Sign In New user? Start here.

<i

मराठी | ENGLISH

 

* अजिंठ्याच्या लेण्यांमधील शांत-मधुर संगीत *

 
zagmag

नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला होता. रेणुका देशकर यांनी तीन वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखला होता. त्यात सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग, नागपूरचे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि मी होतो.

नितीन दादाने १२ जुलैला अजिंठा येथे जायचा बेत आखलेला होता. ११ जुलैला मी नागपूरहून इनोव्हाने निघालो, जी विदर्भ साहित्य परिषदेचे श्री.म्हैसाळकर यांनी आमच्यासाठी बुक केलेली होती, त्या सकाळीच मी वि.सा.प. च्या लायब्ररीलाही भेट दिली होती.

संध्याकाळी नागपूरातच माझ्या नातेवाइकांच्या घरी थोडा वेळ आराम केला आणि निघालो. पाहटे अडीच वाजता अजिंठ्याला पोहचलो. प्रवासाने भयंकर थकवा आलेला होताच, मंदार जोशीला झोपलेला पाहून, मी सुद्धा मस्त झोप घेतली.

आम्ही सकाळीच उठलो आणि ना.धों. महानोरांच्या सोबतीने अजिंठ्याच्या सफारी वर निघालो. जिथे आमच्या चित्रपटाची कथा घडणार आहे, त्या ठिकाणी ना.धों. सारखा कवी सोबत असणे म्हणजे ग्रेटच.. आमच्या सोबत चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री तृप्ती भोईर सुद्धा होत्या.

अजिंठा जागतिक वारसा असल्याने अजिंठ्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत गाड्यांनाच पायथ्यापर्यंत जायला परवानगी आहे. म्हणून आम्ही सुद्धा बसनेच अजिंठ्याच्या पायथ्याशी पोहचलो. पायी वर चढत गेल्यावर लेण्यांचं जे दर्शन झालं, ते श्वास रोखून धरणारं होतं. वाघुरा नदी निरव शांत भासत होती. पण ना.धों. म्हणाले की, सप्टेंबर मध्ये हीच नदी वाघिणी सारखी डरकाळ्या फोडत वाहते.

आम्ही पहिल्या लेणीच्या आत गेलो आणि एवढा अचंबित झालो की, फोटो काढायचं भान हरवून बसलो. पण, सरतेशेवटी एवढ कळलं की, मनावर चितारलेले चित्रं ही लेन्सच्या छायाचित्रांची बरोबरी करूच शकत नाही.

zagmag

मी प्रत्येक लेणीत बराच वेळ घालवला. तिथल्या शांततेला मन लावून ऐकण्याचा प्रयत्न केला...हा विचार नेमका स्वप्नील वाटेल... पण..थोड्याच वेळात त्या लेण्यांतून सुमधुर संगीत दरवळत असल्यासारखं वाटायला लागलं. कळतच नव्हतं की, ही लेणी गात आहेत, की माझं मन ! पण खरंच, तिथल्या कणाकणात संगीत होतं. खालील छायाचित्र पाहून लगेच लक्षात येईल की, त्यांनी त्यांच्या कवितेची सुरुवात ‘डोळ्यांना डसले पहाड इथले’ अशी का केली आहे ते.

ब-याचदा शब्दंच त्यांच्या सोबत संगीत घेऊन येत असतात, ‘डसले’ या शब्दातूनही तेच जाणवलं. मला एखादा शब्द किंवा चित्रंच धून बनवायला प्रेरित करत असतात. ‘संगीत हे चेतनेच्या अनुभूतीचा अनुवाद असतो’..

zagmag

खरंतर, लेण्यांचा हा प्रदेश प्रेरणादायी आहे. वाघुरा नदी तिच्यासोबत ते संपूर्ण वातावरण घेऊनच वाहते आणि आपलं मन त्या प्रवाहात आपसूकच ओढल्या जातं. एकीकडे सृष्टीचं अगाध सौंदर्य आणि दुसरीकडे लेण्या, मानवाचा सृष्टीला अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न; आपणास शरण जाण्यास भाग पाडतात. आणि या सृष्टी निर्मिक होण्यापेक्षा त्याचा एक छोटासा भाग असण्यात धन्यता मानतो.

नितीन दादाचे असिस्टंट फोटो काढण्यात मग्न होते, तर मी त्या वातावरणात एकजीव होऊन कुठलं संगीत मनावर उमटतं, याचा शोध घेत होतो. बुद्ध तत्वज्ञानावर आधारित चित्रपटाचं संगीत सतत मनात गुंजारत होतं, पण एक गाणं मनात उमटत होतं ते ‘मन रे तू काहे को धीर न धरे’..

तेथून निघायची मनात इच्छा होत नव्हती, पण निघावं लागलं...अजिंठ्याच्या पायथ्याशी जेवण केलं आणि शॉपिंगसाठी बाहेर पडलो. तिथल्या स्मार्ट दुकानदाराने बरीच खरेदी करायला लावली....

रात्री जेवणाच्या वेळी महानोरांनी त्यांच्या चालीत गाणे गायले. त्यांच्या आवाजातील त्या चाली मी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्या..

जेव्हा एखादा कवी स्वत:ची कविता गातो, संगीत दिग्दर्शकाला तीच चाल बेस्ट वाटते...काव्यसंध्ये नंतर आम्ही निघालो... पण महानोरांच्या ओळी सतत कानात दरवळत होत्या...मन सतत विचारात होतं, महानोरांची चाल जर मनात बसली तर मी कसा काय नवीन चाल देऊ शकेल ?