Sign In New user? Start here.

* कौशलची लर्नर्स डायरी *

मराठी | ENGLISH

 

* कौशलची लर्नर्स डायरी *

 
kaushal katta

मी ‘अजिंठा’ लेण्यांबद्दल सर्वात आधी १९९४ साली ऐकलं. एक महान पटकथाकार, दिग्दर्शक स्व. चेतन दातार यांच्या प्रयत्नाने मी नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळी मी मतमतांतरांनी भरून वाहत होतो. काही नवीन कल्पना असली, तर माझं त्या प्रत्येकांबद्दल काही तरी मत हे नक्कीच असायचं. चेतन दातारांनी ‘अजिंठा’ एक संगीत नाटीका बनवायची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली होती. ना.धों. महानोरांनी ते महाकाव्य १९८४ साली लिहिलं होतं. आणि त्याला १० वर्ष पूर्ण झाली होती. मला आठवतं आम्ही रुपारेल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ‘अजिंठा’ वाचलं होतं....वाचन झाल्यावर ‘अजिंठा’ रंगमंचावर आणायची खूप इच्छा होत होती. माझी अधीरता वाढत होती, मी चेतनला त्यावर नाटक लिहायला आग्रह करत होतो, पण चेतन शांत होता, त्याला घाई नव्हती. आता असं वाटतं की, मी त्याला जास्त आग्रह करायला हवा होता. कारण चेतनसाठी ते एक स्वप्नंच राहीलं.

तेव्हापासूनच किंवा त्याही आधीपासून अनेक कलाकारांनी ‘अजिंठा’ रंगमंचावर आणायचे प्रयत्न केले. कवितेचे पटकथेत रूपांतर करून पारू आणि मेजर रॉबर्ट गिल यांची प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आणायचे सुद्धा प्रयत्न झाले. प्रत्येक कलाकृती तीचं नशीब घेऊनंच जन्माला येते. चेतनने ती प्रेमकथा रंगमंचावर जिवंत करायची इच्छा प्रकट केली होती, आणि आज मी ‘अजिंठा’ चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करतोय, ज्याची निर्मिती प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि निर्माता नितीन चंद्रकांत देसाई हे करीत आहेत.

गेल्या सतरा वर्षांनी माझ्यात अनेक बदल केले आहे. म्हणूनच जेव्हा मला ‘अजिंठा’ साठी विचारण्यात आलं. तेव्हा मी बराच विचार केला. गेल्या सतरा वर्षात एवढं नक्की शिकलो की, प्रत्येक नवीन कामासाठी तुम्हाला स्वत:चं भूतकाळातलं यश किंवा अपयश विसरावं लागतं. जसा एक चित्रकार को-या कॅनव्हासपासून चित्राला सरुवात करतो, आपल्याला सुद्धा को-या मनाने नवीन सुरुवात करायची असते.