ही आनंदाची बातमी माझ्या आई वडिलांना आणि भावाला कळवली. त्या दिवशी मी साडे चार वाजायची जशी वाट पाहिली आहे, तशी मी पुन्हा कधीही पाहिली नाही! शेवटी एकदाचे साडे चार वाजले आणि मी आणि विशाल, माझा भाऊ, आम्ही गुलाम अलिंच्या हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीवर जाऊन थडकलो. खोलीचं दार बंद होतं. मी बिचकतच दारावरची बेल वाजवली. २ मिनिटं गेली पण दार कुणीच उघडलं नाही. मी आणि विशाल एकमेकांकडे पाहत राहिलो. पुन्हा एकदा बेल वाजवावी का या विवंचनेत आम्ही असतांनाच दार उघडलं. गुलाम अलि झोपेतच होते. आम्हाला ओशाळल्यासारखं झालं. आम्ही ‘सॉरी, सॉरी’ असं काही पुटपुटलो. ते म्हणाले की थकले असल्यामुळे त्यांना जरा जास्त झोप लागली. त्यांनी आम्हाला अर्ध्या तासाने पुन्हा यायला सांगितलं. आम्ही अर्ध्या तासानं पुन्हा वर गेलो. तेव्हा त्यांचे वादकही जमले होते. दिलरूबा वाजवणारे दिल्लीहून आले होते, तबलजी मुंबईचा होता. तो प्रथमच गुलाम अलिंसोबत वाजवत असल्यामुळे त्या खोलीत असलेल्या लोकांमध्ये, तो माझ्यापेक्षाही अधिक नर्व्हस होता! मला फार उत्सुकता लागून राहिली होती की गुलाम अलि रिहर्सल कशी करत असतील. कारण ते प्रत्येक मैफलीत एकच गजल किती वेगवेगळ्या पध्दतीने आणि बारकाव्यांसकट सादर करतात हे ठाऊक होतं. त्यांच्या ‘चुपके चुपके’ या गाण्याचं सतराहून अधिक मैफिलीतलं ध्वनिमुद्रण माझ्याकडे होतं आणि त्या सतराच्या सतरा ध्वनिमुद्रणांमध्ये गाणं तेच असलं तरी त्यांनी ते पूर्णपणे वेगळ्या जागा घेऊन सादर केलं होतं. तेव्हां मी पुढे संगीतकार होईन असा मला पुसटसा अंदाजही नव्हता. पण गुलाम अलिंच्या चालींचं आणि सादरीकरणाचं, एवढंच नव्हे तर त्यांच्या पेटीवादनाचंही मला आकर्षण आणि त्याबद्दल कुतुहल होतं.

kaushal katta

गुलाम अलिंनी फक्त काही गजलांचे मत्ले त्या तबलजीला ऎकवले. कधी एखादा शेर. तबलजीने चांगला ठेका धरला की ते कौतुकाने माझ्याकडे पाहत. मला उत्सुकता मी आणि विशाल दोघेही त्यांची तालीम ऎकण्यात इतके रंगून गेलो की एक तास कसा गेला ते आमच्या लक्षातच आलं नाही.

‘तो कैसी लगी आपको हमारी रिहर्सल?" गुलाम अलिंनी आम्हाला प्रश्न टाकला. आम्ही नुसतंच मानेने दर्शवलं. खरं तर मी खूपच हरखून गेलो होतो. इतक्या जवळून रिहर्सल पाहणं हा माझ्यासाठी अभूतपूर्व योग होता. मग त्यांनी रिहर्सल आटोपती घेतली. आम्हीही आमच्या हॉटेलवर परतलो. आता वेध लागले होते ते रात्रीच्या कार्यक्रमाचे!

kaushal katta

कार्यक्रम गोगटेंच्या घराच्या अंगणात होता. डिसेंबर-जानेवारीचे दिवस होते. थंडीचे दिवस. आकाश तारकांनी भरलेलं होतं. वातावरण भारलेलं होतं. गुलाम अलि रंगमंचावर आसनस्थ झाले. कार्यक्रमाची सुरवात त्यांनी एका ठुमरीने केली. ठुमरी झाल्यावर त्यांच्या पेटीतून यमन कल्याणचे सूर निघाले आणि दुसरीच गजल ते गायले - ‘आ गयी यास शाम ढलते ही!’ माझी फर्माईश! मी चौथ्याच रांगेत बसलो होतो. गुलाम अलि माझ्याकडे पाहून पुन्हा हसले. त्यानंतरचे अडीच तास हे एका वेगळ्याच, रम्य दुनियेत ते आम्हाला सफरीला घेऊन गेले. ‘चुपके चुपके रातदिन ऑंसू बहाना याद है’ सारख्या ओळखीच्या गजलपासून ‘देखना भी तो उन्हें दूर से देखा करना’ सारख्या अनवट गजलांपर्यंत ते आपल्या पोतडीतून चिजा काढतच होते! त्यांची पोतडी म्हणजे त्यांची डायरी ज्यात त्यांनी गाणी लिहून घेतली होती. ‘पारा पारा हुआ पैराहने जॉं’ ही त्यांची अतिशय कठीण पण अप्रतिम आणि त्यावेळी फारशी प्रचलित नसलेली अशी गजल ते गात असतांना वा-याची झुळुक आली आणि डायरीची पानं फडफडली आणि उलटली. आणि नेमका पुढचा शेर गात असतांना त्याचा दुसरा मिस्रा ते विसरले. ‘ना ना...ला..ला...’ मध्ये गुणगुणू लागले. पण मला ती गजल पाठ असल्यामुळे मी चटकन उठून उभा राहिलो आणि दुसरा मिस्रा त्यांना सांगितला. लोकांच्याही नजरा माझ्याकडे कौतुकाने वळल्या. गुलाम अलिंनी मला स्टेजवरूनच आदाब केलं आणि पुढची गजल गायले. मला आजही तो शेर लक्षात आहे.
कोई आहट, न इशारा, न सराब,
कैसा वीरॉं है ये दश्ते इम्कॉं..

गजलांच्या राज्यात रात्रीचे सव्वा दोन कधी वाजले हे कळलं नाही. कार्यक्रमाचा शेवट जवळ येऊ लागला. गुलाम अलिही दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. एक शेवटची फर्माईश ते घेतील असं त्यांनी जाहीर केलं. मला आठवतंय, पहिल्या रांगेत भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि राणी वर्मा बसल्या होत्या. त्यांनी तिघींनीही एकत्रच ‘पता लगा मैंनू हुदी की जुदाई’ या पंजाबी गीताची फर्माईश केली आणि त्याच वेळी मी उठून ‘दिल मी इक लहर सी उठी है अभी’ या गजलची फर्माईश केली. या गजलेमध्ये गुलाम अलि - ‘लहर’ हा शब्द खूप वेगवेगळ्या त-हेने रंगवून म्हणायचे आणि त्याचं मला फार आकर्षण होतं. नासिर काज्मींची फार अप्रतीम अशी गजल आहे. पण माझा आवाज बहुतेक नंतर पोहचला आणि त्यांनी ‘पता लगा मैंनू हुदी की जुदाई’ हे गीत सुरू केलं. ते संपलं तशी त्यांनी हार्मोनियम बंद केली. मग त्यांची दॄष्टी माझ्यावर पडली आणि काय आश्चर्य!! त्यांनी त्यांची हार्मोनियम पुन्हा उघडली! मग ते म्हणाले - "ये बच्चा मुझसे और मेरे मौसिकी से बहुत प्यार करता है, और जो संगीत से प्यार करता है, उसका दिल दुखाना नहीं चाहिये!" असं म्हणत त्यांनी ‘दिल में इक लहर सी उठी है अभी’ ही गजल तब्बल पाऊण तास रंगवून गायली! मला कॄतार्थ वाटलं! आजही त्या मैफलीच्या आठवणीने अंगावर शहारा येतो.

दोन वर्षांपूर्वी पुन्हा गुलाम अलिंचं गाणं एका खाजगी बैठकीच ऎकण्याचा योग आला. त्यांचा आवाज आता त्यांच्या विचाराला साथ देत नाही पण अजूनही पेटीवर बोटं अशी फिरतात की त्याला तोड नाही. ते सूर अशा ठिकाणी जातात जिथे आपली कल्पनाही जात नाही! योगायोगाची गोष्ट अशी की त्या मैफिलीतही त्यांच्या बरोबर दिलरूबावर तेच वादक होते हे बेळगांवला होते आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी मला ओळखलं!

गुलाम अलि फॉर्म मध्ये असतांना इतकं जवळून त्यांचं गाणं ऎकता आलं की मला भाग्याची गोष्ट वाटते. कधी कधी वाटतं की फाळणी झाली नसती तर क्रिकेट, हॉकी आणि गाणं या ती प्रांतात आपण जगात सर्वात श्रीमंत असतो.

 

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.