Sign In New user? Start here.

 

* शब्द आणि चाल *

 

एका संगीतकाराला काही प्रश्नांना पुन:पुन्हा सामोरं जावं लागतं. त्यातला एक प्रश्न म्हणजे चाल आधी की शब्द..?

अनेक बुजूर्ग संगीतकारांनी असं म्हटलं आहे की, शब्दांना चाल लावणं हे जास्त स्वाभाविक आणि नैसर्गीक आहे. नौशाद किंवा श्रीनिवास खळे यांनी वारंवार शब्दांना चाल देण्याच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. खळेसाहेब एकदा विनोदाने म्हणाले होते -

"चाल आधी आणि शब्द नंतर म्हणजे झबलं शिवायचं आणि मग त्या झबल्याच्या मापाचं बाळ शोधत फिरायचं !".

नौशाद साहेबांचं सुद्धा याच अर्थाचं वक्तव्य आहे. ते म्हणतात - " धुनपर लफ्ज लिखना ये तो वही बात हो गई की पहले कफन सिलाऒं और फिर उस माप का मुडदा ढूंढो..!" भावसंगीत शब्दप्रधान असल्याकारणाने शब्द आधी आणि नंतर चाल हा न्याय य संगीतकारांना योग्य वाटतो.

मलाही अनेकवेळा या प्रश्नाला तोंड द्यावं लागलं आहे. खरंतर माझ्या आजवरच्या कारकीर्दीत मी चाल आधी लिहिली आहे आणि त्यावर शब्द लिहून घेतले आहेत असं अभावानेच झालं असेल...किंबहुना असा प्रसंग कधी आलाच नाही. आतापर्यंत माझ्याबाबतीत तरी पोर आधी मग झबलं असाच कायदा लागू पडला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली की, सावध होतो. आपण ज्या मार्गाने चालत आहोत तो एकच मार्ग खरा हे मला मान्य नाही. आपण म्हणतोय म्हणून किंवा आपल्याबाबतीत जे खरं आहे तेच अंतिम सत्य आहे हा विचार जरा भाबडाच असतो ! सत्यालाही पदर असतात, छटा असतात..!

खरंतर संगीतकारांनी या दोन्ही मार्गांनी उत्तमत्तोम गाणी दिली आहेत. एस.डी.बर्मन यांचं "पिआ तोसे नैना लागे रे", किंवा सलील चौधरी यांचं " ऒ सजना बरखा बहार आयी" ही दोन्ही गाणी चालीवर लिहून घेतली आहे. गाणी म्हणून त्यांचा दर्जा कुठेही गौण नाही.

चालीवर गाणी लिहून घ्यायची असली मग मात्र गीतकाराच्या प्रतिभेवर संगीतकाराला अवलंबून रहावं लागतं. चालीतनं मिळणारे संकेत अचूक टिपून गीतकाराला ते संकेत शब्दात पकडावे लागतात. त्यामुळे चाल आधी करताना, गीतकार चांगला असेल तर उत्तम नाहीतर सुरेख चालीमध्ये सामान्य शब्द भरल्यामुळे अनेक चाली चांगल्या असून त्यांची गीतं मात्र सामान्यच राहिली आहे.

शब्दांना चाल देण्याचा एक फायदा म्हणजे शब्दांचे संकेत घेऊनच चाल करता येते. एखाद्या निरागस मुलप्रमाणे आपण आपला हात कवितेच्या हातात दिला तर ती कविताच आपल्याला तिच्या चालीपर्यंत घेऊण जाते. हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.

याउलट चाली आधी करणारे संगीतकार म्हणतात की, गीत आधी लिहिलं नसल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या छंदांमध्ये आणि वॄतांमध्ये चालींचे नानाविध प्रयोग करता येतात. मला एक सातत्याने येणारा अनुभव म्हणजे गीतकार सांगतो की, मला चालीवर लिहिणं सोपं वाटतं. अशा वेळी मी गीतकाराला एक कच्ची चाल करून देतो मग शब्द लिहून झाल्यावर चाल बदलतो !

तात्पर्य कार तर - एकदा एखादं गाणं लिहून झालं की, ते हॄदयाला भिडतं की नाही ह एकच प्रश्न राहतो. बाळ गोंडस असेल आणि झबलं त्याच्यावर खुलून दिसत असेल तर आपण फक्त त्या बाळाचे लाड करावेत! झबलं आधी का बाळ आधी हा प्रश्नच तिथे निरर्थक ठरतो!

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.