Sign In New user? Start here.

* ना.धों. *

मराठी | ENGLISH

 

* ना.धों. *

 
zagmag

मी पहिल्यांदा ना.धों.महानोरांना भेटलो, ते १२ वर्षांआधी श्री.रामदास भटकळ यांच्या घरी. तेव्हा माझा ‘रात्र भिजली’ हा दुसरा अल्बम बाजारात आला होता. त्यावेळी रामदासजी यांच्या घरी आम्ही जमलो होतो. तेथे सौमित्र(किशोर कदम) आणि ना.धो.महानोर सुद्धा होते. त्यात मला रामदासजींनी ना.धों. महानोरांना काहीतरी गाऊन दाखवण्यास सांगितलं. मला चांगलं आठवतं की, मी त्यावेळी ‘दिवे लागणीची वेळ’ हे त्याचंच गीत गायलो होतो. त्यानंतर गेली अनेक वर्ष मी या कवितेनेच माझ्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरवात करतो.

गेल्या महिन्यात परत एकदा ना.धों.महानोरांना नितिन देसाई यांच्या पवईच्या ऑफिसमध्ये भेटण्याचा योग आला. मला वाटलं ते मला ओळखणार नाहीत. मात्र त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला ओळखलंच नाही तर रामदास भटकळ यांच्या घरी मी १२ वर्षांपूर्वी गायलेल्या गाण्याचीही त्यांना आठवण होतीच हे विशेष. महान माणसं तेव्हांच मोठी होतात, जेव्हा सर्वसामान्य माणसालाही ते जवळ करतात. याचाच प्रत्यय मला तिथे आला. आणि त्यांच्याच सहकार्याने, मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वासही वाढला हे काम करण्याचा...

zagmag

‘अजिंठा’ गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात होतंच. जेव्हा ‘अजिंठा’ चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली, तेव्हा माझ्या पोटात गोळा यायला लागला होता. मला खूप धाकधूकही होती. कारण ‘बालगंधर्व’ नंतर नितीन दादा मला परत एकदा चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवत होते. त्यांनी परत एकदा मला त्यांच्या एका भव्य चित्रपटाला संगीत देण्याची संधी दिली, हे माझ्यासाठी खरंच माझा गौरव केल्यासारखंच वाटत होतं. मंदार जोशी यांनी नुकताच ‘अजिंठा’ चित्रपटाच्या पटकथेचा पहिला ड्राफ्ट लिहून पूर्ण केला. पटकथा वाचल्यानंतर मला असं जाणवलं की, या चित्रपटाला यशस्वी करण्यात यातील संगीत महत्वाची भूमिका बजावेल. त्या काळातील वातावरण निर्माण करण्यासाठी संगीत अधिक उपयोगी ठरेल. पटकथा वाचनानंतर ना.धो. महानोरांनी मला त्यांच्याजवळ बोलवलं आणि म्हणाले की, "या कामासाठी तूच योग्य संगीतकार आहेस आणि तू हे काम अतिशय चोख करशील". त्यांच्या ह्याच बोलण्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला.

पंडीत हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक यांच्यासारख्या प्रसिद्ध लोकांबरोबर ज्या माणसाने काम केलंय, त्यांच्यासाठी खर तर मी एक नवखा संगीतकार...मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि म्हणालो मी माझ सर्वोत्तम देईल..