Sign In New user? Start here.

* दाद..! *

मराठी | ENGLISH

 

* दाद..! *

 
kaushal katta

मी रूपारेल महाविद्यालयात शिकत असतांनाची गोष्ट आहे. कॉलेजच्या वार्षिक नियतकालिकासाठी मी एक कथा लिहिली होती. कथा चांगली झाली होती आणि मी मनातल्या मनात स्वत:वरच खूष होतो. मित्र कथा वाचून आवडल्याचं कळवत होते. मग मी विनयशीलपणे त्यांना म्हणायचो...

"अरे, हा तुमचा चांगुलपणा आहे. कथा इतकीही चांगली नाहिये!"
मग त्यावर कुणी -
"हा तुमचा विनय आहे.."असं म्हटलं की माझाही अहंभाव सुखावला जायचा!
मग एक दिवस आमच्या एक प्राध्यापिका रस्त्यात भेटल्या आणि म्हणाल्या -
"कौशल, तुझी कथा वाचली. छान लिहिली आहेस."
माझ्याकडे विनयशील उत्तराचं टेम्प्लेट तयारच होतं!
"छे! छे! मॅडम कथा ठीकठाकच आहे."
त्यावर त्या प्राध्यापिका चिडल्या. म्हणाल्या - "मी तुला मनापासून दाद देतेय...तू जर ती सन्मानाने घेशील का?"

मी ओशाळलो. खरंच समोरचा माणूस मनापासून दाद देतोय, आणि आपण मात्र किती विनयशील आहोत याचं प्रात्यक्षिक देतोय!मी निमूटपणे "धन्यवाद" म्हटलं. त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, "अरे दाद देताही आली पाहिजे आणि घेताही आली पाहिजे!"

मी या प्रसंगी चांगलाच धडा गिरवला. दाद घेताही आली पाहिजे हा मुद्दा माझ्या अंतर्मनावर चांगलाच बिंबवला गेला.

कलाकाराच्या आयुष्यात ‘दाद’ या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे यात शंका नाही. दाद ही कुठल्याही कलेला पूर्णत्व देत असते. चांगल्या कलाकाराचा खरी दाद हेरता येते. नुसतंच " वा! वा!" करणं म्हणजे दाद हा समज चुकीचा आहे. खूप लोक मोठ्यांदा, आक्रमक पद्धतीने दाद देतात. पण ती दाद अस्सल असेलच असं नाही. त्या उलट काही रसिक एक शब्द न उच्चारताही कलाकाराचं मनोबल वाढवणारी दाद देतात. मंगेश पाडगांवकर एकदा म्हणाले होते की, काही लोकांची दाद ही भोव-यासारखी असते. भोवरा स्तब्ध दिसतो, त्याचे रंगही दिसत नाहीत पण तो अत्यंत वेगात गोल फिरत असतो म्हणूनच! काही रसिक इतके रंगून जातात की ते स्तब्ध दिसतो की ते स्तब्ध होतात..भोव-यांसारखे. याचा प्रत्यय मला ब-याचदा आलाय. आम्ही आमच्या कार्यक्रमात ग्रेसांची एक कविता घ्यायचो. त्या गाण्याचं सादरीकरण झालं की टाळ्या वाजायच्या नाहीत. श्रोते गाण्याच्या वातावरणात बुडून जायचे. सभागृहात शांतत पसरायची. ही शांतताच त्या गाण्याची खरी दाद होती.

दाद देण्याला जाण लागतेच पण त्याहून अधिक दानत लागते. आणि म्हणूनच पोएट बोरकर म्हणतात -
"ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन शुद्ध व्हा!
सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा?"

 

कौशल इनामदार

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.