Sign In New user? Start here.

या शुभ्र विरल अभ्रांचे - भाग - २

 

* या शुभ्र विरल अभ्रांचे - भाग - २ *

 

चाल करतांना याकडे विशेष लक्ष दिलं की निरागसपणा आणि साधेपणा ठेऊनसुद्धा चालीत उथळ सोपेपणा वाटणार नाही. वाद्यमेळामध्ये सुद्धा ‘बेल्स’चा उपयोग केला. सुरेश भटांच्या कवितेत ऎकू येणारे ‘आवाज चांदण्यांचे’हे सुद्धा मला हळुवार वाजणा-या घंटानादासारखेच ऎकू येतात! चार तरुणींचं गाणं नसून चार तारकांचं गाणं आहे हे ध्यानात ठेऊन ध्वन्निमुद्रणाच्यावेळी गायिकांच्या आवाजाला एरवीपेक्षा जास्त रिव्हर्ब दिला. रिव्हर्बमुळे अवकाशाचा पट दाखवण्यात मदत झाली.

बालकवींच्या या गाण्याचा अनुभव गाठीशी होता आणि कवी म्हणून त्यांच्याबद्दलचं कुतूहल खूप वाढलं होतं. त्यांच्या कवितांना संगीत देण्याची इच्छा फार जबरदस्त होती, पण कवितेच्या तुलनेत आपल्याला चाली फार सामान्य सुचताहेत असं सारखं जाणवत राही.

मग एके दिवशी मी पार्ल्याला कुठल्याशा कार्यक्रमाला गेलो होतो. त्याच कार्यक्रमाला कविवर्य शंकर वैद्य आले होते. कार्यक्रम संपल्यावर आम्ही पार्ल्याहून दादरपर्यंत लोकल पकडली. गाडीला गर्दी खुप होती पण वैद्य सर कवितेबद्द्ल इतकं सुंदर बोलत होते की गर्दीचं विशेष काहीच वाटत नव्हतं. दादर आलं तसं आम्ही दरवाज्यापाशी आलो. गाडीच्या दरवाज्यातून बाहेर पाहिलं. पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. चंद्रभोवती काही ढग होते. वैद्य सरांचं त्या दॄश्यकडे लक्ष वेधलं तसे ते म्हणाले -

"बालकवींची एक कविता आहे ‘मोहिनी’
"या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले.."
मी म्हटलं -
"वा!अगदी तेच दॄश्य आहे!"
वैद्य सर म्हणाले - " तू चाल दे या कवितेला."

मी बरं म्हणालो. बालकवींचं पुस्तक होतं घरामध्ये. घरी येऊन लगबगीने ते पुस्तक काढलं. ‘मोहिनी’ नावाची कविता काढली. कविता चार पानी होती आणि कवितेच्या शेवटी ‘अपूर्ण’ अशी टीप होती! हे भयानक प्रकरण होतं! चार पानी कवितेला कशी काय चाल देणार! मी ताबडतोब वैद्य सरांना फोन लावला.

"सर, ही कविता चार पानी आहे!!"
वैद्य सर हसले.
"याच्या पहिल्या बारा ओळी वाच. फक्त पहिल्या बारा ओळींना चाल द्यायची."
मी वाचल्या. पहिल्या वाचनात फक्त शब्दांचे नाद सुखावत होते पण अर्थ मनात बिंबत नव्हता.
या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी बेभान पवन ही डोले
तंद्रीतच अर्धी मुर्धी लुकलुकते ताराराणी
ये झुंजुमुंजू तेजाने पूर्वेवर पिवळे पाणी
निस्पंद मंद घटिका ती, अंधुकता धुंद भरीत
ब्रम्हांडमंदिरी गाई सौभाग्य सुभग संगीत
वर मूक मोहने जैसी शशिकिरणे विरघळलेली
इवलाच अधर हलवून, जल मंद सोडिते श्वास
इवलाच वेल लववून, ये नीज पुन्हा पवनांस
निश्चिंत शांति-देवीचा किंचितसा अंचल हाले
रोमांच कपोली भरती कुंजात कोकिला बोले!

वैद्य सर पुढे म्हणाले -
"वाचलंस की तुझ्या ध्यानात येईल की पहिल्या दहा ओळीत कुठलाही आवाज होत नाही. सगळं शांत आहे. आता शब्दही पहा - "या शुभ्र विरल अभ्रांचे...‘पुढे..‘तंद्रीतच अर्धीमुर्धी...’, ‘इवलाच अधर हलवून’...अकराव्या आणि बाराव्या ओळीत जेव्हा ही शांतता भंग होते, तेव्हा ही‘निश्चिंत शांतिदेवीचा किंचितसा अंचल हाले..’ ही शांतता भंग होते तीही कशाने तर कोकिळेच्या बोलण्याने!’

हे ऎकून मी थक्क झालो! कसं सुचलं असेल हे बालकवींना, असा भाबडा प्रश्न मलाही लगेच पड्ला. या बारा ओळी एकाच क्षणाचं वर्णन करत होत्या. रात्र आणि पहाटेच्या उंब-यावरचा क्षण...प्रत्येक ओळीबरोबर मला असं जाणवत होतं की बालकवींनी एक व्हर्च्युअल रिअलिटी निर्माण केली होती. "इवलाच अधर हलवून जल मंद सोडिते श्वास..." असं वाचतांना नुसतंच डोळ्यासमोर चित्र उभं राहात नव्हतं तर प्रत्यक्ष आपल्याच अंगावरून वा-याची झुळूक गेल्याचा अनुभव होत होता. हाच तो छोटासा साक्षात्कार ! कलेचं सामर्थ्य एकाचा अनुभव दुस-यालाही घेऊ शकता येतो यात आहे आणि काळाच्या सीमारेषाही त्यात पुसल्या जातात! क्रमश:

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.