Sign In New user? Start here.

या शुभ्र विरल अभ्रांचे - भाग - १

&nbsp

* या शुभ्र विरल अभ्रांचे - भाग - १ *

 
 

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. ब-याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो.

उदाहरणार्थ -
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश

वरील गीतामध्ये ‘अंधार’ अज्ञान किंवा निराशेचं रूपक आणि ‘प्रकाश’ ज्ञानाचं किंवा आशेचं रूपक आहे असं समजलं तर मानवी व्यवहाराबद्द्लच कवीने मांडलंय असं आपल्या ध्यानात येतं. असं असताना संगीतकार चालीमधून हा मानवी व्यवहार किंवा भावना काय असेल ते सुचवू शकतो आणि ब-याचदा ते सुचवतो देखिल. जसं ‘फिटे अंधाराचे जाळे’ मधे श्रीधर फडकेंनी त्यांच्या चालीमधून आणि संगीत संयोजनामधूनही सुचवलं आहे की ‘झाले मोकळे आकाश’ हे मनाचं लख्ख होण्याचा संकेत आहे.

पण बालकवींच्या काही कविता आहेत, ज्या निस्संदिग्धपणे निसर्गकविता आहेत. ज्यामध्ये निसर्ग एका विलक्षण कॅमे-याने टिपलाय असं वाटावं अशा या कविता आहेत. आज मी एका बालकवींच्या कवितेचं गाणं करताना झालेला माझा सांगितिक आणि भावनिक प्रवास तुम्हाला सांगणार आहे, कारण या अनुभवामध्ये तुम्हालाही सहभागी करून घ्यावं असं फार तीव्रतेने मला वाटतं. कुठल्याही सामान्य माणसाला होऊ शकतात आणि होतात असे छोटे छोटे साक्षात्कार मलाही वेळोवेळी होत असतात. त्यातले काही साक्षात्कार काळाबरोबर विरून जातात आणि काही आपल्याबरोबर राहतात. हे गीत संगीतबद्ध करण्याचा अनुभव असाच एक छोटासा साक्षात्कार होता जो अजून मी जपून ठेवलाय!(खरंतर बालकवींच्या गाण्याच्या बाबतीत ‘संगीतबद्ध हा शब्द विशोभित वाटतो. बालकवींच्या गीताला आपण संगीताचं तारांगण खुलं करून देतो...त्याला संगीतात बांधत नाही!)

खरंतर हे गीत करायच्या आधीही बालकवींचं एक गाणं मी केलं होतं. ‘अमृताचा वसा’ या सीडी मध्येही ते आहे आणि ती कविता ब-याचजणांच्या चांगल्याच परिचयाची आहे. ती कविता होती ‘तारकांचं गाणं’-

कुणि नाही ग कुणि नाही
आम्हाला पाहत बाई
शांती दाटली चोहिकडे
या ग आता पुढेपुढे
लाजत लाजत
हळूच हासत
खेळ गडे खेळू काही
कोणीही पाहत नाही!

भूतलावर सगळी मानवजात निद्रेच्या कुशीत शिरली की आकाशातल्या सगळ्या तारका खाली पृथ्वीवर येऊन खेळतात अशी विलक्षण कल्पना बालकवींनी या कवितेत केली आहे. आपल्याला तारका कशा दिसतात हे कदाचित हजारो कवींनी सांगितलं असेल, पण तारकांना आपण कसे दिसतो हे फक्त बालकवीच सांगतात!

अनेक असले खेळ करूं
प्रेमाशा विश्वात भरूं
सोडुनिया अपुले श्वास
खेळवु नाचवु उल्हास
प्रभातकाळी
नामनिराळी
होऊनिया आपण राहू
लोकांच्या मौजा पाहू!

अशा खेळकर तारकांचं मन बालकवींना वाचता येत असे! या कवितेचं गाणं करतांनाही कवितेमधला निरागसपणा राखणं खूप महत्वाचं होतं. तरीही हे बालगीत नाही, कारण दुस-या एका कडव्यामधे-

&nbsp एखादी तरूणी रमणी
रमणाला आलिंगोनी
लज्जा मूढा भिरूच ती
शंकित जर झाली चित्ती
तिच्याच नयने
कुणे बिंबुनी
धीट तिला बनवा बाई
भुलवा ग रमणालाही

&nbsp असेही शब्द येतात. यामधे ‘बिंबुनी’ या शब्दाने माझं लक्ष वेधलं होतं. मी ‘बिंबुनी’ किंवा ‘बिंबवले’ असा शब्द ऎकला होता, वाचला होता, पण ‘बिंबुनी’ ही कल्पनाच अचाट होती. आपणच कुणाच्यातरी डोळ्यात बिंबायचं! या कडव्यावरून हे निश्चित होतं की कवी हे बालकवी असले तरी कविता काही बाककविता नव्हती!

&nbsp क्रमश:

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.