Sign In New user? Start here.

* मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या... *

 

* मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या... *

 

८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचा प्रारंभ मराठी अभिमानगीताने होणार असल्याची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली. आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरिता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. मूळ कविता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कधीतरी कविवर्य सुरेश भटांनी लिहिली होती. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात ही कविता प्रथम छापून आली होती. तेव्हां या चार ओळी लिहिल्याच गेल्या नव्हत्या.

त्यामुळे इथे पहिला ठळक मुद्दा लक्षात घेण्या्सारखा हा आहे की मूळ कवितेमध्ये या ओळी नव्हत्या!

पुढे १९८०च्या दशकात एका सुरेश भटांच्या कार्यक्रमात (ज्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते) या चार ओळी भटांनी म्हटल्या. आज आपल्याला सुरेश भटांच्या आवाजात ज्या ओळी ऐकू येतात त्या याच का्र्यक्रमातल्या आहेत असा माझा अंदाज आहे. म्हणजे मूळ कवितेनंतर साधारण २० वर्षांनी या ओळी सुरेश भटांनी लिहिल्या!

पण त्यानंतरच्या ‘रूपगंधे’च्या आवृत्तीतसुद्दा आपल्याला या ओळी आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण काय असावं?

खुद्द सुरेश भटांनीसुद्दा या ओळी छापील स्वरूपात जनतेसमोर का येऊ दिल्या नाहीत?

मला असं वाटतं की ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ते ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ (म्हणजे जी मूळ कविता आहे) ती अत्यंत चिरंतन आहे. पण "आपुल्या घरीच हाल सोसते मराठी" ही परिस्थिती काही चिरंतन नाही. आणि ती तशी असावी असं आपल्याला खचितच वाटत नाही! ‘आपुल्या घरी हाल सोसते मराठी’ हे आज जरी सत्य असलं तरी ते सत्य चिरकाल नाही आणि ते आपण राहू देता कामा नये. ही परिस्थिती आज न उद्या बदलेल, पण ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ हे सत्य चिरंतन आहे अशी माझ्या मनाची धारणा आहे. मराठी अभिमानगीत हा मराठीचा ऍन्थम (स्फूर्तिगीत या अर्थी) आहे आणि कुठल्याही ऍन्थममध्ये क्षणिक सत्याला वाव नाही. उदाहराणार्थ, ‘जन गण मन’ किंवा ‘वंदे मातरम’ मध्ये ‘भारत किती गरीब देश आहे आणि भ्रष्टाचार कसा विळखा घालून भारतवासीयांच्या मान्गुटीवर बसलाय’ असं आपण म्हणू का? मराठी ‘अभभमान’गीत म्हणायचं आभण मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असं ही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं.

‘रूपगंधा’ची नवीन आवृत्ती काढून पाहिलीत तरी तुम्हाला या चार ओळी दिसणार नाहीत की, इयत्ता सहावीच्या पु्स्तकात या ओळी आपल्याला आढळणार नाहीत. खुद्द कविवर्य सुरेश भटांनाही या ओळींमध्ये दर्शवल्या गेल्या क्षणिक परिस्थितीची कल्पना होती आणि म्हणून त्यांनी त्या ओळी म्हटल्या पण छापल्या नाहीत!

आणि याच कारणासाठी मी या चार ओळींना चाल दिली. काही कार्यक्रमांतून मी या चार ओळी म्हणतो देखिल पण त्या ओळी ध्वनिमुद्रित केल्या नाहीत. मराठी भाषा चिरकाल राहणार आहे पण मराठीवर आलेली बिकट परिस्थिती ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी क्षणिक आणि तात्कालीकच राहिल – या माझ्या विश्वासातून हा निर्णय घेतला गेला!

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.