Sign In New user? Start here.

एका मैफलीची कथा!

 

* एका मैफलीची कथा.! *

 
 

ज्या काळात मला गजलने झपाटलं होतं, त्या काळातच भारतातही गजलांच्या कार्यक्रमांचं पीक आलं होतं. पंकज उधास, अनूप जलोटा, जगजीत-चित्रा सिंग, चंदन दास, तलत अजीज, अहमद हुसैन-महम्मद हुसैन अशा अनेक गायकांनी आपापला एक श्रोतॄवर्ग तयार केला. गजल ऎकणं ही एक ‘फॅशन स्टेटमेन्ट’ होऊ लागली. या गायकांच्या एखाद दोन रचना जरी मला आवडत असल्या तरी त्यांच्या मैफलींमध्ये मी कधी फारसा रमलो नाही. याचं एक कारण म्हणजे या गायकांनी श्रोत्यांसाठी गजल सोपी करण्याच्या नादात त्यातली मस्ती आणि मौज घालवली असं माझं मत आहे. उर्दूची जागा साध्यासोप्या हिंदुस्थानी शब्दांनी घेतली आणि गजलचे विषय ‘पैमाना’, ‘साकी’, ‘शराब’, ‘हुस्न’, आणि ‘इश्क’ या पुढे जाईनात. पण ज्या ‘पैमाना’ किंवा ‘महब्बत’ मध्ये कैफ नाही, त्यात मौज ती काय!

पण या सगळ्या गजलगायकांच्या जत्रेमध्येही गुलाम अलिंच्या गाण्याची मोहिनी मात्र तशीच कायम होती. मेहंदी हसन आणि गुलाम अलि यांच्या गजलगायनामध्ये शाररीचा दर्जाही उत्तम असायचा. गालिब, मीर, मोमिन, जिगर यांच्याबरोबर अहमद फराज, कतील शिफाई, नासिर काज्मी, फरहत शहजाद यासारखे नव्या दमाचे शायरही ऎकायला मिळाले.

kaushal katta

मी कॉलेजच्या दुस-या वर्षाला असेपर्यंत या सगळ्या शायरांच्या प्रेरणेने मी काही गजला लिहिल्या. आणि एके दिवशी माझ्या वडिलांनी सांगितलं की बेळगावला त्यांच्या एका मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या निमित्ताने गुलाम अलि यांचा आदल्या दिवशी कार्यक्रम आहे. ही बातमी ऎकून मी आनंदित झालो. गुलाम अलि यांना प्रत्यक्ष ऎकायला मिळणं ही पर्वणीच होती! आमच्या शेजारी राहणा-या एका उर्दू माध्यमातून शिकणा-या मुलीकडून मी लिहिलेल्या गजला मी उर्दूत लिहून घेतल्या. गुलाम अलिंना भेट द्यायला! बेळगावला आम्ही पोहोचल्यावर आम्हाला कळलं की गुलाम अलि अजून बेळगावात पोहोचायचे आहेत. दुस-या दिवशी दुपारच्या विमानाने ते येणार होते. मी मंगल गोगटे, ज्यांच्या घरी कार्यक्रम होता, त्यांना गळ घातली की गुलाम अलिंना आणायला मला जाऊ दे. त्यांना माझं गुलाम अलि वेड माहित असल्या कारणाने त्यांनी हसत हसत परवानगी दिली. गुलाम अलिंना आपण प्रत्यक्ष भेटणार, त्यांचं गाणं समोर बसून ऎकणार या विचाराने मला रात्रभर झोप लागली नाही. मी तास, मिनिटं आणि सेकंद मोजत राहिलो. दुस-या दिवशी याच उत्तेजित अवस्थेत मी आणि माझे वडील विमानतळावर जायला निघालो. आमचा ड्रायव्हर होता, रफीक तोही गुलाम अलि प्रेमी होता! विमानतळावर पोहोचलो आणि काही क्षणातच गुलाम अलिंचं आगमन झालं. मी हरखून गेलो. काय बोलावं तेही कळेना! गाडीच्या मागच्या सीटवर गुलाम अलि बसले आणि त्यांच्या शेजारी मी! प्रवासाने थकले होते, चेह-यावर देवीहे व्रण होते, पण चेह-यावर एक लोभस स्मितहास्य आणि कलेचं तेज असल्यामुळे मुद्रा प्रसन्न दिसत होती. मी धीर करून म्हणालो,-

kaushal katta

"खॉंसाहब, मैं आपका बहुत बडा फॅन हूं!"
त्यांनी पुन्हा एकदा स्मितहास्य केलं आणि माझ्याकडे निरखून पाहिलं. त्यांना चाहत्यांची नवलाई नसणार हे उघड होतं, पण माझं वय फार नव्हतं याचं त्यांना नवल वाटलं असेल. काही न बोलता त्यांनी गाडीची काच खाली केली. तशी एक वा-याची खुळूक आता आली. त्यांच्या ओठातून शब्द फुटले -
"इक जरासी हवा के चलते ही.."
त्यांनीच गायलेल्या ‘आ गयी याद शाम ढलते ही, बुझ गया दिल चराग जलते ही।" या गजलेमधला हा मिस्रा होता हे माझ्या ताबडतोब लक्षात आलं. त्या काळात गुलाम अलिंनी गायलेली प्रत्येक गजल मला तोंडपाठ असे. आजही आहे! मी पुन्हा धीर करून म्हणालो -
‘खॉंसाहब, आज ये गजल जरूर गाईये।"
"आपको ये गजल मालूम हैं?" त्यांनी कौतुकाने विचारलं. माझाही धीर चेपला.
"जी!‘आ गयी याद शाम ढलते ही!" आप गाएंगे?
"देखेंगे बेटे, देखेंगे!" ते म्हणाले.

बेळगांव शहरापासून विमानतळ चांगलंच दूर असल्यामुळे गुलाम अलिंच्या सहवासात चांगला पाऊण तास घालवता आला. या पाऊण तासात त्यांच्या आणि माझ्या वडिलांच्या गप्पा रंगल्या. मी त्या अतिशय तन्मयतेने ऎकत होतो. त्यांच्या हॉटेलवर आल्यानंतर मी त्यांची बॅग घेऊन आत गेलो. त्यांनी मला त्यांच्या खोलीत पाच मिनिटं येण्यास आमंत्रण दिलं. खोलीत शिरल्यावर ते म्हणाले -

"रिहर्सल देखना पसंद करोगे?"

&nbsp क्रमश:

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.